इराणमधील पुनरुज्जीवित  #MeToo चळवळ

इराणमधील पुनरुज्जीवित #MeToo चळवळ

आपले लैंगिक शोषण झाल्याची वाच्यता २० महिलांनी सोशल मीडियावर केल्यामुळे इराणमध्ये दुसरी #MeToo चळवळ सुरू झाली. या चळवळीने इराणचे सामाजिक आणि सांकृतिक वातावरण ढवळून निघाले आहे.

५० वर्षांत भारतात ४ कोटी ५८ लाख महिला ‘बेपत्ता’
भाजपसाठी स्त्रियांचे हक्क पुरूषधार्जिणेच!
२२ जून : महिला धोरणाची पंचविशी व आव्हाने

स्वातंत्र्य, समता तसेच वैयक्तिक अधिकार आणि हक्क मिळवण्यासाठी जगभर क्रांती, आंदोलने आणि चळवळी झाल्या आणि अजूनही होतात आहेत. बहुतांश आंदोलने, चळवळी कालानुरूप समूहमनात, जाणिवेत बदल घडवतात तसेच व्यवस्थेतही मोठा बदल घडवून आणण्यात सक्षम ठरतात, जसे अनेक देशात नागरी हक्कांचे आणि स्वातंत्र्य लढ्यांचे झाले.

मात्र शतकानुशतकांच्या अन्याय आणि दडपशाहीच्या लांच्छनास्पद इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या अनेक आंदोलनांना हळूहळू बदल घडून येण्याची वाट पाहावी लागते आणि आमुलाग्र बदल होण्यास खूप काळ तग धरावी लागते, उदाहरणार्थ वंशभेद किंवा वर्णभेद यावरील आंदोलने. अजूनही तो लढा पूर्णपणे संपलेला नाही. BLM (Black Lives Matte) हे अजूनही धुमसणारे जनआंदोलन एकविसाव्या शतकात वर्णभेद कायमचा मिटवण्यासाठी टाकलेले हे पुढचे ठाम पाऊल आहे.

अगदी असेच हजारो वर्षांचा दमन, दडपशाही, अन्याय आणि अनन्वित अत्याचारांच्या काळ्या इतिहासाची पार्श्वभूमी असणारे, मात्र अगदी वेगळे किंवा स्वतंत्र स्वरूप आहे असे वाटणारे एक जनआंदोलन २०१७ सालापासून उभे राहिले आहे. हे समग्र पुरुषजातीला चकित करणारे जनआंदोलन म्हणजे २०१७ साली अमेरिकेत सुरू झालेली  #Me Too ही चळवळ!

तीन वर्षांपूर्वी अमेरिकेत हार्वी विंस्टाईन या चित्रपट आणि माध्यम सम्राटावर लैंगिक अत्याचाराचे अनेक आरोप झाले आणि त्याचा उद्रेक होवून  #Me Too हे आंदोलन अमेरिकेत सुरू झाले आणि सार्‍या जगभर त्याचे लोण हा हा म्हणता पसरले. देशोदेशी बायका त्यांच्यावरील लैंगिक अत्याचार आणि छळ यावर सोशल मीडियात लिहू लागल्या. त्यांचा आवाज, त्यांची न्यायाची हाक न दडपता,  सक्षमपणे लोकांपर्यंत पोचवणारे एक मुक्त व्यासपीठ त्यांना मिळाले होते. काळ्या इतिहासाला वाचा फुटली आणि त्यामुळे पुरुषसत्ताक,  पुरुष प्रधान व्यवस्था असणार्‍या सगळ्या देशात हादरे बसले कारण सोशल मीडियाला वेसण घालणारी व्यवस्था नव्हती.  तसेच जगभरातील स्त्रियांनी त्या आंदोलनाला उचलून धरले किंवा पाठींबा निश्चित दिला.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेत न्याय मिळालायला जरा वेळ लागला. या चळवळीवर अनेक उलटसुलट चर्चा झाली. आरोप झालेल्या अनेक महिलांनी जो ठपका ठेवला होता,  त्याची खिल्ली उडवली गेली किंवा त्याची गांभीर्याने दाखल घेतली गेली नाही. हार्वी विंस्टाईन यांनी देखील सगळे आरोप फेटाळले मात्र पुरावे त्यांच्या विरुद्ध होते आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.

इतर देशात मात्र अपेक्षेप्रमाणे ही चळवळ म्हणूनच राहिली. फार कमी केसेस कोर्टात दाखल झाल्या. आणि कालांतराने अनेक देशात, जोरकसपणे सुरू झालेली ही चळवळ, त्यानिमित्ताने सुरू झालेला सार्वजनिक संवाद हळूहळू विरळ झाला.

पुढे काही अंशी या चळवळीची टिंगल झाली असली, अनेक आरोप हे संशयास्पद आहेत अशी ओरडही झाली. तरी या चळवळीने आपली पाळंमुळं आता घट्ट केल्याची, ती रुजल्याचे संकेत नुकतेच सुरू झालेले आणि भडकत असलेले इराणमधील  #Me too आंदोलन आहे.  ते तेथील न शमणारे वादळ बनले आहे.

त्यातही अत्यंत आश्वासक म्हणजे अनेक पुरुष आणि तरुण मुलगे इराणमधील या चळवळीत सामील झालेले आहेत.

इराणमधील ठिणगी

इराणमधील एका शैक्षणिक संस्थेत किव्हन इमाम वर्दी नामक इसमाने विद्यार्थिनींना मद्य पाजून, पोर्नोग्राफिक व्हिडीओज दाखवून त्यांना त्यांच्यावर बळजबरी केली. हा इसम तेहरान विद्यापीठाचा कला शाखेचा विद्यार्थी असून तो एक पुस्तकांचे दुकान चालवतो. डझनावरी विद्यार्थिनींनी ट्विटरवर जाहीर केले की त्यांना एकेकटे बोलावून,  त्यांना मद्य,  ड्रग्स देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार या इसमाने केले. कमीतकमी २० महिलांनीदेखील त्याच्यावर आरोप केला आहे की त्याने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. अखेर किव्हन वर्दी आणि त्याच्या एका साथीदाराला आता अटक करण्यात आली असून त्याच्यावर खटला सुरू आहे.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी  यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून यातील आरोपींना कडक शिक्षा द्यावी असे जाहीर केले आहे.

या लैंगिक शोषणामुळे इराणमध्ये प्रक्षोभ झाला आणि सोशल मीडियावर इराणी  #Me Too ने सध्या सामाजिक आणि सांकृतिक वातावरण ढवळून निघाले आहे.

इराणी स्त्रियांचे दुसरे Me Too आंदोलन

ऑक्टोबर २०१७ मधील  #me too चळवळीचे पडसाद इराणमध्ये देखील पडले होते. २०१८ मध्ये महझाद इलियासी (Mahzad Elyassi) या नावाच्या तरुणीचा एक लेख एका डावीकडे झुकलेल्या प्रतिथयश वृत्तपत्राने छापला. त्यात तिने २००० साली वयाच्या २१साव्या वर्षी तिच्याशी एका प्रसिद्ध इराणी दिग्दर्शकाने लैंगिकदृष्ट्या आक्षेपार्ह वर्तन केले होते, त्याचा प्रतिकार तिने कसा केला याचा वृत्तांत दिला होता. त्या लेखाला मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पुढे तिने असाही लेख लिहिला होता की इराणी समाज आणि त्यातील व्यक्ती म्हणून अशा घटनांना नीट हाताळण्याइतका सक्षम नाही. तिने असे खेदाने असेही लिहिले होते की MeToo ही फक्त गोर्‍या लोकांची, गोर्‍या लोकांसाठी असलेली चळवळ आहे.

२०२०च्या  ऑगस्टमध्ये मात्र सोशल मीडियावर असंख्य बायकांनी त्यांच्यावरील लैंगिक अत्याचार आणि छळ यावर मोठ्या प्रमाणावर लिहिले आहे. पूर्णपणे इराणी तरीही जागतिक असे या आंदोलनाचे स्वरूप आहे. आणि लिहिण्याचा ओघ अजूनही अजिबात थांबलेला नाही. काही स्त्री अभ्यासकांच्या मते सोशल मीडियावर हा स्फोट कधीतरी होणारच होता.

इराणमध्ये सध्या  “चला # हॅंशटॅगचे वादळ उभे करूया” हा संदेश जनमानसाने उचलून धरला आहे. बलात्कार म्हणजेच #Tajavaz, लैंगिक छळ  #Azar-eJensi किंवा पर्शियन भाषेतील #tajavoz, #tajavoz, #tarozjensi आणि #गुन्हेगार किंवा आरोपी म्हणजेच #Motajaves इत्यादि हॅंशटॅग सोशल मीडियावर आता वेगाने पसरत आहेत.

इराणी स्त्रिया आता धैर्याने त्यांच्या वेदना आणि दु:खाला मोकळेपणी वाट करून देतात आहेत.

सर्व स्तरातील आणि माध्यमातील महिलांचे Me Too आंदोलन

सगळ्या स्तरातील बायकांच्या त्यांच्या जोडीला माध्यमे, पत्रकारिता,  कला आणि चित्रपट क्षेत्रातील महिलांनी देखील त्यांच्या क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध पुरुष कलाकार,  पत्रकार यांनी केलेल्या सूचक वर्तन तसेच लैंगिक छळ,  अन्याय यावर आवाज उठवला आहे.

सारा ओमाताली (Sara Omatali) या रिपोर्टर महिलेने ट्विटरवर प्रसिद्ध चित्रकार अयादिन अघ्दश्लू (Aydin Aghdashloo) यांनी १४ वर्षांपूर्वी अत्याचार केला होता त्याचा साद्यंत वृतांत दिला. त्यावरून हे वादळ सुरू झाले.

ऑगस्टमध्ये दोन जगप्रसिद्ध इराणी कलाकारांची नावे जेव्हा अनेक महिलांनी घेतली तेव्हा, जे जगभर झाले ते तिथेही झाले. आरोप करणार्‍या महिलांना येनकेन प्रकारे प्रसिद्ध व्हायचे आहे, त्यासाठी त्या काहीही करायला तयार असतात, त्या कंड्या पिकवत असून त्या खोटे बोलतात आहेत असे सगळे अगदी टिपिकल आरोप करण्यात आले.

या असल्या आरोप किंवा प्रत्यारोपांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची पुरुषी आढ्यता, स्त्रियांचा जाणूनबुजून केलेला अपमान, अवमानाचा दर्प दिसून येतो असे अभ्यासक म्हणतात. त्यांच्या मते,  स्त्रियांवरील आरोपात एक प्रकारचा विशिष्ट पॅटर्नही दिसून येतो. त्याला पुरुषांद्वारे केला गेलेला विषारी अपप्रचार (male toxicity) असे देखील संबोधले जाते. तसेही,  जगभर स्त्रियांच्या बाबतीत अनेकदा आकस, संशय आणि द्वेषच व्यक्त झालेला दिसून येतो. त्याचे प्रतिबंब माध्यमात, जनचर्चेत देखील पडलेले दिसून येते. अनेक स्त्रीवादी अभ्यासकांच्या मते हा पॅटर्न,  हा विषारी अपप्रचार आणि आकस,  द्वेष दुर्दैवाने इतका खोलवर गेला आहे की तो जागतिक माध्यमांचा स्थायीभाव झाला आहे.

ही अशी विपरीत जागतिक परिस्थिती आणि मुळात एक मुस्लिम देश म्हणून तेथील स्त्रियांचे दमन करणारी तेथील समाज व्यवस्था अशा दोन मोठ्या प्रचंड अडचणींचा सामना करत इराणमधील  #Me Too ही चळवळ आता चांगली जोमाने फोफावते आहे.

मुस्लिम देशातील गुंतागुंत

इराण हा मुस्लिम देश. इतर मुस्लिम देशांप्रमाणे तेथे कायदे शरियानुसार आहेत. त्यानुसार बायकांना पोशाख करावा लागतो. केस देखील पूर्णपणे बांधून,  झाकून ठेवावे लागतात. समाज व्यवहारात फारसा मोकळेपणा,  खुलेपणा नाही. मद्य निषिद्ध आहेच. तसेच इतर बिगर मुस्लिम देशात असतो तसे लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवायला एक अलिखित सामाजिक,  सांस्कृतिक निर्बंधही आहेत. तसेच विवाहबाह्य संबंध देखील बेकायदा आहेत. समलैंगिक संबंध हा अपराध असून त्याला मृत्युदंडाची शिक्षा आहे.   सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बलात्काराचा आरोप सिद्ध झाला तर फाशीची शिक्षा आहे.

इराणी बायका पडद्यामागे राहणार्‍या आहेत,  सांस्कृतिकदृष्ट्या इतर देशांच्या मानाने जास्त दमन सहन करावे लागणार्‍या असल्या तरी त्यांच्यातील असंख्य बायका कष्ट करणार्‍या,  नोकरी करणार्‍या आहेत,  अर्थाजन करणार्‍या आहेत. त्यांनी व्यक्त केलेली लैंगिक अत्याचार,  छळाच्या दु:ख आणि वेदनांची जातकुळी मात्र अगदी जगातल्या समस्त महिलांची आहे.

त्यांच्या समाजात सांस्कृतिकदृष्ट्या असे सोशल मीडियावर व्यक्त होणे शिष्टसंमत नाही तरीही त्या भरूभरून व्यक्त होतात आहेत हे इराणच्या दृष्टीने क्रांतिकारी आहे. स्वत:ची अशी वैयक्तिक दु:खे सगळ्या जगासमोर व्यक्त करणे म्हणजे स्वत:चे एक प्रकारे एक वस्तुकरण करणे असे त्यांच्या समाजात समजले जाते.

तरीही इराणी स्त्रिया ज्या प्रकारे त्यांचा आत्तापर्यंत दडपलेला आवाज उठवतात आहेत त्यावरून एक वेगळी सामाजिक धार या आंदोलनाला आता प्राप्त होते आहे. पडद्यामागचे अन्यायी वास्तव त्यांनी एकमेकींच्या साहाय्याने संपूर्ण जगापुढे आणले आहे. . #MeToo च्या चळवळीतून त्यांनी स्वत:च्या वैयक्तिक अवस्थेला,  परिस्थितीला देशाच्या सामाजिक – सांस्कृतिक राजकारणाबरोबर जागतिक राजकारणाला जोडले आहे. आणि त्या सगळ्या प्रकारच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दमनाला आव्हान देत आहेत,  लढा देत आहेत,  हे नुसते आश्वासक नसून क्रांतिकारक असे तेथील अभ्यासकांचे मत आहे.

इराणी अभ्यासक मात्र पश्चिमेतील माध्यमांच्या बाबतीत सावधपणे बोलतात. त्यांच्या मते इराणी स्त्रियांचा हा लढा इस्लामिक राज्याविरोधी असल्याचा सूर पश्चिमेतील माध्यमात दिसून येतो. त्यांचे म्हणणे आहे की हे आंदोलन राष्ट्रविरोधी नाही तसेच ते कुणा एकाच्या राज्यव्यवस्थेविरुद्ध नाही. हे आंदोलन,  ही चळवळ, हा लढा पुरुषप्रधान,  पुरुषसत्ताक व्यवस्थेशी असलेला लढा आहे. आणि त्यामुळेच तो जागतिक आहे आणि त्याचे स्वरूप राष्ट्रीय नसून आंतरराष्ट्रीय आहे. त्यामुळेच संपूर्ण दडपशाहीत जगणारी, दमन केलेली स्त्री अशी इराणी स्त्रियांची पश्चिम माध्यमांनी उभी केलेली प्रतिमा त्यांना अमान्य आहे.

अतिशय महत्त्वाचे म्हणजे गोर्‍या लोकांनी ही चळवळ सुरू केली असली तरी त्यांनी जगातील इतरांचे म्हणजेच गोरे नसणार्‍या सगळ्यांचे “त्राते”  असल्याचा आव आणि आविर्भाव सोडून द्यावा असे तेथील अभ्यासक म्हणतात कारण त्यांचेही पाय याबाबतीत देखील मातीचेच आहेत.

त्यांच्या मते हे आंदोलन आणि चळवळ यशस्वी व्हायला खर्‍या आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि एकीची गरज आहे,  जिथे वैयक्तिक तसेच सामाजिक,  सांस्कृतिक,  धार्मिक आणि राजकीय बाबींच्या पलीकडे जाऊन बदल व्हायला हवा आहे.

मुलगे आणि पुरूषांचे मशिदीतील MeToo आंदोलन

#MeToo हे आंदोलन स्त्रियांनी सोशल मीडियावर उचलले तसेच #MosqueMeToo असा हॅंशटॅग देखील सुरू झाला. त्यावर मशिदी तसेच इतर धार्मिक स्थळात होणार्‍या लैंगिक अत्याचार आणि छळावर अनेक पुरुषांनी व मुलांनी लिहिले असे BBC वरील एका वृत्तात म्हटले आहे.

या वृत्तात एका मुलाने शाळेतल्या मुख्याध्यापकाने त्याच्यावर बळजबरी केल्याचा आरोप केला आहे. ट्विटरवर एका व्यक्तिने आपण एका मुलीचा विनयभंग केला अशी जाहीर कबुली दिली असून तिची माफी मागितली आहे. ट्विटरवर मुलींनी देखील आपल्या जवळच्या नातेवाइकांनी विनयभंग केला मात्र आपण आईवडिलांना सांगू शकलो नसल्याचे म्हटले आहे.

शाळांतील लैंगिक शिक्षणावर वाद

बीबीसीतील बातमीनुसार लहान मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचारांमुळे इराणमध्ये आता शाळांमध्ये लैंगिक शिक्षण देण्यात यावे की नाही यावर वाद सुरू आहे. इराणमधील विद्यापीठात लैंगिक शिक्षणाचे तास असतात.

इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी UN च्या शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाच्या मार्गदर्शक तत्वांकडे दुर्लक्ष करायला सांगितले असेही या बातमीत नमूद केले आहे. कारण त्यांच्या मते इराणचे हे पाश्चिमात्यीकरण करतात आहेत.

सोशल मीडियावर अनेक इराणी नागरिकांनी या धोरणावर टीका केली आहे. त्यांच्या मते शाळांमध्ये लैंगिक शिक्षण देण्यात यावे नाहीतर लहान मुलामुलींवर अत्याचार होण्याचा धोका अधिक आहे.

आकडेवारीच्या राजकीय दमनाचा इतिहास

इराणमध्ये लैंगिक अत्याचार, हल्ले यांची शासकीय आकडेवारी उपलब्ध नाही. तसेच तेथील सरकारने स्त्रियांवरील अत्याचारांविषयक कुठलाही डाटा जाहीर केलेला नाही.

अभ्यासक असेही म्हणतात की विवाहबाह्य संबंधात असणार्‍या स्त्रियांना गुन्हेगार ठरवले जाते. इराणच्या संसदेतील सामाजिक आयोगाचे संचालक सलमान खोदादादी यांच्यावर २०१७ साली जाहरा नाविदपुर या महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर तिला अनेक धमक्या येऊ लागल्या. पुढे तिचा मृत्यू संशयास्पदरित्या झाल्याचे ट्विटरवर अनेकांनी म्हटले आहे.

इतर अनेक देशात जसे असते तसेच बलात्कार झालेल्यांना कुठलीच मदत किंवा सुरक्षा दिली जात नाही. उलट त्यांना समाज अपराधी ठरवतो. त्यामुळे मूकपणे अन्याय सहन करण्याची वृत्तीच इथे दिसून येते.

२०१८ साली झैनाब सेकांवांद या महिलेला इराणमध्ये फाशी देण्यात आली. तिने तिच्या नवर्‍याची हत्या केल्याचा तिच्यावर आरोप होता. तेव्हा ती १७ वर्षाची होती. खटला सुरू असताना तिने सांगितले तिच्या दिराने तिच्यावर बलात्कार केला. पुढे तिच्यावर पोलिसांनीच अत्याचार केला. तिने आवाज उठवला मात्र तिला न्याय मिळाला नाहीच उलट फाशी दिली.

इराणमधील माध्यमे देखील अन्याय, अत्याचाराची आकडेवारी आणि घटना दडपतात. त्यांच्या मते पाश्चिमात्य जगतात बलात्कार आणि अत्याचार होतात कारण तेथे नैतिकतेचा अभाव आहे. त्याबरोबर महिलांच्या बाबतीत किती कडक नियम,  कायदे आहेत याचा फार अभिमान तेथील माध्यमे व्यक्त करतात.

महिला डोक्यापासून पायापर्यंत परिधानात असल्या तरीही ही स्थिती.  हिजाब घेतला नाही तर शिक्षा केली जाते. विवाहबाह्य संबंध बेकायदा आहेत त्यासाठीही महिलांनाच दोषी ठरवण्यात येते. तरुण मुली किंवा बायकांनी तोकडे कपडे घातले,  केस मोकळे सोडले आणि तर त्यांच्यावर बळजबरी झाली तर दोषी महिलांना ठरवले जाते इतकी अन्यायी न्याय व्यवस्था इराणमध्ये आहे.    

इराणमधील सामाजिक बदलांचे वारे

राजकीय,  धार्मिक,  सांस्कृतिक आणि सामाजिक दमनाचा इराणचा इतिहास आणि वास्तव असले तरी पुनरुज्जीवित झालेली  #MeToo ही चळवळ,  तेथील लैंगिकता आणि त्यानुषंगिक अत्याचार आणि छळाची खरी परिस्थिती दर्शवते. त्याबरोबर,  तेथील सामाजिक-सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यावरणात दिसणारा नैतिकतेचा आणि अन्यायी भूमिकेचा गुंता यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे याचेही वास्तव दाखवते.

इराणमध्ये सामाजिक,  सांस्कृतिक आणि कायद्यात बदल सध्या होणार नसण्याची शक्यता अधिक असली तरी अत्याचार आणि अन्याय सहन केलेल्यांनी आवाज उठवला आहे हे फारच आश्वासक आहे. तेथील अनेक अभ्यासक आणि नागरिकांनी या आंदोलनाचे स्वागत केले आहे. त्यांच्या मते स्त्रियाच पुरुषसत्ताक व्यवस्थेला आव्हान देऊन बदल घडवून आणतील. तशी परिस्थिती इराणमध्ये तयार होत आहे, हे आश्वासक आहे.

गायत्री चंदावरकर,या इन्स्ट्रक्शनल डिझाइन कन्सल्टंट असून पुणे विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0