ठोकशाहीला आवरा

ठोकशाहीला आवरा

शिवसेना नेतृत्वाने अशा बेभान कार्यकर्त्यांना कडक शब्दांत समज द्यावी आणि आपण अत्यंत नाजूक समयी राज्याचे नेतृत्व करत आहोत, याचे भान जपावे.

महाराष्ट्राची विस्कटलेली राजकीय घडी
खरे प्रश्न पुढे आलेच नाहीत
शिवसेनेत खासदार बंडाच्या पवित्र्यात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवणारे केवळ एक कार्टुन फॉरवर्ड केले म्हणून शिवसेना कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नागरिकास मारहाण केल्याची घटना निषेधार्ह आहे, यात शंकाच नाही. पीडित गृहस्थ कर्मधर्मसंयोगाने नौदलातले निवृत्त कर्मचारी आहेत, म्हणून त्याला राष्ट्रभक्तीचा रंग देण्याचा भाजपचा प्रयत्नही तितकाच निषेधार्ह आहे, यातही शंका असू नये.
या घटनेचे निमित्त साधून राज्य आणि केंद्रीय स्तरावरच्या भाजप नेत्यांनी महाराष्ट्रात गुंडाराज अवतरल्याची ओरड सुरू केली, काहींनी तर थेट राष्ट्रपती राजवटीची मागणीही केली आहे. हे सुद्धा अपेक्षित संहितेनुसारच म्हणायचे.

पालघर घटनेपासून हा खेळ सुरू झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, चीनशी असलेल्या लष्करी संघर्षाच्या काळात वेळात वेळ काढून संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांनी पीडित मदन शर्मा यांची आस्थेने विचारपूस केली. पाठोपाठ हा त्यांचा संवेदनशीलपणा, उद्धव ठाकरे सरकारच्या कारभाराबद्दलच्या नाराजीसह ट्विटरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला. हेही भाजपच्या कार्यशैलीस साजेसेच म्हणायचे.
इथे मुद्दा, सिलेक्टिव्ह होत गुंडागर्दीचा आरोप करण्याचा आणि संवेदनशीलतेचे प्रदर्शन मांडण्याचा आहे. म्हणजे, गेल्या सहा वर्षांत गोरक्षण, लव जिहाद, रोमियोविरोधी स्क्वॉडच्या नावाखाली देशभर जी हिंसा दिसली, तिला भाजप नेत्यांनी कधी गुंडाराज म्हटले नाही. आतापर्यंत गोरक्षणाच्या नावाखाली अखलाक, पहलू खान आदींच्या दिवसाढवळ्या हत्या झाल्या, पण आता जशी राजनाथ सिंहांनी पीडितांची चौकशी केली, तसे त्या वेळी एकाही मंत्र्याने अशी तत्परतेने, अशी संवेदनशीलता दाखवल्याचे ऐकिवात आले नाही.
पहलू-अखलाक सोडा, दाभोलकर-पानसरे-गौरी लंकेश या प्रतिष्ठित विचारवंत-लेखकांचे खून झाले, तेव्हा एकाही मंत्र्याच्या संवेदनशीलतेचे दर्शन घडले नाही. उलट, जयंत सिन्हा सारख्या उच्चशिक्षित मंत्र्याने अर्थातच शीर्षस्थ नेत्यांच्या सहमतीने हल्लेखोर गोरक्षकांचा हारतुरे घालून जाहीर सन्मान केला. निदान तेवढे आतापर्यंत तरी शिवसेना नेतृत्वाने जाहीरपणे केलेले नाही. जाहीर काय, खासगी काय,  तसे घडूही नाही

जमले तर शिवसेना नेतृत्वाने अशा बेभान कार्यकर्त्यांना कडक शब्दांत समज द्यावी आणि आपण अत्यंत नाजूक समयी राज्याचे नेतृत्व करत आहोत, याचे भान जपावे.

जाळ्यात अडकवण्याची एकही संधी भाजप सोडणार नाही, आपण स्वत:हून त्या सापळ्यात अडकायचे की नाही, हे एकदाचे आता शिवसेनेने ठरवून टाकावे. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण, कंगना रानौतचे भाजप पुरस्कृत डावपेच हे सारे शिताफीने परतवून लावण्यातच खरे शहाणपण आहे. अरे ला कारे, करताना जरब बसावी या उद्देशाने, समोरच्यास धडा शिकवू गेल्यास त्याला अंत नाही. ही राजकीयदृष्ट्या आत्मनाशाकडे नेणारी खात्रीशीर कृती आहे, हे शिवसेना नेतृत्वाने पुरते जाणावे. यात केवळ पक्षाचे नव्हे, राज्याचे भले आहे, हेही सांगणे न लगे. मुळात, परीक्षा केवळ संयमाची नाही, तर राजकीय प्रगल्भतेची आहे, हे सांगायला शिवसेना सत्तेच्या राजकारणात नवखी-नादान नक्कीच नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0