जगप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यू य़ॉर्क येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याशी आपला कोणताही संबंध नाही, रश्दींवर झालेला हल्ल्या हा त्यांनी व त्या
जगप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यू य़ॉर्क येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याशी आपला कोणताही संबंध नाही, रश्दींवर झालेला हल्ल्या हा त्यांनी व त्यांच्या पाठिराख्यांनी इस्लामवर केलेल्या टीकेची परिणिती आहे, अशी पहिली अधिकृत प्रतिक्रिया इराणने सोमवारी दिली. रश्दी यांच्याकडून इस्लामची निंदा झाली होती, त्यांनी टिकेच्या सर्व सीमा पार केल्या होत्या. त्यांची टीका दीड अब्ज मुसलमानांना दुखावणारी होती. रश्दी यांनीच लोकांमध्ये राग, संताप निर्माण केला असे इराणचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नासेर कन्नानी यांनी म्हटले. रश्दी यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराशी आपला कोणताही संबंध अथवा त्याची माहिती नाही, असेही इराणने स्पष्ट केले आहे.
इराणच्या सरकारी प्रसिद्धी माध्यमावर अमेरिकेची टीका
इराणची अधिकृत प्रतिक्रिया येण्याच्या आधी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकेन यांनी इराणच्या सरकारी प्रसिद्धी माध्यम ‘जाम-ई जाम’ वरही टीका केली. ‘जाम-ई जाम’ने रश्दींवर झालेला प्राणघातक हल्ला हा रश्दींनी केलेल्या गुन्ह्याची दैवाने दिलेली शिक्षा आहे, असे विधान केले होते. त्याच बरोबर रश्दी यांना आपला एक डोळा गमवावा लागणार आहे, हे म्हणजे सैतानाचा एक डोळा काढला गेल्याचे विधान या माध्यमावरून व्यक्त करण्यात आले होते. यावर ब्लिंकेन यांनी इराणची अशी प्रतिक्रिया घृणास्पद, धिक्कार करण्यायोग्य आहे, असे म्हटले होते. तर ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणने आपली प्रतिक्रिया मागे घ्यावी, यासाठी त्यांच्यावर दबाव आणावा अशी मागणी ब्रिटन सरकारला केली आहे.
रश्दी यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा
दरम्यान रश्दी यांच्या प्रकृतीत रविवारी किंचित सुधारणा झाली असून त्यांच्यावर झालेला हल्ला प्राणघातक असल्याने त्यांच्या शरीरात खोलवर दुखापत झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. रश्दी यांना दिलेला व्हेंटिलेटरही आता काढून टाकण्यात आला आहे, त्यांच्या स्वभावातील विनोदीपणा कायम असून व्हेंटिलेटर काढून टाकल्याने रश्दी यांच्या कुटुंबाला हायसे वाटत असल्याचेही रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
COMMENTS