इराकच्या पंतप्रधानांवर ड्रोन हल्ला

इराकच्या पंतप्रधानांवर ड्रोन हल्ला

इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल- कादिमी यांच्यावर ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातून कादिमी बचावले आहेत.

इराकचे  पंतप्रधान मुस्तफा अल-कादिमी यांच्या निवासस्थानावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनने रविवारी सकाळी हल्ला करण्यात आला. इराकचे पंतप्रधान या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. मात्र या हल्ल्यात काही लोक जखमी झाले आहेत. इराकी लष्कराने मात्र हा पंतप्रधानांच्या हत्येचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. बगदादच्या अत्यंत सुरक्षित ‘ग्रीन झोन’ भागात झालेल्या हल्ल्यात पंतप्रधानांचे सात सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत, असे इराकी अधिकाऱ्यांनी सांगितले.

या हल्लाचा अमेरिका आणि सौदी अरेबियाने निषेध केला आहे.

इराकी लष्कराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की या हल्ल्यामध्ये कादिमींच्या बगदाद येथील निवासस्थानाच्या ग्रीन झोनला लक्ष्य करण्यात आले.

बगदादच्या रहिवाशांनी परदेशी दूतावास आणि सरकारी कार्यालये असलेल्या ‘ग्रीन झोन’ मधून स्फोट आणि बंदुकीच्या गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकला. पाश्चात्य राजदूतांनी सांगितले की त्यांनी स्फोटांचा आणि गोळीबाराचा आवाज ऐकला.

पंतप्रधानांच्या हत्येच्या प्रयत्नाचा हा एक भाग होता पंतप्रधानांच्या निवासस्थानाला स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनने लक्ष्य केले होते. आता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलण्यात आली आहेत, असं सरकारडून एका निवेदनाद्वारे सांगण्यात आले.

हल्ल्यानंतर लगेचच पंतप्रधान अल-कादिमी यांनी ट्विट करून आपण सुरक्षित असल्याचे सांगितले. “वीर सुरक्षा दलांचे मनोबल आणि मनोधैर्याला देशद्रोह्यांचे रॉकेट धक्का देऊ शकत नाही. मी बरा आहे आणि आपल्या लोकांमध्ये आहे. देवाचे आभार आहे,” असे अल कादिमी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र इराण समर्थक बंडखोरांवर हल्ल्याचा संशय आहे.

गेल्या महिन्यामध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालांचा इराण समर्थक हशेद अल-शाबी शिया मिलिशिया समर्थकांनी निषेध केला होता. गेल्या महिन्यात झालेल्या इराकच्या संसदीय निवडणुकांचे निकाल या शिया बंडखोरांनी नाकारले आहेत आणि जवळपास महिनाभरापासून ‘ग्रीन झोन’च्या बाहेर तळ ठोकून आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा स्फोट झाला.

COMMENTS