अज्ञात आहे पण ही पोकळी नाही

अज्ञात आहे पण ही पोकळी नाही

सकाळच्या वर्गासाठी नेहमीप्रमाणे लॉग इन केले. अजून मुले यायची होती. कुणी आताच नुकतीच उठली असेल. ब्रश करून हातात कॉफीचा मग घेऊन बसली असेल. कुणी आळोखे-पि

शिवसेनेचा द्रौपदी मुर्मूंना पाठींबा
दत्ता इस्वलकरः गिरणी कामगार इतिहासाचे पर्व संपले
मुंबई किनारपट्‌टी मार्ग : सीआरझेड क्लिअरन्स न्यायालयाकडून रद्द

सकाळच्या वर्गासाठी नेहमीप्रमाणे लॉग इन केले. अजून मुले यायची होती. कुणी आताच नुकतीच उठली असेल. ब्रश करून हातात कॉफीचा मग घेऊन बसली असेल. कुणी आळोखे-पिळोखे देत अजूनही अंथरुणात बसली असेल. केस आवरत लॅपटॉप ऑन करत असेल. एखादा नीटनेटका आवरून बसला असेल आणि विडिओ ऑन करू का बंदच ठेऊ असा विचार करतच वर्ग जॉईन करत असेल. लॅपटॉपवर उघड्या असलेल्या  विंडोज बंद करतो. समोर स्क्रीनकडे एकदा पाहतो. मग, बाजूच्या गच्चीतून समोर निरभ्र आकाशाकडे  पाहतो. समोरचे आंब्याचे झाड हलकेसे झोके घेतेय. बाजूचा आंबा आंब्यांच्या ओझ्याने जडशीळ बसून आहे. पुढच्या घरातले गच्चीचे दार रात्रीपासून तसेच सताड उघडे आहे. आज काय बोलायचे त्याची उजळणी करत राहतो.

तेवढ्यात फोन वाजतो. फोनवर दादा.

“संध्याकाळी परडी सोडायची आहे. ध्यानात हाय नव्ह्?”

संध्याकाळी जायचे केव्हांचेच ठरलेय. दादालाही तसे आधीच सांगितलेय. पण, त्याचा नेहमीप्रमाणे आठवणीसाठी फोन येतो तसा आताही आला. श्री बाळूमामांवर नितांत श्रद्धा असणारा पापभिरू दादा डोळ्यासमोर उभा राहिला.

समोर स्क्रीनवर वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गात जॉईन करून घेतो. आताशा आम्ही सगळेच ऑनलाईन प्रकरणाला चांगले सरावलोय.

“गुडमॉर्निंग सर”

“गुडमॉर्निंग. हाऊ आर यु, निहाल.”

“गुडमॉर्निंग सर”

“हाऊ आर यू, निकिता.”

ओळखीचे आवाज येऊ लागतात. आवाज आणि मुले यांची संगती मी लावू लागतो. आवाज मनात साठवून ठेवतो. माणसांना न बघता त्यांच्या ओळखी ठेवण्याचे कसब मी अलीकडे वर्षभरात शिकून घेतलेय.

सकाळचा ताजा फ्रेश आवाज.

रात्री न झोपलेला आवाज.

अपरिहार्यतेचा आवाज.

आवाज ऐकवून बंद ठेवण्याचा आवाज.

सकाळची कॉफी न झालेला अधीर आवाज.

शिकण्याच्या जबाबदारीचा आवाज.

औपचारिकतेचा आवाज.

कुणीतरी दामटून बसवल्याचा आवाज.

हेडफोन लावून बोलण्याचा आवाज.

लॅपटॉप समोर बसून बोलण्याचा आवाज.

लोळत पडून बोलण्याचा आवाज.

कसेतरी बसून राहिल्याचा आवाज.

आजच्या वर्गात चर्चेसाठी घेतलेला विषय-

तुम्ही रस्त्यावर नाटक सादर करणारी माणसे पहिली आहेत काय? गटागटाने उभे राहून गाणी म्हणणारे लोक तुम्हाला माहिती आहेत काय? तुमच्या गावात- शहरात – शेजारात नाटके सादर करताना तुम्ही पाहिले आहे काय? तुमच्या घरात-मित्र-मैत्रिणींच्या घरात-नातेवाईकांकडून नाटकांबद्दल ऐकलंय काय?तुमच्या आजूबाजूला कोणते परफॉर्मन्स कल्चर आहे?

सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय १९ ते २१ वर्षे.

गुजराती- मराठी-हिंदी – तामिळ- तेलगू अशा भाषा जाणणारी मुले. अर्थात, फक्त काहीचजण अशा भाषा जाणतात. पण, सारेच जण इंग्रजी जाणणारे.

कुणी इंग्रजी भाषा बोलतो-जाणतो म्हणून भवतालापासून तुटलेलाच असतो असे नसते.

कुणी मराठी किंवा तेलगू भाषेत बोलते म्हणजे भवतालचे भान असणारीच असते असेही नसते.

कुणी वयाने तरुण असतो म्हणून तो उमदा-समकाळात जगणारा-उत्साही-सतर्क असतो असेही नव्हे.

सांगावात राहणारा दादा आणि पुण्यातल्या विद्यापीठात शिकणारी-देशविदेशात फिरलेली रिया आपापले खास असे विश्व घेऊन येणारे.

कुणी गाळात रुतलेले. कुणी आकाशात उडणारे. कुणी जमिनीला कान लावलेले. कुणी जिथे असतील तिथे वाहत्या नदीचा शोध घेणारे.

चर्चा होऊ लागते. प्रतिसाद येऊ लागतात.

“I haven’t seen any performances in my neighbourhood.”

“I have heard that there used to be a lively performing tradition of the jatra in my area in Bengal.”

“No, I haven’t seen a group playing instruments on the roadside.”

“I attended a local tamasha performance near Ahmednagar when I was a child. I went to a jatra-a yearly festival.”

“I have lived in a boarding school throughout. I attended some of the performances as a part of our school’s cultural activities.That’s all.”

I watch a lot of live shows on Netflix.”

“I attend live poetry sessions in a bar in my area.”

“I haven’t seen a single performance in my life.”

“There is no theatre in my area where I live.”

“I have always wanted to see plays. However, my parents say that I should focus on my studies for my career.”

“I asked my grandparents about the performance culture in my area. But, they also don’t know. I am sorry, sir.”

आपल्या आजूबाजूला होणारी नाटके हा विषय गेले काही वर्गांमधून मी चर्चेला घेतोय. पुस्तके कोणती वाचली, लेखक कोणते माहिती आहेत अशा प्रकारचा तो विषय. चाळीस-पन्नास मुलांच्या ग्रुप्स मध्ये एखाददुसरा मुलगा-मुलगी आपल्या गावात-आपल्या आजूबाजूला होणाऱ्या नाटकांबद्दल जाणून असते. त्यांच्या घरच्यांनाही फार काही माहिती नसते.

खरंतर, मला ऐकायचे असते-

“हो आम्ही सगळे जण मिळून नाटक पाहायला जातो.”

“आमच्या घरासमोर कुणी एक गाणारा येतो. त्याचा आवाज नेहमी कानावर पडत असतो.”

“माझे आजोबा त्यांच्या लहानपणीच्या नाटकांबद्दल सांगतात.”

“माझ्या घरासमोर थिएटर आहे.”

पण, असे कमी ऐकायला मिळत नाही. तरीही मी हा विषय चर्चेला घेतो कारण, बऱ्याच जणांप्रमाणे माझेही कान आशेचे सूर ऐकायला उत्सुक असतात. मागच्या वर्षी कोरोना प्रकरण सुरू झाले आणि मी घरून काम करायला लागलो तेव्हा वासुदेव आमच्या इमारतीखाली आला होता. योगायोगाने, त्याच वेळेस मी लोकपरंपरांविषयी बोलत होतो. वासुदेवाचे गाणे त्यावेळी वर्गाला ऐकवले होतो. त्यानंतर वासुदेव परत दिसला नाही. कोरोनाने त्याला घरी बसवले असणार.

अलीकडे रघुवीर खेडकर आणि मंगला बनसोडेंची मुलाखत यु-ट्यूब वर ऐकली.

वाताहत. परवड. उखडले जाणे.

मुलांबरोबर पंडवाणी करणाऱ्या तिजनबाईंची मुलाखत शेअर केली.

आम्ही एकत्र त्यांना स्क्रीनवर पाहत राहिलो.

“चिरंतन काय असते, आशुतोष?” कधीकाळी लीलाताईंनी कोल्हापुरात हा प्रश्न विचारला होता. परत परत तो प्रश्न मनात येत राहतो.

चिरंतनाची ओढ. तात्पुरतेपणाची आस. बदलाचे अपरिहार्यपण.

दुपारचे जेवण आवरतो. स्वयंपाकघर स्वच्छ करतो. पंतप्रधानांना लोकांसमोर खुलेआम बोलताना पाहतो. त्यांनी दिलेले सोशल डिस्टंसिंगचे डोस घेतो. फक-फेक म्हणतो. डोळे मिटून पडून राहतो. बाजूला पडलेल्या आयपॅडवर इंस्टाग्राम उघडतो. कुठल्यातरी वर्तमानपत्रातली कोरोनाची बातमी वाचतो. फेसबुकवर सायको डॉक्टरने टाकलेली जजमेंटल पोस्ट वाचतो. आयपॅड मिटवतो. गॅसवर चहा होतो. कप-गाळणे-पातेले बाजूला ठेवतो.

कारमध्ये जगजीतसिंग “होशवालोंको को खबर क्या..” गात असतो.

आजूबाजूचं सगळं जग विसरविण्याची ताकद असलेला शेतावरच्या हिरव्यागार आसमंतात शिरतो. उजव्या बाजूला वांग्याचा बहर. समोर गुढघ्यापर्यंत वाढलेला ऊस. समोर नजरेच्या टप्प्यातली विहीर.

विहिरीत परडी वाहायची तयारी.

डोक्यावर प्रसादाची बुट्टी.
खांद्यावर परडी.
पायात पाय करणारे पोर.
तिच्या काखेत ती.

कवितेची ओळ बांधावरून सरकत राहते.

शांताबाई कालच सौंदत्तीला जाऊन आल्या. येताजाता भेटतील त्या देव-देवळांना भेटी देऊन आल्या. सुखरूपपणासाठी साकडे घालून आल्या. त्यांच्या श्रद्धाळू डोळ्यांनी विहिरीत डोकावताच निरंजन पेटल्याचा भास झाला. सारे शांत. अव्यक्ताची भाषा विहिरीतल्या पाण्याची धीरगंभीर लहर बोलत होती.

परडी मांडली. त्यावर नैवेद्य ठेवला. पुरणाचे दिवे लागले. उदबत्ती दरवळली. नारळ वाढवला.  हलक्याशा चांगभलंच्या गजरात परडी पाण्यावर तरंगू लागली.

“परडी सोडली की कसं बेश्ट वाटतं. कुणबी इकडं यायची टाप नाही.” कुणीतरी बोललं. जणू सारं विश्व् पाण्यावर तरंगत होतं. विहिरीने चढउताराच्या या काळातली खळबळ आपल्या पोटात लपवली होती असे वाटले.

सकाळचे व्हर्च्युअल जग रोमँटिक वाटेल. परडी सोडणे मेलोड्रॅमॅटिक वाटेल. स्वप्नाळूही. सुचिता खल्लाळला वाटते तसे हा  “चौकटीला न पेलवणारा मजकूर” असेल. पण, तरीही, ती म्हणते, “मी लिहू पहातेय नेटाने”. म्हणून, डिस्टोपिया दूरवर, त्या-तिथे-त्यांच्या-त्या-तिथे राहतो. कारण, “मी लिहिलेल्या ओळीं / कदाचित मी गवसेन ओळींमधल्या /असंख्य रिक्त को-या अवकाशात.”(चौकटीला न पेलवणारा मजकूर, सुचिता खल्लाळ, हाकारा, जुलै, २०१७.)

अज्ञात आहे पण ही पोकळी नाही. भरलेली नाही पण शून्यही नाही.

घरंगळून टाकणाऱ्या निसरड्या अवकाशात आपल्या बाहेरचे आत घेताना अंधार दिसला तरी परडीवरचे दिवे मिणमिणत राहिलेले मी पाहिले त्या दिवशी पाहिले.

आशुतोष पोतदार नाटककार, कवी, कथालेखक  आणि साहित्य – संस्कृतीचे अभ्यासक आहेत. ते फ्लेम युनिव्हर्सिटी, पुणे येथे साहित्य आणि नाटकाचे अध्यापन करतात.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0