विलक्षण संशोधक जेन गुडाल

विलक्षण संशोधक जेन गुडाल

‘My life with Chimpanzee’ आणि ‘In the shadow of man’ हे जेन गुडाल यांचे दोन आत्मचरित्रात्मक ग्रंथ जगभर नावाजले गेले आहेत. त्यांचे नाव यंदाच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी चर्चेत आहे. जेन यांनी चिंपांझींसंबंधी भरपूर संशोधनात्मक लेखन केले असले तरी त्यांच्या “माणसाने निसर्गाशी युद्ध पुकारल्यासारखे वर्तन न करता, निसर्गासोबत एकात्मतेने आणि एकोप्याने राहावे”, या विचाराला नवसंजीवनी मिळेल अशा धारणेतून त्यांचे नांव जगभरातून नोबेल समितीला सुचविण्यात आले होते.

सुदानमध्ये लोकशाहीची पहाट होणार का?
अज्ञात पूर्वज : आफ्रिकन डीएनए अभ्यासातून रहस्यमय शोध
अंतहिन आक्रोशाचे प्रतिध्वनि

येत्या ऑक्टोबर महिन्यात नोबेल पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर होतील. नोबेल समितीसाठी सध्याचा काळ हा नामांकन झालेल्या व्यक्ति वा संस्थांच्या कार्याचा अभ्यास करून अंतिम यादी बनविण्याचा काळ आहे. नोबेल पुरस्कार साहित्य, विज्ञान आणि तिच्या उपशाखा, अर्थशास्त्र, सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रातील कार्यासाठी देण्यात येतो मात्र यांतही ‘नोबेल शांतता पुरस्कार’ विशेष सन्मानाचा समजला जातो. यावर्षीचा ‘नोबेल शांतता पुरस्कार’ हा ज्येष्ठ प्राणी-संशोधक आणि लेखिका जेन गुडाल यांना मिळण्याची शक्यता जगभरातून वर्तविली जात आहे. वास्तविक पाहता नोबेल समिती कधीही संभाव्य विजेते अथवा नामांकित व्यक्तींची नावे पुढील पन्नास वर्षांपर्यंत जाहीर करत नाही. पण या पुरस्कारांसाठी जगभरातून जे अनुमान लावले जातात; ते आजवर मोठ्या प्रमाणावर खरे ठरत आले आहेत.

या वर्षीच्या ‘नोबेल शांतता पुरस्कारा’साठी जेन गुडाल यांचे नाव सर्वाधिक चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, नोबेल समितीने पात्र व्यक्तींकडून जेव्हा पुरस्कारासाठी नामांकन सादर करण्याचे आवाहन केले; त्यावेळी जगभरातून अनेक मोठे नेते, संशोधक, माजी नोबेल पुरस्कार विजेते आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी यंदाचा पुरस्कार जेन गुडाल यांना देण्यात यावा, अशी मागणी पत्रांद्वारे नोबेल समितीला केली.

जेन गुडाल यांना हा पुरस्कार मिळाला; तर “माणसाने निसर्गाशी युद्ध पुकारल्यासारखे वर्तन न करता, निसर्गासोबत एकात्मतेने आणि एकोप्याने राहावे”, या विचाराला नवसंजीवनी मिळेल अशा धारणेतून त्यांचे नांव नोबेल समितीला सुचविण्यात आले होते.

जेन गुडाल यांचे नांव अर्थात नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचविण्यात आले आणि त्यांना तो मिळावा एवढे त्यांचे कार्य खचितच महत्त्वाचे आहे. मात्र त्यांनी लिहिलेल्या ग्रंथसंपदेसाठी त्यांना स्वतंत्रपणे साहित्याचा नोबेल पुरस्कार देण्यात यावा एवढे महत्त्वाचे लिखाण त्यांनी केले आहे.

जेन गुडाल आपल्याला ठाऊक आहेत ते मुख्यत: चिंपांझींवरील त्यांनी दीर्घकाळ केलेल्या संशोधन आणि लेखनामुळे. त्यांचे ‘My life with Chimpanzee’ आणि ‘In the shadow of man’ हे दोन आत्मचरित्रात्मक ग्रंथ जगभर नावाजले गेले आहेत. जेन यांनी चिंपांझींसंबंधी भरपूर संशोधनात्मक लेखन केले असले तरी त्यांच्या लेखनात कुठेही बोजडपणा वा किचकटपणा नाही. सर्वसामान्य वाचकांना रुचेल, समजेल अशा सुबोध शैलीत त्यांनी लेखन केले. यामुळेच त्यांची उपरोल्लेखित पुस्तके लहान वयातल्या वाचकांमध्येही लोकप्रिय ठरली आहेत.

‘My life with Chimpanzee’ या विलक्षण सुंदर पुस्तकात जेनने आपल्या संशोधनाची कथा सांगितली आहे. जेनला अगदी लहान वयापासून प्राण्यांच्या सहवासात राहणं आवडायचं. वयाच्या सातव्या वर्षी जेनच्या आजीनं तिला आफ्रिका देशाची ओळख करून देणारं एक पुस्तक नाताळला भेट दिलं. ते पुस्तक वाचल्यानंतर जेनने आपणही कधीतरी आफ्रिकेला जायचं असं ठरविलं होतं. त्यानंतर जेन आफ्रिका आणि तेथील जैव-विविधतेसंबंधी मिळेल ती पुस्तकं अधाशासारखी वाचू लागली. त्यातून तिला आफ्रिकेची ओळख तर होत होतीच; शिवाय पुस्तकांचे समृद्ध दालनही तिच्यासमोर खुले होत होते. वाचनासंबंधी आपल्या आत्मचरित्रात जेनने लिहिले आहे; “मला जेव्हा एखाद्या गोष्टीमुळे फार दु:ख व्हायचं, तेव्हा मी पुस्तक वाचायला घ्यायचे. आईनेच मला तसं शिकविलं होतं. ती म्हणायची; त्यामुळे तुला दु:खाचा विसर पडेल, किमान पुस्तक तुझ्या हातात आहे तोवर तरी. पुस्तक हातात घेतल्यावर मात्र मला फारसं वाईट वाटायचं नाही. आजही मला कशाने अतीव दु:ख झालं तर मी पुस्तकांकडेच वळते.”

पुढे जेनचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने अनेक प्रकारच्या नोकऱ्या केल्या. सहा महिने एका लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी केली. तिला ते काम आवडतही असे. नंतर काही काळ ऑक्सफर्ड विद्यापीठात तर काही काळ एका फिल्म स्टुडिओमध्येही तिने काम केलं. जीवन तिच्या गतीने जात राहिलं. पण जेनच्या आफ्रिकेला जायच्या स्वप्नाचं काय? जेन ते स्वप्न कधीच विसरली नव्हती. ती जे म्हणून काम आजवर करत आली होती; त्यातून केवळ काळाचा एक तुकडा जगून काढत होती. आफ्रिकेला जायच्या स्वप्नाने तिच्या मनात कायमचे घर केले होते. ती फक्त संधीची वाट पाहत होती. तशी संधी येईल असा तिला ठाम विश्वास होता. लवकरच तशी संधी जेनला प्राप्तही झाली.

जेनला एके दिवशी तिची शाळेतील मैत्रीण क्लोचे पत्र मिळाले. क्लोच्या आईवडिलांनी केनियामध्ये मोठी जमीन खरेदी केली होती. आणि तिथं येण्यासाठी क्लोने जेनला आमंत्रित केलं होतं. हा एक चमत्कारच होता. शाळा संपल्यानंतर जेनचा क्लोशी काहीच संपर्क नव्हता की कधी भेट झाली नव्हती आणि आज अचानक तिने केनियाला जेनला येण्याचे निमंत्रण दिले होते. जेनला हे सारे स्वप्नवत वाटत होते. आणि जेन ही संधी नक्कीच सोडणार नव्हती. पण त्यासाठी पैशांचा प्रश्न होता. जेनने एका हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी केली. पुरेसे पैसे जमविले आणि तिच्या स्वप्नातील भूमीकडे प्रस्थान केले. आफ्रिका.

आफ्रिकेत तिने क्लोच्या फार्मवर काही दिवस काढले. पण तिला परत जायचं नव्हतं. ती आफ्रिकेतच काम करणार होती. एव्हाना आिफ्रकेलाच तिने तिचं सर्वस्व मानलं होतं. तिथे तिला लुईस किले या संशोधकाला साहाय्यकाची गरज असल्याचं समजलं. तिने त्यासाठी मुलाखतही दिली. मात्र तिच्या निवडीविषयी ती साशंक होती. संशोधनासाठी आवश्यक असणारे औपचारिक शिक्षण तिने पूर्ण केले नव्हते. पण लुईसला शिक्षणापेक्षा प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या साहाय्यकाची गरज होती. त्याने जेनला आनंदाने हे काम देऊ केलं. जेनने लुईससोबत काम करणं सुरू केलं; तो काळ जेनसाठी फार महत्त्वाचा काळ होता. तिथे जेनला प्राण्यांसंबंधी खूप काही शिकायला मिळत होतं. लुईस जेनसोबत नेहमी ‘तंगानिका’ येथील सरोवराच्या आजूबाजूला राहणाऱ्या चिंपांझींविषयी बोलत असायचा. चिंपांझींवर आजवर कुणी गंभीर संशोधन केलं नव्हतं. लुईसला त्याची नितांत गरज वाटत होती. त्याला आदिमानवाच्या जीवनात फार रस होता. चिंपांझी हे जैविकदृष्ट्या मानवाच्या सर्वात जवळचा प्राणी असल्याने म्हणा की मानवाच्या उत्क्रांतीमधील तो एक दुवा होता म्हणून म्हणा; पण चिंपांझींविषयी अधिकाधिक माहिती मिळवून आदिमानवाच्या जीवनाविषयीच्या आपल्या ज्ञानात मोलाची भर पडेल असं त्याला वाटत होतं. हे सारं तो जेनला एका विशिष्ट हेतूने सांगत होता. आणि जेनलाही नेमकं तेच हवं होतं.

क्रेडीट डब्ल्यू एल आर एन

क्रेडीट डब्ल्यू एल आर एन

पण तिची निवड आणि प्रत्यक्ष कामाला सुरवात या दोन घटनांत एक वर्षाचा काळ जावा लागला. अनेक अडचणी पार करून जेनने प्रत्यक्ष कामाला सुरवात केली तेव्हा तिला कोण आनंद झाला. त्या दिवसाविषयी तिने नंतर लिहिले; “माझ्या आयुष्यातील तो सर्वात आनंदी दिवस होता. मी आता कुठल्याही मानवी वस्तीपासून दूर अशा आफ्रिकेच्या जंगलात होते. आजूबाजूच्या कभिन्न काळोखात मला फक्त जंगली प्राण्यांचाच काय तो शेजार होता. केवळ मुक्त जंगली प्राणी. हेच तर मला हवं होतं. इथं येण्याचं स्वप्नच तर मी आयुष्यभर पाहत आले होते.”

प्राण्यांचा अभ्यास आणि निरीक्षण करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट होती त्यांचं जवळून निरीक्षण करणं. पण चिंपांझींना तिचा सुगावा जरी लागला तरी ती झाडांत दिसेनाशी होत असत आणि जेन तिथून जाईतो पुन्हा बाहेर येत नसत. तेव्हा दुरून निरीक्षण करणं हा एकच मार्ग तिच्यासमोर होता; पण त्याने फार काही हाती लागत नसे. हळूहळू त्यांना जेनच्या अस्तित्वाची सवय होऊ लागली. जेन त्यांच्यासाठी कधी एखादं फळ घेऊन येत असे तर कधी एखादी नवी वस्तू ज्याने आकर्षित होऊन त्यांतील काही वानरे तिच्या जवळही येऊ लागली होती. या गोऱ्या बाईपासून आपल्याला कसलाच धोका नाही असा विश्वास चिंपांझींमध्ये निर्माण करण्यात ती यशस्वी झाली. पण हे काही एका दिवसात घडले नाही. सुमारे दोन वर्षाहून अधिक काळ यासाठी जावा लागला. मात्र त्यानंतर तिच्या संशोधनाचा मार्ग पुष्कळच सुकर झाला. एकदा ती ज्या कळपाचं निरीक्षण करत होती, त्या कळपातील मादीने आपली नवजात पिले जेनला दाखविण्यासाठी तिच्या कॅम्पजवळ आणली. जेनने तो भावबंध आयुष्यभर जीवाशी सांभाळला.

चिंपांझींसंबंधी तिला जशा अनेक गोष्टी समजू लागल्या तसे मानवाबरोबर असणारी त्यांच्यातील साम्ये पाहून ती अचंबित झाली. जेन निर्भीड आणि हाडाची संशोधक होती. निर्मनुष्य अरण्यात रात्ररात्र ती  चिंपांझींच्या कळपाचं निरीक्षण करत होती. काही जीवावर बेतणारे प्रसंग आले. पण जेनने न डगमगता आपले संशोधन कार्य पुढे नेले. त्या संशोधनातूनच जेनने आधी ठाऊक नसलेल्या अनेक गोष्टी जगासमोर आणल्या. त्यासंबंधी तिने ‘My life with Chimpanzee’ मध्ये लिहिले आहे.

एकदा एक चिंपांझी गवताची काडी घेऊन जमीन उकरत असताना तिला दिसून आला. तो तिथून एक प्रकारचा कीटक बाहेर काढून तोंडात टाकायचा. असं खूप वेळ चाललं. नंतर ती काडी मोडली. चिंपांझीने दुसरी एक गवताची काडी घेतली. त्यावरील पाने खुडून काढली आणि पुन्हा ती काडी जमिनीत खुपसली. जेन ते दृश्य अवाक होऊन पाहत राहिली. याआधी माणूस सोडून इतर कुठला प्राणी हत्यारांचा वापर करत नाही असं समजलं जात असे. ते खरं नसल्याचं जेन प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहत होती. चिंपांझी मांसाहार करतात हेही जेननेच प्रथम शोधून काढलं. एका चिंपांझीच्या कळपाला मांस खाताना तिने कॅमेऱ्यात कैद केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, चिंपांझींमध्येही माता आणि पिल्लांत दृढ भावबंध असतात हे तिने सिद्ध केलं. एका पिलाची आई गेली तेव्हा तिचं मूल तिच्या प्रेताशेजारून हलायला तयार नव्हतं. पुन्हापुन्हा ते पिल्लू आईला हलवून जागं करू पाहायचं. आपली आई आता पुन्हा कधीच जागी होणार नाही हे ध्यानात आल्यावर पिल्लाने अन्न-पाणी सोडून दिलं आणि दोन आठवड्यांतच मरून गेलं. आई आणि मुलांतील असे स्नेहबंध फक्त माणसातच असतात या समजुतीला तिने फाटा दिला. अशा अनेक गोष्टी जेन चिंपांझींच्या सहवासात शिकली. या साऱ्या निरीक्षणांतून ती केवळ चिंपांझी या प्राण्याविषयी शिकत नव्हती तर आदिमानवाच्या विश्वाशी जुळवून घेण्याच्या पहिल्यावाहिल्या प्रयासांना पाहत होती.

‘My life with Chimpanzee’ या पुस्तकात जेनने हे सारे अतिशय सुंदर भाषेत कथन केले आहे. पुस्तकाचे अखेरचे प्रकरण भूतदयेने आणि मानवतावादाने ओतप्रेत भरलेले आहे. मानवाच्या आद्य पूर्वजापासून सुरू झालेल्या जेनच्या प्रेमाचे वर्तुळ चिंपांझीसोबतच समग्र प्राणिमात्राला एवढेच नव्हे तर वृक्षांनाही कवटाळून विस्तारले आहे.

अभिषेक धनगर, पी.व्ही.पी.आय.टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बुधगांव येथे साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1