संवैधानिक मूल्याची पेरणी करणारा ‘जय भीम’

संवैधानिक मूल्याची पेरणी करणारा ‘जय भीम’

न्याय, समता, स्वातंत्र्य, आणि बंधुता ही संवैधानिक मूल्य ‘जय भीम’ सिनेमात पेरली गेली आहेत. अहिंसेच्या मार्गाने संवैधानिक अधिकार वापरून लढलेला न्यायिक लढा म्हणजे ‘जय भीम’.

भारतीय इतिहासामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी सुसंगत आणि राज्य घटनेतील मूल्यांवर आधारित सिनेमा यायला अनेक दशकं जावी लागली. विशेष असे की ‘जय भीम’ शीर्षकाने तो वंचितांचे प्रश्न उपस्थित करतो आहे. ‘जय भीम’ हा उद्घोष केवळ आंबेडकरवादी एकमेकांना अभिवादनपर संबोधन करतात.

या पूर्वी दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीयांच्या जीवनावर आधारित सिनेमे आलेले आहेत. मात्र ते उच्चजातीय सिनेमा निर्मात्यांच्या वंचित समूहाप्रती असलेल्या सहानुभूतीपूर्व दृष्टिकोनातून आले आहेत. या सिनेमात वंचितांचे प्रतिनिधित्व हा कोणी तरी दुसरा व्यक्ती करत असतो, ज्याला वास्तवाशी आणि वंचित लोकांच्या जीवनाशी काही संबंध नसतो. साहजिकच त्याला दलित आदिवासी आणि मागासवर्गीयांचे जातीयतेचे अनुभव केवळ कल्पनेने मांडावे लागतात.

भारतात अछूत कन्या (१९३६), सुजाता (१९५४), अंकुर (१९७४), बँडिट क्वीन (१९९४), सद्गती (१९८१), दामुल (१९८५), आरक्षण (२०१२), आर्टिकल 15 (२०१९) आदी, असे सिनेमे निर्माण झाले आहेत. मात्र आंबेडकरवादी दृष्टिकोनातून सिनेमा निर्माण झाला तो केवळ दलित, वंचित समूहातील सिनेमा निर्मात्यांकडून आणि म्हणून वंचित कलावंत सिनेमात यायला अनेक दशकांचा कालावधी जावा लागला. आणि याची सुरुवात प्रादेशिक सिनेमा निर्मात्यांनी केली आहे. मराठी, तामिळ, आणि विशेषतः दक्षिण भारतीय सिनेइंडस्ट्रीने आंबेडकरवादी अथवा वंचितांच्या जात जाणिवा प्रामुख्याने दाखवायला सुरुवात केली. पा. रंजित एक असे दाक्षिणात्य सिनेमा इंडस्ट्रीतले नाव आहे. ज्याने मद्रास (२०१४), काला (२०१८) आणि सरपट्टा परंबराई (२०२१) सारखे प्रसिद्ध सिनेमा आंबेडकरवादी दृष्टिकोनातून निर्माण केले. मराठीत नागराज मंजुळे यांचे पिस्तुल्या (२००९), फॅन्ड्री (२०१३), आणि सैराट (२०१८) हे चित्रपट दलित-वंचित- मागासवर्गाचे जीवन नवदृष्टीकोनातून परिवर्तनासाठी दिशा निर्देश करणारे आहेत. हिंदी सिनेमा मात्र यापासून दूर राहिला आहे. सध्यस्थितीत मात्र काही प्रमाणात वंचितांच्या विषयांना हाताळण्याचा अयशस्वी प्रयत्न होत आहे.

बॉलीवूडला जे जमलं नाही ते प्रादेशिक सिनेमाने करून दाखवलं आहे. विशेषतः दाक्षिणात्य सिनेनिर्मात्यांनी हे धाडस केलं आहे. त्याची अनेक कारणे आहेत. त्या पैकी एक म्हणजे पेरियार आणि त्यांच्या विचाराचा असणारा समाजावर पगडा. ज्या पद्धतीने पेरियार यांच्या वैचारिक दृष्टिकोन तिथल्या राजकारणात रुजला आहे, अगदी त्याच प्रमाणे सांस्कृतिक आणि व्यावहारिक जीवनात ही त्यांच्या विचाराचा प्रभाव आहे. आणि म्हणून तिथे असुरन (२०१९) सारखा सिनेमा बनतो आणि हिट होतो. कर्णन (२०२१) वंचितांचे प्रश्न प्रखरतेने दाखवतो.

असे चित्रपट प्रस्थापित उच्चभ्रू निर्मात्यांच्या विशिष्ट प्रकारच्या सिनेमा रचनेला आव्हान देत आहे. अशा चित्रपटांना, त्यातील कलाकारांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जात आहे.

धनुष्यला असुरन (2019) साठी बेस्ट ऍक्टरचा नॅशनल अवॉर्ड मिळाला, तर नागराज मंजुळेला सलग तीन वेळा नॅशनल अवॉर्ड्सने सन्मानित केले आहे.

‘जय भीम’ दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीचा सुपरस्टार असलेल्या सूर्य या निर्माता-अभिनेत्याचा चित्रपट आहे. ‘जय भीम’ या अभिवादनपर शब्दांना सूर्याने विशिष्ट समाजापुरते मर्यादित न ठेवता वैश्विक केले आहे. चित्रपटात ‘जय भीम’चा नारा, जयघोष कुठेही नाही. पण त्याचे अस्तित्व दिसून येते. न्याय, समता, स्वातंत्र्य, आणि बंधुता ही संवैधानिक मूल्य ‘जय भीम’ सिनेमात पेरली गेली आहेत. अहिंसेच्या मार्गाने संवैधानिक अधिकार वापरून लढलेला न्यायिक लढा म्हणजे ‘जय भीम’.

नागरी जीवनापासून हजारो मैल दूर असणार्या आदिवासी समाजाच्या संघर्षाची ही कहाणी आहे. या देशातला कायदा आणि सुव्यस्थेतेचे पालन करणारी व्यवस्थाच जेव्हा कायद्याचा दुरुपयोग करते तेव्हा वंचितांनी अन्यायाच्या विरोधात उभे राहून दंड ठोकून जय भीम केला पाहिजे, असे हा सिनेमा सांगतो.

‘जय भीम’ प्रतिकांनी भरलेला आहे, ही अशी प्रतीके आहेत जी अन्यायाविरोधात लढायला शिकवणारी, आपल्या अधिकाराची जाणीव करून देणारी, विवेकवादी बनवणारी, समतेची शिकवण देणारी आणि अहिंसा आणि शांतीचा मार्ग दाखवणारी मार्क्स, पेरियार, आंबेडकर, आणि बुद्ध यांचा वारसा सांगणारी आहेत.

‘जय भीम’ शोषितांचा, वंचितांचा, पीडितांच्या जो जो अन्यायग्रस्त मुख्य धारेपासून दूर फेकले गेलेले समूह आहेत, त्यांचा सगळ्यांचा मुक्तीचा नारा  ‘जय भीम’ हाच असल्याचे निर्णायकरित्या स्पष्ट करतो. समतामूलक समाजाच्या रचनेचे आशावादी असलेले बाबासाहेब त्यांचा जय म्हणजे म्हणजे न्याय, समता, स्वातंत्र्याचा जय आहे. लोकशाही मूल्य वृद्धिंगत करणाऱ्या सामान्य माणसाच्या आशा म्हणजे जय भीम. अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर मागासवर्गीयांना एकाच आशावादी ध्येयाने प्रेरित करणारा हा सिनेमा आहे.

महत्त्वाची बाब ही की डॉ. बाबासाहेब इतर राज्यात फक्त राजकीय दृष्ट्या पोचले मात्र महाराष्ट्रात निर्माण झालेला हा जय घोष दक्षिण भारतीयांनी स्वीकारून मुख्य प्रवाहात आणणे ही त्यांच्या सांस्कृतिक राजकारणाची नांदी आहे. उत्तर भारतात हा नारा केवळ राजकीय दृष्टीनेच वापरला गेला आणि आजही वापरला जातोय. मात्र दक्षिण भारतीयांनी महाराष्ट्राच्या पुढे पाऊल ठेवत आपले पुरोगामीत्व सिद्ध केले आहे. वास्तववादी सिनेमा असून तो व्यावसायिक दृष्टीने यशस्वी होतो, हे अगोदरच दाक्षिणात्य सिनेमाने सिद्ध केलं आहे.

एके काळी सवर्णांना लपून जय भीम असे एकमेकांना अभिवादन करणारे दलित आणि आज मुख्य चार भाषेत वैश्विक पातळीवर प्रदर्शित होणारा जय भीम सिनेमा आणि त्याची झालेली प्रसिद्धी समीक्षकांनी केलेली स्तुती आणि प्रेक्षकांनी दिलेली दाद वाखाणण्या जोगी आहे. याचा अर्थ जय भीम आत्ता सगळ्या पर्यंत पोचला आहे.

चंद्रकांत कांबळे, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे येथे सिनिअर रिसर्च स्कॉलर आहेत.

COMMENTS