धांडोळा माणगाव परिषदेचा

धांडोळा माणगाव परिषदेचा

डॉ. बाबासाहेबांनी माणगांव परिषदेत बहिष्कृतांच्या अधोगतीचे विश्लेषण केले. ते म्हणाले, आपल्या अगोदरच्या लोकांना वाटते की, आपल्या अधोगतीचे कारण आपले दुर्भाग्य आहे. आणि दुर्भाग्याला आळा घालणे आपल्या हाती नाही. पण नवीपिढी वेगळा विचार करते आहे त्यांच्यामते, ही वाईट स्थिती ईश्वरी लीलेचा परिपाक नसून ती इतरांच्या दुष्कृत्याचा परिणाम आहे.

कुळकथा चैत्यभूमीची…
‘तुम्ही सेक्युलर नाही?’
प्रजासत्ताक ते फॅसिझम

२२ मार्च २०२० माणगाव परिषदेच्या शताब्दी पूर्ती समारोहच्या समाप्तीचा दिवस झाला. या अनुषंगाने ‘माणगाव परिषदेचा’ धांडोळा घेणे गरजेचे वाटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक लढे जेवढे चर्चिले जातात आणि आजही त्या त्या लढ्यांची स्थळे स्फूर्ती देतात तसेच त्यांच्या परिषदांची स्थळे देखील स्फूर्तीची ठरावीत अशीच आहेत. किंबहूना त्या परिषदांचे महत्त्वही तेवढेच मोलाचे आहे. त्यातलीच बाबासाहेबांच्या जीवनातील पहिली सार्वजनिक परिषद असलेली माणगावची परिषद. जी दोन दिवसांची झाली. २१ मार्च आणि २२ मार्च १९२०.
या परिषदेची पुढाकार, प्रेरणा राजर्षी शाहू महाराजांची होती. अस्पृश्य समाजातील कोणी उच्च शिक्षण घेतलेला तरुण मुंबईत सिडनेहॅम कॉलेजात प्राध्यापक आहे, त्याचा गौरव, सत्कार आपल्या कोल्हापूरात व्हावा अशी तळमळ असणारा हा राजा होता. त्याला कारणही तसेच होते. त्यांच्यावर त्यांच्या विद्यार्थी दशेतच त्यांचे गुरु एस. एम. फ्रेझर यांचा प्रभाव होता. पाश्चात्य उदारमतवादी शिक्षण व संस्कृतीचे चांगले संस्कार त्यांच्यावर झाले होते. तसेच महात्मा फुलेंच्या समतावादी सत्यशोधक चळवळीचा प्रभावही त्यांच्यावर होता. कृष्णाजी अर्जुन केळूस्कर आणि दामोदर सावळेराम यंदे हे महात्मा फुलेंचे अनुयायी महाराजांच्या सहवासात होते. याचाही परिणाम महाराजांच्या कृतीकार्यावर झालेला दिसून येतो. जसे १९०२ साली ब्राह्मणेत्तरांना ५० टक्के आरक्षण देण्याचा कायदा, दत्तोबा पोवार या चर्मकार कार्यकर्त्यांला वकिलांची सनद देणे, गंगाराम कांबळेला हॉटेल उघडून देणे, भास्करराव जाधवांना संस्थानात नोकरी देणे आदी.
दत्तोबा पोवार हे चर्मकार कार्यकर्ते महाराजांच्या सहवासातले आणि सीताराम शिवतरकर हे चर्मकार समाजाचे नेते. शिवतरकर हे बाबासाहेबांचे सचिव होते. या दोघांमुळे १७ डिसेंबर १९१९ रोजी राजर्षी शाहू महाराजांची व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पहिली भेट झाली. शाहू महाराज स्वतः या दिवशी मुंबईला परळच्या बीडीडी चाळीत बाबासाहेबांच्या घरी भेटायला गेले. एक राजा अस्पृश्य समाजाच्या मुलाचे कौतुक करायला त्यांच्या घरी जातो ही अभूतपूर्व अशी ऐतिहासिक घटना आहे. इथे बाबासाहेबांच्या गुणवत्तेचा आणि महाराजांच्या उदार अंत:करणाचा, अहंकार शून्यतेचा साक्षात्कार दिसतो. या भेटीत वंचित, उपेक्षितांचे प्रश्न, त्या प्रश्नांना ऐरणीवर आणण्यासाठी नियतकालिकाची गरज यावर चर्चा झाली. महाराजांनी नियतकालिकासाठी २५००/-रु. मदत बाबासाहेबांना दिली. या घटनेनंतर एक महिन्याने ‘मूकनायक’ बाबासाहेबांनी सुरू केले.
माणगावची बहिष्कृत मंडळी जागृत होती. समाजमंदिरात सार्वजनिक वाचनालय होते. स्वतः तेथील नाना मास्तर लोकांना पेपर वाचून दाखवत. त्यातून डॉ. आंबेडकराविषयी माहिती त्यांच्यापर्यंत होती. आपल्यातला हा विद्वान माणूस आपण आपल्याकडे आणला पाहिजे, अशी चर्चा तेथील कार्यकर्त्यात त्यांनी घडवून आणली. त्यासाठी जातीभेद मोडून काढून एकीने लढण्यासाठी परिषद घ्यायची असे त्यांचे ठरले. या चर्चेत खुद्द नाना मास्तर, गणू मसू सनदी, नागोजी यल्लापा कांबळे, कृष्णा तुकाराम कांबळे, कृष्णाजी देवू, यमालिंगू, दत्तू सिंघ, कासीम मास्तर आदी कार्यकर्ते होते. सगळे जण गावात जहागिरदार आप्पासाहेब दादागोंडा पाटील यांच्याकडे सल्लामसलतीसाठी गेले. पाटील जैन समाजाचे होते. सगळ्यांच्या विनंतीवरून त्यांनी शाहू महाराजांकडे प्रस्ताव ठेवला. यावरून पाटलांचा अस्पृश्यांविषयीचा जिव्हाळा ठळकपणे लक्षात येतो. महाराजांना आनंदच झाला. सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. एवढेच नव्हे तर मी स्वतःच डॉ. आंबेडकराना निमंत्रण देतो म्हणाले. स्वतः शाहू महाराजांनी मुंबईला जाऊन बाबासाहेबांना निमंत्रण दिले. तारीख ठरली, २१/२२ मार्च १९२०.
गावकर्यांनी जय्यत तयारी केली. समाज मंदिरासमोरच देखणा मंडप उभारला. बँन्ड सज्ज ठेवला. गावभर नुसते आनंदाचे वारे वहात होते. सनातन्यांच्या जीव तडफडत होता. द्वेषाने लालेलाल होत होते. पण खुद्द शाहू महाराज प्रमुख पाहुणे असल्याने त्यांचा नाईलाज झाला होता. चरफडत राहण्यापल्याड काहीच हातात नव्हते.
अपप्रचार करूनही परिषदेला ठिकठिकाणाहून पाच हजारापेक्षा जास्त लोक हजर होते. मात्र ‘डिप्रेस्ड क्लास मिशन’ व इतर बहिष्कृतांच्या हितासाठी काम करणार्या संघटनांचे कोणी नव्हते. ‘डिप्रेस्ड क्लास’चे कोणी नसण्याचे कारणही तसेच होते. ब्रिटिश सरकार भारतीयांना जे काही देऊ पहात होते, त्यात बहिष्कृतांच्या वाट्याला काय? असा बाबासाहेबांचा सवाल होता. यावर ‘डिप्रेस्ड क्लास’चे महर्षी वि. रा. शिंदे म्हणत होते की,अस्पृश्यांचे प्रतिनिधी हे कायदे मंडळाने निवडावेत. तर बाबासाहेब म्हणत होते की, वरिष्ठ हिंदू अस्पृश्यांवर राष्ट्रीय गुलामगिरी लादू पाहात आहेत. ते प्रयत्न अस्पृश्य लोक हाणून पाडतील. अशा राजकीय प्रतिनिधित्वाची पार्श्वभूमी त्याला होती.
बाबासाहेब दु.४.००वा. माणगावला पोहचले. गावकर्यांनी मोठे भव्य दिव्य स्वागत त्यांचे केले. गावभर वाजत गाजत मिरवणूक काढली. खुद्द नाना मास्तरांनी लिहिलेले व कासीम मास्तरांनी चाल लावलेले स्वागतगीत चंदाताई व चंद्राताईंनी गाऊन सभामंडपात बाबासाहेबांचे स्वागत झाले. परिषदेचे स्वागताध्यक्ष होते, दादासाहेब राजेसाहेब इनामदार. पाडवा सणाचा दिवस असूनही एवढी गर्दी लोकांनी केली म्हणून त्यांनी आभार माणले. कुणावर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या स्वजनोद्धाराचे कार्य आपणच हाती घेतले पाहिजे असे त्यांनी विशद केले. परिषदेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेबांनी बहिष्कृतांच्या अधोगतीचे विश्लेषण आपल्या भाषणात केले. ते म्हणाले, आपल्या अगोदरच्या लोकांना वाटते की, आपल्या अधोगतीचे कारण आपले दुर्भाग्य आहे. आणि दुर्भाग्याला आळा घालणे आपल्या हाती नाही. पण नवीपिढी वेगळा विचार करते आहे त्यांच्यामते, ही वाईट स्थिती ईश्वरी लीलेचा परिपाक नसून ती इतरांच्या दुष्कृत्याचा परिणाम आहे. हिंदू धर्माचे संघटन दोन तत्त्वांना धरून केले आहे. एक जन्मसिद्ध योग्यायोग्यता व दोन जन्मसिद्ध पवित्रापवित्रता. या तत्वानुसार त्यांनी हिंदू लोकांची विभागणी तीन वर्गात केली आहे. १) जन्माने सर्वात श्रेष्ठ व पवित्र-ब्राह्मण वर्ग. २) ज्याचे जन्माने श्रेष्ठत्व ब्राह्मण वर्गापेक्षा कमी दर्जाचे तो ब्राह्मणेत्तर वर्ग. ३) जे जन्मसिद्ध कनिष्ठ व अपवित्र तो बहिष्कृत वर्ग. अनेक दिवस अयोग्य व अपवित्र म्हणून घेतल्यामुळे नैतिकदृष्ट्या आपल्यातील आत्मबल व स्वाभिमान हे उन्नतीचे आद्य कारणे आहेत ती लोपून गेली आहेत. व्यापार, नोकरी व शेती हे धनसंचयाचे मार्ग आपल्याला खुले नाहीत. परिस्थिती सानुकूल नाही. ती सानुकूल होण्यासाठी आपण राजकीय सामर्थ्य संपादिले पाहिजे व जातवार प्रतिनिधित्व मिळाल्याशिवाय आपल्या हाती राजकीय सामर्थ्य येणार नाही.
दुसर्या दिवशी ३ वाजता परिषदेला पुन्हा सुरूवात झाली. यावेळी स्वतः शाहू महाराज शिकारीच्या वेशात प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहिले. या वेशात येण्यामागे त्यांची मुत्सद्देगिरी होती. सामाजिकदृष्ट्या पुरोगामी भूमिका महाराजांवर सनातन्यांनी टीकेची झोड उठवली होती. एवढेच नव्हेतर त्यांच्यावर प्राणघातक हल्याचा कटही रचण्यात आला. कारण ते समाज परिवर्तनासाठीचे करीत असलेले कायदे व सुधारणा आपल्या विरोधी जाणार्या आहेत असे सनातन्यांना वाटत होते. या कटाचे सूत्रधार के. डी. कुलकर्णी होते. फुलेंनाही हे सोसावे लागले तेच महाराजांच्या वाट्याला आले. पण या कुलकर्ण्यांना पकडून बिंदू चौकातील तुरुंगात डांबून ठेवले. तुरुंगातील दामू जोशी साथीदारांसह तुरुंग फोडून तो पळून गेला व त्याने महाराजांना बाँम्बने उडवण्याचे प्रतिआव्हान दिले. राजवाड्याच्या मागच्या बाजूस लक्षतीर्थ वसाहत भागात बॉम्बस्फोट झाला. नंतर त्याचा अहवाल २८ ऑगस्ट १९१९ ला महाराजांना प्राप्त झाला. घटनास्थळी भेट दिल्यानंतर महाराजांना त्या स्फोटाचे गांभीर्य लक्षात आले.हा बॉम्ब राजवाड्यावर पडला असता तर त्यांचे सारे कुटुंब उध्वस्त झाले असते. त्यामुळे महाराज अशा प्रकारची मुत्सद्देगिरी करत.

महाराज परिषदेत आपल्या भाषणात म्हणाले, बहिष्कृत लोक निकृष्ट अवस्थेला पोहचण्याचे कारण त्यांनी त्यांचा योग्य पुढारी निवडला नाही. गोड बोलून नावलौकीक मिळवण्याच्या हेतूने आमच्यापैकी काही अप्पलपोटी मंडळी अयोग्य पुढारी नेमून देऊन अज्ञानी लोकांना फसवतात. पशूपक्षीसुद्धा आपल्याच जातीचा पुढारी करतात. पक्ष्यांत कधी चतुष्पादाचा पुढारी झाला नाही. मात्र गाय, बैल, मेंढर यात मात्र त्यांचा पुढारी धनगर असतो. परिणाम काय? तर शेवटी त्यांना कसाबखान्यात जावे लागते. हे महाराजांचे विश्लेषण प्रत्येक जातसमूहाच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. महाराज पुढे म्हणाले, माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजनांनो, तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढलात. याबद्दल मी तुमचे अंत:करणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, डॉ. आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सार्या हिंदुस्थानचे पुढारी होतील, अशी माझी मनोदेवता मला सांगते.

या परिषदेच्या जेवणाचा सर्व खर्च जहागीरदार आप्पासाहेब दादागोंडा पाटील यांनी केला. परिषदेनंतर मात्र त्याचे प्रायश्चित्त त्यांना भोगावे लागले. जातबांधवांनी त्यांना ७ वर्ष वाळीत टाकले.
परिषदेत एकूण १५ ठराव मांडले गेले. त्यातील ठळक ठराव असे-

  • हिंदी साम्राज्यातील लोकांप्रमाणे बहिष्कृत लोकांना ही मानवीहक्क आहेत. त्यांना सार्वजनिक सोयींचा उपभोग घेण्याचा हक्क आहे. जसे विहिरी, तलाव, रस्त,शाळा वगैरे.
  • प्राथमिक शिक्षण मुलामुलींना भेद न करता सक्तीचे व मोफत द्यावे. इतर वर्गाचे माणसे बहिष्कृत वर्गाच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष किंवा अनुदारपणा दाखवतात म्हणून शिक्षणासाठी अधिकारी वर्गात बहिष्कृत अधिकारी असावेत आणि ते दरेक जिल्ह्यात असावेत. बहिष्कृतांच्या मुलांसाठी मुबलक शिष्यवृत्त्या द्याव्यात. स्पृश्य अस्पृश्यांच्या शाळा एकत्रित असाव्यात. महार वतनाच्या जमिनी थोड्या महारांना मोठ्या प्रमाणात वाटून त्यांनी आपल्या मुलामुलींना साक्षर करून दर्जा प्रमाणे राहावे असे लिहून घ्यावे. आणि ज्या महारांस वतनी जमिनींना मुकावे लागले त्यांना शक्य तेथे पड जमिनी रयताव्याच्या नियमाने देऊन त्यांची सोय लावावी.
  • भावी कायदे कौन्सिलात बहिष्कृतांचे प्रतिनिधी त्यांच्या लोकसंख्येच्या व गरजेच्या प्रमाणात त्यांच्या मतदारसंघात निवडून द्यावेत वगैरे..

या परिषदेत पूर्वास्पृश्य, शेतकरी एकत्र आले होते. सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण झाले होते. शाहू महाराजांच्या दूरदृष्टी भाकितानुसार बाबासाहेब भारताचे पुढारी तर झालेच. पण जगद्वंदनीय झाले. ठरावातील अनेक बाबी राज्यघटना लिहून अंमलात आणल्या. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एक परिवर्तनवादी राजा आणि एक विद्वान नेता यांचे मैत्रीपूर्ण संबंध आले. पुढे पुन्हा परदेशी बाबासाहेब शिकायला गेले तेव्हा महाराजांनी त्यांना मदत केली. एकमेकांना पत्रव्यवहार होऊ लागला. राजांचा मुलगा राजाराम आणि मुलगी आक्कासाहेब बाबासाहेबांना मामाचे नाते लावू लागले. एवढं प्रेम एकमेकांमध्ये निर्माण झाले.
हे जसे घडले तसे १०० वर्षानंतर पडजमिनी म्हणजे गायरान जमिनीचे प्रश्न अनुत्तरित आहेत. शिष्यवृत्त्यांची अनियमतता अनुभवाचीच आहे. जातीअंताचा लढा आजही गरजेचा आहे. आंतरजातीय प्रेम अथवा विवाह केला की, अनेक तरणतरुणींना सामाजिक रोषाला सामोरे जावे लागते किंबहुना जीव गमवावे लागतात. जात पुढार्यांना परजातीच्या पुढार्यांचे महात्मे अधिक वाटून सुखावह व लाभदायक वाटते. जातपुढार्यांचा अप्पलपोटेपणा समाजभावनांचा चक्काचूर करतो. राखीव जागांवर कशी वर्णी लागते त्याचेही कटुनुभव पाहावे लागतात. जाती अधिक घट्ट होतायत. धर्माचे स्तोम, शेखी मिरवून अल्पसंख्यांकांची भयभीतता वाढत आहे. अशा परिस्थितीत त्यावेळी शाहू महाराजांनी आणि बाबासाहेबांनी केलेल्या भाषणांची व ठरावांची याद शंभर वर्षानंतरही आत्मपरीक्षणास बहुजन वर्गास भाग पाडते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0