जेटलींचं मरण आणि राम सेतू

जेटलींचं मरण आणि राम सेतू

पोलिटिकल हिंदूंचा एक वर्ग आहे. या वर्गाला काहीही करून राम खरोखरच होता हे संशोधनाअंती सिद्ध करायचं आहे. पोलिटिकल हिंदू आधुनिक विज्ञान नाकारतात पण रामाचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मात्र त्याना विज्ञान हवंय.

माध्यमांनी जेटलींच्या आरोग्याची बातमी का लपवली?
कुष्ठरोग भारतात परत येतोय , पण सरकार मान्य करू इच्छित नाही!
इलेक्ट्रोरल बाँडबाबत नियम तोडण्याचे पीएमओचे आदेश

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशांक यांनी खरगपूरच्या आयआयटीतल्या इंजिनयरिंग विद्यार्थ्यांना राम सेतू या विषयावर संशोधन करण्याचा सल्ला दिला. राम सेतू असं नाव दिलेली दगडांची रांग भारत आणि लंका यांच्यामधल्या समुद्रात आहे.

निशांक ज्या दगडांच्या रांगेचा उल्लेख करतात त्यालाच राम सेतू हे नाव अगदीच अलीकडं देण्यात आलंय. त्या आधी ती रांग अॅडमचा पूल म्हणून ओळखली जात होती. ख्रिस्ती समजुतीनुसार अॅडम शिक्षा झाल्यावर पृथ्वीवर पडला तो या पुलाच्या जागी असं काहींचं म्हणणं.

लंका मुळात कुठं होती यावर अनेक मतं आहे. मालदीव बेटं हीसुद्धा लंका असू शकते असं आर्यभट्ट या गणितीनं मांडलेल्या हिशोबानुसार निघत होत. पूल बांधल्याच्या कथेवरून लंकेचं स्थान लोकांनी ठरवलं, मालदीवकडं पूल नाही म्हणून मालदीवच्या नावावर फुल्ली, श्री लंका ही लंका झाली.

राम सेतूवर  संशोधन करायचं म्हणजे करायचं तरी काय?

तामिळनाडू आणि लंका यांच्यामधील समुद्रातली दगडांची रांग  निसर्गातल्या उलथापालथीतून पृष्ठभागावर आलीय असं वैज्ञानिक म्हणतात. हिमालय पर्वतही एके काळी एका समुद्राचा तळ होता, उलथापालथीतून तो वर आला. या घटना आधुनिक विज्ञानानं सिद्ध करता येतात, सिद्ध झाल्या आहेत. ही दगडांची रांग म्हणजे रामानं बांधलेला पूल आहे असं अलिकडं  लोक म्हणू लागलेत.  हा दावा विज्ञानाच्या कसोटीवर किंवा पुराव्याच्या कसोटीवर टिकत नाही असं लक्षात आल्यावर रामसेतूवाली मंडळी इंजिनियर, डॉक्टर, वैज्ञानिक इत्यादीना तो दावा खरा आहे असं सांगण्यास भरीस घालत आहेत.

वाल्मिकीनं रामायण लिहिलं आणि त्यात पूल बांधला असा अप्रत्यक्ष उल्लेख आहे. पूल कसा बांधला, कुठल्या जागी, कोणी, किती माणसं, इत्यादी तपशील नसल्यानं वाल्मिकीच्या ओळी कविता ठरतात. रामायणातल्या ओळीवरून मराठी वाल्मिकी माडगुळकर यांनी गीत रचलं आणि त्याला सुधीर फडके यांनी चाल लावली, सेतू बांधारे सागरी हे गीत जन्मलं.

रामायण ही एक कथा होती आणि राम हा खरोखरच एक सशरीर देव होता अशा दोन समजुती, दोन मतं आहेत. राम ही कल्पित कथा असेल तर संशोधनाची आवश्यकताच नाही.

राम हा देव आहे असं हिंदू मानतात. रामाला देव मानणाऱ्यांमधे दोन गट आहेत. एक गट सर्व सामान्य माणसांचा. राम ही त्या प्रकारच्या माणसांची  श्रद्धा आहे,  ती श्रद्धा खरीखोटी ठरवण्यात त्यांना रस नाही.ते  राम होता हे सिद्ध करण्यासाठी वैज्ञानिक संशोधन करा असं म्हणत नाहीत. संशोधन करा किंवा नका करू, त्यांची श्रद्धा अढळ रहाणार आहे, त्यांच्या लेखी राम होता आणि रहाणार आहे. बहुसंख्य हिंदू या गटात मोडतात.

दुसरा वर्ग पोलिटिकल हिंदूंचा आहे. या वर्गाला मात्र काहीही करून राम खरोखरच होता हे संशोधनाअंती सिद्ध करायचं आहे. पोलिटिकल हिंदू आधुनिक विज्ञान नाकारतात पण  रामाचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मात्र त्याना विज्ञान हवंय, त्यासाठी आधुनिक इंजिनियरिंग त्याना हवंय. आयुर्वेद श्रेष्ठ आहे, आधुनिक चिकित्सा शास्त्र सदोष आहे असं त्याना वाटतं, पण आयुर्वेदाचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी त्याना आधुनिक शास्त्रातलेच पुरावे लागतात. रामाचं असणं सिद्ध केलं तर राजकीय शत्रूंचा, म्हणजे भाजप सोडून सर्व,  पराभव करणं पोलिटिकल हिंदूना शक्य होईल. सेक्युलर लोकांना खोटं पाडल्यामुळं हिंदू मतदार आपल्या बाजूला येतात असं पोलिटिकल हिंदूना वाटतं, ते अंशतः खरंही आहे. सगळा खेळ मतं मिळवण्याचा आहे, धर्माचा नाही.

म्हणूनच पोलिटिकल हिंदूना अयोध्येत राम मंदीर उभारायचं आहे, राम सेतू रामानंच बांधला हे सिद्ध करायचं आहे. खरं म्हणजे अयोध्येत बाबरी पाडून तिथं राम मंदीर बांधण्यात सामान्य हिंदूना रस नव्हता. देशभरात हज्जारो राम मंदिरं आहेत आणि घरोघरी रामाच्या तस्विरी आणि प्रतिमा आहेत. अयोध्येत एक नवं राम मंदीर होण्यातून त्याना फारसा फरक पडत नाही. बाबरी पाडण्याचा उद्योग झाला त्याच्या आधी शेकडो वर्षं हिंदू माणसं रामाची पूजा सुखेनैव करत आली आहेत. अयोध्येत राम मंदीर नाही यामुळं त्यांचं अडत नव्हतं. बाबरी पाडून आपलं रामप्रेम पोलिटिकली सिद्ध करण्याचा खटाटोप हिंदुत्ववाद्यांनी केला कारण तो न करते तर त्याना भारतात निरंकुष सत्ता प्राप्त होती ना.

निशांक म्हणतात तसं राम सेतूवर संशोधन करायचं म्हणजे काय करायचं? आयआयटीतले विद्यार्थी इंजिनियर होणारेत.   त्या दगडांची घडण, ताकद, स्ट्रक्चरल इंजिनयरिंगच्या हिशोबात ते दगड म्हणजे खांब ठरवून त्यावर किती ताकदीचा पूल बांधता येईल असं संशोधन करता येईल. पण तो पूल रामाचाच होता याचं संशोधन ते विद्यार्थी कसं काय करणार? निशांक यांच्या पक्षाला लोकसभेत सगळ्याच्या सगळ्या जागा मिळाव्यात, त्यांच्या पक्षाला भारतातल्या सर्व विधानसभेत सर्वच्या सर्व जागा मिळाव्यात यासाठी आयआयटीनं हा संशोधन प्रकल्प हाती घ्यायचाय की काय?

निशांक खरगपूरच्या विद्यार्थ्यांशी बोलत असतानाच प्रज्ञा ठाकूर या भाजपच्या खासदार बाईनी सांगून टाकलं की जेटली यांचा मृत्यू विरोधकांनी केलेल्या जादू टोण्यामुळं झाला, मारक शक्तीमुळं झाला.

मारक शक्तींचा उल्लेख रावणाच्या संदर्भात येतो.

रावण….सौर मंडलातले सर्व ग्रह रावणाच्या इशाऱ्यानुसार चालत. मेधनादच्या जन्माच्या वेळी रावणानं सर्व ग्रहांना आज्ञा दिली होती त्यांनी आपापल्या जागी स्थिर रहायचं, अजिबात हलायचं नाही, जेणेकरून मेघनाद हा अजीत आणि अमर होईल. ग्रह स्थिर राहिले. शनी या ग्रहानं रावणाचं ऐकलं नाही. त्यानं आपली जागा बदलली. परिणाम असा झाला की मेधनाद पराक्रमी निघाला पण लहान वयातच त्याचा मृत्यू झाला….

प्रज्ञा ठाकूर आता खगोलशास्त्राच्या अभ्यासकांना सांगतील की रावणानं अवकाशातल्या सर्व ग्रहांना ताब्यात ठेवलं होतं ते शोधून काढा.

रावण …. विद्वान होता आणि ग्रेट तांत्रीक होता. शत्रूचा नाश करण्याचे मंत्र मारण मंत्र त्याला माहित होते. शत्रू नष्ट करायचा असेल तर एका विशिष्ट जागी जाऊन २१ रात्री त्या मंत्राचे २१००० जप करायचे,  २१०० मंत्रांचं हवन करायचं. दक्षिण दिशेकडं पहात हात उंचावून हे मंत्र जपायचे. अशी साधना करत असताना भयानक अनुभवही येण्याची शक्यता आहे. साधना पार पडल्यावर शत्रू खलास. परंतू या मारण मंत्राचा उपयोग ब्राह्मण, साधू, संत, महात्मा किंवा अन्य तांत्रीकाच्या विरोधात मात्र करायचा नाही. तसं केल्यास हा मंत्र त्याचा वापर करणाऱ्यावरच उलटू शकतो.

तो मंत्र खालील प्रमाणे असल्याचं सांगितलं जातं.

“लां लां लां लंकाधिपतये

लीं लीं लीं लंकेशं लूं लूं लूं लोल जिह्वां,

शीघ्रं आगच्छ आगच्छ चंद्रहास खङेन

मम अमुक शत्रुन विदारय विदारय मारय मारय

काटय काटय हूं फ़ट स्वाहा”

प्रज्ञा ठाकूर या किंवा असल्याच कसल्या तरी मारण मंत्राबद्दल बोलत असाव्यात. मारण मंत्र चांगल्या माणसांच्या बाबतीत प्रभावी ठरत नसतो. खरं म्हणजे देव चांगल्या लोकांना संरक्षण देत असतो, मारण मंत्रांपासून वाचवत असतो. रावणाने मारण मंत्र समजा रामाविरोधात वापरले असतील देवानी रामाला तारलं म्हणून राम वाचला. पण विरोधकांचे मारण मंत्र  जेटली, स्वराज, पर्रीकर इत्यादी लोकाना मारू शकले. याचा अर्थ एक तर जेटली इत्यादी माणसं चांगली नव्हती किंवा देवांचा त्याना पाठिंबा नव्हता.

प्रज्ञा ठाकूर पुणे विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना मारण मंत्रावर संशोधन करायला सांगतील.

रामायण हे रामायण राहू द्या. राम हा राम राहू द्या. शेकडो वर्षांपासून राम लोकांच्या मनात वसलेला आहे, तो तसा राहू द्या. १९२५ च्या अलिकडं पलिकडं ज्यांची राजकीय महत्वाकांक्षा जागृत झालीय, ज्यांना देशातली राजकीय सत्ता हवीय, त्या लोकानी राजकारण जरूर करावं पण रामाला मधे आणू नये.

पोलिटिकल हिंदू राम आणि हिंदू सांस्कृतीक परंपरांचा इवेंट करून राजकारण करत आहेत, हिंदू सांस्कृतीक परंपरांना मत मिळवण्याचं साधन करत आहेत. राजकारण, सत्ता हाच त्यांच्या करियरचा मुख्य मुद्दा आहे. सामान्य हिंदूंच्या हे लक्षात येईल तोच सुदीन.

निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 2