नवी दिल्लीः देशातल्या पहिल्या १० सर्वोत्तम विद्यापीठाच्या यादीत नाव कमावणार्या दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाने यंदा यूपीएससी परीक्षेतही
नवी दिल्लीः देशातल्या पहिल्या १० सर्वोत्तम विद्यापीठाच्या यादीत नाव कमावणार्या दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाने यंदा यूपीएससी परीक्षेतही आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे. या विद्यापीठातील ३० विद्यार्थ्यांनी अंतिम परीक्षेत बाजी मारली आहे.
यूपीएससीची तयारी करून घेण्यासाठी विद्यापीठात कोचिंग अकादमी असून यंदा तेथे ३० जणांनी प्रशिक्षण घेतले. यातील २५ विद्यार्थी अकादमीतील होते तर अन्य ५ जणांनी मुलाखतीचे प्रशिक्षण घेतले होते.
या यशस्वी विद्यार्थांमध्ये २६ वर्षाच्या रुची बिंदाल यांनी अखिल भारतीय स्तरावर ३९ वा क्रमांक पटकावला. आपल्या या यशामागे अविरत कष्ट होते. पहिले तीन प्रयत्नात प्राथमिक परीक्षाही मी उत्तीर्ण झाले नव्हते नंतर चौथ्या प्रयत्नात मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले नाही पण पाचव्या प्रयत्नात यश मिळाल्याचे बिंदाल यांनी सांगितले.
यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या बिंदाल या त्यांच्या परिवारातील पहिल्याच आहे. आठ वर्षांपूर्वी राजस्थानातील मकराना येथून त्या कुटुंबासमवेत दिल्लीत स्थायिक झाल्या. २०१४मध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी जामियात प्रवेश घेतला.
दोन काश्मीरी विद्यार्थ्यांची बाजी
२३ वर्षांची नादिया बेग जम्मू व काश्मीरमधील कुपवाडा येथील असून त्यांनी ३५० वा क्रमांक पटकावला आहे. काश्मीरमधील अस्थिर परिस्थिती पाहून त्यांनी जामियातील नागरी सेवा कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतला. गेल्या वर्षी ५ ऑगस्टला परिस्थिती वेगळी होती. यंदा मात्र घरात माझ्या यशामुळे सर्वच जण खूष झाल्याचे बेग यांनी सांगितले. नादिया यांनी जामियातून अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. त्यांचे आई-वडिल काश्मीरमध्ये सरकारी शाळेत अध्यापन करतात.
२५ वर्षांचे असिफ युसूफ तांत्रेय हे काश्मीरमधील कुलगाम येथे असून त्यांचा क्रमांक ३२८ इतका आहे. मी उत्तीर्ण झालो असलो तरी या क्रमांकावर आपण समाधानी नसल्याचे तांत्रेय यांनी सांगितले. काश्मीरविषयी बोलताना तांत्रेय यांनी काश्मीर विषयी चांगले बोलले जात नाही, असे सांगत काश्मीरी समाजाची जी प्रतिमा तयार केली गेली आहे ती बदलण्यासाठी व्यवस्थेत येऊन परिवर्तन करता येईल, असे सांगितले. ३७० कलम बदलण्याचा निर्णय हा राजकीय असून आता सरकारला काश्मीरी जनतेशी सुसंवाद साधण्याचा, त्यांना राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेत सामील करून घेण्यावर भर द्यावा लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीर लॉकडाऊन केल्यानंतर नादिया व तांत्रेय या दोघांचाही त्यांच्या कुटुंबियाशी अनेक दिवस संपर्क तुटला होता. त्याही मानसिक परिस्थितीत या दोघांनी यूपीएससीची मुख्य परीक्षा दिली होती. घरातल्यांशी तुटल्याने मनावर ताण आला होता तो सहन करत परीक्षा दिल्याचे दोघांनी सांगितले.
‘विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो’
आपल्या अकादमीचे यश पाहून जामियातील कोचिंग अकादमीचे प्रमुख तन्वीर झफर यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांनी कमालीचा संयम व मानसिक संतुलन न ढळू देता यश मिळवल्याबद्दल अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया दिली. झफर हे माजी आयएएस अधिकारी असून ते विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात.
गेले ९ महिने जामियातील दिवस कठीण होते. गेल्या डिसेंबरमध्ये जामियात पोलिस घुसले व त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली, लायब्ररीची नासधूस केली. पण आमच्या विद्यार्थ्यांचा मनोग्रह अशा हल्ल्याने तुटला नाही. आज यूपीएससीमध्ये त्यांनी दाखवलेले यश या संस्थेच्या परिश्रमाचे आहे. जामियावर अनेक बेताल आरोप केले गेले, या विद्यापीठाची प्रतिमा मलिन करण्यात आली. विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवण्यापर्यंत मजल गेली पण या विद्यापीठाने आपली पूर्वीही गुणवत्ता दाखवली होती आजही त्यांनी ती तितकीच दाखवून हे विद्यापीठ किती सक्षम आहे, हे दाखवल्याची प्रतिक्रिया जफर यांनी दिली.
गेल्या वर्षी याच अकादमीतून जुनैद अहमद यांनी यूपीएससी परीक्षेत ३ रा क्रमांक मिळवला होता. २०१०मध्ये विद्यापीठाने नागरी सेवा प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते. त्यानंतर या केंद्रातून २३० मुलांची निवड आयएएस, आयपीएस, आय़एफएस व अन्य सेवांसाठी झाली आहे.
मूळ बातमी
COMMENTS