लोकप्रियतेमुळे उमर, मेहबुबांवर पीएसए

लोकप्रियतेमुळे उमर, मेहबुबांवर पीएसए

श्रीनगर : जम्मू व काश्मीरचे दोन माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला व मेहबुबा मुफ्ती यांची काश्मीरी समाजात लोकप्रियता असल्याने त्यांच्यावर पब्लिक सेफ्टी अॅ

काश्मीरमध्ये कर्नल, मेजरसह ५ जवान चकमकीत शहीद
लडाखमध्ये अराजपत्रित पदे स्थानिकांसाठी राखीव
सर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे

श्रीनगर : जम्मू व काश्मीरचे दोन माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला व मेहबुबा मुफ्ती यांची काश्मीरी समाजात लोकप्रियता असल्याने त्यांच्यावर पब्लिक सेफ्टी अॅक्ट (पीएसए)अंतर्गत कारवाई केल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोन नेत्यांवर पोलिसांनी कोणत्या कारणांसाठी पीएसए दाखल केल्याचे डोसियर उघडकीस आले असून यात ओमर अब्दुल्ला हे समाजाला प्रभावीत करू शकणारे व्यक्तिमत्व असून जम्मू व काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करूनही ओमर अब्दुल्ला यांच्या आवाहनामुळे तेथील नागरिक मतदानासाठी बाहेर पडल्याचे कारण पोलिसांनी नोद केले आहे.

त्याचबरोबर पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती या अत्यंत तापट व कटकारस्थान करणाऱ्या व्यक्ती असून त्या काश्मीरमधील फुटीरतावादी चळवळीला मदत करत असल्याचे पुरावे गुप्तचर खात्याला मिळाल्याने त्यांच्यावर पीएसए दाखल केल्याचे डोसियरमध्ये म्हटले गेले आहे.

या दोन नेत्यांवर पीएसए दाखल करण्याची अन्य कारणेही देण्यात आली आहेत. त्यात ओमर अब्दुल्ला यांनी ३७० कलम रद्द झाल्यानंतर त्याविरोधात अनेक ट्विट केले होते आणि त्या ट्विटद्वारे त्यांनी देशाच्या एकता व अखंडत्वला आव्हान देणारे संदेश लिहिले होते. पण याचा पुरावा या डोसियरमध्ये दिलेला नाही. पण ओमर अब्दुल्ला यांनी राजकारणाच्या माध्यमातून केंद्र सरकारविरोधात अनेक कारवाया करण्याचे प्रयत्न केले. त्यांना जनतेचा पाठिंबा असल्याने तो त्यांनी वापरण्याचा प्रयत्न केला, असे डोसियरमध्ये नमूद करण्यात आले आहे. ३७० कलम व ३५ अ रद्द झाल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी आपला खरा चेहरा उघड केला आणि केंद्र सरकारला मदत करण्याऐवजी कट्‌टरवादी राजकारणाची मदत घेत सरकारला उचकावण्यासाठी विखारी राजकारणाच्या चाली खेळण्यास सुरूवात केली असे डोसियरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

मेहबुबा मुफ्ती यांच्यावर मत व्यक्त करताना या डोसियरमध्ये, पीडीपी हा पक्ष बनावट असून या पक्षाच्या झेंड्यात हिरवा रंग आहे. हिरवा  रंग कट्‌टरवाद्यांचा रंग असतो. या पक्षाच्या निवडणूक चिन्ह्यात कलम व दौत अशी प्रतीके असून ती मुस्लिम युनायटेड फ्रंटकडून घेतली आहेत. ही फ्रंट जमात-ए-इस्लामी या संघटनेशी संलग्न असून त्यांनी १९८७मध्ये नॅशनल कॉन्फरन्ससोबत निवडणुका लढवल्या होत्या, असे नमूद करण्यात आले आहे.

ओमरच्या बहिणीची सर्वोच्च न्यायालयात याचिका

ओमर अब्दुल्ला यांच्यावर पीएसए अंतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या विरोधात त्यांची बहिण सारा अब्दुल्ला पायलट यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संसदेत निवडून आलेल्या एक लोकप्रतिनिधीला, केंद्रात मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या माजी मंत्र्याला व नेहमीच देशहितासाठी काम करणाऱ्या एका नेत्याचा सत्तेला धोका वाटतो यावर याचिकेत सारा पायलट यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सारा पायलट यांनी डोसियरमध्ये व्यक्त केलेली पोलिसांची सर्व निरीक्षणे व मते धुडकावून लावली असून त्यांनी ओमर अब्दुल्ला यांची सार्वजनिक पातळीवरील सर्व राजकीय विधाने सोशल मीडियावर उपलब्ध असून ती तपासता येतात असे याचिकेत म्हटले आहे.

या अगोदर मेहबुबा मुफ्ती यांनीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

गेल्या गुरुवारी फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला व मेहबुबा मुफ्ती यांच्यासह अन्य तीन काश्मीरी नेत्यांवर पीएसए दाखल करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेला धोका असल्याचे कारण दाखवत पीएसए दाखल करता येऊ शकतो.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0