काश्मीरमधील पेलेट-पीडित

काश्मीरमधील पेलेट-पीडित

इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस संस्था या संस्थेने काश्मीरमध्ये केलेल्या अभ्यासानुसार विशेषतः पेलेट-पीडित विद्यार्थ्यांमध्ये अंधत्वासोबत मानसिक विकार अधिक प्रमाणात दिसून येत आहेत.

काश्मीरमध्ये तीन महिन्यात १२५ योजनांना विक्रमी वन मंजुऱ्या
मेहबूबा, ओमर नजरकैदेत
काश्मीरमध्ये माध्यमांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पत्रकारांचा अपमान

१८ वर्षाचा फरझान नाझिर शेखला राग आला की लवकर शांत होत नाही. राग आला की बहुतेक वेळा फरझान त्याच्या हाताला येतील त्या वस्तू फेकतो किंवा त्यांची मोडतोड करतो. त्याला असे अचानक अनियंत्रित रागाचे झटके येण्याचे प्रमाण वाढले आहे. “मला पेलेट गोळ्या लागल्यापासून माझं आयुष्य पूर्ण बदलूनच गेलं आहे,” नवाबझार, श्रीनगर इथल्या आपल्या लहानशा दुकानात बसलेला फरझान सांगतो. “मी आधी असा नव्हतो.”

२०१७ मध्ये पाच महिन्यांच्या कालावधीत फरझानला दोन वेळा पेलेट गोळ्यांमुळे इजा झाल्या. २८ मार्च, २०१७ रोजी फरझानच्या घराच्या बाजूच्याच गल्लीजवळ सुरक्षा दलांनी त्याच्यावर पेलेट गोळ्यांचा वर्षाव केला तेव्हा त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टी गेली. त्याच वर्षी, ७ ऑगस्ट रोजी जेव्हा फरझान कसाबसा बरा होत होता तेव्हा सुरक्षा दलांनी झाडलेल्या पेलेट गोळ्यां फरझानच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला घुसल्या आणि त्याने उजव्या डोळ्याचीही दृष्टी काही प्रमाणात गमावली.

फरझान नाझिर शेख. श्रेय: मुझामिल मट्टू

फरझान नाझिर शेख. श्रेय: मुझामिल मट्टू

“पहिली घटना तेव्हा घडली, जेव्हा अचानक काही गोंधळ ऐकू आला म्हणून मी घराच्या बाहेर गेलो. बाहेर निदर्शने चालू होती. त्याच वेळी सुरक्षा दलांनी झाडलेल्या पेलेट गोळ्या माझ्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला लागल्या,” फरझान सांगतो, “दुसऱ्या वेळी रस्त्यावरचा एका दिव्याचा प्रकाश माझ्या खोलीत येत असल्यामुळे माझ्या झोपेत व्यत्यय येत होता. तो दिवा बंद करण्यासाठी मी बाहेर गेलो आणि सुरक्षा दलांनी माझ्या दिशेने पेलेट गोळ्या झाडल्या.”

फरझान त्याच्या घरातला एकमेव कमावता हात आहे. आत्तापर्यंत त्याच्या डोळ्यांवर सात शस्त्रक्रिया झाल्या आहेत आणि त्याला त्याच्या उजव्या डोळ्याची ४०% दृष्टी परत मिळाली आहे. डाव्या डोळ्याची दृष्टी मात्र पूर्ण गेली आहे. त्याचे वडील, नाझिर अहमद शेख यांचे मागच्या वर्षी निधन झाले.

फरझान सांगतो, नियमितपणे नेत्रतज्ञाकडून डोळ्यांचे उपचार करून घेण्याबरोबरच तो आता मनोविकारतज्ञाचाही सल्ला घेत आहे. मागील दोन वर्षात त्याला मनोविकारांचा त्रास होऊ लागला आहे. “माझ्या डोक्यात घुसलेल्या काही पेलेट गोळ्या अजूनही तिथेच आहेत. माझ्या कवटीला तडे गेले होते,” चष्मा घातलेला फरझान सांगतो. “अनेक वेळा रागाच्या भरात मी माझ्या आई आणि बहिणीवर खूप आरडाओरडा केला आहे. एकदा तर माझा राग इतका अनावर झाला की मी एक पंखा आणि एक फॅन तोडला. पण मला नेहमीच नंतर त्याचा पश्चात्ताप होतो.”

“कधीकधी दुकानात बसल्या बसल्या मी मनातल्या मनात पुन्हा माझा भूतकाळ जगतो आणि मग मला आणखी राग येतो. माझी दृष्टी कदाचित परत येणारच नाही, पण डॉक्टरांच्या मते माझ्या बाकीच्या समस्यांमधून लवकरच माझी सुटका होईल,” फरझान म्हणतो.

फरझानप्रमाणेच, काश्मीरमधील ८५% पेलेट पीडितांना मनोविकारांचा त्रास होऊ लागला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस संस्था या संस्थेने काश्मीरमध्ये केलेल्या अभ्यासामध्ये हे दिसून आले आहे.

पेलेट इजांमुळे मनोविकारांच्या प्रमाणात मोठी वाढ

‘काश्मीर खोऱ्यात पेलेट इजा पीडितांमधील मानसिक रोग’ या शीर्षकाखाली हा अभ्यास केला गेला. या यादीमध्ये नैराश्य (Depression) पहिल्या स्थानावर आहे. २५.७९% पीडित या विकाराने ग्रस्त आहेत. त्यानंतर जुळवून घेता न येणे (Adjustment disorder १५.७९%), मानसिक आघातानंतरचा तणाव (Post Traumatic Stress Disorder ९.२१%) आणि चिंताग्रस्तता (Anxiety disorders ९%) हे मनोविकार येतात. डॉक्टरांनी २०१६च्या विद्रोहानंतर ३८० पेलेट पीडितांची तपासणी केली आणि त्यापैकी ८५%ना वेगवेगळ्या प्रकारच्या मनोविकारांचा त्रास होत असल्याचे त्यांना दिसून आले.

असिफ रशीद शेख. श्रेय: आमिर अलि भट

असिफ रशीद शेख. श्रेय: आमिर अलि भट

या अभ्यासानुसार पेलेट पीडितांमधील हे मानसिक आजार त्यांना झालेल्या इजेची तीव्रता आणि प्रकार यांच्याशी थेट संबंधित होते. “डोळ्यांना इजा होऊन दृष्टी गमावणे या घटनेनंतर मानसिक आजार होण्याची सर्वाधिक जोखीम दिसून आली,” असे अभ्यास सांगतो. ज्यांना मानसिक आजार झाले अशा पेलेट पीडितांमध्ये ९२.९२% लोकांना डोळ्याला इजा झाली होती तर ७०% रुग्णांना इतर इजा होत्या.

मानसिक समस्यांनी ग्रस्त असलेल्या ३२५ पेलेट पीडितांना आत्तापर्यंत श्रीनगर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाशी निगडित असलेल्या रुग्णालयांमध्ये मानसोपचार मिळाले आहेत. परंतु बहुतांश पेलेट पीडित मानसोपचार तज्ञांना भेटतच नाहीत.

“बहुसंख्य पीडितांना त्यांच्या मानसिक समस्यांबद्दल माहीतच नाही,” असे अभ्यास नमूद करतो. “जरी अनेक रुग्णांना समुपदेशनासारख्या प्रक्रियेमधून किंवा कधीकधी औषधांमार्फत उपचार मिळाले असले तरी उपचार मध्येच सोडून देण्याचे प्रमाणही जास्त आहे, याचे कारण म्हणजे त्यांच्यापैकी अनेक जण नंतरचा पाठपुरावा करू शकत नाहीत.”

अभ्यासामध्ये असेही दिसून आले की नैराश्य, चिंताग्रस्तता आणि मानसिक आघातानंतरचा तणाव यासारख्या मनोविकारांमध्ये चिडचिडेपणा हा सामायिक घटक असतो. पेलेट इजा झालेले आणि त्यानंतर मानसिक आजार झालेले विद्यार्थी यांच्यामध्ये हे सर्वाधिक प्रमाणात दिसून आले. “आमच्या अभ्यासात विद्यार्थी हा सर्वात मोठा गट होता. मानसिक आजाराच्या समस्या आणि पेलेट गोळ्यांमुळे झालेल्या गंभीर इजांमुळे त्यांना शिक्षण चालू ठेवणे आणि अगदी रोजचे सामाजिक-व्यावसायिक जीवनही अवघड झाले आहे,” असे अभ्यास करणाऱ्या एका डॉक्टरांच्या गटाने द वायरला सांगितले. “पेलेटमुळे इजा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची मानसिक आजारांकरिता तपासणी झाली पाहिजे.”

हा अभ्यास रुग्णालयांमध्ये दोन वर्षे चालू होता आणि त्यामध्ये जीएमसी श्रीनगर इथल्या अस्थिरोगशास्त्र आणि नेत्ररोगशास्त्र या विभागांमधल्या रुग्णांचा समावेश होता.

सर्व रुग्णांची मिनी-इंटरनॅशनल न्यूरोसायक्रिऍटिक इंटरव्ह्यू (मिनि-प्लस आणि मिनि-किड) यावर आधारित सविस्तर मानसिक तपासणी करण्यात आली. याव्यतिरिक्त, निदानाची पुष्टी करण्यासाठी डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल (डीएसएस-५) याचाही वापर करण्यात आला.

असिफ त्याच्या आई वजीरा अख्तर यांच्याबरोबर. श्रेय: आमिर अलि भट

असिफ त्याच्या आई वजीरा अख्तर यांच्याबरोबर. श्रेय: आमिर अलि भट

१३ वर्षांचा असिफ रशीद शेख हट्टी आणि हेकेखोर झाला आहे. २० जुलै, २०१६ ला सुरक्षा दलांनी त्याच्यावर पेलेट गोळ्या झाडल्यामुळे त्याच्या उजव्या डोळ्याची दृष्टी गेली आहे. “असिफ खाऊच्या गोळ्या आणायला दुकानात गेला होता तेव्हा पेलेटमुळे जखमी झाला,” असिफची आई वजीरा अख्तर म्हणाल्या. “ही दुर्दैवी घटना घडली त्याआधी माझा मुलगा अगदी शांत आणि लाजाळू होता. आता त्याचं वागणंच बदललं आहे. एखादी गोष्ट त्याने हवी म्हटली की काही करून ती त्याला द्यावीच लागते.” वजीरा म्हणाल्या. “एकदा रागाच्या भरात त्याने खिडकीची काच फोडली. कधीकधी त्याला राग आला की त्याला आवरणं अवघड होऊन बसतं. तो भिंतीवर डोकं आपटायचा प्रयत्न करतो.”

असिफचे वडील अब्दुल रशीद शेख हे अनंतनाग नगरपरिषदेत रोजंदारीवर काम करतात. वजीरा सांगतात, त्यांच्या मुलाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आता त्यांनाही मोलकरीण म्हणून काम करावे लागत आहे. “माझा मुलगा अनेकदा मोठ्याने रडत बसतो आणि स्वतःलाच शिव्या देतो. त्याच वेळी तो मरून गेला असता तर बरं झालं असतं असं त्याला वाटतं.” वजीरा सांगतात.

असिफसाठी त्यांनी मानसोपचारतज्ञाचा सल्ला घेतला आहे का असे विचारले असता त्या नाही म्हणाल्या. “आम्ही असिफच्या डोळ्यांच्या उपचारांसाठी होतं नव्हतं ते सगळं खर्च केलं. माझ्या मुलाच्या बदललेल्या वागण्यात सुधारणा होण्यासाठीही डॉक्टरांची गरज आहे असा आम्ही विचारच नाही केला,” वजीरा म्हणाल्या, “त्या एका घटनेने माझ्या मुलाचे आयुष्यच बदलून गेले आहे.”

आसिफ अहमद पारे. श्रेय: DaastanEZulum/Twitter

आसिफ अहमद पारे. श्रेय: DaastanEZulum/Twitter

अधिकृतरित्या ‘जीवघेणे नसलेले (non-lethal) शस्त्र’ म्हणवली जाणारी पंपसारखे काम करणारी पेलेट बंदूक एकाच वेळी ६०० धातूचे लहान छर्रे वेगात बाहेर टाकते, ज्यामुळे गंभीर जखमा होतात.

सुरक्षा दलाने २०१० च्या विद्रोहाच्या काळात निदर्शकांचे दमन करण्यासाठी पहिल्यांदा पेलेट बंदुकांचा वापर केला. या शस्त्रामुळे काश्मीरमध्ये आजवर अनेकांचे मृत्यू झाले आहेत आणि इतर हजारो जखमी झाले आहेत.

२०१८ मध्ये यूएस डिपार्टमेंट ऑफ द स्टेटने प्रकाशित केलेल्या मानवी अधिकारांच्या उल्लंघनाबाबतच्या एका अहवालामध्ये अधिकृत आकड्यांचा संदर्भ देऊन असे नमूद केले आहे की या शस्त्रामुळे जुलै २०१६ ते ऑगस्ट २०१७ दरम्यान काश्मीरमध्ये किमान १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. २०१८ मध्ये विधानसभेला संबोधित करताना मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितले की पेलेट बंदुकांमुळे जुलै २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या काळात काश्मीरमध्ये ६,२२१ लोक जखमी झाले आहेत.

ऍम्नेस्टी इंटरनॅशनल आणि ह्यूमन राईट्स वॉच यासारख्या मानव अधिकार गटांनी काश्मीरमध्ये पेलेट बंदुका वापरण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मात्र अजूनही सुरक्षा दल त्यांचा मुक्त वापर करत आहेत.

पेलेटच्या ताज्या घटनांमधील पीडित

१४ वर्षांचा असिफ अहमद पारे त्याची रोजची कामे करू शकत नाही. पेलेटमुळे त्याच्या चेहऱ्याची चाळण झाली आहे. तो या बंदुकांची नवीन शिकार आहे.

असिफचे कुटुंबीय सांगतात, १६ मेला तो घरी येत असताना सुरक्षा दलांनी त्याच्यावर जवळून पेलेट गोळ्या झाडल्या. ही घटना दक्षिण काश्मीरमधील एक जिल्हा शोपियाँमधल्या चकमकीच्या ठिकाणावर घडली. पेलेट असिफच्या दोन्ही डोळ्यांमध्ये खोलवर घुसल्या. त्याला उपचारांसाठी श्रीनगरला पाठवण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितले की असिफचा एक डोळा पूर्ण गेला असून तो काढून टाकण्यात येईल आणि दुसऱ्या डोळ्याची दृष्टी थोडीफार परत येऊ शकेल.

जम्मू अँड काश्मीर पीपल्स मूव्हमेंटची नेता शेहला रशीद बरोबरच इतर अनेकांनी असिफबद्दल समाजमाध्यमांमध्ये त्यांच्या अकाऊंटवरून पोस्ट केली आणि या कुटुंबाला मदत करावी अशी लोकांना विनंती केली. असिफचे वडील, ६० वर्षीय जहूर अहमद पारे यांना दगडफेक केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. २१ मेला त्यांची सुटका झाली.

मूळ लेख

लेखाचे छायाचित्र -पेलेट गनची शिकार ठरलेला असिफ अहमद पारे, आणि त्याचे वडील जहूर अहमद पारे. श्रेय: Shehla_Rashid/Twitter 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0