जात नको आर्थिक निकषावर आरक्षण मागा – केरळच्या न्यायाधीशांचे ब्राह्मणांना आवाहन

जात नको आर्थिक निकषावर आरक्षण मागा – केरळच्या न्यायाधीशांचे ब्राह्मणांना आवाहन

न्या. चितमबरेश यांनी पूर्वी हिंदू महिलेला मुस्लिम पुरुषाशी लग्न करण्याचा हक्क आहे तसेच दोन सज्ञान स्त्री-पुरुषांना लिव इन संबंधात राहण्याचा अधिकार अाहे, असे दोन महत्त्वपूर्ण निर्णय दिले होते.

‘आर्टिकल १५’, जातभान आणि निवडणुकीचे राजकारण
कर्नाटकात ब्राह्मणांना जातीचे व उत्पन्नाचे प्रमाणपत्र
सवर्णांचे पाणी प्याले म्हणून दलित विद्यार्थ्याचा मारहाणीत मृत्यू

नवी दिल्ली : केरळ उच्च न्यायालयाचे न्या. व्ही. चितमबरेश यांच्या ब्राह्मण आरक्षणावरून केलेल्या विधानाने खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी ‘तमिळ ब्राह्ममिन्स ग्लोबल मिट’ या संस्थेच्या एका कार्यक्रमात बोलताना न्या. व्ही. चितमबरेश यांनी ब्राह्मण समाजाने जातीऐवजी आर्थिक निकषावर आरक्षण मागण्याची गरज आहे असे विधान केले. त्यांनी ब्राह्मण कोणाला म्हणावे याबाबत काही वैशिष्ट्येही तसेच ब्राह्मणांचे गुण काय असतात हेही उपस्थितांना सांगितले.

या संदर्भातले सविस्तर वृत्त ‘बार अँड बेंच’ने दिले असून न्या. चितमबरेश यांनी प्राचीन काळातल्या ‘अग्रहारम’ (मंदिरांकडून ब्राह्मणांना मिळत असलेल्या जमिनी) परंपरेचेही कौतुक केले. केरळमध्ये अशा अनेक जमिनी पडून आहे त्यांचे जतन केले पाहिजे. ही प्राचीन परंपरा जपली पाहिजे, त्यावर कोणतेही बांधकाम करण्यास मनाई केली पाहिजे, असे न्या. चितमबरेश यांनी म्हटले.

न्या. चितमबरेश आरक्षणाच्या मुद्द्यावर म्हणाले, ‘ मी सध्या घटनात्मक पदावर असल्याने आरक्षणाबाबत कोणतेही मत मांडू शकत नाही. पण ब्राह्मणांनी जात किंवा धर्माच्या आधाराचा आग्रह न धरता केवळ आर्थिक निकषाच्या आधारावर आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करावा. मी कुणाच्या हिताला प्रोत्साहन देत नाही पण आरक्षण कोणत्या आधारावर मिळावे याचा एक मार्ग मी सांगत आहेत.’

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी १० टक्के आरक्षणाच्या तरतूदीचे समर्थन करताना न्या. चितमबरेश म्हणाले, ‘ब्राह्मण आचाऱ्याचा मुलगा ‘नॉन क्रिमी लेअर’ गटात येत असूनही त्याला आरक्षण मिळत नाही. पण अन्य मागास जातीतला लाकडाचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याच्या मुलाला तो ‘नॉन क्रिमी लेअर’ गटात असल्याने आरक्षण मिळते. हे माझे मत नाही पण तुम्ही (उपस्थित श्रोते) या मुद्द्यांवर जोर दिला पाहिजे’.

न्या. चितमबरेश यांनी भाषणाच्या ओघात ब्राह्मण समाजाच्या गुणांचाही उल्लेख केला. ‘ब्राह्मण हे जात्यंध नाहीत, ते अहिंसावादी आहेत. ब्राह्मण वर्ग समाजावर प्रेम करतो, ते योग्य कारणासाठी सढळपणे दानधर्म करत असतात. अशी माणसे धुरा सांभाळत असतात. तामिळ ब्राह्मणांचे असे एकत्र येणे ही कलाटणी देणारी घटना आहे,’ असे ते म्हणाले.

ब्राह्मण समाजाच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख करताना, त्यांनी ब्राह्मण कोणाला म्हणतात, याचा विस्तार केला. ‘ब्राह्मणाला ‘द्विज’ (ज्याला दोन जन्म असतात) असे संबोधतात, कारण त्याने पूर्वायुष्यात चांगली कर्मे केलेली असतात. ब्राह्मण स्वच्छता पाळतात, उदात्त विचार करतात, त्यांचा स्वभाव शुद्ध असतो, बहुतांश ब्राह्मण शाकाहार पाळतात, कर्नाटक संगीताची त्यांना आवड असते. अशा प्रकारचे चांगले गुण त्यांच्यामध्ये असतात, असे न्या. चितमबरेश म्हणाले.

न्या. चितमबरेश हे थिरुवअनंतपुरम येथील गर्व्हमेंट लॉ कॉलेजचे पदवीधर असून नोव्हेबर २०११ मध्ये ते केरळ उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून रुजू झाले होते. नंतर डिसेंबर २०१२ मध्ये ते कायमस्वरुपी न्यायाधीश झाले.

न्या. चितमबरेश यांनी, हिंदू महिलेला मुस्लिम पुरुषाशी लग्न करण्याचा हक्क आहे तसेच दोन सज्ञान स्त्री-पुरुषांना लिव इन संबंधात राहण्याचा अधिकार अाहे, असे दोन महत्त्वपूर्ण निर्णय दिले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0