संयुक्त जनता दलाच्या ( जेडीयु) राष्ट्रीय अध्यक्षपदी रविवारी रामचंद्र प्रसाद सिंह (आरसीपी सिंह) यांची निवड झाली. सिंह हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमा
संयुक्त जनता दलाच्या ( जेडीयु) राष्ट्रीय अध्यक्षपदी रविवारी रामचंद्र प्रसाद सिंह (आरसीपी सिंह) यांची निवड झाली. सिंह हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे अत्यंत निकटचे समजले जातात. त्यांच्या अध्यक्षपदाच्या नावाचा प्रस्ताव पक्ष कार्यकारणीच्या बैठकीत ठेवण्यात आला होता, त्याला सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले.
२०१९मध्ये तीन वर्षांसाठी नितीश कुमार यांची जेडीयूच्या अध्यक्षपदी निवड झाली होती पण राज्यसभा सदस्य असलेल्या आरसीपी सिंह यांच्यासाठी त्यांनी अध्यक्षपद सोडले आहे. आरसीपी सिंह तीन वर्षे पक्षाच्या अध्यक्षपदी राहणार आहेत.
नालंदा येथे राहणारे आरसीपी सिंह हे यूपी काडरचे आयएएस अधिकारी होते व नितीश कुमार सरकारमध्ये त्यांनी पूर्वी प्रधान सचिव म्हणून काम पाहिले होते. ते राज्यसभेवर दोनदा निवडून गेले आहेत.
अरुणाचलमध्ये जेडीयूला भाजपचा धक्का
अरुणाचल प्रदेशमधील संयुक्त जनता दलाचे ( जेडीयु) सहा आमदार भाजपने फोडून आपल्या कळपात घेतल्याने सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितिशबाबू कमालीचे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असतानाच राष्ट्रीय जनता दलाने (राजद) थेट नितीशकुमार यांनाच साद घातली आहे. आमच्या बरोबर या, एक चांगले आणि भक्कम सरकार बनवू असे आवाहन राष्ट्रीय जनता दलातर्फे करण्यात आले आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी थेट नितिशबाबू यांनाच साद घालून आता आमच्याकडे या अशी विनंती केली आहे. आजवरचा इतिहास पाहता नितीशकुमार यांनी अनेकदा लालू प्रसाद यादव यांच्याशी सोयीस्कर मिळतेजुळते भूमिका घेतली आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये संयुक्त जनता दलाचे ७ आमदार होते. पण त्यातील ६ आमदार भाजपने फोडून आपल्या पक्षात घेतले. ६० विधानसभा सदस्य संख्या असलेल्या अरुणाचल प्रदेशमध्ये आता नितीशकुमार यांच्या पक्षाचा एकच आमदार उरला आहे, तर भाजपची संख्या ४८ वर पोहोचली आहे. फोडाफोडीच्या भाजपच्या या वृत्तीने नितीशकुमार प्रचंड नाराज झाले आहेत.
बिहारमध्ये सर्वात कमी आमदार असूनही भाजपच्या टेकूवर नितीशकुमार मुख्यमंत्री पदी आरूढ झाले असले तरी सर्व काही आलबेल नाही. सुरुवातीपासूनच बळेबळे नितिशबाबू यांना मुख्यमंत्रीपदी बसवल्याचे स्पष्ट चित्र दिसत होते. राष्ट्रीय जनता दल सर्वाधिक ७५ जागा घेऊनही सत्तेपासून वंचित राहिला आहे. तर ७४ जागी भाजप आमदार निवडून आले आहेत. केवळ ४३ जागा जिंकून नितीशकुमार भाजपच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे सध्या त्यांची अवस्था एखाद्या शोभेच्या बाहुल्यासारखी झाली आहे. गृह खाते वगळता अन्य सर्वत्र भाजपचे वजनदार मंत्री असल्याने नितिशबाबू यांना मुक्तपणे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही.
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या मातोश्रीचे निधन अलीकडेच झाले. पण नितीशकुमार यांनी त्यांना भेटून सांत्वन करण्याचेही टाळले. याची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.
COMMENTS