नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधात विद्यापीठ प्रशासनाने घेतलेल्या काही निर्णयावर सोमवारी शेकडो विद्या
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधात विद्यापीठ प्रशासनाने घेतलेल्या काही निर्णयावर सोमवारी शेकडो विद्यार्थ्यांनी विद्यापीठात आंदोलन पुकारले. विद्यापीठ प्रशासनाने अचानक वाढवलेली फी व विशिष्ट पोशाखाची केलेली सक्ती याच्याविरोधात गेले दोन आठवडे विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
गेले काही दिवस विद्यार्थी कुलपतींना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना भेट मिळत नसल्याने विद्यार्थी संघटनांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. विद्यापीठ प्रशासनाने नवे हॉस्टेल परिपत्रक आणले असून त्यानुसार सेवा कर म्हणून १७०० रु. तर भोजनालयाचे एकावेळचे (जे नंतर परत मिळणार आहे) डिपॉझिट साडेपाच हजार रु. ते १२ हजार रु. इतके वाढवले आहे. त्याचबरोबर सिंगल रुम शेअरिंगचे मासिक शुल्क २० रु.हून ६०० रु. तर डबल शेअरिंग खोलीचे शुल्क महिना १० रु.हून ३०० रु. इतके केले आहे. शिवाय प्रशासनाने हॉस्टेलमध्ये ड्रेस कोड व कर्फ्युची वेळही निश्चित केली आहे. त्याचबरोबर ‘पार्थसारखी रॉक्स’ भवनात विद्यार्थ्यांना बंदी व विद्यार्थी संघटनांची कार्यालयेही बंद करण्यात आली आहेत. या सर्वांच्या विरोधात विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे.
सोमवारी जेएनयूचा दीक्षांत समारंभ विद्यापीठातील एआयसीटीईच्या सभागृहात होता. त्या सभागृहाकडे जाण्याचा प्रयत्न आंदोलक विद्यार्थ्यांनी केला असता त्यांना सुमारे तीन किमी अगोदरच रोखण्यात आले. तरीही काही विद्यार्थ्यांनी सकाळी ११.३०च्या सुमारास बॅरिकेड तोडून एआयसीटीईच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारण्यात आले. काहींना ताब्यात घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी यावेळी दिल्ली पोलिस परत जा, कुलपती एम. जगदीश एक चोर आहे असे फलक फडकवले.
विद्यार्थ्यांचे हे आंदोलन अनेक वेळ सुरू असल्याने दीक्षांत समारंभाला उपस्थित असलेले मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल अनेक तास अडकून पडले होते. विद्यार्थ्यांनी रस्ता रोखल्याने त्यांच्याशी प्रशासनाने त्यांच्याशी चर्चा सुरू केली. तरीही विद्यार्थी ऐकण्यास तयार नव्हते. नंतर पोखरीयाल यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर विचार करू असे आश्वासन दिले. पण विद्यार्थ्यांना कुलपतींशी भेट देण्यास प्रशासनाने नकार दिला.
या संदर्भात द वायरने जेएनयूतील एक विद्यार्थी अनुज यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी जेएनयूतील १८-१९ हॉस्टेलची फी अचानक वाढवल्याचे सांगितले. ही फी वाढवताना विद्यार्थी संघटनांशी प्रशासनाने चर्चा केली नाही. अशी एकाएकी फी वाढवल्याने सुमारे ४० टक्के विद्यार्थ्यांना विद्यापीठातून आपले शिक्षण सोडावे लागेल अशी भीती अनुज यांनी व्यक्त केली.
मूळ बातमी
COMMENTS