ट्रंप-बायडन चर्चा, धड करमणूकही नाही, ज्ञानही नाही

ट्रंप-बायडन चर्चा, धड करमणूकही नाही, ज्ञानही नाही

डोनल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यात झालेल्या टीव्ही चर्चेमुळं अमेरिकेच्या भवितव्याबद्दल शंका आणि निराशाच पदरी पडली.

नुपूर शर्मांविरोधातल्या सर्व फिर्यादी दिल्ली पोलिसांकडे वर्ग
क्रिप्टो करन्सी अर्थव्यवस्थेला धोकाः रिझर्व्ह बँक
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर

डोनल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यात झालेल्या  टीव्ही चर्चेमुळं अमेरिकेच्या भवितव्याबद्दल शंका आणि निराशाच पदरी पडली. दोघेही सत्तरी पार केलेले, एक गडी प्रेसिडेंट, एक गडी आठ वर्ष व्हाईस प्रेसिडेंट. दोघे करोडो लोकांच्यासमोर भांडतांना दिसतात हे काही देशाच्या चांगल्या भवितव्याचं लक्षण नव्हे.

अमेरिकेसमोरचे पाच मुख्य प्रश्न घेऊन त्यावर दोघांनी दीड तास बोलावं अशी योजना होती. अर्थव्यवस्था, शांतता, पर्यावरण, कोविड वंशवाद अशा  प्रश्नावर दोघांनी प्रथम दोन दोन मिनिटात बाजू मांडावी आणि नंतर उरलेल्या वेळात चर्चा करावी अशी योजना होती.

ट्रंप सतत खोटं बोलत होते.  ९० मिनिटात किमान ४५ वेळा खोटं बोलले. गेल्या चार वर्षांच्या त्यांच्या कारकीर्दीत काय झालं ते सारं जग अनुभवत आहे. साऱ्या जगाशी भांडण उकरून काढलं. देशात वंशद्वेषी हिंसेला चिथावणी दिली. तरीही मुलाखतीत आपण केलेली कामगिरी फिनॉमेनल आहे, लिंकन वगळता इतर कोणाही अध्यक्षापेक्षा जास्त कामगिरी आपण केलीय असं सांगत राहिले.

ट्रंप यांचं एकूण ज्ञान दिव्य आहे हे वारंवार सिद्ध झालं आहे. जंतुनाशकं शरीरात टोचावी असं ते एकदा म्हणाले. डॉक्टरांनी आणि आम जनतेनं त्यांची यथेच्छ टिंगल केल्यानंतर ते म्हणाले की मी गंमत म्हणून तसं बोललो. कोविडचं गांभिर्य सहकाऱ्यांनी वेळोवेळी सांगितलं असताना कोविड आपोआप जाईल, कोविड हे राजकीय विरोधकांनी उचकलेलं बालंट आहे असं ते सतत बोलत राहिले. रोग नियंत्रण विभागाच्या वैज्ञानिक अधिकाऱ्यांशी ते सतत भांडत राहिले.

मुलाखतीत कॅलिफोर्नियात लागणाऱ्या आगींचा प्रश्न निघाला. यांचं ज्ञान किती दिव्य आहे पहा. झाडं वाळतात, पानं सुकतात, त्यामुळं एक साधी काडी पडली तरीही आगी लागतात असं ट्रंप म्हणाले. प्रश्न होता हवामान बदलाचा. सारं जग सांगतंय की प्रदूषणामुळं हवामानात बदल होताहेत; आगी,पूर, चक्रीवादळं निर्माण होताहेत. वाढत्या तपमानामुळं आगी वाढतात असं वैज्ञानिक सांगतात तर ट्रंप सांगतात की पानं वाळतात आणि आग लागते.

प्रतिस्पर्धी जो बायडन यांच्या बोलण्यात सतत ट्रंप अडथळे आणत होते, त्यांच्याबद्दल कुत्सीत बोलत होते. मॉडरेटर क्रिस वॉलेस सतत ट्रंपना समज देत होते, थांबवू पहात होते. खुद्द वॉलेस प्रश्न विचारत तेव्हांही त्यात ट्रंप अडथळे आणत.

या चर्चेत अमेरिका आणि जगाचे प्रश्न विचारात घेतले जावेत अशी अपेक्षा असते. ट्रंप बायडन यांच्यावर व्यक्तिगत आरोप करत होते.बायडन यांच्या मुलानं गैरव्यहार करून पैसे मिळवले असा आरोप ते करत होते. ते आरोप मागं झाले होते, सिद्ध झालेले नाहीत. चार वर्षं ट्रंप यांची कारकीर्द असताना, एफबीआय व इतर संस्था त्यांच्या हाती असताना वरील आरोपांचा शहानिशा लावून बायडन यांच्या मुलाला शिक्षा करणं ट्रंप यांच्या हातात होतं. ते त्यांनी केलं नाही. एका क्षणी बायडन यांना सांगावं लागलं की त्यांचा मुलगा ड्रगच्या आहारी गेला होता आणि फार कष्टानं त्याला त्या त्रासातून बाहेर काढावं लागलं.

क्रिस वॉलेस मॉडरेटर होेते. ते फॉक्स न्यूज या ट्रंप समर्थक चॅनेलमधे काम करतात. पण ट्रंप त्यांनाही बोलू देत नव्हते. ते बोलत असताना ट्रंप मधेच घुसत आणि एकतर्फी रीतीनं बोलत, त्यांना कामच करू देत नसत.  वॉलेस त्यांना सांगत की ते नियमांचं उल्लंघन करत आहेत, वॉलेस यांनी झाडलेल्या या ताशेऱ्याकडंही ट्रंप दुर्लक्ष करत होते.

ट्रंप यांचा आक्रमक, आक्रस्ताळा पवित्रा असा होता की त्यापुढं केवळ तेवढ्याच उर्मटपणे बोलणाला माणूस टिकला असता. बायडन यांचं व्यक्तिमत्व तशा प्रकारचं नाही. बायडन यांना सलगपणे भूमिका मांडणं जमलं नाही याचं एक कारण ट्रंप यांचा उर्मटपणा हेही असेल.

अमेरिकेत अशी पद्धत आहे की प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, सेक्रेटरी ऑफ स्टेट या पदावर काम करणाऱ्या किंवा काम केलेल्या माणसाला त्यांच्या पदानं संबोधलं जातं, नावानं नाही. मिस्टर प्रेसिडेंट, मिस्टर व्हाईस प्रेसिडेंट, मिसेस सेक्रेटरी असं संबोधलं जातं. बायडननी सुरवात करताना ट्रंप यांचा उल्लेख मिस्टर प्रेसिडेंट असाच केला. पण अगदी सुरवातीपासून ट्रंप बायडन यांचा उल्लेख जो असा करत होते. मोदी ओबामांचा उल्लेख बराक बराक असा करत त्याची आठवण झाली. ट्रंप बायडन यांच्याकडं सतत तुच्छतेचे कटाक्ष टाकत होते, त्यांच्यावर कुत्सीत रिमार्क टाकत होते.

कोणत्याही मुद्द्यावर कोणाही माणसानं स्पष्ट अशी योजना मांडली नाही. तुम्ही गेल्या ४७ वर्षांत काय केलंत असं सतत ट्रंप विचारत होते. कित्येक वेळा याच प्रश्नाला आपण काय केलं असं तुटक उत्तर बायडन देत होते. ट्रंप यांच्याकडं कोणताच कार्यक्रम नाही हे सिद्ध करण्याची आवश्यकताच नाही. पण बायडन यांनाही एक सर्वंकष कार्यक्रम मांडता आला नाही हेही खरं आहे. डेमॉक्रॅटिक पक्षात अनेक विषयावर मतभेद आहेत, ते मतभेद जाऊन एक एकात्मिक कार्यक्रम बायडन यांनाही मांडता आला नाही, ते कमी पडले.

१९६२ साली टीव्ही सुरु झाला तेंव्हा केनेडी आणि निक्सन यांच्यात पहिली टीव्ही चर्चा झाली, तेव्हां टीव्ही रंगीत नव्हता. ती चर्चा केनेडीनी जिंकली होती. तेव्हांपासून प्रत्येक चर्चेच्या वेळी चर्चा करणारे अध्यक्षपदाचे उमेदवार जय्यत तयारी करून येतात, अनेक सहाय्यक  बोलण्यातला आशय आणि बोलण्याची ढब याची खूप तयारी करून घेतात. त्यातून श्रोत्यांच्या ज्ञानात भर पडते आणि बरीचशी करमणुकही होते.

या चर्चेत ज्ञान नव्हतं आणि करमणूकही नव्हती.

निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0