‘कोरोना फॅक्ट-चेक’ : अचूक माहितीचे जागतिक आव्हान !

‘कोरोना फॅक्ट-चेक’ : अचूक माहितीचे जागतिक आव्हान !

संपूर्ण जग टाळेबंदीमध्ये अडकले आहे. लोकांचा राजकीय, विज्ञान, अर्थव्यवस्था, आरोग्य व्यवस्था आणि लोकशाही या सर्वांवरचा विश्वास उडून जाऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली असून, अर्धवट आणि अवैज्ञानिक माहितीने ही पोकळी भरून निघत आहे. ही लढाई बऱ्याच आघाड्यांवर लढावी लागणार आहे. त्यामध्ये अचूक माहितीचे व्यवस्थापन हा एक कळीचा मुद्दा बनला आहे.

नियमांची कडक अंमलबजावणी करावी – उपमुख्यमंत्री
तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरू ठेवावेत – ठाकरे
सोशल डिस्टन्सिंग: कोरोनाविरुद्ध एकमेव प्रभावी अस्त्र

आपण एका असाधारण काळात जगत आहोत. शतकामध्ये अशी वेळ कदाचित एकदाच येते जेव्हा एखाद्या रोगाने संपूर्ण जगातील करोडो लोकांना संक्रमित केलेले असते. सहा महिने जगातील प्रत्येक देशामध्ये या रोगाने धुमाकूळ घातला आहे आणि संपूर्ण जग टाळेबंदीमध्ये अडकले. या सर्व परिस्थितीमुळे लोकांचा राजकीय, विज्ञान, अर्थव्यवस्था, आरोग्य व्यवस्था आणि लोकशाही या सर्वांवरचा विश्वास उडून जाऊ शकतो. अशा प्रकारच्या संकटाच्या क्षणी या यंत्रणांवरील कमी झालेल्या विश्वासामुळे अर्धवट आणि अवैज्ञानिक माहितीने ही पोकळी भरून निघत आहे. यामध्ये वाईट वाटावं अशी गोष्ट ही आहे, की सोशल मीडिया, इंटरनेट आणि आता मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे (मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक दोन्ही) ही अर्धवट-अवैज्ञानिक माहितीचा लोंढा लोकांच्या गैरसमजुतीमध्ये अधिकच भर घालत आहेत. त्यामुळे शतकातील सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्य आणीबाणीला तोंड देताना संपूर्ण जगाची दमछाक होत आहे. ही लढाई बऱ्याच आघाड्यांवर लढावी लागणार आहे. त्यामध्ये अचूक माहितीचे व्यवस्थापन हा एक कळीचा मुद्दा बनला आहे.

जेव्हा कोविड -१९ जगभर पसरू लागला, तेव्हा हा आजार इतरांपेक्षा वेगळा आहे, हे समजण्यास सरकारी अधिकारी, सार्वजनिक आरोग्याचे व्यवस्थापन करणारे प्रशासक आणि निर्णायक भूमिका बजावणारे राजकारणी यांना बराच वेळ लागला. मागील काही वर्षात प्रसार झालेले स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू आणि मॅड काऊ आजार हे आजार प्राणघातक मानले गेले, परंतु त्यांचा प्रसार कोरोनाच्या तुलनेने काही भौगोलिक प्रदेशांपुरता मर्यादितच राहिला. अशा प्रकारे, मानवाकडे त्यांच्या उपचारांचा किंवा त्यावर लस विकसित करण्यासाठी पुरेसा वेळ होता. परंतु, कोविड-१९ च्या संक्रमणाचा वणवा आगीसारखा पसरला आणि संपूर्ण जगातील देशांच्या वैद्यकीय आणि आपत्कालीन सेवा-यंत्रणांचा, त्यांच्या अकार्यक्षमतेचा पर्दाफाश झाला.

यामध्ये मानवजातीला सर्वात प्रथम माहिती झालेल्या या रोगाच्या जीवशास्त्रीय तपशीलाबद्दल जसेजसे संशोधन पुढे येत गेले तसेतसे माहितीचा स्फोट होऊ लागला. या रोगाच्या विषाणूच्या  गुणसूत्रांचे मापन, विषाणूच्या उपजाती आणि प्राण्यांमधून मानवामध्ये संक्रमण कसे झाले, या मूलभूत गोष्टी समजायलाच बऱ्याच आठवड्यांचा काळ लोटला. जानेवारीमध्ये चीनने या रोगाबद्दल तपशील जाहीर केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने याला जागतिक महामारीचे संकट घोषित करण्यासाठी अकरा मार्च उजाडला. पुढील फक्त १३ दिवसांत, मागचा पुढचा कसलाही विचार न करता भारताच्या केंद्र सरकारने राष्ट्रीय टाळेबंदी जाहीर केली. टाळेबंदी जाहीर करताना अर्धवट-अवैज्ञानिक माहितीचा सामना कसा करायचा याची कोणतीही जाणीव धोरणकर्त्यांनी आणि प्रशासनातील कार्यकारी व्यवस्थेने ठेवलेली दिसली नाही. सार्वजनिक आरोग्याच्या आणीबाणीचे स्वरूप काय असते आणि त्याला लोकांच्या सहभागाने तोंड कसे द्यायचे याचा कोणताही गंध नसलेला हा निर्णय अंमलात आणताना चुकीच्या माहितीच्या राक्षसाला तोंड देण्यासाठी कोणताही सर्वसमावेशक असा कार्यक्रम आखला गेला नाही.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जेव्हा आपला देश टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात येऊन पोचला, तेव्हा प्रसारमाध्यमे, डिजिटल माध्यमे आणि प्रपोगंडा करणारा सरकारी राजकीय पक्ष आणि त्यांचे आयटी सेल्स, हे संपूर्ण देशाची अशी समजूत करून द्यायला यशस्वी झाले की कोरोना विषाणू हा तब्लिगी जमातीच्या लोकांनी पसरवला आहे आणि दिल्लीतील निझामुद्दीन मर्कझच्या ठिकाणी हा कट रचला गेला. २१ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तब्लिगिंवरचे आरोप खोटे असल्याचा निर्णय देऊन त्यांना दोषमुक्त केले. अर्धवट वैज्ञानिक माहिती आपल्या सर्व जनतेला, आपल्या व्यवस्थेला कशी गुंगीत-भ्रमात ठेऊ शकते आणि त्याचा आपल्या आरोग्य व्यवस्थेवर आणि सामाजिक स्वास्थ्यावर कसा भयानक परिणाम होऊ शकतो हे तब्लिगी प्रकरणात झालेल्या चुकीच्या माहिती प्रसारामुळे आपल्याला कळून येईल. या प्रकारामुळे कोव्हीड-१९ विरोधातील लढ्याला एक भयानक जातीय-धार्मिक वळण मिळाले आणि अचूक वैज्ञानिक माहितीच्या आधारे या महामारीचा मुकाबला करण्याच्या उद्देशाला खिंडार पडले.

अर्धवट-अवैज्ञानिक माहितीची कुजबूज मोहिमेमध्ये अज्ञात व्हॉट्सऍप फॉरवर्डनी सुरुवात झाली. यामध्ये बऱ्याच प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक वृत्त-माध्यमांनी सुद्धा भर घातली आणि लोकांना हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की हा विषाणू चीनने त्यांच्या प्रयोगशाळेतून हेतुपुरस्सर सोडला गेलेला आहे. परंतु हा विषाणू निसर्गातील उत्परिवर्तन (mutation) मुळे जन्माला आल्याचे प्राणिशास्त्रातील संशोधकांनी सिद्ध केल्यानंतर चीनच्या प्रयोगशाळेतील ‘कट’ रचला गेल्याची अफवा मागे पडली. त्यानंतर या विषाणूच्या प्रसारामागे जगाची अर्थव्यवस्था आपल्या नियंत्रणाखाली आणण्याचा चीनचा कट आहे, अशा अफवा पसरायला सुरुवात झाली. या प्रकारच्या अफवा किंवा व्हायरल बातम्या / विश्लेषणामागे विषाणूला एका शस्त्राप्रमाणे वापरले गेल्याचे रंगवून सांगितले गेले. याप्रकारची भडक कट कारस्थानच्या कारवाया उघड करणाऱ्या दावा असलेल्या चुकीच्या बातम्या या केंद्र सरकारच्या राजकीय पाठीराख्यांसाठी सोयीच्याच होत्या. कारण त्यामुळे केंद्र सरकारचे लॉकडाऊन काळातील अपयश झाकून ठेवायला मदत होत होती. आपल्या बाजूने येणाऱ्या टीकेचा रोख दुसरीकडे वळवायची सत्तेतील शक्तींची ही कोरोना काळातील सुधारित आवृत्ती होती. आता या कटकारस्थानाच्या अफवेला बरेच महिने उलटून गेले आहेत आणि त्यामुळे केंद्र असेल किंवा भारतातील राज्य सरकारे असतील त्यांना आपल्या अपयशाच्या उत्तरदायित्त्वापासून पळून जाता येणार नाही.

दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळात चुकीच्या माहितीच्या संदेशाचा पुढील गाजावाजा पुढे रेटला गेला. ज्योतिषतज्ज्ञ आणि अंकतज्ज्ञ सांगू लागले की त्यांनी हा साथीचा आजार सुरू होण्यापूर्वीच याची भविष्यवाणी केली होती. त्यापैकी काहींनी असेही भाकीत केले होते, की कोविड -१९ चा अंत होणारा पुढील टप्पा कधी सुरु होणार आहे; त्या तारखा आल्या व गेल्या पण कोरोनाची परिस्थिती गंभीरच होत गेली. त्यानंतर काही लोकांनी जप-तप आणि सकारात्मक उर्जेबद्दल प्रचार करण्यास सुरुवात केली. पंतप्रधानांनी आरोग्यसेवकांचे आणि डॉकटरांचे अभिनंदन करण्यासाठी थाळी-घंटा वादन करण्याच्या आवाहनाला ‘व्हाटसऍप विद्यापीठा’मधील धर्मांध-छदमविज्ञान तज्ज्ञांनी कोरोनाविरुद्ध शस्त्रवापर केल्यासारखा आक्रमक प्रचार करून लोकांच्या बेसावधनतेमध्ये वाढ होण्यात भर घातली. याच्यापुढे जाऊन जसे आधुनिक भारतात आजपर्यंत बऱ्याच रोगांवर इलाज म्हणून दावा केल्या गेलेल्या गोमूत्र, शेण किंवा पंचगव्याद्वारे याची आक्रमक शिफारस केली. याचा पुढे जास्त प्रचार झाला नाही, कारण यातून इतर दुष्परिणाम समोर आले. यावर कडी म्हणजे पुढे जाऊन गुजरात सरकारने कोविड-१९ च्या रूग्णांवर पंचगव्याच्या मानवी चाचण्या सुरू केल्या आणि हा अवैज्ञानिक उपाय सगळ्यांच्या माथी मारून लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकणाऱ्या कृतीला सरकारी आश्रय मिळाला.

हे प्रकरण केंद्र सरकारच्या पातळीवर अधिक गंभीर प्रकारे होत होते. कोव्हीड-१९ आजारचा मुकाबला करताना आजार प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केंद्राच्या आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक काढा गुणकारी-रामबाण उपाय आहे, असे मार्गर्शक तत्त्व जाहीर करणाऱ्या जाहिराती प्रसारित करण्यात आल्या. केंद्र सरकारच्या यंत्रणेमार्फत सर्व विद्यापीठे, सरकारी आस्थापने, सार्वजनिक उपक्रम (PSU), मंत्रालयांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्यास सांगितले गेले. याबरोबर आणखी दोन गोष्टी घडल्या. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यानजीक येईपर्यंत आरोग्य सेतू ऍप वापरणे बंधनकारक करण्यात आले. याचबरोबर अर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक गोळ्यांचा जोरदार प्रचार केला गेला, ज्याची कोरोना विषाणू विरोधातील लढ्यात उपयुक्तता अजूनही सिद्ध झालेली नाही.

तब्लिगी समुदाय संबंधित चुकीच्या प्रचारानंतर या सर्व पुढील घटनांचा एकत्रित परिणाम असा झाला की धोरण अंमलबजावणी पातळीवर प्रतिबंधक योजना(Prevention), शोध-तपास (Detect), मागोवा (Trace), Test(चाचणी), Isolate-Quarantine(विलगीकरण-अलगीकरण), Treat (उपचार), निराकरण (and Mitigate) या जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीपेक्षा आपली सगळी राज्य सरकारे केंद्राच्या एकाधिकारशाहीने अंमलात आणलेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात गुंग होऊन गेली. भीती पसरवणारे मुद्रित-इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचे कव्हरेज, कोणतीही एकवाक्यता व सुसंवाद नसलेली केंद्र-राज्य सरकारांची धोरणे आणि मोठ्या प्रमाणावर चुकीच्या माहितीचे वणवे समाज-माध्यमांतून पसरत गेल्यानंतर गावोगावी आणि शहरोशहरी सुद्धा मदत करायला पुढे येण्याऐवजी समाजमन कोव्हीड-१९ चे संक्रमण झालेल्यांना वाळीत टाकू लागले. भिती आणि अंधश्रद्धेने गुलाम झालेली मने ही संहारक शस्त्रांपेक्षा सुद्धा अधिक भीषण नुकसान करू शकतात, याचे कोरोना काळातील माहितीच्या व्यवस्थापनात आलेले अपयश, हे एक प्रमुख उदाहरण आहे.

कोणत्याही प्रकारचे उत्पादित औषध किंवा लस उपलब्ध नसल्याने लोक घरगुती उपचारांकडे वळू लागले. चहा, आले, लसूण, लिंबू यांपासून बेकिंग सोडा आणि मोहरीचे तेल वापरुन नाकपुड्या स्वच्छ करणे या कोरोनावर उपाय म्हणून सिद्ध न झालेल्या गोष्टींचे संदेश फॅमिली व्हाट्सऍप ते समाजमाध्यमांत फिरू लागले. यापैकी बऱ्याच घरगुती मसाले-पदार्थांचा वापर सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी केला जातो आणि हे मोठ्या लोकसंख्येच्या मनावर बिंबत गेले की कोरोना विषाणू जो नाक, घसा किंवा श्वसन-अन्ननलिकेमार्फत सर्वात घातक दृष्ट्या आक्रमण करून जीवघेणा ठरू शकतो, ते थांबवण्यासाठी हे उपाय आक्रमकपणे वैयक्तिक आणि घरगुती पातळीवर केले गेले, तर रोगापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते. जागरूक, प्रश्न विचारणाऱ्या  आणि नेहमी साशंक असणाऱ्या काही मर्यादित लोकांना सोडले तर बहुतेक लोकांनी आजार प्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या पलीकडे जाऊन याचा प्रचार केला. दिवसभर गरम पाणी पिल्याने कोरोना होत नाही, हा समज कोणताही वैज्ञानिक आधार नसताना सर्वसामान्यांच्या मनात घर करून राहिला. यावरून यात आपण कसं गंडलो आहोत हे दिसून येईल. घरगुती मसाले-पदार्थांपासून सर्दी-ताप दूर होण्यास मदत होते, परंतु ते काही यावरचे अंतिम औषध नाही. सर्दी-तापाचा त्रास वाढल्यास आपल्याला औषधच घ्यावे लागते. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी हे सर्व घरगुती पदार्थ कसे काय उपयोगी पडू शकतील हा प्रश्न विचारणाऱ्यांना मुर्खात काढले गेले.

येथे, ‘आजार ‘प्रतिकारशक्ती’ या शब्दांची सार्वजनिक समज कशी चुकीच्या दिशेने गेली आहे हे समजावून घेणे आवश्यक आहे. वैज्ञानिक भाषेत, आजार प्रतिकारशक्ती नेहमीच एखाद्या विशिष्ट रोगाविरूद्ध असते आणि अशी आजार प्रतिकार शक्ती मिळविण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे लसीकरणद्वारे किंवा एखाद्यास संसर्ग झाल्यानंतरच्या काळात त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रतिपिंड (antibody) तयार झाल्यास, ही आजार प्रतिकारशक्ती तयार होऊ शकते. पण सामान्यतः जनतेमध्ये असा समज आहे, की कोणत्याही पारंपरिक उपायांनी आपल्याला थोडे जरी बरे वाटले तरी हे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित पदार्थ आपली इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात. जनमानसातील याच अवैज्ञानिक धारणेचा फायदा घेऊन हर्बल द्रावणे, काढा बनवण्याची साधने विकणारे आणि इतर आयुर्वेदिक-होमियोपॅथी-युनानी पद्धतीच्या औषधांचे विक्रेते यांनी भरपूर मार्केटिंग करून लोकांची दिशाभूल तर केलीच शिवाय अनैतिक मार्गाने गडगंज पैसा सुद्धा कमावला. पतंजली उद्योगसमूहाने ‘कोरोनील’ या इम्युनिटी वाढवण्यासाठी असा प्रचार केलेल्या औषधाचा सुद्धा कोरोनावर उपचार म्हणून गाजावाजा केला. त्यानंतर उत्तराखंडच्या अन्न व औषध प्रशासनाने (U.K.-FDA) आम्ही असे कोणतंही प्रमाणपत्र दिलं नाही असं जाहीर केलं. यानंतर केंद्र सरकारने या उत्पादनाची जाहिरात करण्यास पतंजलीला बंदी घातली आणि अलीकडेच मद्रास उच्च न्यायालयाने पतंजली समूहाला या प्रकरणात औचित्यभंग करून सार्वजनिक आरोग्यावर दुष्प्रचार करण्यासाठी दहा लाख रुपयांचा दंड केला.

फसव्या-अर्धवट माहितीच्या आणखी एका प्रकाराने या विषाणूच्या स्वरूपाबद्दल आणि त्याच्या प्रसाराबद्दल मोठा संभ्रम निर्माण केला. बऱ्याच ठिकाणी असा दावा केला गेला की मांस-मटण आणि चिनी खाद्यपदार्थाद्वारे हा विषाणू पसरतो. तसेच सुरुवातीच्या काही आठवड्यांत, अनेकांना असा विश्वास होता की उष्णता आणि आर्द्रतेमुळे भारतात विषाणूचा प्रसार होऊ शकणार नाही. मेच्या सुरुवातीच्या काळात काही वृत्तपत्रांत अशा बातम्या आल्या की नॉव्हेल कोरोना विषाणूचा प्रसार वटवाघळांमार्फत होत आहे आणि बर्‍याच शहरांत अतिसंवेदनशील स्थानिक स्वराज्य संस्थांनी आणि हाऊसिंग सोसायटींनी वटवाघळांच्या वसाहती असलेली मोठी झाडे तोडण्यास सुरुवात केली. वटवाघळांमार्फत कोव्हीड-१९ पसरत असल्याचे कोणतेही पुरावे समोर आलेले नसताना आणि कोणत्याही शासकीय प्रयोगशाळेने किंवा मंत्रालयाने याबाबत कोणतीही सूचना जारी केलेली नसताना वृक्षतोड सुरु झाली. हे धक्कादायक होते.

यातील पुढील कहर म्हणजे देशामध्ये बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन नंतर घरी परतणाऱ्या प्रवासी मजुरांवर ब्लिच पावडरच्या द्रावणाचा किंवा सोडियम हायपोक्लोराइटच्या द्रावणाचे फवारे मारले गेले. देशामध्ये प्रत्येक सरकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ, बऱ्याच ठिकाणी मार्केट्समध्ये, हाऊसिंग सोसायटीमध्ये, रस्त्यांवर, इमारतींच्या भिंतीवर आणि संपर्क येऊ शकणाऱ्या इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण कक्ष (Disinfection Chamber) उभे केले गेले. यामध्ये वापरली जाणारी रसायने ही कोरोना विषाणूला नष्ट करू शकणारी नव्हती. परंतु निर्जंतुकरणाचा सरळधोपट मार्ग हा कोरोनाच्या नावाने सार्वजनिक भंपकपणा म्हणून पुढे आला. यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर जनता ‘आपण या प्रकारच्या कक्षातील फवाऱ्यामुळे निर्जंतुक झाल्याच्या गुंगीमध्ये गाफील’ राहिली.

या चुकीच्या माहितीच्या विरोधात अनेक गट जोरदार लढा देत आहेत. ‘कोविड -१९ ला भारतीय वैज्ञानिकांचा प्रतिसाद (ISRC)’ या भारतातील नामवंत शास्त्रज्ञांच्या गटाने अर्धवट आणि अवैज्ञानिक माहितीमुळे तयार झालेल्या गैरसमजूतींना दूर करण्यासाठी असंख्य इन्फोग्राफिक्स विविध भारतीय भाषांमध्ये तयार केली आहेत. वादग्रस्त घटना, अजून सिद्ध न झालेले (अ)वैज्ञानिक दावे आणि टाळेबंदीमुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण तसेच यापुढील काळात कोरोनाशी मुकाबला करताना वैज्ञानिक पुरावे सार्वजनिक धोरण अंमलबजावणीमध्ये आणून कशा पद्धतीने कोणत्या उपाययोजना राबवत्या येतील यावर वेळोवेळी ISRC च्या वैज्ञानिक गटाने सार्वजनिक निवेदने जारी केली.

मागील काही महिन्यांत कोरोना विषयक काही फेक न्यूज, अर्धवट माहिती व अवैज्ञानिक संदेश पसरवणाऱ्या बातम्या मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांतून व्हायरल होत आहेत. त्यातील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या बातम्यांचे संकलन मी स्वतः केले आहे आणि अजूनही ते चालू आहे. त्यातील काही बातम्यांचा संदर्भ म्हणून येथे यादी देत आहे. महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील बातम्यांचा यात समावेश आहे.

१) चिकन खाल्ल्याने कोरोना होतो. (सुरुवातीच्या काही आठवड्यात लाखो कोंबड्याना यामुळे मारण्यात आले. यामुळे स्वयंरोजगार किंवा लघु-उद्योजकांचे अत्यंत नुकसान झाले.)

२) पुण्यातील एका ख्रिश्चन धर्मगुरूने एका विशिष्ट प्रकारचे तेल लावून येशूचा जप केल्यास कोरोना पळून जातो असा दावा केला होता.

३) सूर्यप्रकाशाच्या प्रभावाने कोरोना विषाणू नष्ट होतो.

४) लसूण खाल्याने कोव्हीड-१९ विषाणू दूर होतो.

५) हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाने कोरोना दूर होतो.

६) वर्तमानपत्रामुळे कोरोना पसरतो.

७) शंखध्वनी, टाळ्या आणि थाळ्यांचा आवाज यामुळे कोरोना विषाणू पळून जातो.

८) कोरोना विषाणू हवेमार्फत पसरतो.

९) धोत्र्याच्या झाडाची फुले औषध म्हणून कोव्हीड-१९ वर उपयोगी आहेत.

१०) मोहरीच्या तेलाने कोव्हीड-१९ आजार बरा होऊ शकतो.

११) अल्कोहोल पिल्याने कोरोनाचा विषाणू दूर होतो. (इराणमधील अफवा – या घटनेत अनेक लोक मृत्युमुखी पडले होते)

१२) जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार कोबी खाल्ल्याने कोव्हीड-१९ होतो.

१३) मीठ घातलेल्या गरम पाण्याने गुळण्या केल्यास कोरोना दूर होतो.

ही फेक न्यूजची काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. यामध्ये अजून शेकडो उदाहरणे आपण देऊ शकतो, एवढी माहितीच्या प्रदूषणाची समस्या मोठी आहे आणि विशेषतः कोरोनाच्या काळात ही समस्या अजून जटील बनली आहे. या चुकीच्या बातम्या आणि अर्धवट-अवैज्ञानिक माहितीच्या  संदेशांची पोल-खोल करण्यासाठी सध्या भारतामध्ये बऱ्याच स्वतंत्र-तटस्थ माध्यमसंस्था काम करत आहेत. यामध्ये AltNews, BoomLive, HoaxSlayer हे प्रमुख आहेत. भारतातील बऱ्याच वृत्तपत्रांनी आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांनी सुद्धा त्यांच्या मीडिया कार्यक्रमांत / प्रकाशनांमध्ये फॅक्टचेक (म्हणजे सत्य-तपासणी) समाविष्ट करून घेतले आहे. परंतु ज्या समर्पित आणि व्यावसायिक वृत्तीने AltNews आणि BoomLive या संस्था सध्या हे काम करत आहे त्या दर्जेदारपणे कोणीही सध्या तरी करत नाही.  कदाचित प्रसारमाध्यमे ताज्या बातम्यांच्या प्रवाहात आणि व्यावसायिक स्पर्धेमध्ये एवढे वाहून जातात की पूर्ण क्षमतेने त्यांना यामध्ये त्यांची संसाधने देता येत नाहीत. केंद्र सरकारने सुद्धा आता पत्र-सूचना प्रसिद्धी विभागातर्फे PIB-FactCheck ही सेवा सुरु केली आहे परंतु केंद्र सरकारच्या अधिकृत भूमिकेला प्रश्न करणाऱ्या कोणताही फेक न्यूजचा भांडाफोड हा विभाग उदार मनाने मान्य करत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा वेळोवेळी असंख्य फेक न्यूज उघडी पाडणारी किंवा अर्धवट-अवैज्ञानिक माहितीचे खंडन करणारी बरीच निवेदने-स्पष्टीकरणे दिली आणि यातूनही मोठ्या प्रमाणावर जागतिक प्रसारमाध्यमे, प्रशासन आणि लोक यांना या माहिती-प्रदूषणाला तोंड देण्यास मदत होत आहे.

आपल्या समाजात असा एक मोठा समूह आहे, की जो दुष्प्रचाराला आणि चुकीच्या अवैज्ञानिक माहितीला नेहमीच बळी पडतो. यात आणखी गंभीर बाब म्हणजे या लोकांचे गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न करणाऱ्या लोकांना शत्रू किंवा पाश्च्यात्य देशांचे हितसंबंधी असे समजले जाते. अशा मोठ्या लोकमूहाला आपण जर वैज्ञानिक पुरावे, वैज्ञानिक तथ्य आणि संबंधित माहिती पुरवायचा जर प्रयत्न केला, तर त्यांच्यात फार परिवर्तन होईल याची शक्यता वाटत नाही. पण या लोकांच्या पलीकडे जाऊन असा एक लोकांचा मोठा समूह आहे, की जे या प्रकारची अर्धवट अवैज्ञानिक माहिती तयार करणार नाहीत, त्याचा प्रसार करणार नाहीत परंतु त्यांच्यासमोर अशी माहिती जर आली ते त्याची सत्यता तपासून पाहणारे प्रश्न सुद्धा विचारणार नाहीत. हा समूह बऱ्याच वेळा अदृश्य असतो आणि त्यांच्या ताकदीबद्दल आपण जास्त आशादायी नसतो. परंतु याच मोठ्या लोकसमूहाकडे, जो सक्रिय नसतो, शांत असतो, चुकीची माहिती पसरवणाऱ्या गटाची हिम्मत वाढवतो, त्या गटाशी संवाद साधला पाहिजे.

चुकीची माहिती ही एखाद्या संसर्गासारखी पसरते. एका समुदायाकडून दुसर्‍या समुदायाकडे स्थलांतरित होण्यासाठी एका विशिष्ट संख्येच्या सक्रिय संदेशवाहकांची गरज असते आणि मोठ्या प्रमाणावर वणव्यासारखी एखादी अर्धवट माहिती, अफवा पसरण्यासाठी या विशिष्ट (critical mass) संख्येचे लोक या अवैज्ञानिक माहितीने प्रभावित होणे आवश्यक असते. समाजाचा एक मोठा गट जेव्हा अर्धवट-चुकीच्या माहितीपासून एक प्रकारची प्रतिबंधक शक्ती विकसित करतो तेव्हा या प्रकारच्या चुकीच्या माहितीपासून आपले संरक्षण होऊ शकते. मोठ्या प्रमाणावर जर लोकांनी त्यांच्याकडे येणारे चुकीचे ‘फॉर्वर्डस’ जर जागेवरच डिलीट केले तर यातून चुकीच्या माहितीचा प्रसार व्हायची शक्यता कमी होईल. यामुळे अवैज्ञानिक-अर्धवट माहितीच्या संसर्गाबद्दल आपली प्रतिकारक शक्ती वाढेल.

विज्ञान विषयक संवाद साधताना बहुतेक वेळेला आपली पारंपारिक रणनीती लोकांना अचूक वैज्ञानिक माहिती सांगणे, स्वतःचा विज्ञान विषयक अभ्यासक असल्याचा धाक / दबदबा निर्माण करणे इथपर्यंतच मर्यादित असते. पण यामुळे काही फरक पडत नाही. लोकांना आज एका गूगल सर्चमध्ये सर्व माहिती, आकडेवारी आणि इतर तपशील उपलब्ध होतो. त्यांना अ‍ॅनिमेशन आणि व्हिडिओ सुद्धा सहज ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्यांना आता अद्ययावत माहिती शोधून एकत्रित करण्यासाठी तज्ञांची आवश्यकता नाही. आता आपण त्याच त्या वैज्ञानिक तथ्यांविषयी बोलणे थांबविले पाहिजे. त्याऐवजी, आपण त्यांच्याशी विज्ञानाची प्रक्रिया / पद्धती कशी काम करते आणि तर्कनिष्ठ तपासणी कशी करायची याचे प्रशिक्षण दिले पाहिजे. एक प्रकारे वैज्ञानिक पद्धतीचे भान असणाऱ्या वैज्ञानिक दृष्टीकोनाची आणि त्याच्यासाठी आवश्यक कौशल्याची पेरणी आपण लोकांमध्ये केली पाहिजे. एक म्हण आहे, “जर तुम्ही एखाद्याला मासे दिले तर तो आज खाईल, परंतु माणसाला मासे पकडायला शिकवा आणि तो कायमचा त्याचे पोट भरत राहील.

राहुल माने विज्ञान-तंत्रज्ञान विषयावर लिहिणारे पत्रकार असून, ‘इंडियन अॅकॅडेमी ऑफ सायन्सेस’चे ‘एस. रामशेषन विज्ञान लेखन’ फेलो आहेत.

ऋणनिर्देश आणि संदर्भ  :

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई येथे कार्यरत असलेले प्रा. अनिकेत सुळे यांनी वेळोवेळी वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या आणि समाजमाध्यमे यातून या विषयावर केलेले भाष्य मला सहाय्य्यभुत ठरले. विशेषतः त्यांनी EPW मध्ये या विषयावर लिहिलेला लेख माझ्यासाठी प्रेरणादायी ठरला. वरील माझ्या लेखामध्ये त्यांच्या EPW च्या लेखातील बरेच तपशील आणि तर्क समाविष्ट केले आहेत.

EPW लेखाची लिंक : https://www.epw.in/journal/2020/24/commentary/covid-19-and-infectious-misinformation.html

२) दर महिन्याला अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रामध्ये प्रकाशित झालेले विविध लेख

‘कोरोना आणि अंधश्रद्धा’ या विषयावरील वार्तापत्र विशेष

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0