पत्रकारांवर हल्लेः देशभरातून निषेध

पत्रकारांवर हल्लेः देशभरातून निषेध

मुंबईः देशात वाढती धर्मांधता व कोविड-१९ महासाथीत सरकारकडून होणारी मुस्कटदाबी व पत्रकारांवर होणारे सततचे हल्ले यांचा निषेध म्हणून १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देशभरातील अनेक पत्रकारांनी ऑनलाइनच्या माध्यमातून चिंता प्रकट केली व सरकारचे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ऑनलाइन माध्यमातून पत्रकारांवर होणार्या हल्ल्यांचाही निषेध करण्यात आला.

गेल्या काही दिवसांत पत्रकारांवर जीवघेणे हल्ले झाले. पहिली घटना ईशान्य दिल्लीत घडली. येथे दंगलीनंतर वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या कारवाँ या मासिकाचे शाहीद तांत्रेय, प्रभजित सिंग व एका महिला पत्रकारावर जमावाने हल्ला केला. त्यांना मारहाण केली, महिला पत्रकाराच्या शरीराला स्पर्श केला गेला. पत्रकाराला धर्म विचारून जमावाने मारहाण केली व त्यांना पाकिस्तानात जा म्हणून सांगण्यात आले.

दुसरी घटना ११ ऑगस्टला बंगळुरूत घडली. इंडिया टुडे, द न्यूज मिनिट, सुवर्णा न्यूज 24X7 या वृत्तवाहिन्याच्या पत्रकारांवर हल्ले करण्यात आले. हे पत्रकार बंगळुरू हिंसाचारात जमावाने नासधूस केलेल्या पोलिस ठाण्याचे वृत्तांकन करत असताना त्यांच्यावर जमावाने हल्ला केला.

आपले कर्तव्य करत असताना पत्रकारांवर हल्ले करणे, त्यांच्यावर पोलिस कारवाई करणे, प्रशासनाकडून धमकी देणे अशा घटना सातत्याने घडत आहे. दिल्ली दंगलीचे वृत्तांकन करताना आणि कोविड-१९ परिस्थितीबाबत वृत्ते देताना या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

जम्मू व काश्मीर, छत्तीसगड अशा राज्यांमध्ये पत्रकारांवर गुन्हे दाखल करणे, व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणार्या पत्रकारांवरच पोलिस कारवाईची धमकी देणे असे प्रकार नित्याचे झाले आहेत.

हे सर्व चित्र मांडण्यासाठी ऑनलाइन मोहीम हाती घेण्यात आली होती. ट्विटरवर #StopMediaLockdown हा ट्रेंडही चालवण्यात आला होता.

द वायरचे संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी पत्रकारांवरचे हल्ले थांबवावेत, त्यांच्यावरच्या खोट्या केसेस मागे घेतल्या जाव्यात, पोलिसांनी त्यांची हिंसा थांबवावी असे आवाहन केले. लॉकडाऊनच्या काळात अयोध्येमध्ये योगी आदित्यनाथ सरकारकडून धार्मिक कार्यक्रम रेटण्याचे प्रयत्न केले जात असल्याच्या वृत्तावरून वरदराजन व द वायरवर उ. प्रदेश पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. हा मुद्दाही त्यांनी मांडला.

स्क्रोलचे संपादक नरेश फर्नांडिस यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणशी मतदारसंघात भूकबळीचे वृत्त स्क्रोलच्या कार्यकारी संपादक सुप्रिया शर्मा यांनी देताच त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले, असा मुद्दा उपस्थित केला.

पत्रकारांवर झालेले हल्ले व पोलिसांची दमनशाहीची सर्वाधिक प्रकरणे भाजपशासित राज्यात घडली आहेत. पण अन्य राज्यातही विशेषतः कोरोना महासाथीचे वृत्तांकन करणार्या पत्रकारांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रात १५ पत्रकारांवर असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पत्रकारांनी सरकारची महासाथीतील अकार्यक्षमता उघडकीस आणली होती पण त्यावर प्रशासनाने आक्षेप घेत त्यांच्यावर खटले दाखल केले आहेत.

मूळ बातमी

COMMENTS