लोकशाही तुडवणारे ती सांगून तुडवत नसतात. ‘आता मी बघा कशा मुसक्या आवळतो’, असं सांगून मुसक्या आवळत नसतात. या देशात लोकशाही स्थापन करणारांनी, तिची प्रतिष्ठापणा करणारांनी ती सहजासहजी कुणाच्या खुंट्याला बांधली जाणार नाही याची व्यवस्था करून ठेवली आहे.
विक्रम गोखले हे उत्तम अभिनेते आहेत. नाटक,चित्रपट, मालिका या माध्यमांमधला फरक त्यांना अचूक कळतो, त्या त्या प्रमाणे आपल्या अभिनयाच्या पद्धतीत बदल करण्याची कुवत, क्षमता आणि योग्यता त्यांच्या ठायी आहे. हे त्यांनी गेली पन्नासेक वर्षे वारंवार सिद्ध केलं आहे. परंतु एखादी व्यक्ती अभिनेता म्हणून चतुरस्त्र असणं आणि माणूस म्हणून त्याने चौफेर विचार करणं या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. आपण या दोन गोष्टींची नेहमीच गल्लत करतो. त्यातही वय वाढलेला, किंवा झालेला प्रत्येक माणूस तार्कीक तोल सांभाळून बोलेल असं आपल्याला उगाचच वाटत असतं. गोखले लोकशाहीविषयी बोलले ते बरंच झालं, त्यांनी आपल्या वक्तव्यानं स्वतःच लोकशाहीची लक्तरं काढून वेशीवर टांगली. गोखले जे बोलले ते अनेकांच्या मनात आहे, त्यामुळे हे एकट्या गोखलेंचंच मत आहे असं मानण्याचं कारण नाही.
लोकशाही तुडवणारे ती सांगून तुडवत नसतात. ‘आता मी बघा कशा मुसक्या आवळतो’, असं सांगून मुसक्या आवळत नसतात. या देशात लोकशाही स्थापन करणारांनी, तिची प्रतिष्ठापणा करणारांनी ती सहजासहजी कुणाच्या खुंट्याला बांधली जाणार नाही याची व्यवस्था करून ठेवली आहे. परंतु वर वर लोकशाहीची सर्व तत्वे पाळून, सर्व नियम, कायदे पाळले जात आहेत, असा भास निर्माण करून जे अप्रत्यक्षरित्या लोकशाहीच्या गळ्याला नख लावण्याचे उद्योग करत आहेत, ते गोखले यांना दिसणार नाहीत. त्यांच्यासारख्या अनेकांना ते दिसत नाही.
‘देशात सातत्याने लोकशाही धोक्यात आहे, लोकशाहीची गळचेपी होते आहे असं बोललं जातं त्यावर तुमचं मत काय?’ असं विचारलं असता, ‘लोकशाहीची गळचेपी होते आहे असं म्हणणाऱ्यांचं थोबाड फोडलं पाहिजे’ अशी संतप्त प्रतिक्रिया गोखले यांनी दिल्याचं प्रसिद्ध झालं आहे. ‘कोण असं म्हणतं ? मी आत्ता माझं मत मांडतो आहे, इथे प्रत्येकजण मत मांडू शकतो, यांना मतदान करा किंवा करू नका हे सांगू शकतो, अशा वेळी गळचेपी होते आहे अशी ओरड करणारी माणसं आहेत कोण? त्यांना माझ्यासमोर आणा.’ असं आव्हानच त्यांनी दिल्याचं या बातमीत म्हटलेलं होतं.
लोकशाहीचा अर्थ गोखल्यांना अजून कळलेला नाही हे तर त्यांनी या वक्तव्यातून दाखवून दिलं आहेच. कारण ज्यांना ही लोकशाही नव्हे असं वाटतं त्यांचं थोबाड फोडण्याची इच्छा व्यक्त करून आपण स्वतः किती लोकशाही मानतो हे त्यांनी स्पष्ट करून टाकलं आहे. मुळात गोखलेंना राजकीय प्रश्न विचारण्यातच माध्यमाच्या प्रतिनिधीची चूक झाली. ‘नाटक,सिनेमावाल्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यावर सरकारची भूमिका तुम्हाला पटते का, काही वेगळे उपाय सूचतात का?’ असे प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारायला हवे होते. गोखलेंचा तो प्रांत आहे. ते नेहमी त्यांच्यात वावरत असतात. गोखलेंना त्यांचे प्रश्न चांगले माहिती असतील. परंतु प्रतिनिधी त्यांना लोकशाहीविषयी विचारत बसला. ‘कोणत्याही प्रश्नाचे आम्ही म्हणून तेच खरे उत्तर आहे, इतर कोणतेही उत्तर सांगण्याचा प्रयत्न करणारांना आम्ही थोबडवून काढू’ अशा वृत्तीशीच या देशातील लोकांना सध्या झगडावे लागत आहे, हे गोखले यांना कसे माहिती असणार? सत्ता कोणाचीही असो,कलावंत, लेखक, विचारवंत, पत्रकार यांनी अभिव्यक्ती आणि आविष्कार स्वातंत्र्याच्या सीमा अधिकाधिक ताणण्यासाठीच झगडायचे असते, हे गोखलेंना कोण सांगणार? कशाला लोकशाही म्हणायचं आणि कशाला म्हणायचं नाही, हे ठरवण्याचा अधिकार हे सुद्धा लोकशाहीचेच एक महत्वाचे लक्षण आहे हे गोखलेंना कसे कळणार?
लोकशाहीवरील संकटे अनेकदा छुपी असतात आणि ती प्रत्येकवेळी आपल्या लक्षात येतीलच असं नाही. उदाहर्णार्थ राज ठाकरेंच्या मताशी असहमती दर्शवली म्हणून राजचे समर्थक कुणाच्या तरी घरी जाऊन त्या व्यक्तीला उठाबशा काढायला लावतात, तेव्हाही लोकशाहीच्या अंगावर वळ उठतात. एखाद्या लेखकानं पुरस्कार परत केला म्हणून सोशल माध्यमांच्या टोळधाडी अंगावर सोडल्या जातात तेंव्हाही लोकशाहीच धोक्यात येते. दाभोलकरांच्या खून्याचा तपास लावण्याबाबत सरकार खरंच गंभीर आहे का असा प्रश्न खुद्द न्यायालयच विचारते तेंव्हाही लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उमटत असते… अशा घटना घडल्यावर माणूस उद्वेगानं विचारतो, ‘या देशात खरंच लोकशाही आहे का?’ तेव्हा त्याचा तो उद्वेग समजून घेणार की त्याला धरून थोबडवणार?
त्यातही महत्वाचं म्हणजे, लोकशाहीची पायमल्ली होत असेल, देशहिताच्या, समाजहिताच्या विरोधात आपल्या आजूबाजूला काही घडत असेल आणि ते जर आपल्या लक्षात येत असेल तर ते जगापुढे आणणं हे लोकशाहीचं रक्षण करणंच असतं. उदाहरणार्थ गोखले म्हणतात, की ‘माझ्या घरी आलेल्या व्यक्तीनं प्यायला पाणी मागितलं तर, तो किती पाणी पिणार हे ते विचारूनच मी त्याला पाणी देतो. पाणी वाया जाऊ नये याची काळजी घेतो.’ याबद्दल गोखलेंचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. परंतु गोखलेंच्या आसपास अनेक कलावंत, निर्माते असे असू शकतील, जे आपल्या मानधनाचा मोठा हिस्सा रोखीत घेतात. आपण स्वतः गोखलेंच्या बाबतीत अशी शंका घेऊ शकत नाही, कारण त्यांच्यासारखा ज्वलंत देशभक्त असे कदापी करणार नाही. परंतु आजवर गोखलेंनी, असे रोख व्यवहार करणाऱ्या आपल्या एखाद्या सहकाऱ्याला फैलावर घेतले, झापले अथवा आपण त्याच्यासोबत काम करणार नाही अशी तात्विक भूमिका घेतली असे कधी ऐकले नाही. गोखलेंच्या संपर्कात आलेले, येणारे सर्वच व्यवहार स्वच्छ असावेत बहुधा. परंतु असे व्यवहार होत असल्याचे माहिती असूनही गोखले जर, ‘मला काय त्याचे’ म्हणून गप्प बसले असतील ,तर मग त्यांचे काय करायचे?
लोकशाहीनेच दिलेली राजकीय ताकद किंवा अधिकार वापरून सर्वाधिकार हाती घेण्याची, आपण म्हणू तीच पूर्वदिशा असावी असा हेका धरण्याची प्रवृत्ती ही काही कुठल्या एकाच विशिष्ट पक्षात असेलअसे नाही. इंदिरा गांधी यांनी असा प्रयत्न केला तेंव्हा त्यांनी तो उघड उघड केला आणि त्याची शिक्षा देशाने त्यांना दिली. मात्र जी माणसे आपले हेतू उघड करण्यास धजावत नाहीत आणि आम्ही म्हणतो तीच लोकशाही आहे असे म्हणू लागतात, त्यांच्याशी लढण्याचे आव्हान आता उभे ठाकले आहे. गोखलेंना आणि त्यांच्यासारख्या अनेकांना ते दिसत नाही त्याला आपण काय करणार? आजच्या काळात तर आणीबाणी जाहीर न करता आणीबाणी आणणे जास्त सोपे झाले आहे. अशा वेळी लोकशाहीची मूळ तत्त्वे विसरून धर्म आणि संस्कृतीच्या पांघरूणाखाली कुणाचा बचाव करण्याचे काम बुद्धिवाद्यांनी, कलावंतांनी करू नये. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणे आणि त्यांच्या विरोधात उभे राहणे हे जसे प्रसारमाध्यामांचे उपजत कर्तव्य असते, तसेच ते कलावंत, लेखक, चित्रकार आदींचेही असते. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य हाच कोणत्याही आविष्काराचा पाया असतो. त्यामुळे ‘देशात लोकशाही सुखैनैव नांदत आहे’ असे गोखलेंना किंवा त्यांच्यासारख्यांना वाटत असेल तर त्यांना तसे म्हणण्याचा अधिकार आहे. परंतु ज्यांना तसे वाटत नाही, त्यांनाही तसे न वाटण्याचा अधिकार आहे. त्यालाच लोकशाही म्हणतात.
अगस्ती चापेकर, घरंदाज राजकीय विश्लेषक असून, लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.
COMMENTS