व्हिलेज डायरी :  सुरुवातीची अखेर

व्हिलेज डायरी : सुरुवातीची अखेर

१.१.२०१९ पांडवाच्या पोफळीच्या धर्मराज युधिष्ठीराच्या पाठीला हुबरलेला विठोबा.. भक्कम मिशाचा धोतरा उपरण्यातला थोरल्या चुलत्यासारखा घोड्यावरला धर्मरा

‘तबलिगींसारखी परिस्थिती दिल्लीच्या वेशीवर होईल का?’
शेळ्यामेंढ्यांच्या चारापाण्याची वानवा
शेती कायदाः रखवालदार म्हणून चोराची नेमणूक

१.१.२०१९

पांडवाच्या पोफळीच्या धर्मराज युधिष्ठीराच्या पाठीला हुबरलेला विठोबा..
भक्कम मिशाचा धोतरा उपरण्यातला थोरल्या चुलत्यासारखा घोड्यावरला धर्मराज स्वप्नात डोळ्यासमोर यायचा लहानपणी .. किंवा कदाचित चुलताच दिसत असावा थोरला भाला घिऊन वस्तीला रात्री गस्त घालणारा.
आपला घरचा पूर्वज धरमराया मग त्येला भेटायला ईट्टल येतो एवढीच याची वळख मग मोठा झालो तसा समजलं हा गॉडफादर.
मला वाटायचं पांडवकुळी म्ह्णून कीर्तन हरिपाठ पांडवाचा असतोय घरात मग समजलं गाथा पोथ्या याच्या. धरमरायाला धाकटा असला तरी हा पाठिशीय म्हणून संसाराय.
वर्षं गेली आज..
वाटा तशाच आहेत.
चिखलातल्या..

द वायर मराठी घेऊन येत आहे वेब पोर्टल वर कधी न झालेला प्रयोग एक अस्सल, प्रदीर्घ लिखाण – दर सोमवारी सकाळी

वेब पोर्टल वर कधी न झालेला प्रयोग
एक अस्सल, प्रदीर्घ लिखाण ‘द वायर मराठी’वर

गावं?
गावं तिथंच तशीच दगडाला घट्ट पकडून बसलेली..
नदी कॅनॉल च्या विळख्यातली..
कॅनॉल नंतर कुठली प्रगती आल्याची जाणवत नाही.
वाटा तशाच आहेत चिखला धोंड्यातल्या सातनाल्यातनं गेलेल्या चिलारीनं समृद्ध झालेल्या..
गाड्या बदलल्या. बैलगाडीतल्या फेऱ्या आता धुरळा उडवणार्या गाडीवर आल्या पण या वाटेवरचा चिखल अजून वाळला नाही.
सायकल च्या कॅरेज ला दप्तरं आडकावून कॅनाल वरनं निघालेल्या थव्यांच्या नशिबी स्कुलबस या गेलेल्या तीन दशकात आली नाही.
डेव्हलपमेंट अजून तरी गावा गावांना शिवलेली नाही. पक्की घरं दिसत असतील तर सिटीतलि संडासं न स्मशानं त्यापेक्षा ऐसपैस न पक्की झालीयत.
१९८९ सुरू झालंय गावात आज !
……
तेव्हा सह्याद्री वर वाजायचं, “हि काळी आई, धनधान्य देई.. जोडते मनाचे नाते आमची माती आमची माणसं..!”
मला चुलत्याचा आवाज वाटायचा..
शाळेतनं आल्यावर गडबडीत हातपाय वलं करून चहा बटर खायचं.. शुभंकरोती आमच्या सात पिढयात कोण म्हणलं नव्हतं त्यामुळं तसलं काय सांगत नाही उगीच. शिक्षकाच्या घरचं वातावरण संध्याकाळी शाळेसारखं असतंय त्यामुळं लगीच दप्तर काढलं कि आधी शार्पनर नं केलेलं कोरीव काम काढून कचऱ्यात टाकायचं मग शाईपेनात शाई भरायची. बॉलपेन एकदा आणलेला मामानं स्टील बॉक्स मधला. गृहपाठ केला त्यानं, वडलांनी कुत्र्यासारखा धुतला . मग शाईपेन शिवाय हात लावला नाही जेल येईपर्यंत. ऍड जेल यायचा २९ ला आणि शेलो जेल १४ ला. मग आम्ही ऍड जेल मध्ये सेलो जेल ची रिफिल टाकून वापरायचो.
हे पण फार नंतरचं झालं, त्या आधी पत्र्याच्या खोलीत वडलांचा क्लास, नोकरी विनानूदानीत शाळेची.
त्याच २ खोल्यात मग ६ चुलत भाऊ, आणि २ चुलत बहिणी आणि आम्ही चौघं-पाच जण. गावाकडनं एकराच्या वाड्यातनं आलेलो.. मला आठवत नाही जास्त स्पष्ट.. घरमालकाच्या म्हशी होत्या. गवताचं भारं आणायची ते.. त्यांच्यात आम्ही दिवसभर दत्तक दिल्या सारखे.. त्यांचंही लहान जागेत मोठं कुटुंब तसं ७-८ जणांचं.. कळायला लागल्या पासून चुलत भावंडं सोबत त्यामुळं आम्ही काका काकी म्हणायला लागलो आई वडलांना.
शनिवार रविवार गावाकडं राजदूत वर.. माघारी सोलापूर ला निघताना बरोबर ५ वाजलेल्या असायच्या आणि लक्ष्या भुताच्या माळावर पोचलेला असायचा.. पुढंच बघायच्या आधी पप्पांचा चला म्हणून आवाज आला की लक्ष्याला ढिगाऱ्याखाली सोडून पळायचं.

ढिगाऱ्याखाली कधी बघितलंचं नाही, अवकाळी न धून नेल्यासम
मी कोण?
मी तोच
गुहेतला
नाईल वलांडून आलोय सीनेकाठावर
उजनी च्या वाट्यावर.
टेबल खुर्ची पसनं चवाळापतुर उलटा प्रवास करून..
माझी गोष्ट सुरु होते काही हजार लाख वगैरे वर्षांखाली..
मी अन्नासाठी माझ्या कुटुंबा सोबत भटकत होतो आफ्रिकेपासून यूरेशिया पतुर..
माझ्या लै लोकांना तिथल्या भूमिपुत्रांना ठोकला
आम्ही पळालो,
नदीच्या वाटंनं..
नाईल ला गेलो
तिथं माझ्या त्या काळातल्या आज्ज्या नं म्हातारीला बी मागितलं..
म्हातारीला म्हणला तुज्या हातानं पेर..
तुझा वंश वाढलाय लै मोठा..
समृद्धी हाय तुझ्या हाताला..
तिनं सूनाशिंला घिऊन पहिला पेरा केला..
कष्ट पेरून सुखं उगवायची वाट बघायलेलं माझं कुटुंब सुखी होतं..
गुहेतलं..

……

सुमारे 12 हजार वर्षांपूर्वी मानवाला शेती चा शोध लागला किंबहुना 40 हजार वर्षांपूर्वीपासून असणाऱ्या प्रोटो फार्मिंग ची डेव्हलपमेंट होत होत माणसाने निओलिथिक रिव्हॉल्युशन घडवून आणलं.
माणसाची या जीवनपद्धतीमध्ये उत्क्रांती दोन टप्प्यात झाली, पहिली प्लांट डोमेस्टीकेशन आणि दुसरी ऍनिमल डोमेस्टीकेशन. प्लांट डोमेस्टीकेशन या प्रोसेस मध्ये माणसाने खाण्यायोग्य विविध बियांचा शोध घेतला जे पचवता आलं ते ठेवलं आणि बाकीचं सोडून दिलं.
9000 वर्षांपूर्वी सीरिया मध्ये खाण्यायोग्य धान्ये पिकवली जाऊ लागली तत्पूर्वी 9000 वर्षांपूर्वीपासून या भूभागात अंजीर पिकवलं जात होतं.
3500 वर्षांपूर्वी भारतात तुरीची लागवड झाली, तत्पूर्वी तूर आफ्रिका आशिया आणि अमेरिकेमध्ये रोजच्या खाण्यातला पदार्थ झालेला. कॅल्शियम लोह मग्नेशियम मोठ्या प्रमाणत असलेली तूर कामगारांच्या जीवावर उभ्या असलेल्या भारत आणि उपखंडात लोकप्रिय झाली. शेतीव्यवसाय किंवा व्यवसाय सदृश्य काम असेलेली शेती परंपरेने करणाऱ्या गरीब विभागात विभागल्या गेलेल्या शेतकरी वर्गाकडून तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते, मध्यम किंवा मोठ्या कालखंडातील पिक या दृष्टीकोनातून.
प्रिहिस्टोरिक बिया नसणारी फळे जॉर्डन वॅली मध्ये सुमारे 11,000 वर्षांपूर्वी कॅल्टीवेट केली गेली. तरीही भटक्या जीवनपद्धतीतुन मायग्रेशन हे डोमेस्टीकेशन झाल्या नंतर निओलिथिक गावांमध्ये आढळून आलं, धान्य प्रोसेसिंग करायच्या पद्धतींचा शोध लागल्या नंतर.
तांदूळ आणि बाजरीचा शोध हा चीन मध्ये लागला, 2007 साली पूर्व चीन मध्ये जगातील सर्वात प्राचीन राईस फिल्ड्स सापडली जी आग आणि पूर यांपासून बचाव होईल अशा पद्धतीने डिझाइन केली गेलेली.
देशभक्तांना राग आल्यास भात गिळून गप्प बसावं.
13,000 ते 12,000 वर्षांदरम्यान गहू आशियायी खंडात आला, याच काळात फर्टाईल क्रेसेंट मध्ये गहू उदयास आला किंबहुना निओलिथिक क्रांती चा पाया गव्हाने रचला, मानवाची दिशाभूल गव्हाने केली.
भोपळ्या काकडी ते कारलं वगैरे फळभाज्यासदृश्य पिकांची उत्पत्ती मेक्सिको मध्ये 10,000 वर्षांपूर्वी झाली. मेक्सिको मधल्याच बल्सास नदीच्या काठी टीओसीन्टी नावाच्या जंगली गवतापसून जेनेटिक म्युटेशन होऊन म्हणजे शुद्ध मराठीत हायब्रीड हायब्रीड तयार झालं, त्या हायब्रीड च नाव मका/कॉर्न. पावसाळ्यात जी कपल कडून कणीस भाजून खाल्ली जाते ते आजकाल मल्टिप्लेक्स मध्ये 100/150 ला 50 ग्रॅम विकली जाते. जगभरातील गव्हानंतरचे सर्वात मोठं खाद्य. सुमारे 9000 वर्षांपूर्वी याचं म्युटेशन होऊन मकेसदृश्य पीक तयार झालं आणि फक्त 5500 वर्षांपूर्वी मका पूर्णपणे डेव्हलप झाली. त्यानंतर उत्तर अमेरिकेत मका पोहोचली आणि 5000 वर्षांपूर्वी सुर्यफुलाचही कल्टीवेशन उत्तर अमेरिकेत सुरू झालं.
सुमारे 5000 वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेच्या इंडिज भूभागात बटाट्याचा शोध लागला.
10,000 वर्षांपूर्वी जीनेव्हा मध्ये ऊसाचा शोध लागला, सुमारे 2000 वर्षांपूर्वी ऊस आशियायी खंडात आला आणि सुमारे 1500 वर्षांपूर्वी भारतातील एका रसायनशास्त्रज्ञाने उसाच्या रसाला क्रिस्टल स्वरूपात रूपांतरित करायचा मार्ग शोधून साखरेचा शोध लावला आणि नंतर पवारसाहेबांनी कारखाने काढले.
हजारो वर्षांचा पिचलेला शेतकरी ऊसामुळे मान वर काढू शकला, तो विषय वेगळा असल्याने पुढील लेखात चर्चेस घेऊ.

गायी-म्हशी शेळ्या मेंढ्या डुकरं यांचं डोमेस्टीकेशन नाईल-यूफ्रेट्स-टिग्रीस नद्यांकाठच्या पूर्व तुर्की इराक दक्षिणपश्चिमी इराण यांनी मिळून बनवलेल्या फर्टाईल क्रेसेंट मध्ये 10000-13000 वर्षांपूर्वी करण्यात आलं.
या संपूर्ण प्रोसेस मध्ये शेकडो हजारो म्युटेशन घडले घडवले गेले, विविध पद्धती अवलंबल्या गेल्या. विविध हत्यारे औजारे शोधली गेली आणि त्या डेव्हलपमेंटसाठी मानवाचा मोठा टक्का विस्थापित झाला. माणूस स्थिरावल्याने तसेच बेसिक अन्नाची गरज भागल्याने माणसाचे आयुष्यमान वाढले, कल्चरल डेव्हलपमेंट होऊ शकली , वसाहती निर्माण झाल्या. सुपीक जमिनींच्या काठी मानवी वसाहती दाट झाल्या, त्यातून प्रांत प्रदेश राज्ये राजे ते आत्तापर्यंत चे देश या सर्व संकल्पना आल्या.
अन्नधान्याची गरज भागल्याने किंबहुना ती भागवण्याची जबाबदारी एखाद्या वर्गावर झिडकारून इतर सबंध मानवजातीने स्वतःचा उत्कर्ष साधला आणि शेतीवर जगणार्या वर्गाला संपूर्णपणे इतर मानवी परसेप्शन पासून तोडून टाकण्यास सुरुवात केली.
पॅरासाईट ठरलेला इतर वर्ग कोलमडण्याची शक्यता आता फार दूर नाही, स्वतःच्या अन्नाचा सोर्स निर्माण न करू शकणारा वर्ग हा मानव इतिहासात लयास गेलेला आहे.
आता निओलिथिक क्रांती ही मानवी जीवनातील मोठा फ्रॉड असा प्रचार झालेल्या गोष्टीकडे येऊ.
युवाल आणि इतर काही संशोधकांच्या म्हणण्या नुसार हे असं आहे याला त्यांची कारणं वेग वेगळी आहेत पण ही विचारसरणी शेतकऱ्यांना दोष देत नाही तर शेतकऱ्यांना शोषित मानते किंबहुना आजचा अस्तित्वात असलेला संपूर्ण माणूस हा शेतकऱ्याचा वंशज तरी आहे किंवा शेतकरी तरी. ही पुस्तकं जगभर सहज उपलब्ध झाल्यामुळे, अनुवादित झाल्यामुळे किंवा हे विचार जग जवळ आल्यामुळे सार्वत्रिक झाले आणि त्याकारणाने भारतातील त्यातल्या त्यात महाराष्ट्र या अतिविद्वान लोकांच्या प्रदेशात येथील महान अडनचोटांनि शेतकऱ्याला मानवद्रोही ठरवत मानवी आरोग्याच्या पतनास सर्वस्वी शेतकरी जबाबदार धरत शेतकऱ्याला पावलोपावली ठोकायला सुरुवात केली. कित्येक विचारधारेणुसार मानवी अस्तित्व हे पृथ्वीच्या ह्रासास कारणीभूत आहे मग तुम्ही आत्महत्या करणार आहात का?
किंवा हे मत मांडणारे पर्यावरणवादी स्वतःपासून जीव देऊन सुरुवात करतात का?
माणूस शिकार करून जगत होता. हंटिंग व्यवस्थेत जगणारा मानव हा सर्वात जास्त काळ पृथ्वीवर तग धरून होता, जवळपास १० लाख वर्षे. ६ लाख वर्षे फक्त निइंडरथालचा स्पॅन आहे. याचं कारण काय असावं याची मीमांसा केली असता अनेक गोष्टी समोर येतात, त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट या व्यवस्थेत शोषण अत्यल्प होते किंवा ते नव्हतेच.
शोषण कशाला म्हणतात? एकाच्या कष्टावर दुसर्याने जगणे.
त्या व्यवस्थेतला प्रत्येक माणूस हा स्वतःचं अन्न स्वतः मिळवून खात होता. लक्षात घ्या ती 10 लाख वर्ष माणूस हा सर्वस्वी नैसर्गिक जीवनपद्धती जगत होता, जी फूड चेन वर अवलंबून आहे किंबहुना निसर्गाच्या फूड चेन चा हिस्सा होता मानव. माणसासमोर एकमेव प्रश्न होता तो अन्न.
शेतीच्या शोधानंतर माणूस स्थिरावला आणि रोजच्या शिकरिवरचं त्याची अवलंबित्व संपूर्णपणे कमी होऊ मानवाची अन्न ही एकमेव गरज भागली, शारीरिक झीज ही वेगळ्या कारणामुळे आणि ठराविक वर्गाची व्हायला लागली. अन्नधान्याचे साठे झाले आणि त्याच्या सुरक्षेसाठी ते त्या शेतीच्या जीवनपद्धतीला लागणाऱ्या विविध गोष्टींसाठीची मानवी चेन उभा राहिली, त्या सर्व्हिसेस च्या बदल्यात धान्न्याची देवाण घेवाण व्हायला लागली, आणि सर्व्हाईव्ह व्हायसाठी स्वतःचं अन्न स्वतः मिळवणे किंवा उत्पादित करणे हे नामशेष होत गेलं.
यातून शोषण व्यवस्था उभा राहिली आणि फक्त काही हजार वर्षात होमो सेपियन या जमातीने स्वतःला तसेच या ग्रहाला विनाशाच्या द्वारावर आणून उभा केले.

आज समाजात कुठला वर्ग स्वतःचं अन्न स्वतः पिकवून खातो? किंवा कुठल्या वर्गाचं अस्तित्व हे अन्नासाठी आहे किंवा कुठल्या वर्गाला सर्वाईव्हल ची लढाई रोज लढाई लागते?
जगभरातील किंबहुना भारतसदृश्य दर्भसंतील शेती या एकमेव व्यवस्थेत जगणारा वर्ग आणि या ग्रहावरील काही ट्राईब आहेत ऍमेझॉन आणि नाईल च्या काठी ज्या सर्वाईव्हल चा लढा लढतायत. इतर संपूर्ण वर्ग समाजगट शेती या व्यवस्थेच्या शोषणावर टिकून आहे.
पर्यावरण निसर्ग आणि इतर सजीवसृष्टी या एकसमान सर्व गोष्टींच्या अस्तित्वाला धोका हा या इतर वर्गापासून आहे, यांचं अस्तित्व नष्ट झालं तरच हा ग्रह बरबाद होण्यापासून वाचू शकतो.
सर्वात बेसिक आणि सर्वात शाश्वत काय असेल तर ती शेती. हजारो वर्षांच्या स्थिरतेकडे स्थितप्रज्ञ म्हणून पाहताना काळाच्या पटलावर हिरव्या शिवारांशिवाय दुसरं काही दिसणार नाही.

…….

ती गेली तेव्हा..

ती गेली तेव्हा सिंगल फेज लाईट हुती..
कॅपॅसिटर जोडायला आमचा हात बिजी हुता..
पाणबुडी ला मासा लागला हुता..
डुबी मारू मारून पाणी वरच्या हेड ला काढेस्तो मिसकॉल पडलेला मोबाईल बॅटरी एमप्टी हुन तीज्या आठवणी सारखा ईझत गेला…
ती गेली तेव्हा ऊस बांधायला आल्याला..
युरिया सुपर फॉस्पेट चा डोस जस्ट झाल्याला
सिंगल फेज लाईट हुती..
कॅपॅसीटर जळला हुता
तिजं मिसकॉल पडलेला मोबाईल इंजिनासारखा कोरडा पडून शांत शांत झाला हुता…
ती गेली तेव्हा आम्ही डिझेल आणायला गेला हुताव..
ती गेली तेव्हा सिंगल फेज लाईट हुती..
टेस्टिंग ला गेल्याला पवाराचा बापू करंट लागून कॅनॉल मधी पडला हुता..
अख्ख्या गावाचा ऊस बांधताना कॅनॉल च्या पाण्यासाठी तळमळल्याला बापू  पाण्यात शांत झाला हुता…
तिजं मिसकॉल पडल्याला मोबाईल बापूसारखा शांत हुन बांधावर निपचिप पडल्याला..
ती गेली तेव्हा अख्खा गाव रातपाळी बंद ठीऊन बापू साठी उर फोडून रडत होता..
ती गेली तेव्हा…

……..

सकाळ सकाळ लोकं चुत्ये असतात..
दुपारी एडझवे,
संध्याकाळी नालायक..
आणि सोबत आपणही अनुक्रमे नालायक चुत्ये आणि एडझवे ठरतो .
त्यांना तुम्ही समजून सांगता टनाच्या उत्पन्नाचा अन मजुरीचा हिशोब.
ते म्हणतात स्वतः काम करायला काय होतं,
तुम्ही हम्म म्हणता विषय सोडून देता..
ते तिथून दिवसरात्र बोंबलायला लागतात, यांना स्वतः काम करायला नको आळशी हरामखोर कुठले !!

त्यांना तुम्ही समजून सांगता इन्वेसमेंट आणि त्याचे रिटर्न्स,
ते म्हणतात 100 टन उत्पन्न आल्यावर लॉस होतोच कसा, मास प्रोडक्शन चा फायदा कॉस्ट कटिंग हाच असतो,
तुम्ही हम्म म्हणता विषय सोडून देता..
ते तिथून दिवसरात्र बोंबलायला लागतात, यांना एका दाण्याला हजार दाणे मिळतात फुकटखाऊ टॅक्सचोर कुठले !!
त्यांना तुम्ही समजून सांगता हमीभाव भाव आयात निर्यात निर्बंध व्हॅल्यू ह्यूमन राईट्स,
ते म्हणतात प्लॉट घेता घेता आयुष्य जातं आमचं भोसडीच्यानों तुम्ही तर एकर एकर हेक्टर हेक्टर जमीनिवर नावं लावून बसता..
तुम्ही सांगता वाढलेली महागाई महाग जगणं,
तुम्ही हम्म म्हणता विषय सोडून देता..
ते तिथून दिवसरात्र बोंबलायला लागतात, यांच्या ऍसेट्स ची व्हॅल्यू लाखोनि वाढली, आम्हाला काय फायदा झाला??
मग तुम्ही गप्प बसता ..

ते तुम्हाला ए अडाण्या म्हणतात,
तुम्ही चिडून शिकलेली पोरं दाखवता राबणारी..
ते म्हणतात बघा बघा यांना नोकरी धंदा करायला नको पळवाटा काढतात हरामखोर कुठचे !
मग तुम्ही हम्म म्हणता विषय सोडून देता..
ते दिवस रात्र बोंबलत सुटतात, राज्य शेतकऱ्यांनी मागे नेलंय !
राज्यात शेतकऱ्यांनि शोषण केलंय..
बघा बघा दिवसाला बाईला लागणीला मजुरी फक्त 300 देतात, आणि गड्याला इतर कामाला 350-400.
तुम्ही सांगायचा प्रयत्न करता, मजुरी 3 लाख गेली आणि पट्टी 6 हजार आली..
पण ते बोंबलत सुटलेले ऑफिस च्या टेबलावर असतात, कॉफी चा वाफाळलेला मग समोर ठेवून..
तुम्ही शोधत राहता कोण बोलतंय लगा कोण बोलतंय म्हणत.
बातम्या अग्रलेख टीव्ही वरचे प्राईम टाईम तुमच्या अपयशाचं नालायक पणाचं विवेचन करत असतं अन तुम्ही पुन्हा मातीत पुरून बियाणं पुढच्या नुकसानीला तयार झालेला असता, या वेळेला तरी फिटलं सगळं डाग धून निघल म्हणून.
सकाळ सकाळ लोक चुत्ये असतात
दुपारी एडझवे
आणि संध्याकाळी नालायक.

…….

1000 म्हणलं की 8 ठिकी दिसतात 4 क्विंटल ची,
ऑटो दिसतोय गेलेला,
लाईन दिसतिय एमसीबी ची लोम्बकळाय लागलेली फडाला पेटवायला शिवशिवणारी,
वायरमन चं चहापाणी नगु म्हणून डेपी वर चढून भाजून घेतलेला हात डिसतो,
रात्रपाळीची खराब झालेली बॅटरी दिसते लाचार मिणमिणारी,
खळ्याला गडी वाचवायला वाकून पाट्या देणारा म्हातारा दिसतो,
म्हातारीनं गाठीला ठिवल्याली बंद पडल्याली लाल नोट दहाव्याला घावली, दुष्काळी मरणाला तिरडीला ठीवल्याली..
1000 म्हंलं की डाग मोडल्याली ती दमून झोपलेली दिस्ती.
दूर तिकडे दुसर्या आकाशगंगेतल्या कुठल्याश्या ग्रहावर 1000 म्हणलं की एक लार्ज पिज्जा दिसतो !!…….

शहरं संस्कृत्या जमिनीखाली गाडल्या जातील. राजधान्या राष्ट्रं नष्ट झाली आणि होतील. महालं राजवाडे ओस पडले मातीत मिसळले, वाडे बंगले भुईसपाट होतील.
कुळव नांगर बैल बारदाना शेती शेतकरी गावं पूर्वीही होती आजही आहेत उद्याही राहतील.
शेतकरी अस्तित्वाचे सांगाडे दिसू लागलेयत.
एक पिढी शेतीपासून दूर गेली तर पुढची पिढी शेती तंत्रज्ञान हरवून बसते आणि अशा एक एक पिढ्या तूटतायत शेती माती पासून. शेतकरी घटक इतका क्रूर नाही की उत्क्रांती ने त्याला खाऊन टाकावा आणि नपुसकही नाही की तो सामाजिक पतनात नष्ट व्हावा.
चर्चा एकांगी असतात आणि होत राहतील. अजेंडे राबवले जातील त्या त्या विचार आचार प्रवृत्तींचे पण अस्तित्वाची अखेर ही पिढी तुमची माझी पिढी अनुभवणार आहे, त्यातून बाहेर येण्यासाठी बाहेरच्याला साद घालण्यापेक्षा आता आतून चक्र भेदायला धक्का देणं गरजेचं झालेलं आहे.
शेतकरीच फिरवू शकतो पुन्हा कालचक्र.

…….

शेकडो हातांच्या उंचीवरच्या त्याच्या गुहेच्या तोंडाशी तो पाठमोरा बसलेला..
चांदण्यांनी भरलेलं आभाळ बघत..
ते त्याला भुलवायचं..
अंगावर वारं घेत गवताची सरसर तो ऐकायचा..
ते त्याला झुलवायचं..
डोळ्यांना शांती देणाऱ्या त्या गोळ्याच्या शोधात त्याचे पूर्वज अगणित क्षण चालत पडत धावत इथं आलेले.. त्याच्या गुहेच्या दगडावर त्यांनं रेखाटलेला त्यांचा प्रवास त्या पांढऱ्या थंड मातीतला, त्या उंच उंच डोंगरांमधला.. त्यांचा प्रवास संपलाय कि नाही हे त्याला माहित नव्हतं पण त्यानं थांबायचं ठरवलेलं..
लाल प्रकाशात तिची नाचणारी सावली त्याला सांगत होती..
त्या वाऱ्यावर नाचणार्या गवताची गोष्ट..
त्या वाहणाऱ्या नितळ नदीची गोष्ट..
तिच्यासोबतच्या रोजच्या गेलेल्या एका एका शांत शीतल गोळ्या सोबत त्या शेकडो हातांवरच्या आभाळातल्या गुहेपर्यंत त्यानं दगड कोरलेला, तिच्या पावलासाठी आणि तिच्या उदारातल्या त्याच्या वंशजासाठी..
त्याच्या सोबत आणलेल्या बिया त्यानं ठेवल्यायत थेंब पडल्या नंतर त्या मातीत टाकायला..
तो थांबलाय..
तिच्या काठावर..
त्या मातीत..
त्या तिघींसाठी.. नदी, ती आणि माती..
एक वाहणारी आणि दुसरी याच्यावर बरणारी आणि तिसरी त्याला उदरात घेणारी…!
त्याच्या कल्याणाचा पाया त्या तिघीत आहे हे त्याला उमगलेलं.. मानव उत्क्रांती अस्तित्व भविष्य हे स्त्रीच्या मातीच्या नदीच्या गर्भात आहे..
त्याला पोसणारं सगळंच स्त्रीलिंगीय..

…..

समदी गपगार बसलेली गोल दगडाकडंनी..
पोराचा धाव्वी चा निकाल बघून..
कुणीच काय बोलीना म्हणून  सेपियन च्या आज्ज्या क्रो मॅग्नन नं ईशय काढला, म्हनला आरं खावा आता ती कंदमुळं, भाजल्यालं गोड पाण्यातलं मासं. धाव्वी तर हुती. मायग्रेशन नव्हतं. मायग्रेशन मधी आपटलं आसतं म्हंजी ईशय काळजी चा हुता. ती जनावर तोंडाची निएंडरथाल क्लेईन फेल्डोफेर ग्रोट्टी च्या गुहेत मेलेली आपल्याला सापडली नव्ह्ती, त्येंच्या दगडावर धाव्वी बारावी बोर्डात आल्याली नोंदी हुत्या. शिकार मिळाली न्हाई म्हणून आतडं करपून मेली नव्हं. काय उपेग झाला गा मार्काशिंचा.
आपण पिकपाण्याच्या नोंदी ठिवत हुताव ऍग्रीकल्चरल रिव्हॉल्युशन ची तयारी करत हुताव तवा ती तिकडं उपासमारीनं गेली.
भित्तीवर दगडानं सगळं चित्तारायलेलं पोरगं ऐकत हुतं कान दिऊन..
आज्ज्या नं शोधलेल्या वर्षभरात पुना पुना लावता येणाऱ्या ब्या ची चित्रं न कुठं मिळणार कुठल्या हंगामात मिळणार त्येची चित्रं ओरखरून रेकॉर्ड ठिवालेल्या त्यानं मागं वळून म्हाताऱ्याकडं बघितलं..
बिथरल्याली समदी जरा शांत झाली न पुन्हा मार्गाला लागली.. दगडांची भांडी खडखडायला लागली. समद्याची जेवणं झाली. बारकी प्यायला लागली.. गुहेत गोंगाट गोंधळ चालू झाला रोजचा..
सावल्या नाचू लागल्या..
मशालीत.. शेकोटीत..

गुहेबाहेर गवतावर रोजची बैठक बसली थोरल्यांची..
आजू बाजूच्या गुहेतली म्हातारी जमा झाली..
खाली वरडालेल्या कोल्ह्यात..
कुत्र्याच्या आवाजात..
रातकिड्याच्या गुणगुणित..
निइंडर व्हॅली मधनं म्हाताऱ्यानं आणल्याला चुना काढून आज्ज्यानं समद्याच्या बोटावर थोडा थोडा लावला अन नाईलच्या पल्याडनं आणलेल्या पाल्याचा चुरा त्यात मळत तोंडात टाकून दाढंखाली ढकलत गॅलॅक्सिकडं बघत पुढच्या उत्क्रांतीचा जागर मार्कांविना सुरू केला..
म्हातारं म्हणला नातवाला हे ऐक, लै डिपाय बे.
तुझ्या माझ्या वंशजापतुर हा जागर पोचला फायजेल..
अन काळाच्या पडद्यावर ४० हजार वर्षांचा इतिहास लिहायला सुरुवात झाली..
मी पाहतोय क्षितिजावर उभारून..

……

२८ हजार वर्षांनी,
माझ्या पूर्वजांच कुटुंब तिथं स्थिरावलय नाईलच्या खोर्यात…
त्या मातीवर या घामानी शेतकऱ्याचा इतिहास गोंदवत..
पुढ विस्थापनात पणजा आज्जा भीमेसीनेच्या काठाला आली..
उद्या मीही जाईन त्या नदीच्या मार्गाने एकाध प्रकाशवर्ष दूर असलेल्या इंटरस्टेलर क्लाउड मधी टेक्स्मो ची अवजड मोटर टाकायला..
इथल्या मातीतून हुकसवून लावायच्या आधी अँड्रोमेडा मधी रोटर फिरवून ६ फुटी सरी सोडायला..८६०३२, १०००१, ६७१, २६५, ८००५ ची रोपं तयार करायला..
मळईला वाहत गेलेली आमची आमच्या पूर्वजांची प्रेतं कदाचित त्या अगणित समांतर शक्यतांमध्ये शेती करण्यासाठी या जीवनामधून विस्थापित झाली असतील..
तुम्ही आत्महत्या म्हणा !!

……..

शेती करण्यात मजाय… पाहण्यात वाचण्यात लिहिण्यात किंवा चित्तरण्यात नाही ..
२०१४ ते २०१८ आलेख मातीच्या जवळ जवळ जाणारा आणि इतर माध्यमांपासून मुक्ती देणारा ठरत गेला.. किंबहुना २०१८ पूर्णपणे अलिप्तात घेऊन जात त्या मातीच्या स्वप्नाशी जोडून टाकणारा वारसा पेलायला लावणारं होतं..
२०१९ माझंय..
लिहायची बोलायची संवादाची किंबहुना ओरडून जगाला त्या मातीतल्याचं दुःख सांगायची तडप सुरुवातीच्या काळात होती..फेसबुक पासून ऍग्रोवन, वायर पर्यंत ती भागली.. पुढचा त्या मुरून निचरा झालेल्या उरलेल्या सत्वाला प्रदर्शित ठेवण्याचा काळ दूरदर्शन ने पूर्ण केला.. पण न दिसणाऱ्या चक्राची एक बाजू
गलबतं किनाऱ्याला थोरला समुद्रच लावतो.. मोठी वादळं पोटात घेत शांतशांत करत कदाचित.. हा काळ्या रानाचा समुद्र..
कॉसमॉस सारखा पसरलेला..
कित्येक पिढ्या या मातीतल्या पिकांच्या ब्लॅकहोल मध्ये समर्पित झाल्या असतील..
होतायत,
आणि होतील..
पुढचं बिग बँग होईस्तो..
शेती करण्यात मजाय,
ती लिहिण्यात नाही..
……..

भेटूयात लवकरच गुहेतल्या त्या माझ्या पूर्वजांची आणि दुसऱ्या आकाशगंगेतल्या माझ्या वंशजांची गोष्ट या पुसट झालेल्या लिपीने कागदावर आणल्यावर..
रामराम

समाप्त
आकाश शिवदास चटके सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकरी आहेत. लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: