शबरीमला प्रवेश साजरा करायचे प्रयोजन काय ?

शबरीमला प्रवेश साजरा करायचे प्रयोजन काय ?

जेव्हा सवर्ण स्त्रीवादी, एका जातीपातीच्या जुलुमाला मंजुरी देणाऱ्या मंदिरात प्रवेश करून त्या मार्गे आमच्यावर स्त्री-पुरुष समानता लादतात तेव्हा एक दलित महिला म्हणून आम्ही शांत राहणार नाही.

‘कंगना तुला जातीबद्दल काय माहिती आहे?’
दलित तरुणाने मूर्तीला हात लावल्याने कुटुंबाला साठ हजार रुपयांचा दंड
आरोग्य सेवेत मुस्लिम, दलित-आदिवासींशी भेदभाव

दोन स्त्रियांचा शबरीमला मंदिरातील प्रवेश ही घटना, भारतीय स्त्रीहक्कांच्या चळवळीमध्ये ‘ऐतिहासिक’ का मानली जात आहे याचा विचार, मागचे काही दिवस एक दलित महिला म्हणून मी करत आहे.  प्रतिच्छेदनाचा (इंटरसेक्शनॅलिटीचा) विचार न करता, जातीच्या विचारांशिवाय, एका निर्वात पोकळीत या घटनेचे विश्लेषण केले पाहिजे असे मी स्वतःला सांगत राहिले. फक्त ‘स्त्री’ म्हणून विचार कर, ‘दलित स्त्री’ म्हणून नाही, हे मी स्वतःला बजावत राहिले.

काय साजरे केले जातेय? ही कोण माणसे आहेत जी याला महिला हक्कांच्या लढ्यातील एक मोठे पाऊल मानत आहेत ?  शबरीमला मंदिरातील प्रवेश हा स्त्रीमुक्तीला दिलेली मोकळी वाट कशी ठरते ?

प्रामुख्याने प्रस्थापित हिंदू जातीतील महिला, शबरीमलामधील प्रवेशाला साजरा करताना दिसत आहेत. कोणीही एक व्यक्ती संपूर्ण जमातीचे प्रतिनिधित्व करू शकत नाही, आणि दलित महिलांच्या बाबतीत देखील हे लागू पडते. सवर्णांच्या नेतृत्वाने चाललेल्या जातविरोधी स्त्रीवादी भूमिकेतून या घटनेचा उदोउदो करणे हे न्यूनकारी, आत्मकेंद्री आणि पाखंडी आहे. माझ्या असे म्हणण्याला तीन कारणे आहेत.

स्त्री-पुरुष समानतेसाठी पुरुषसत्तेला नष्ट करणे?

भारतातील स्त्रीवादी चळवळीचे ध्येय ‘पितृसत्तेला छेद देणे’ हे आहे असे मी खूप काळ गृहीत धरून चालले होते. प्राथमिक स्तरावर यातून असे सूचित होते की स्त्री-पुरुष समानतेचा मार्ग म्हणजे पुरुषांच्या नियंत्रणातून स्वातंत्र्य, म्हणजेच पुरुषांसमोर दबून न राहणे!

महिला भक्त जेव्हा पुरुष पुजाऱ्यासमोर किंवा पुरुष ब्रह्मचारी देवासमोर नतमस्तक होतात तेव्हा  पितृसत्ताक पद्धतीला विरोध होत नाही. (तर त्या पद्धतीला शरण जाणे असा अर्थ होतो.)  या घटनांच्या व्यापक पटलावर नारीद्वेषाचा अंत कुठे दिसतो?

स्त्री-पुरुष समानता – सत्तासंबंधांमध्ये बदल?

स्त्रीवादी राजकारण ‘जैसे थे’ परिस्थितीला धक्का देऊन स्त्रीयांकडे अधिकारांचे हस्तांतरण करुन घ्यायला समर्थ असते असा माझा समज होता. पुरुषांच्या हाती एकवटलेल्या अधिकारांवर कब्जा मिळवणे हा ही एक  अंतिम हेतू असतो. या उद्देशांप्रती शबरीमला प्रवेशाने अभूतपूर्व बदल कसा साधला जाणार आहे हे काही मला समजत नाही. ज्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी त्या झगडत आहेत त्या मंदिरांमधले कोणतेही  निर्णय त्यांना घेता येतील का? मंदिरात अजूनही फक्त ब्राह्मण पुरुषांची मक्तेदारी असते. तरीही सवर्ण स्त्रीवादी, मंदिर प्रवेशाला समानतेचा मार्ग समजतात, हे तर्काच्या पलीकडले आहे.

शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याचा रेहाना फातिमा आणि कविता जक्कल यांचा प्रयत्न. सौजन्य: फाईल/पीटीआय

शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याचा रेहाना फातिमा आणि कविता जक्कल यांचा प्रयत्न. सौजन्य: फाईल/पीटीआय

लिंगन्यायाच्या दृष्टीने आर्थिक सबलीकरण झाले का?

आर्थिक सबलीकरण, साधनसंपत्तीमधील समान हक्क, मालमत्तेतील अधिकाराची संधी, महिलांसाठी मालमत्ता उभी करणे या स्त्री-मुक्तीमधील अग्रगण्य गोष्टी म्हणून ओळखल्या जातात. देशाच्या अर्थसंकल्पांमध्ये महिलाकेंद्रित सरकारी योजनांसाठी पैसा राखून ठेवला जाईल यासाठी स्त्रीवादी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असतात. त्यासोबत जमीन आणि मालमत्ता यातली मालकी स्त्रियांकडे येण्यासाठी सुद्धा त्या मोठ्या प्रमाणात आवाज उठवत आलेल्या आहेत. याही पुढे जाऊन महिला करत असलेल्या विना मोबदला कामांची दखल घेतली जावी यासाठी काही महिलांचे गट कार्यरत आहेत. हे गृहीतक समजायला फार कठीण नाही की आर्थिक स्वातंत्र्य आणि पुरुष सहचरावर आर्थिक दृष्टया अवलंबून नसणे हा स्त्रीवादी राजकारणाचा  महत्वाचा उद्देश आहे.

शबरीमला येथील महिला भक्तांना त्या मंदिराच्या आर्थिक बाबींमध्ये काही मत देण्याचा अधिकार मिळाला आहे?  मंदिराच्या मालमत्तेसंदर्भात त्यांची वर्णी लागते का ? मंदिर व्यवस्थापन त्यांचा निधी कसा खर्च करेल याचा निर्णय त्या घेऊ शकतील ? (याची उत्तरे ‘नाही’ अशी असतील तर) हा भारतीय महिलांचा ऐतिहासिक विजय कसा?

या घटनेमुळे सवर्ण स्त्रीवादी राजकारणाचा उतावळेपणा उघडा पडला आहे. कुठल्याही प्रकारच्या जुलुमापासून मुक्त असणाऱ्या जगाची ते कल्पनाच करू शकत नाही, इतका त्यांचा दृष्टीकोण  मर्यादित आहे. जातीव्यवस्थेचा महिलांवर झालेला खोल परिणाम दुर्लक्षित करताना सवर्ण नेतृत्वाच्या स्त्रीवादी मांडणीचा संकुचितपणा लक्षात येतो.

हिंसक भाषा

एका अर्थाने सवर्ण स्त्रीवादी  विचारांनी दलित महिलांवर वेगळ्या पद्धतीने केलेली ही हिंसाच आहे ज्यातून चळवळीला फाटे फुटत राहिले. त्यांनी आमचे मानवी अस्तित्वच नाकारले जणू !

वॉशिंग्टन पोस्टसाठी लिहिताना बरखा दत्त असे म्हणतात की ही तिरस्करणीय, आधुनिक अस्पृश्यता आहे जिथे महिला ‘दूषित पारिया’ ठरवल्या  जातात.  माझा आतला आवाज मला सांगतो की बरखा दत्त या दलित महिलेच्या अस्तित्वाविषयी अनभिज्ञ आहेत किंवा यातून त्यांच्या जातीमुळे बहाल झालेले  विशेषाधिकार प्रकट झालेले आहेत.  एखादी स्वयंघोषित स्त्रीवादी व्यक्ती अशा प्रकारचे उथळ विधान का करेल हे मला कळत नाही.  ‘पारिया’ तामिळनाडू मधील एका जातीचे नाव आहे, तसेच तो अपमानास्पद शिवी सारखा वापरला जातो.  बरखाने तो का वापरला असेल हे समजून घेणे कठीण आहे.

सवर्ण स्त्रियांकडून नव्या भाषेतून, नवअस्पृश्यतेच्या ट्विट्सची आणि मतांची सरबत्ती सुरु झाली; नवे हॅशटॅग जन्माला आले #WomenAreNotUntouchable (#स्त्रिया अस्पृश्य नाहीत). यासारखा वाक्प्रचार तयार करण्यासाठी, मुळात आधी स्वतःला ‘अस्पृश्य’ न समजणे अत्यावश्यक आहे. दलितांच्या (दलित महिलांसकट) वाट्याला आलेली अस्पृश्यता सहज स्वाभाविक ठरवणारी ही भाषणे यांचे जातीचे वर्चस्व आणि या सवर्ण स्त्रियांचे विशेषाधिकार यातूनच येत असल्याचे दिसून येते.

कोणी संविधानातील अनुच्छेद १७ नुसार अस्पृश्यताया शब्दाच्या वापरावरून माझ्याशी कायदेशीर वाद घालू शकेल. परंतु त्यामध्ये ब्राम्हणी पितृसत्ता आणि हिंदू ग्रंथांनी अस्पृश्यतेला दिलेली वैधता, जे अस्पृश्यतेचे मूळ आहे, हेच समजून घेतलेले नाही त्यामुळे माझ्या लेखी त्या वादाला काही अर्थ नाही.

एक दलित महिला म्हणून, अस्पृश्यता आणि भेदभावाची वेदना सहन करताना, अशा प्रकारच्या भाषिक हिंसेमुळे यातना होतात आणि संताप येतो. हे अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट आहे की जोपर्यंत सवर्ण महिला त्यांच्या फायद्याच्या, सोयीच्या रचना/व्यवस्था उद्ध्वस्त करत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने एकता प्रस्थापित होऊ शकत नाही.

एक दलित महिला म्हणून, आम्हाला आमच्या भंगलेल्या जगाची जाणीव आहे आणि घाई करून त्याला अजून भेदण्याची इच्छा नाही. कोणत्याही प्रकारच्या जुलुमापासून मुक्त असलेल्या जगाचे स्वप्न घेऊन आम्ही संघटित होतो. त्या जगात सुख, सुरक्षितता आणि मानवाधिकार असतील आणि तेही सर्वांसाठी! जातीजातींमधली, गटागटांमधली हिंसा आणि अन्याय यातून वाट्याला आलेल्या अनुभवांनी आम्हाला खंबीर बनवले आहे आणि अप्रिय असलेल्या वस्तुस्थितीचा स्पष्ट उच्चार करण्याचा निश्चय आम्ही केलेला आहे.

सावित्रीमाई सारख्या आपल्या मूळ स्त्रियांनी आपल्याला करुणा आणि दयेचे धडे दिलेले आहेत. पण ज्या मंदिरांनी जातीचे जुलूम मान्य केले अशा मंदिरात स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली होणारा प्रवेश तुम्ही आमच्यावर लादू पाहाल तर आम्ही शांत बसणार नाही.

(छायाचित्र ओळी – शबरीमला मंदिरातील अय्यप्पा मूर्ती. सौजन्य: पीटीआय)

आशा कोवताल या अखिल भारतीय दलित महिला अधिकार मंचाच्या सरचिटणीस आहेत.

हा लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.

अनुवाद – मृदगंधा दिक्षित

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0