कर्नाटकः माध्यान्ह भोजनात अंडे-मांस न ठेवण्याची शिफारस

कर्नाटकः माध्यान्ह भोजनात अंडे-मांस न ठेवण्याची शिफारस

बंगळुरूः राष्ट्रीय शिक्षण धोरणांतल्या आरोग्य व कल्याण संबंधातील एका प्रस्तावात माध्यान्ह भोजनात मुलांना आजार होण्याची भीती असल्याने अंडे देऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या आहे. माध्यान्ह भोजनात अंडे दिल्याने मुलांमध्ये भेदभाव होऊ शकतात, भारतीयांच्या शरीराची ठेवण लहान असल्याने मुलांना लहानपणापासून अंडे व मांस नियमित दिल्यास त्यांच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढून अतिरिक्त ऊर्जा तयार होईल व त्याने जीवनशैलीसंबंधी आरोग्य समस्या सुरू होतील, असे या प्रस्तावात म्हटले आहे. हा प्रस्ताव देशातील अग्रगण्य अशा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स (निमहंस) या संस्थेतील बाल मनोचिकित्सा विभागाचे प्रमुख प्रा. जॉन विजय सागर यांच्या अध्यक्षतेखालील एक विशेष तज्ज्ञांच्या समितीने तयार केला आहे.

द हिंदूने हे वृत्त दिले आहे. या वृत्तात समितीचे म्हणणे आहे की, एकाच वर्गातल्या मुलांना वेगवेगळे अन्न दिल्याने त्यांच्यात पोषण संबंधी असमतोल होऊ शकतो. उदाहरणार्थ एकाच वर्गातल्या मुलांना अंडी विरुद्ध क़डधान्ये किंवा अंडी विरुद्ध केळी असे अन्न दिल्यास त्यांच्या शरीरातल्या पोषण मुल्यांमध्ये असमतोल वाढू शकतो. त्यामुळे मैत्रीमध्ये अनेक अडथळे निर्माण होतील, अशा भावना मुलांमध्ये तयार होतील. भारतीय तत्वज्ञान वा धर्म सर्व मुलांना भेदभाव न करता समान वागणूक द्यावे हेच सांगतो. मुलांना ‘सात्विक भोजन’ देण्याची गरज असल्याने त्यांना शेंगदाणे, तिळाचे लाडू किंवा चिक्की असे ‘नैसर्गिक जेवण’ द्यावे. याने एनिमिया सारखे आजार दूर राहतील, असे या समितीने प्रस्तावात सूचवले आहे.

प्रा. जॉन विजय सागर यांनी आपल्या शिफारशींमध्ये अनेक देशांमधील अध्ययनाचा हवाला दिला आहे. यात मांसाहार आधारित अन्न माणसाच्या संप्रेरकांमध्ये अनेक अडथळे निर्माण करत असते. भारतीय वंशांला त्यांचे नैसर्गिक खाणे देणे महत्त्वाचे असून भीम व हनुमान यांच्या खाण्याच्या सवयी, त्यांचे साहस, वीर यांच्या गोष्टी मुलांपर्यंत न्यायला हव्यात अशा सूचना प्रा. सागर यांनी मांडल्या आहेत.

कर्नाटकातील सात जिल्ह्यात ६ ते १५ वयोगटातील मुलांना कुपोषण, एनिमिया व प्रोटीन कमतरतेमुळे माध्यान्ह जेवणात उकडलेले अंडे व केळे दिले जाते. हा कार्यक्रम सरकार पूर्ण राज्यात राबवण्याच्या प्रयत्नात आहे.

पायथागोरस प्रमेय बनावट, न्यूटनची कथा प्रोपोगंडा

राष्ट्रीय शिक्षण धोरणात नॉलेज फॉर इंडिया या विषयांतर्गत स्थापन केलेल्या समितीने पायथागोरस प्रमेय बनावट असून न्यूटनची सफरचंद पडल्याची गोष्ट एक प्रचार असल्याचे म्हटले आहे. या समितीचे अध्यक्ष बीएचयू आयआयटीमधील प्रा. केवी रामनाथन हे आहेत. या समितीने सर्व मुलांना तिसरी भाषा म्हणून संस्कृत शिकवण्याबरोबर व मनुस्मृतीही शिकवली पाहिजे अशी शिफारस केली आहे.

विज्ञानातील गुरुत्वाकर्षण व पायथागोरस सारखे सिद्धांत भारतात प्राचीन काळी अनेक संतांनी अगोदर मांडले होते, असे या रामनाथन समितीचे म्हणणे आहे.

मूळ वृत्त

COMMENTS