नवी दिल्ली: संसदेच्या आवारात यापुढे निदर्शने, धरणे, धार्मिक कार्यक्रम घेता येणार नाहीत, असे राज्यसभा सचिवालयाने १४ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्र
नवी दिल्ली: संसदेच्या आवारात यापुढे निदर्शने, धरणे, धार्मिक कार्यक्रम घेता येणार नाहीत, असे राज्यसभा सचिवालयाने १४ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. विरोधी पक्षांनी या निर्णयावर टीकास्त्र सोडले आहे पण संबंधित अधिकाऱ्यांच्या मते अधिवेशनांपूर्वी काढले जाणारे हे नेहमीसारखे परिपत्रक आहे.
संसदेच्या प्रत्येक अधिवेशनापूर्वी अशा प्रकारचे परिपत्रक काढले जाते, असे राज्यसभा सचिवालयातर्फे सांगण्यात आले. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात २०१३ मध्ये जारी झालेल्या अशाच प्रकारच्या परिपत्रकाच्या प्रतीही सचिवालयाने दाखवल्या. अशी परिपत्रके अनेक वर्षांपासून जारी केली जात आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी यांनी नवीन बुलेटिन प्रसिद्ध केले आहे. यात सर्व सदस्यांना सहकार्याची विनंती करण्यात आली आहे.
“सदस्य संसदेच्या आवाराचा वापर निदर्शने, धरणी, उपोषण यांसाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या धार्मिक समारंभांसाठी करू शकत नाहीत,” असे बुलेटिनमध्ये म्हटले आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस व राज्यसभेतील पक्षाचे मुख्य प्रतोद जयराम रमेश यांनी सरकारच्या या निर्णयावर हल्ला चढवला आहे.
‘विशगुरूज लेटेस्ट साल्वो- धरना मना है (D(h)arna Mana Hai)!’ असे ट्विट त्यांनी केले आणि १४ जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकाची प्रत शेअर केली आहे.
यापूर्वी विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद भवनाच्या आवारात निदर्शने केली आहे आणि महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळही धरणी धरली आहेत.
काही विशिष्ट शब्द ‘असंसदीय’ ठरवणाऱ्या लोकसभेने प्रसिद्ध केलेल्या बुलेटिनमुळे विरोधीपक्ष संतप्त असतानाच हे संसदेच्या आवारात निदर्शनांवर बंदी घालणारे हे परिपत्रक आले आहे.
भारतीय जनता पार्टी देशाला कशा प्रकारे उद्ध्वस्त करत आहे याचे वर्णन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व शब्दांना असंसदीय ठरवण्यात आले आहे, अशी टीका विरोधीपक्ष करत आहेत. अर्थात, यातील कोणताच शब्द वापरण्यास संसदेत बंदी नाही पण ते शब्द विशिष्ट संदर्भात काढून टाकले जाणार आहे, असे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी गुरुवारी स्पष्ट केले. सदस्य त्यांची मते व्यक्त करण्यास स्वतंत्र आहेत, पण सदनाची सभ्यताही राखली पाहिजे, असे ते म्हणाले.
असंसदीय शब्दांच्या यादीमध्ये दरवर्षी नवीन शब्दांची भर घातली जाते आणि यापूर्वीही संसद, राज्यांमधील विधिमंडळे तसेच राष्ट्रकूल देशांमध्ये काही शब्द व अभिव्यक्ती ‘असंसदीय’ ठरवण्यात आल्या आहेत, असे लोकसभा सभापती म्हणाले. अर्थात विशिष्ट शब्द किंवा अभिव्यक्ती काढून टाकायच्या की नाही याबाबत सभापतींचा निर्णय अंतिम आहे, असेही ते म्हणाले.
लोकसभा सचिवालयाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या बुलेटिनमध्ये नवीन असंसदीय शब्दांची यादी आहे. ‘जुमलाजीवी’, ‘बालबुद्धी’, ‘कोविड स्प्रेडर’, ‘स्नूपगेट’ या शब्दांशिवाय ‘अशेम्ड’, ‘अॅब्युज्ड’, ‘बिट्रेड’, ‘करप्ट’, ‘धर्म’, ‘ड्रामा’, ‘हिपोक्रसी’ आणि ‘इनकम्पिटण्ट’ हे शब्दही यापुढे लोकसभेत व राज्यसभेत असंसदीय समजले जाणार आहेत.
COMMENTS