श्रीनगर : जम्मू व काश्मीर राज्याला वेगळेपण देणारे राज्यघटनेतील ३७० कलम रद्द करण्याच्या संसदेच्या निर्णयानंतर विस्कळीत झालेले राज्यातील जनजीवन सलग २३ व
श्रीनगर : जम्मू व काश्मीर राज्याला वेगळेपण देणारे राज्यघटनेतील ३७० कलम रद्द करण्याच्या संसदेच्या निर्णयानंतर विस्कळीत झालेले राज्यातील जनजीवन सलग २३ व्या दिवशीही पूर्वपदावर आलेले नाही. रविवारी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग येथे आंदोलक व पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत एका काश्मीरी ट्रक चालकाचा मृत्यू झाला.
मृत ट्रक चालक ४२ वर्षीय नूर मोहम्मद डार हा जिल्ह्यातील जरादीपुरा उरानहाल भागात राहात होता. तो ट्रक घेऊन जात असताना आंदोलकांनी त्याचा ट्रक सुरक्षा दलाचा असल्याचा संशय घेऊन त्यावर तुफान दगडफेक केली. त्यात नूर डार हा जखमी झाला व इस्पितळात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यां जमावातील दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
दरम्यान सलग २३ व्या दिवशीही काश्मीर खोऱ्यातले जनजीवन पूर्वपदावर आलेले नाही. खोऱ्यातल्या सर्व शाळा, व्यवसाय, बाजार बंद आहेत. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती अगदीच कमी आहे. नागरिकांची रस्त्यावरची वर्दळही दिसत नाही. रस्त्यावर वाहनेही तुरळक दिसत आहेत. रविवारी खोऱ्यातील काही भागात लँडलाइन दूरध्वनी सेवा चालू केली असली तरी राजधानी श्रीनगरमधील लाल चौक व प्रेस एन्क्लेव भागात ही सेवा बंदच आहे. खोऱ्यात अजूनही इंटरनेट व मोबाइल सेवा सुरू करण्यात आलेली नाही.
खोऱ्यातील काही भागातील संचारबंदी शिथिल करण्यात आलेली असली तरी सुरक्षिततेचे उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. सरकारकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत असले तरी खोऱ्यात अनेक भागातून तरुण मुले रस्त्यावर येऊन घोषणाबाजी, दगडफेक करताना दिसत आहेत.
चर्चेचा कोणताही प्रस्ताव नाही : पीडीपी
जम्मू व काश्मीरमधील तणावाची परिस्थिती निवळावी म्हणून कोणत्याही राजकीय हालचाली केंद्र सरकारकडून सुरू झालेल्या नाहीत. याच पार्श्वभूमीवर सोमवारी पीडीपीने केंद्र सरकारकडून आमच्यापर्यंत कोणत्याही चर्चेचा प्रस्ताव आला नसल्याचे स्पष्ट केले. काही प्रसारमाध्यमांत केंद्र सरकार पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्याशी चर्चा करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पण नजरकैदेत असलेल्या पीडीपीच्या एका नेत्याने स्वत:चे नाव जाहीर न करण्याच्या अटीवर, प्रसारमाध्यमात आलेली ही सर्व वृत्ते निराधार व तथ्यहीन असल्याचे सांगितले. खोऱ्याबाहेरची प्रसारमाध्यमे खोटी वृत्ते पसरवण्यात पुढे असल्याचाही त्यांनी आरोप केला.
आमच्या पक्षाचे प्रमुख नेते किंवा लोकप्रतिनिधीच नव्हे तर खेड्यापाड्यात असलेल्या सामान्य कार्यकर्त्यालाही नजरकैदेत ठेवल्याचे या नेत्याने ‘द वायर’ला सांगितले.
८० वर्षांचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सैफुद्दीन सोझ व त्यांच्या पत्नीलाही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. आम्हाला स्थानबद्धतेची कोणतीही नोटीस सरकारने दाखवलेली नाही पण आम्हाला घरात कैद करून ठेवले आहे असे सोझ यांनी ‘द वायर’ला सांगितले. काश्मीरमध्ये काही ठिकाणी लँडलाइन सेवा सुरू केल्यानंतर ‘द वायर’ने त्यांच्याशी संपर्क साधला होता. ‘पोलिस मला घराबाहेर पडून देत नाहीत पण माझ्या पत्नीलाही त्यांनी अटकाव केला होता. पण १७ ऑगस्टला माझ्या पत्नीला रुग्णालयात जायचे असल्याने तिला जाऊ देण्यात आले’, असे सोझ म्हणाले.
माजी आयएएस अधिकारी व जम्मू व काश्मीर नॅशनलिस्ट मुव्हमेंटचे प्रमुख शाह फैजल यांनाही अजून नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
सचिवालयावरील जम्मू व काश्मीरचा ध्वज हटवला
एकीकडे राज्यातील जनजीवन विस्कळीत असतानाच रविवारी जम्मू व काश्मीर सचिवालयावरचा राज्याचा ध्वज हटवण्यात आला. तीन आठवड्यांपूर्वी ३७० कलम रद्द केल्यानंतर केंद्र सरकारकडून ही कारवाई करण्यात आली होती. ३७० कलम असताना राज्याच्या सचिवालयावर राज्याचा ध्वज तिरंगा ध्वजासोबत फडकत असे. आता जम्मू व काश्मीर राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्याने तो ध्वज काढण्यात आला आहे. रविवारी सकाळी ध्वजारोहण करत असताना सचिवालयावर केवळ तिरंगा फडकवण्यात आला.
COMMENTS