४६ दिवस तुरुंगात कोंडल्यासारखे

४६ दिवस तुरुंगात कोंडल्यासारखे

नवी दिल्ली : जम्मू व काश्मीरमधल्या अनंतनागमधील तेहमीना आपल्या नवऱ्याला अब्दुल हलीमला म्हणते, ‘ आपण दुसऱ्या मुलाचा विचार करूया’!

तेहमीनाच्या मनातील हा विचार अत्यंत अस्वस्थतेतून व अनिश्चिततेतून आलेला. ५ ऑगस्टनंतर काश्मीरमध्ये पसरत गेलेले भयाचे वातावरण आजही कायम आहे. आपला मुलगा फैज मारला गेला तर दुसऱ्या मुलाला तरी आपण आपला म्हणू शकतो, अशी वेदना तेहमीना आपल्या नवऱ्याला बोलून दाखवते.

तेहमीनाच्या बोलण्यानंतर हलीम शांत होतो. आपला मुलगा मरण पावला आहे या कल्पनेने त्याला घाम फुटतो.. ‘ये सून कर मेरी रूँह काप गयी’, असे हलीम त्याची भेट घेण्यास आलेल्या एका महिला समितीपुढे बोलतो.

गेल्या आठवड्यात अनंतनागमध्ये काश्मीरमधील परिस्थिती पाहण्यासाठी नॅशनल फेडरेशन इंडियन वुमेनच्या अनी राजा, कँवलजीत कौर, पंखुरी झहीर या सदस्या तर प्रगतीशील महिला संघटनच्या पूनम कौशिक व मुस्लीम फोरमच्या सईदा हमीद यांनी १७ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर असा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी काश्मीरमधल्या श्रीनगर, शोपियन, पुलवामा व बंदीपूर जिल्ह्यात अनेक काश्मीरी कुटुंबांची भेट घेतली. रुग्णालयात जाऊन रुग्णांशी, बाजारपेठेत जाऊन व्यापाऱ्यांशी, शिक्षक- विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या एकूण संवादात सामान्य काश्मीरी नागरिकाच्या बोलण्यातून अस्थिरता व अनिश्चितताच दिसून आली.

सामान्य काश्मीर नागरिक गेले ४५ दिवस तुरुंगात कोंडल्यागत जीवन जगत आहेत. खोऱ्यातील दुकाने, हॉटेल, शाळा, महाविद्यालये, वित्तीय संस्था, आस्थापने, कार्यालये बंद आहेत. सगळीकडे शुकशुकाट दिसतो. एकप्रकारे लोकांना शिक्षा दिल्यासारखे वातावरण काश्मीरमध्ये पाऊल ठेवल्यानंतर दिसून येते.

या महिला सदस्यांना चार जिल्ह्यातून रात्री आठ नंतर लाईट बंद केली जाते याची तक्रारही ऐकायला मिळाली. रात्रीचा नमाज झाल्यानंतर प्रशासनाकडून वीजप्रवाह बंद केला जातो, असे नागरिकांनी सांगितले.

बंदीपोरामध्ये एका मुलीला घरी कंदील चालू ठेवल्याबद्दल निमलष्कराच्या रागाला बळी पडावे लागले. ही मुलगी आपली शाळा सुरू होईल व परीक्षा घेतल्या जाईल या आशेवर रात्री कंदीलाच्या प्रकाशात अभ्यास करत असताना अचानक लष्कराच्या जवानांनी तिच्या घरात प्रवेश केला व वडील आणि भावाला चौकशीसाठी घेऊन गेले. ते आजही लष्कराच्याच ताब्यात आहेत.

झरीना म्हणते, ‘पुरुषांनी संध्याकाळी सहाच्या नंतर घरी परतावे असा आमचा आग्रह असतो. वडील किंवा भाऊ रात्री रस्त्यावर दिसल्यास त्यांना पकडण्याची शक्यता जास्त असते. अगदीच काही गरज पडल्यास आम्ही बायकाच घराबाहेर पडतो..’

या पाच महिलांनी तयार केलेल्या अहवालात काही धक्कादायक माहिती मिळाली आहे. ५ ऑगस्टनंतर खोऱ्यातील १४ ते १५ वयोगटातील मुलांना पकडून नेले गेले आहे. त्यांचा छळ केला जात आहे. त्यांच्याकडील कागदपत्रे ताब्यात घेतली गेली आहेत, मुलांच्या पालकांना त्याची कल्पनाही दिली गेलेली नाही. पोलिस दफ्तरी जुन्या फिर्यादी आजही बंद केलेल्या नाहीत.

एका महिलेचा अनुभव तर काश्मीरमधील विदारक परिस्थिती विशद करतो. या महिलेच्या २२ वर्षाच्या मुलाला घेऊन जाण्यासाठी सुरक्षा रक्षक घरी येतात पण या मुलाच्या हातावर प्लॅस्टर असल्याने त्याच्या ऐवजी १४ वयाच्या त्याच्या भावाला पोलिसांनी उचलून नेले. पोलिस, निमलष्कराच्या जवानांनाकडून मारहाणीच्या घटना तर नित्याच्याच आहेत. दोन तरुणांना अशीच मारहाण करण्यात आली. त्यातील एकाला २० दिवसांनंतर अत्यंत असहाय्य अवस्थेत सोडून देण्यात आले. दुसरा अजून कोठडीत आहे.

५ ऑगस्टनंतर काश्मीर खोऱ्यातील सुमारे १३ हजार तरुणांना विविध ठिकाणी तुरुंगात डांबण्यात आले आहे. तुरुंगाच्या बाहेर अटक करण्यात आलेल्या मुलांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत. काही तरुणांनी प्रकृतीची खालावल्याचे कारणे सांगूनही त्यांना वैद्यकीय उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आढळून येत आहेत.

सुमारे ४० दिवस काश्मीर बंद असताना रेशन हा कळीचा मुद्दा बनला आहे. काही नागरिकांनी सुरक्षा दलाकडून रेशन पळवले जात असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. सुरक्षा रक्षकाचे जवान तपासणीच्या निमित्ताने कोणाच्याही घरात घुसतात व रेशन घेऊन जातात अशा तक्रारी आहेत.

या पाच महिलांना काश्मीर भेटीत नागरिकांच्या हालअपेष्टा दिसून आल्या त्याचबरोबर नागरिकांमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप दिसून आला. काही ठिकाणी त्यांना स्वतंत्र आझादीचे सूर दिसले. अनेक  नागरिकांना भारत किंवा पाकिस्तानात सामील व्हायची अजिबात इच्छा नाही. त्यात ३७० कलम रद्द केल्याने भारताशी असलेला दुवा कायमचा इतिहासजमा झाला असेही हे नागरिक सांगतात. तर दुसरीकडे आपल्या मुलांचे हाल होत असलेले पाहून काश्मीरीची आयांचे आक्रोशही दिसले.

मूळ लेख

COMMENTS