‘कश्मीर टाइम्स’च्या ऑफिसला सील

‘कश्मीर टाइम्स’च्या ऑफिसला सील

श्रीनगरः शहरातील प्रेस एन्क्लेव्हस्थित ‘कश्मीर टाइम्स’ या वृत्तपत्राचे कार्यालय जम्मू व काश्मीर प्रशासनाने सोमवारी सील केले. हे कार्यालय एका सरकारी इमारतीत होते पण या कार्यालयाला सील करताना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात आली नाही, कार्यालय सील करण्यामागील कारणे सरकारने सांगितली नाहीत, असा आरोप ‘कश्मीर टाइम्स’च्या मालक व संपादक अनुराधा भसीन यांनी केला आहे.

‘कश्मीर टाइम्स’चे दिवंगत संस्थापक वेद भसीन यांना सरकारने दिलेले घरही ताब्यात घेतले आहे.

‘कश्मीर टाइम्स’चे मुख्यालय जम्मू येथे असून हे वृत्तपत्र जम्मू व काश्मीर आणि लडाख येथे प्रकाशित होते. सोमवारी जेव्हा ‘कश्मीर टाइम्स’चे कार्यालय सील करण्यासाठी सरकारी अधिकारी आले तेव्हा त्यांनी आम्ही तुमचे कार्यालय बंद करतोय, असा कोणताही आदेश दाखवला नाही. त्यानंतर आम्ही न्यायालयात ही कारवाई रोखण्यासाठी प्रयत्न केले पण तेथूनही काही निर्णय आला नाही. सरकारचा आमचे कार्यालय सील करण्याचा हेतू हा सूडबुद्धीचा आहे. ३७० कलम रद्द केल्यानंतर या निर्णयाविरोधात आमच्या वृत्तपत्राने सातत्याने विरोधात भूमिका घेतला होती, त्यावरून थेट कार्यालयच सील करण्याचा निर्णय सरकारने घेतला असा आरोप भसीन यांनी केला आहे.

त्या म्हणाल्या, गेल्या वर्षी काश्मीरमधील प्रसार माध्यमांवर निर्बंध आणल्यानंतर आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो होतो, तेव्हापासून सरकारी जाहिराती बंद केल्या गेल्या.

दरम्यान वेद भसीन यांचे घर ताब्यात घेण्याप्रकरणात भसीन कुटुंबियांनी नोटीस पाठवली होती. ते हयात नसल्याने व त्यांच्या कुटुंबियांनी घर देण्यास होकार दर्शवल्याने सरकारी अधिकारी तेथे गेले असा दावा एक अधिकारी मोहम्मद अस्लम यांनी केला.

पण अस्लम यांचा दावा अनुराधा भसीन यांनी फेटाळला. आम्हाला कोणतीही नोटीस आलेली नाही. काही कनिष्ठ पदावरचे अधिकारी कार्यालयात आले आणि त्यांनी तोंडी घर खाली करण्यास सांगितले. कार्यालयाला कुलुप लावले व कारवाई केली असे भसीन म्हणाल्या.

१९९०च्या दशकात ‘कश्मीर टाइम्स’ला जागा देण्यात आली होती.

दरम्यान सरकारच्या या कारवाईचा नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी निषेध केला आहे. काश्मीर खोर्यातील अनेक प्रतिष्ठित वर्तमानपत्रे सरकारची मुखपत्रे म्हणून काम करत असून त्यातून केवळ सरकारचे म्हणणे मांडले जाते. अशा काळात स्वतंत्र पत्रकारिकतेला मोठी किंमत मोजावी लागत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनीही सरकारच्या निर्णयाचा निषेध करत अनुराधा भसीन यांच्यासारखे निडर पत्रकार सरकारविरोधात उभे असताना सरकारच त्यांचेच कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेते. हा निर्णय भाजपाने घेतलेला सूड आहे, असे यातून आढळते असा आरोप त्यांनी केला.

मूळ बातमी

COMMENTS