केरळमधील हत्तीणीला कोणी मारले?

केरळमधील हत्तीणीला कोणी मारले?

हत्तीणीचा मृत्यू व्हायला नकोच होता पण आपण सगळेच, म्हणजे विकासाच्या नावाखाली वने उद्ध्वस्त करणारे सगळेच, या मृत्यूला जबाबदार नाही का?

राजभवन की राजकीय अड्डे !
सर्व्हे अचूक असेल तर कोरोनाची रुग्ण संख्या १४-१५ कोटी
‘सुडाचे राजकारण सोडून तज्ज्ञांचे सल्ले घ्या’

केरळमधील एका हत्तीणीच्या मृत्यूमुळे गेले दोन-तीन दिवस सोशल मीडिया संताप आणि उद्रेकाने भरून गेला आहे. २७ मे २०२० रोजी एका दुष्ट व्यक्तीने फटाक्यांनी भरलेला अननस खायला देऊन ‘नृशंस हत्या’ केलेल्या या ‘गरोदर’ हत्तीणीबद्दलची भीषण कार्टून्स आणि व्यंगचित्रे या प्लॅटफॉर्म्सवर पोस्ट होत आहेत. देशभरातील टीव्हीवरील वृत्तवाहिन्या आणि काही वर्तमानपत्रेही या खळबळजनक बातमीचा पाठपुरावा ठेवत आहेत. या सगळ्या पोस्ट्स आणि सादरीकरणांवर दृष्टिक्षेप टाकल्यानंतर आपल्याला जे सांगितले जात आहे त्याबद्दल आणि खरे काय घडले याबद्दल काही प्रश्न निर्माण होतात.

यातील लक्षणीय घडामोड म्हणजे भाजप खासदार मनेका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर या घटनेवर टीका करताना ती घडली त्या मलप्पुरम जिल्ह्यालाच “तीव्र गुन्हेगारी कारवायां”चा जिल्हा ठरवले आहे.

मलप्पुरम जिल्हा उत्तर केरळमध्ये आहे. जिल्ह्यांत सात तालुक्यांमध्ये १३८ खेडी आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या ४१ लाख (२०११ सालच्या जनगणनेनुसार) असून त्यापैकी ७०.२४ टक्के मुस्लिम आहेत. दीर्घकाळ केंद्रीय मंत्रीपदी राहिलेली व्यक्ती हा संपूर्ण जिल्हा गुन्हेगारीमध्ये ‘सक्रिय’ आहे असे म्हणते तेव्हा याचा अर्थ काय होतो? भारतात गेल्या काही काळात इस्लामोफोबिया वाढीस लागला आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास एकटे तबलिगी जमात संमेलनच जबाबदार आहे, अशा प्रकारच्या आरोपांतून तो दिसून येत आहे. एखाद्या मुस्लिमबहुल जिल्ह्यावर “गुन्हेगारीत सक्रिय” असल्याचा शिक्का मारणे या इस्लामोफोबियाचेच आणखी विकृत स्वरूप आहे.

आपण या घटनेतील काही आणखी महत्त्वाच्या तथ्यांचे परीक्षण करू. ही चर्चा सुरू झाली ती मोहन कृष्णन नावाच्या एका वनअधिकाऱ्यांनी फेसबुकवर टाकलेल्या एका पोस्टपासून. वेलियार नदीजवळ झालेल्या हत्तीणीच्या मृत्यूचे कथन या पोस्टमध्ये करण्यात आले होते. त्यांच्या कथनाबाबत काही प्रश्न उपस्थित होतात. विशेषत: त्यांनी ज्या प्रकारे या घटनेला फिक्शनल स्वरूप दिले आहे, त्यामुळे तर प्रश्न उपस्थित होतातच. हत्तींकडे मृत्यू जवळ आल्याचे सांगणारा “सिक्स्थ सेन्स” असतो असे यात म्हटले आहे. लोक भावनाप्रधान असतात पण या प्रकरणात घटनेला सनसनाटी करण्यासाठी भावनांचा वापर करण्यात आल्यासारखे वाटते.

या हत्तीणीला स्फोटकांनी भरलेला अननस एका माणसाने दिला आणि ती स्फोटके तोंडात फुटल्यामुळे तिचा मृत्यू झाला हे ‘निश्चित’ आहे, असे प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि मुख्य वन्यजीव व्यवस्थापक सुरेंद्रकुमार यांनी पीटीआयला सांगितले आहे.

येथे भौगोलिक तथ्ये बघणे महत्त्वाचे आहे. आपण सर्वांनी आणि मनेका गांधी यांनीही. ही हत्तीण पलक्कड जिल्ह्यातील मन्नरक्कड भागातील सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानातून निघाली होती. पलक्कड आणि मलप्पुरम जिल्हे एकमेकांलगत आहे. दोन्ही जिल्ह्यांतील मोठा भाग एकमेकांना लागून आहे. सीमाभागात अनेक खेडी आहेत. ही हत्तीण थिरुविझियामकुन्नु वनठाण्यानजीक सापडली होती. हे ठाणे मन्नरक्कड वनविभागात येते. हा विभाग पलक्कड जिल्ह्यात येतो.

तेव्हा मनेका गांधी यांंनी नमूद केलेली तथ्येच चुकीची आहेत : हत्तीणीचा मृत्यू पलक्कड जिल्ह्यात झाला आहे, मलप्पुरम जिल्ह्यात नव्हे. मग त्यांनी जनतेची दिशाभूल का केली? इस्लामोफोबियाला उत्तेजन का दिले?

दुसरा मुद्दा, ‘द हिंदू’मधील बातमीनुसार, हे कृत्य सहेतूक केले गेल्याचा कोणताही प्रथमदर्शनी पुरावा नाही, असे मन्नारक्कडचे विभागीय वन अधिकारी के. के. सुनील कुमार यांनी स्पष्ट केले आहे. हत्तीणीने स्फोटके भरलेला अननस खाल्ला याचा कोणताही पुरावा नाही, असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पिके उद्ध्वस्त करणाऱ्या रानडुकरांना घाबरवण्यासाठी स्फोटकांनी भरलेल्या अननसांचा वापर करणे ही पद्धत जंगलाच्या सीमेवर राहणारे शेतकरी दीर्घकाळापासून वापरत आहेत. रानडुकरांना ‘नुकसानकारक’ म्हणून जाहीर करून ती पिकांचे नुकसान करत असल्यास त्यांना गोळ्या मारण्याची परवानगी वन अधिकाऱ्यांना देणारा आदेश केरळ सरकारने मार्चमध्येच संमत केला आहे. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२च्या कलम ६२नुसार राज्य सरकार काही वन्यप्राण्यांची यादी केंद्राकडे पाठवू शकते आणि या प्राण्यांना ‘नुकसानकारक’ जाहीर करून त्यांच्या निवडक शिरकाणासाठी परवानगी मागितली जाते. या यादीत रानडुकरांसोबतच ऱ्हिसस माकडे आणि नीलगायींचाही समावेश आहे. १५ मे रोजी वन अधिकाऱ्यांनी पठानम्थिट्टा जिल्ह्यात रानडुकराच्या एका मादीला ठार केले आणि ही घटना अनेकांनी साजरीही केली.

हत्तीणीबाबत जे घडले ते नक्कीच हृदयद्रावक आहे पण त्यानंतर जे घडले ते अधिक चिंताजनक आहे. ती हत्तीण एक महिन्याची गरोदर होती. अर्थात तिचे गरोदरपण डोळ्याला जाणवण्याजोगे नव्हते. हा दुर्दैवी योगायोग होता पण या योगायोगामुळे अनेकांना त्यांच्या तलवारी परजण्याची संधी मिळाली. या घटनेचे रूपांतर विविध प्रकारच्या आपत्तींमध्ये करण्यासाठी विविध स्तरांवरील लोकसेवक जबाबदार आहेत. हत्तीण मृत्यू प्रकरणाशी संबंधित लोक “स्वार्थी” आणि निर्दय आहेत असे गृहीत धरणारे वनअधिकारी; मूलभूत पडताळणी करण्यात अपयशी ठरलेले पत्रकार; या दाव्यांना सनसनाटी पद्धतीने अतिशयोक्त करणारे सामान्य लोक; या घटनेचा वापर प्रसाराचे शस्त्र म्हणून करणारे राजकीय नेते हे सगळे याला जबाबदार आहेत. यात अखेरीस एक महत्त्वाचा प्रश्न विचारला गेला पाहिजे : आपली वने नक्की कोणाच्या मालकीची आहेत?

हत्तीणीचा मृत्यू व्हायला नकोच होता पण आपण सगळेच, म्हणजे विकासाच्या नावाखाली वने उद्ध्वस्त करणारे सगळेच, या मृत्यूला जबाबदार नाही का? शहरे वाढत गेली तशी मानवाने अधिकाधिक जमिनीचा ताबा घेण्यास सुरुवात केली. राहण्यासाठी तसेच शेती करण्यासाठी मानवाने वनांवर अतिक्रमण केले. आणि आपण पाण्यासारखी स्थानिक संसाधने अधिकाधिक वापरू लागलो, तशी वने कोरडी झाली आणि प्राण्यांना नवीन वसतिस्थाने शोधणे भाग पडले. एकीकडे हवा प्रदूषित करणे सुरू ठेवून दुसरीकडे स्मॉग टॉवर्स बांधण्याला जसा फारसा अर्थ नाही, तसेच एकीकडे प्राण्यांच्या घरांवर अतिक्रमण करत राहायचे आणि दुसरीकडे हत्तीणीच्या मृत्यूबद्दल संताप व्यक्त करायचा यालाही फारसा अर्थ नाही.

खरे तर कोणत्याही प्राण्यावर हल्ला करणे अमानवी आहे- मग तो हत्ती असो किंवा रानडुक्कर. उदाहरणार्थ, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय अभयारण्य ज्या अट्टापाडी जंगलांचा विस्तारित भाग आहे, त्या जंगलाच्या अवतीभवती तमीळनाडूतील कोइंबतूर जिल्ह्यातील खेडी आहेत. या भागात अनेक इमारती आहेत, फार्म हाउसेस आहेत आणि त्यांच्याभोवती हत्तींना दूर ठेवण्यासाठी विद्युत कुंपणे घातलेली आहेत. यातील एक सार्वजनिक संस्थेची इमारत आहे, तर एक धार्मिक संस्थेची इमारत आहे. त्यामुळे मूलभूत समस्या आहे ती प्राण्यांना बेघर करून जंगलांमध्ये घुसणाऱ्या लोकांच्या असंवेदनशीलतेची आहे.

एखाद्या पद्धतीने हेतूत: रानडुकरे मारली जात असताना, त्याच पद्धतीने निर्हेतूकपणे हत्तीचा बळी गेला तर आपल्याला ते एवढे का लागते? सरकारी कार्यालयांमधील जबाबदारीच्या हुद्द्यांवरील व्यक्ती बेजबाबदार का वागतात?

हत्तीच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी आपण निश्चित वेळ काढू पण त्याहून अधिक वेळ व्यापक स्तरावर जे घडत आहे त्याबद्दल विचार करण्यासाठी, त्यावर चर्चा करण्यासाठी काढू.

वैद्यनाथन निशांत हे हैदराबाद येथील लोयोला अॅकॅडमीमध्ये अधिव्याख्याते आणि संशोधक आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0