उदयपूरः नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील पराभव व पक्षनेतृत्वावरून सुरू असलेला संघर्ष या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या तीन दिवसांच्य
उदयपूरः नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील पराभव व पक्षनेतृत्वावरून सुरू असलेला संघर्ष या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या तीन दिवसांच्या ‘नव संकल्प’ या चिंतन शिबिराला शुक्रवारपासून उदयपूर येथे सुरूवात झाली. भाजपच्या कथित राष्ट्रवादाला प्रखर उत्तर देण्यासाठी काँग्रेसने आपलाही राष्ट्रवाद पुढे आणण्याचे ठरवलेले दिसते.
काँग्रेस पक्षाने आजपर्यंत कोणत्याही कडव्या, अतिरेकी विचारसरणीला दूर ठेवले आहे, आताचा लढा भारतीय राष्ट्रवाद विरुद्ध छद्म राष्ट्रवाद असा राहील व काँग्रेस भारतीय राष्ट्रवादाला पुन्हा उजाळा देण्याचा प्रयत्न करेल असे पक्षाच्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले गेले आहे. भाजप-संघपरिवार पुरस्कृत राष्ट्रवाद हा ‘फेक’ राष्ट्रवाद असून नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात देशाच्या मुलभूत संघराज्यीय पाया, घटनात्मक मूल्ये, व्यक्तीस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य, भारतीय संस्कृतीचा वारसा यांवर सतत हल्ले केले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला. भारतीय संस्कृती ही ३००० वर्षे जुनी आहे. काँग्रेस या वारशाचे प्रतिनिधित्व करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
या नव संकल्प शिबिराला देशभरातून ४५० सदस्य आमंत्रित करण्यात आले असून उपस्थितांपैकी ५० टक्के सदस्य ४० वा त्यापेक्षा कमी वयाचे आहेत. पक्षाने सहा पॅनेल तयार केली असून प्रत्येक पॅनेलच्या माध्यमातून देशापुढील, पक्षापुढील आव्हानांचा आढावा घेतला जाणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजपला कसे रोखायचे, निवडणूक व्यूहरचना कशी असावी या संदर्भातील मंथन या शिबिरात होत आहे.
सर्वांना आत्मचिंतनाची गरजः सोनिया गांधी
आपल्या अध्यक्षीय भाषणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपने देशात भय निर्माण केले असून त्याच वातावरणात सामान्य माणसाला ते जगायला लावत असल्याचा त्यांनी आरोप केला. संघपरिवार, भाजप व त्यांच्या मित्र पक्षांच्या राजकीय धोरणांचा समाचार घेण्यासाठीच आपण आज एकत्र आलो असल्याचे त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘मॅक्झिमम गवर्नन्स व मिनिमम गव्हर्नमेंट’ म्हणजे अल्पसंख्याक समाजावर क्रूर अत्याचार असल्याचाही त्यांनी आरोप केला.
सोनिया गांधी यांनी आपले भाषण इंग्रजी व हिंदीमध्ये केले. त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना ही वेळ व्यक्तिगत व पक्षासाठी आत्मचिंतनाची असल्याचे सांगितले. पक्षामध्ये व आपल्या कामामध्ये परिवर्तनाची गरज आहे. प्रत्येक सदस्याने त्यासाठी मोकळेपणाने बोलावे असे आवाहन त्यांनी केले. आजपर्यंत पक्षाने तुम्हाला खूप दिले, आता कर्जाची उतराई करण्याची वेळ आली आहे. प्रत्येकाला धैर्य, साहस दाखवावे लागेल, परिवर्तनाची ही वेळ आली असल्याचे त्या म्हणाल्या.
पक्षातील ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, अजय माकन, अशोक गेहलोत यांनीही आपली मते मांडली. भारताच्या राजकीय इतिहासात आजपर्यंत काँग्रेस अनेक संघर्षातून उभी राहिली आहे. त्यामुळे या शिबिरात पक्षाला नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी निश्चित मार्ग मिळू शकतो, असे या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे होते.
खरगे हे सहा पॅनेलचे समन्वयक असून त्यांनी काँग्रेसपुढील पाच आव्हाने उपस्थितांपुढे ठेवली. एक म्हणजे काँग्रेसने आपला समृद्ध वारसा तरुणांपुढे नेला पाहिजे. दुसरे,पक्षाच्या विचारसरणीला पुन्हा नव्या उजाळा देत कार्यकर्ते व समर्थकांमध्ये विश्वास वाढवला पाहिजे. तिसरे, राज्यघटनेप्रती आपले उत्तरदायित्व दाखवले पाहिजे, व्यक्तीस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य, संघराज्य तत्वप्रणाली, पददलित, कष्टकरी कामगारवर्गाच्या हिताचे राजकारण मांडले गेले पाहिजे. चौथे, भारतीय जीवनशैलीचा विचार मांडला पाहिजे, पाचवे, पक्षाच्या पुनरुज्जीवनावर भर देत समाज व देश यांच्याविकासाप्रती त्याला उत्तरदायित्व करता आले पाहिजे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मते काँग्रेसने आपल्या केलेल्या कामाचे कधीच मार्केटिंग केले नाही. हा पक्षाचा सर्वात मोठा कमकुवतपणा आहे. भाजपने जसा गुजरात मॉडेलचा गवगवा करत सत्ता कमावली तसा प्रचार काँग्रेसने कधी केला नाही. गेल्याच दहा वर्षांच्या काँग्रेस राजवटीत माहिती अधिकार, शिक्षणाचा मूलभूत अधिकार, मनरेगा, अन्न सुरक्षा कायदा असे अत्यंत महत्त्वाचे कायदे काँग्रेसने केले पण या कायद्यांचे मार्केटिंग काँग्रेसला करता आला नाही, असे ते म्हणाले.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसचे राष्ट्रवादी वैशिष्ट्य जोरकसपणे मांडण्यावर भर दिला.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याने आपल्या सर्वस्वाचा त्याग केला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसने देश एकसंघ उभा केला. त्यानंतर वसाहतवाद, दहशतवाद, नक्षलवादाला रोखण्यासाठी म. गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, बियांत सिंग, विद्या चरण शुक्ला, नंद कुमार पटेल व असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपले प्राण दिले. भाजप या संघर्षात कुठेच दिसला नाही ते स्वातंत्र्य लढ्यातही सामील नव्हते असे खरगे म्हणाले.
अजय माकन यांनी काँग्रेस पक्षाच्या रचनेवर भर देत त्यात सुधारणांची गरज व्यक्त केली. गेल्या ५० वर्षात पक्षाच्या रचनेत बदल झालेला नाही. आपल्याला त्यात बदल घडवून आणावा लागेल, त्यासाठी नवे सूचना पक्षाच्या घटनेत समाविष्ट कराव्या लागतील असे मत त्यांनी मांडले. लोकांकडून सूचना घेणे, पक्षाने त्याला प्रतिसाद देणे, पक्षांतर्गत विचारांचे आदानप्रदान याचीही गरज त्यांनी बोलून दाखवली.
माकन यांनी एक कुटुंब एक तिकीट हा काँग्रेसचा नवा फॉर्म्युलाही बोलून दाखवला. पण त्यातून त्यांनी गांधी घराण्याला वगळल्याचे उपस्थितांच्या लक्षात आले. तिकीट देताना उमेदवाराचे वय, त्याची पार्श्वभूमी यांचाही विचार केला जाईल, काँग्रेसमधील सर्व समित्यांमध्ये ५० टक्के जागा ५० वर्ष वयाच्या आतील कार्यकर्त्यांना दिल्या जातील असे ते म्हणाले. आपले घर दुरुस्त करायचे आहे व त्याला संघटित रुप द्यायचे आहे, असे माकन यांनी स्पष्ट केले.
मूळ वृत्त
COMMENTS