नवी दिल्लीः धर्माने मुस्लिम असलेल्या भरतनाट्यम नृत्यांगना मनसिया व्ही. पी. यांना केरळमधील त्रिसूर जिल्ह्यातल्या एका मंदिराने नृत्याचा कार्यक्रम करण्या
नवी दिल्लीः धर्माने मुस्लिम असलेल्या भरतनाट्यम नृत्यांगना मनसिया व्ही. पी. यांना केरळमधील त्रिसूर जिल्ह्यातल्या एका मंदिराने नृत्याचा कार्यक्रम करण्यास परवानगी नाकारली. त्रिसूर जिल्ह्यातल्या इरिनजलकुडा येथील कुडालमनिकायम मंदिरात मनसिया व्ही. पी. यांचा भरतनाट्यमचा कार्यक्रम ठरला होता. या मंदिरात १० दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सुमारे ८०० हून अधिक कलाकार त्यात सहभागी होत आहे. हे मंदिर केरळ सरकारच्या देवासवोम बोर्डच्या अखत्यारित येते. मनसिया यांचा कार्यक्रम २१ एप्रिल रोजी होणार होता. पण त्यांचा धर्म मुस्लिम असल्याचे कळल्यानंतर मंदिर व्यवस्थापनाने त्यांना कार्यक्रम रद्द केल्याचे कळवले.
मंदिर व्यवस्थापनाच्या या एकतर्फी निर्णयावर मनसिया यांनी नाराजी व्यक्त केली. आपण भरतनाट्यममध्ये पीएचडी करत असून आपला विवाह श्याम कल्याण या हिंदू युवकासोबत झाला आहे. आपण कोणताही धर्म मानत नसल्याचेही त्यांनी आपल्या फेसबुकवर अकाउंटवर म्हटले आहे.
मंदिर व्यवस्थापनाने धर्माच्या आधारावर कार्यक्रमांचे वेळापत्रक ठरवले असून मनसिया किती चांगल्या नृत्य करतात हा मुद्दा मंदिर व्यवस्थापनाने विचारात घेतलेला नाही, अशी माहिती उघडकीस आली आहे. मनसिया यांनी कोणताही धर्म पाळत नसल्याचे सांगितल्याने त्यांना कार्यक्रमास परवानगी दिली नाही, असे मंदिर व्यवस्थापनाने स्पष्ट केले. आमच्या मंदिरातल्या कार्यक्रमात केवळ हिंदूच भाग घेऊ शकतात व ही पूर्वापार परंपरा असल्याचे मंदिर व्यवस्थापनाचे संचालक प्रदीप मेनन यांनी सांगितले.
मनसिया यांना त्यांनी हिंदू मुलाशी लग्न करून धर्मांतर केले का असेही प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. मला कोणताच धर्म नसल्याने मी कुठे जाऊ असा सवाल मनसिया यांनी फेसबुकवर उपस्थित केला आहे.
मनसिया यांना मुस्लिम असल्यामुळे कार्यक्रम नाकारण्याची ही पहिलीच घटना नाही. या अगोदर गुरुयावरूर येथील श्री कृष्ण मंदिरातही त्यांना कार्यक्रम करण्यास मंदिर व्यवस्थापनाने नकार दिला होता. कला व कलाकार हे धर्माने व जातीने बांधले जात नाहीत. पण माझ्याबाबत असे पूर्वी घडले होते. आमच्या सेक्युलर म्हणवल्या जाणाऱ्या केरळमध्ये काहीच बदल झालेला नाही, अशी खंत मनसिया यांनी फेसबुकवर व्यक्त केली आहे.
मूळ बातमी
COMMENTS