नवी दिल्लीः गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात वादग्रस्त सीएए कायद्याविरोधात आंदोलन करणार्या ४६ आंदोलकांवर केरळ सरकारने गुन्हे दाखल केले आहेत. सीएए क
नवी दिल्लीः गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात वादग्रस्त सीएए कायद्याविरोधात आंदोलन करणार्या ४६ आंदोलकांवर केरळ सरकारने गुन्हे दाखल केले आहेत.
सीएए कायद्याच्या विरोधात आंदोलन करणार्यांवर सरकार कोणतेही गुन्हे दाखल करणार नाही, असे आश्वासन केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिले होते, पण हे आश्वासन सरकारने पाळले नाही, असा आरोप या आंदोलकांनी केला आहे. हे गुन्हे कोझीकोड शहर पोलिसांनी दाखल केले असून त्यात राजकीय, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील ४६ जणांचा समावेश आहे. यामध्ये के के बाबूराज, टीटी श्रीकुमार, जे. देविका, एनपी चेकुट्टी, नसर फैजी कुडाथाई, दिवंगत टी. पीटर समवेत अनेक प्रसिद्ध कार्यकर्ते व नेते आहेत.
१७ फेब्रुवारी २०१९मध्ये सीएए विरोधात आंदोलन झाले होते. त्यावर कोझीकोड पोलिसांनी केस दाखल केली होती. त्यावर स्थानिक न्यायालयाने सर्व आंदोलकांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
या आंदोलकांवर जमावबंदी कायद्याचे उल्लंघन, दंगल पसरवणे, सार्वजनिक पातळीवर अडथळे उत्पन्न करणे, गुन्ह्यासाठी उकसवणे व बेकायदा सभेत उपस्थित राहणे अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या संदर्भात पोलिसांनी दावा केला आहे की, केरळ उच्च न्यायालयाने या आंदोलनाला परवानगी दिली नव्हती, त्यामुळे हे समन्स जारी करावे लागले आहे. पण आंदोलनकर्त्यांच्या मते सरकारचा हा दुट्टपीपणा आहे.
या आंदोलनात वेल्फेअर पार्टी, सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया, ह्यमून राइट्स मूव्हमेंट, बीएसपी, पोरट्टम समवेत अन्य ४० संघटनांचे कार्यकर्ते होते. या आंदोलनात डाव्या पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित नव्हते.
मूळ बातमी
COMMENTS