मुंबईः शेतकरी आंदोलन टुलकिट प्रकरणात आरोपी व पर्यावरण कार्यकर्ते शांतनू यांच्या बीडमधील घरात विना वॉरंट दिल्ली पोलिसाचे दोन कर्मचारी घुसले व त्यांनी क
मुंबईः शेतकरी आंदोलन टुलकिट प्रकरणात आरोपी व पर्यावरण कार्यकर्ते शांतनू यांच्या बीडमधील घरात विना वॉरंट दिल्ली पोलिसाचे दोन कर्मचारी घुसले व त्यांनी कम्प्युटरची हार्ड डिस्क व अन्य सामग्री ताब्यात घेतली असा आरोप शांतनूचे वडील शिवलाल यांनी केला आहे. शिवलाल यांनी तशी तक्रार मंगळवारी बीड पोलिसांकडे सविस्तर केली आहे. बुधवारीच टुलकिट प्रकरणात शांतनू यांना मुंबई उच्च न्यायालयाने १० दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता.
बीड पोलिसांना दिलेल्या तक्रारीत शिवलाल यांनी असे म्हटले आहे की, १२ फेब्रुवारीला पहाटे साडेपाचच्या दरम्यान बीडमधील चाणक्यपुरी येथील आपल्या घरात दिल्ली पोलिस खात्यातील दोन पोलिस आले. त्यांनी आपली ओळखपत्रे दाखवली पण त्यांच्याकडे वॉरंट नव्हते. आपण शांतनु यांच्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी आलो आहोत, असे सांगितले. शांतनू यांनी देशद्रोह केला असून त्यांचे संपर्क खलिस्तान समर्थकांशी आला असल्याने त्यांची घराची झडती घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे पोलिसांचे म्हणणे होते. त्यानंतर दोन पोलिसांनी आमच्या घराची सर्व झडती घेतली. शांतनुच्या खोलीतून कम्प्युटरची हार्ड डिस्क, पर्यावरण संबंधी पोस्टर, एक पुस्तक व मोबाइल फोनचे कव्हर नेले. या वस्तूंचा पंचनामा केला नाही त्याचबरोबर शांतनु याच्या वस्तू आपण नेत आहोत याची परवानगीही कुटुंबियांकडून घेतली नाही, असे शिवलाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान टुलकिट प्रकरणात दिल्ली पोलिस एका ब्रिटिश महिलेचीही चौकशी करणार आहेत. ही महिला या प्रकरणातील अन्य आरोपी निकिता जेकब व शांतनु यांच्यासोबत ट्विटरवर शेतकरी आंदोलनाची मोहीम चालवत होती. तिचा सहभाग टुलकिट तयार करण्यात होता. ही महिला एक्स्टिंशन रिबेलियन (एक्सआर) या ब्रिटनमधल्या एका मोहिमेशी निगडीत असून तिने जेकेब व शांतनू यांच्यासोबत ४-५ जानेवारीला टुलकिटचा मसुदा बनवला होता.
मूळ बातमी
COMMENTS