खगोल मंडळात या – तुमच्यासाठी अवकाशाचे दरवाजे उघडतील

खगोल मंडळात या – तुमच्यासाठी अवकाशाचे दरवाजे उघडतील

अवकाशातल्या गोष्टी समजून घेण्यासाठी दर बुधवारी संध्याकाळी, नागरिकांचा एक गट सायन, मुंबई येथील साधना विद्यालय येथे एकत्र येतो. संध्याकाळी ६.३० ते ८.३० होणारी ही बैठक त्यांना ग्रह, तारे, उल्का आणि धूमकेतू यांच्या हालचालींची आणि त्यांचा अभ्यास करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींची झलक देते. रविवारी संध्याकाळी ६.०० ते ८.०० आणखी एक याच विषयात रस असणारा गट विद्या प्रबोधिनी शाळा, नाशिक येथे भेटतो.

फी वाढः उच्च शिक्षण आणि संशोधनावर सरकारी कुऱ्हाड
फी वाढीविरोधात आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांचे उपोषण सुरूच
संस्कृत नसेल तर संगणक ‘क्रॅश’ – मंत्र्यांची मुक्ताफळे

१९८५ मध्ये काही मित्रमंडळी एकत्र आले आणि त्यांनी खगोल मंडळ नावाची संस्था स्थापन केली. त्यांचं उद्दिष्ट आहे खगोलशास्त्राला लोकप्रियता मिळवून देणं. या वर्षाच्या सुरुवातीला  ‘द इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनिअन’ने या मंडळाच्या खगोलशास्त्रातील प्रयत्नांची दखल घेतली आणि त्यांच्या ‘ऍस्ट्रोनॉमर्स व फूट’ यायोजनेसाठी अनुदानदेखील देऊ केले आहे.

“खगोल मंडळाची स्थापना दिलीप जोशी यांच्या नेतृत्वाखाली सहा जणांच्या गटाने केली.” अभय देशपांडे या संस्थेचे समन्वयक (विनावेतन) आहेत यांनी पुढे संगितले, “त्या सहापैकी चार जणांची पार्श्वभूमी विज्ञानशाखेची नव्हती तर दोघे विज्ञानशाखेचे विद्यार्थी होते. आम्ही हा एक मंच उपलब्ध करून देतो जिथे लोकांना त्यांच्या शंका, त्यांचे खगोल शास्त्राविषयीचे शोध, निरीक्षणं एकमेकांसमोर मांडता येतात, त्यावर ते एकमेकांशी चर्चा करू शकतात, या विषयावरची व्याख्याने ऐकू शकतात, दुर्बिणीतून (टेलिस्कोप) छान आकाश न्याहाळू शकतात, अशा ठिकाणांना सहलीला जाऊ शकतात, आणि संशोधकांकडून स्वतःच्या शंकांचं निरसन करून घेऊ शकतात.”

साधारण २५ लोक नियमितपणे मुंबईच्या बैठकांना हजेरी लावतात, तर साधारण ४०जण नाशिक येथे नियमितपणे येत असतात. सदर खगोल मंडळ इतरही अनेक प्रकल्प आणि अवकाशाशी संबंधित कार्यक्रम आयोजित करते ज्याचा लाभ बाकी बरेच लोक घेत असतात.

द ऍस्ट्रोनॉमर्स ऑन फूट

सुरवातीला हे खगोल मंडळ सहा ठिकाणी सक्रियपणे काम करत होते. मुंबई, ठाणे, पनवेल, डोंबिवली, बदलापूर आणि नाशिक. १९९५ साली त्यांनी इतर शाखा मुंबई शाखेमध्ये विलीन केल्या आणि नाशिक शाखेने आपल्या कक्षा रुंदावत आजूबाजूच्या जिल्ह्यांना जोडून घेतले. ‘द ऍस्ट्रोनॉमर्स ऑन फूट’ मध्ये त्यांनी किनारपट्टीवरील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांवर भर दिलेला आहे. मालेगाव, नंदुरबार इथल्या आदिवासी भागांपर्यंत पोचण्याचाही त्यांचा मनसुबा आहे.

आश्रमशाळेतील कार्यक्रम. सौजन्य: खगोल मंडळ

आश्रमशाळेतील कार्यक्रम. सौजन्य: खगोल मंडळ

हा प्रकल्प पुढील गोष्टी साध्य करू शकेल:

–    लोकांना प्रशिक्षण देणे आणि तांत्रिक प्रक्रियांची माहिती सांगणे.

–    साधने उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणे आणि खगोलशास्त्र लोकप्रिय होण्यासाठी हातभार लावत राहणे.

–    इंग्रजी व मराठी भाषेत या विषयातील शिक्षण साहित्य निर्माण करणे, सोबत प्रत्याक्षिकासाठी लागणाऱ्या वस्तू, सादरीकरणे उपलब्ध करून देणे, दाखले-खगोलीय नमुने बनवण्यासाठीच्या कार्यशाळेसाठीचे, आकाश मार्गदर्शनासाठी स्थानिक भाषांतून छोटे लोकप्रिय विज्ञानासंबधीचे व्हिडीओ उपलब्ध करून देणे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांच्या योजना तयार असल्याचे मंडळाचे सदस्य सांगतात. म्हणूनच खरंतर ते मागची तीन दशके सलग कार्यरत आहेत.

या योजनेची पहिली पायरी आहे शाळेतून, स्वयंसेवी संघटना आणि इतर संस्थातून प्रशिक्षणार्थींचा शोध घेणे. त्यांनतर त्यांना टेलिस्कोप हाताळण्याचे आणि ‘विज्ञान सादरीकरण’ करण्यासाठीचे प्रशिक्षण देणे. एकदा त्यांचे ते धडे गिरवून झाले की ते प्राथमिक खगोलशास्त्र वर्ग घेण्यासाठी ते पात्र ठरतील. ते स्वतः आकाश प्रदर्शन आणि व्यख्याने, प्रात्यक्षिके देण्यासाठी तयार असतील.

खगोल मंडळामुळे मंडळात सहभागी असणाऱ्या लोकांच्या आयुष्यात नेमका काय बदल झाला आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे. खासकरून त्यांनी विद्यार्थी म्हणून पहिल्यांदा खगोलशास्त्र शिकल्यानंतर झालेले बदल! देशपांडे यांच्या मतानुसार, मंडळाच्या योजनांमध्ये सहभागी व्हायला लागल्यानंतर १८ जणांनी त्यांची पीएचडी पूर्ण केलेली आहे (विज्ञानामध्ये).

खगोल मंडळ, सायन येथे रॉबिन कॅचपोल, सेवानिवृत्त वरिष्ठ खगोलशास्त्रज्ञ, रॉयल ग्रीनविच वेधशाळा, यूके यांचे सार्वजनिक व्याख्यान. सौजन्य: खगोल मंडळ

खगोल मंडळ, सायन येथे रॉबिन कॅचपोल, सेवानिवृत्त वरिष्ठ खगोलशास्त्रज्ञ, रॉयल ग्रीनविच वेधशाळा, यूके यांचे सार्वजनिक व्याख्यान. सौजन्य: खगोल मंडळ

“आमच्या मध्ये खूप जण असे आहेत ज्यांनी विद्यार्थीदशेत इथे आपल्या प्रवासाची सुरवात प्राथमिक स्वयंसेवक म्हणून केली आणि नंतर दीर्घकालीन अध्ययन आणि संशोधन केले.”  देशपांडे पुढे सांगतात की आमचा उद्देश फक्त गणित आणि भौतिकशास्त्र एवढाच नसून आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे जाणून घेणं हा सुद्धा आहे.

खगोल मंडळ, शाळांमध्ये माहितिवर्ग, व्याख्याने आयोजित करण्यासाठी मदत करते जिथे मुले भौतिकशास्त्र व खगोलशास्त्र शिकतात, ग्रहांची स्थाने आणि हालचाली मोजतात आणि काही उत्सवांचे खगोलशास्त्रीय उगम समजून घेतात. हे सर्व अधिक अनौपचारिक, संवादी अशा स्वरूपाचे असते आणि सैद्धांतिक, तात्विक भाषणांना इथे प्रकर्षाने टाळले जाते. याविषयी देशपांडे म्हणतात की, “यामुळे तरुण स्वयंसेवक इथे रमतात व त्यांच्यामधील उत्सुकता टिकून राहते”.

आयआयटी, पवई इथे भौतिकशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक असलेल्या अर्चना पै यांना देखील खगोल मंडळाचे कार्य आणि महत्व पटले असून त्या १९९० मध्ये त्यांच्या पदवीपूर्व शिक्षणाच्या दरम्यानच खगोल मंडळात सामील झाल्या होत्या. खगोल मंडळाने कर्जत जवळील वांगणी इथे आयोजित केलेल्या छोट्या सहलीमध्ये अर्चना पै सहभागी व्हायच्या. पूर्वी त्यांनी सुरुवात केली ती नवीन काहीतरी शिकायला मिळेल या हेतूने, मात्र कालांतराने त्या स्वयंसेवक म्हणून जायला लागल्या. त्या सांगतात की,  “मी त्या सर्व ताऱ्यांच्या पार्ट्या एन्जॉय केल्या. त्या धड्यांचा परिणाम म्हणून आपल्या विश्वाविषयीची माझी उत्सुकता अधिकाधिक वाढत गेली.” यातूनच त्यांचा ‘गुरत्वाकर्षणीय लहरींचे भौतिकशास्त्र’ या विषयातील संशोधक होण्याचा मार्ग आखला गेला.

या कार्यक्रमांची रचनाच अशी आहे की त्यातील सदस्य हे उत्तम सामाजिक वक्ते, कार्यक्रम नियोजक आणि उत्तम रीतीने दुर्बीण हाताळणारे बनण्यामध्ये या खगोल मंडळांचा हातभार लागतो. बीएस्सीचा विद्यार्थी असलेल्या २१ वर्षांच्या सुनीत जाधवच्या म्हणण्यानुसार खगोल मंडळाच्या ‘प्राथमिक खगोलशास्त्र आणि गोलाकार खगोलशास्त्र’ अभ्यासक्रमांची, त्याच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात त्याला मदत झालेली आहे. “आम्ही या शिक्षणपद्धतीचा आणि कार्यक्रमांचा भाग आहोत ज्यामुळे आमचा सैद्धांतिक आणि निरीक्षणात्मक खगोलशास्त्रातील रस वाढला आहे. मी विज्ञान प्रसाराचा समर्थक आहे आणि मला तशी प्रेरणा आणि संधी खगोल मंडळातून मिळाली आणि मी त्याचा एक भाग होऊ शकलो.” असे तो सांगतो.

रात्रीच्या वेळी आकाश निरीक्षण. सौजन्य: खगोल मंडळ

रात्रीच्या वेळी आकाश निरीक्षण. सौजन्य: खगोल मंडळ

अनौपचारिकतेमुळे सहभाग वाढतो

खगोल मंडळातील अनौपचारिकतेमुळे खगोलशास्त्राच्या बरोबरीने इतर काही कारणांसाठी सुद्धा मंडळाकडे लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. ही देखील या कामाची दुसरी जमेची बाजू.

देशपांडे माहिती देतात, “एका गटाला फोटोग्राफीमध्ये रस आहे. त्यांना सातत्याने दुर्बिणीतून अंतराळातील आकार आणि स्थाने यांचे निरिक्षण करायचे असते. खगोलीय भौतिक शास्त्राच्या संकल्पना आणि त्यावरील व्याख्याने त्यांना फारशी पसंत  पडत नाहीत. दुसरा एक गट आहे ज्यांना ग्रह ताऱ्यांची स्थाने आणि त्यांच्यातील अंतरे मोजण्यात अधिक रस आहे. अशा कुठल्याही विशेष आवडी निवडीना आम्ही कधीच नाउमेद करत नाही.” आता बराच काळ झाला ते मंडळात आहेत, त्यातील बरेचसे सदस्य अधिकृत खगोलशास्त्रज्ञ आहेत, किंवा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात काम करणारे शास्त्रज्ञ आहेत. ते मंडळाला नवनवीन माहिती आणि दृष्टीकोन देत असतात.

अशा प्रकारे  खगोलशास्त्राविषयी ‘जाता जाता’ वाटणाऱ्या आस्थेतून सुरु झालेले खगोल मंडळ आता विज्ञानाच्या विविध शाखांतून आपली गुंतवणूक करताना दिसत आहे. १९८५ पासून मंडळ लोकांच्या प्रत्यक्ष सहभागाविषयी आग्रही राहिलेले आहे. त्यामुळे जरी ते काही विशिष्ठ उपक्रमांसाठी नाममात्र शुल्क आकारीत असले तरी त्यांचे बरेच उपक्रम मोफत आहेत.  मंडळाच्या संस्थापकांची अशी धारणा आहे की निधी गोळा करण्याने त्यांच्या मूळ उद्दिष्टांना धक्का बसेल.

मंडळ जिथे पण कार्यक्रम घेतात तिथे ते सोबत त्यांची दुर्बीण घेऊन जातात. ऑक्टोबर आणि मे मध्ये ते जवळ जवळ १०० कार्यक्रम पूर्ण करतात. या कार्यक्रमांमध्ये व्याख्याने, परिसंवाद आणि स्काय शो अशा उपक्रमांचा समावेश असतो. यातले साधारण ४० तरी उपक्रम फक्त खगोलशास्त्रावर आधारित आहेत आणि त्यातले निम्मे तरी उपक्रम रात्री घेतले जातात.

मुंबई विद्यापीठाच्या खगोलशास्त्र विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रमात १९९४ पासून खगोल मंडळाला असलेले स्थान ही त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या अभ्यासक्रमात दिल्या जाणाऱ्या ३० व्याख्यानांपैकी १८ व्याख्याने खगोल मंडळातील वक्त्यांकडून दिली जातात. त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्थांकडून त्यांना सतत संपर्क केला जातो. ज्याला खगोल मंडळाकडून नेहमीच प्रतिसाद दिला जातो. उदा. मराठी विज्ञान परिषदेला दुर्बीण बसवण्यासाठी मदत केली जाते. जेणेकरून विविध खगोलीय घटनांचे निरीक्षण करता येईल उदा: उल्कापात, ग्रह पारगमन, ग्रहणे इत्यादी. आणि हे सर्व उपक्रम सर्वांसाठी खुले असतात.

विज्ञान लोकांपर्यंत नेण्याचे धडे

नंदुरबार जिल्ह्यातील मुगबारी येथील आकाशदर्शन कार्यक्रम. सौजन्य: खगोल मंडळ

नंदुरबार जिल्ह्यातील मुगबारी येथील आकाशदर्शन कार्यक्रम. सौजन्य: खगोल मंडळ

वैज्ञानिक माहिती समाजापर्यंत नेण्याच्या प्रवासात नेहमीच नवीन आव्हाने जन्माला येतात. अलीकडेच इंडियन सायन्स काँग्रेसचा ऑगस्ट मधील कार्यक्रम अशाच एका वादाचा साक्षीदार ठरला. त्या कार्यक्रमात पुराणकाळातील भारतीय विज्ञान कसे स्वयंपूर्ण होते आणि आधुनिक पाश्चात्य विज्ञान कसे विकसित होत गेले यावरून चांगलाच वाद निर्माण झाला.

देशपांडे असे सांगतात की, “आम्ही इथे कोणाचेही आकलन दुरुस्त करायला वा त्यांच्या श्रद्धेच्या विरुद्ध जाऊन त्यांच्याशी वाद घालायला जात नाही. विज्ञानाच्या दृष्टीकोनातून आम्हाला जे समजले ते फक्त समजवून देण्याचे काम आम्ही करतो. कधी कधी लोक अगदी कोंडीत पकडणारे प्रश्न विचारतात किंवा विज्ञानावर अजिबात आधारित नसलेला संदर्भ सांगतात. पण अशा प्रसंगातून संघर्ष निर्माण होणार नाही याची आम्ही विशेष काळजी घेतो. आमच्या मते संघर्ष फक्त नकारात्मकतेला जन्म देतो.” सांस्कृतिक समज – माहिती यांचा अनादर होणार नाही याचीही ते काळजी घेतात. आणि “सातत्याने वैज्ञानिक आणि तार्किकतेवर भर दिल्याने आम्ही लोकांच्या विचारात दीर्घकालीन बदल करू शकतो अशी आशा बाळगून आहोत.” असे मत देशपांडे व्यक्त करतात.

त्याचबरोबर, खगोल मंडळ नाशिक भागातून ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोकांसोबत काम करते. हे लोक अशिक्षित जरूर असतील पण निसर्गासोबत राहण्याचे त्यांचे ज्ञान अफाट असते. या उपक्रमांचे समन्वयक आहेत मिलिंद बाबर आणि सुजाता बाबर. या दोघांनीही आपल्या आयुष्याची बरीच वर्षे तळागाळातील लोकांसाठी काम करण्यात दिली आहेत.

नाशिकच्या तीन दिशांना आदिवासी भाग आहे आणि तिथल्या खगोल मंडळाचे बरेचसे काम निम्न शहरी वा ग्रामीण भागातून होते. सुजाता सांगतात की, “जेव्हा आम्ही खगोलशास्त्रीय उपक्रम नाशिकमध्ये सुरु केले, तेव्हा आम्ही आदिवासी भागातूनही हे उपक्रम घ्यायला उत्सुक होतो. कारण आम्हाला जे येतंय ते आम्हाला त्यांना सांगायचे होते आणि तसेच त्यांना जे येतेय तेही त्यांच्याकडून शिकून घ्यायचे होते. आम्ही  स्वतःला फक्त ज्ञान देणारे समजत नाही ही दोन्ही बाजुंनी होणारी देवाण-घेवाणीची प्रक्रिया आहे.”

त्यांनी १९९६ची एक आठवण सांगितली, “आम्ही हेल बॉप कॉमेट,  जे पुढच्या वर्षीपासून दिसणे अपेक्षित होते, ते पाहण्यासाठी ठिकाण तयार करत होतो आणि त्याविषयीची जागरूकता निर्माण करण्यासाठी त्या विषयावर भाषणे देत होतो. तेव्हा आदिवासी समाजातील काही लोक आमच्याशी बोलायला आले. आमच्या लक्षात आले की त्यांना कॉमेट्स विषयी आधीच माहिती आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आम्ही “ओरियन कॉन्स्टलेशन”चा उल्लेख केला, ज्याला मराठीमध्ये “मृग” म्हणतात, ते म्हणाले यासाठी आदिवासी नाव आहे “खाटला” किंवा “पाटला”, ज्याचा अर्थ आहे “खाट”. त्यांनी पुढे सांगितले की त्यांचे नाव अधिक रास्त ठरते कारण ओरियन कॉन्स्टलेशन हे तसेच दिसते.”

सुजाता म्हणतात, “मला नेहमी असे वाटते की या लोकांचे खगोलशास्त्राविषयी स्वतःचे असे काही तर्क असतात, माहिती असते आणि त्यांना जेवढे ज्ञान आहे त्या ज्ञानात भर घालून आपल्याला त्यांना पुढे न्यायाचे आहे. आपण सगळे शिकतोय.”

हा लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.

(छायाचित्र ओळी – २०१८ मध्ये खगोल मंडळासह चंद्रग्रहण पहात आहे. सौजन्य: खगोल मंडळ)

शारदा दुबे यामंकीज इन माय बॅकयार्ड (२०१२)च्या लेखिका आहेत.

(अनुवाद: मृदगंधा दीक्षित)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0