‘..उंबरा’ मधल्या कविता केऑसच्या कविता आहेत. हा केऑस कवीचा खासगी आहे, आंतरिक आहे. केऑस म्हणजे फक्त गोंधळ नव्हे. केऑस हे आंतरिक मंथनाचं पर्यटक म्हणून सुद्धा ग्राह्य धरलं पाहिजे.
मुक्त कविता हा मुख्यत: बदनाम विषय आहे, एकतर सरळसोट, रचनेचा विचार न करता, एका खालून एक शब्दशृंखला मांडत जाणे म्हणजे कविता या एका बालिश समजूतीमधून निर्माण झालेल्या फुलपाखरं समजणाऱ्या असंख्य सुरवंटांमुळे. त्यात वास्तववादाच्या स्थितीशी किंवा प्रतिमेशी सलगी करताना तर अधिकच बदनाम झाला. या सगळ्यात मुक्त कविता करणारे हात ज्या प्रमाणात वाढले त्याच वेगवान प्रमाणात त्यांना वाचणारे डोळे पण कमी झाले. मुक्त कविता झाकोळली गेली, प्रवाहाबाहेर गेली पण संपली नाही. कवितेचा अस्सल वाचक तिच्या पासून अंतर राखून राहू लागला पण दुरावला नाही.
**************
‘खेळ खेळत राहतो उंबरा’
काही दिवसांपूर्वी इन्स्टावर मी या पुस्तकांचं मुखपृष्ठ पाहिलं आणि सगळ्यात आधी दोन गोष्टी मनात आल्या – १. म्हणजे ही केऑसाचं व्यक्तिचित्रं असावं आणि २. हे नेमकं कसलं पुस्तकं असावं – कवितासंग्रह की कथासंग्रह.
आशुतोषची आधीची दोन पुस्तकं अर्थात नाट्यसंहिता – ‘आनंदभोग मॉल’ आणि ‘F1/105’ मला ठाऊक होती; त्यातलं ‘F1/105’ मी वाचलेलं होतं आणि कामवाल्या बायांबद्दल पुसटशीही कल्पना नव्हती. त्यामुळे मला उत्सुकता होतीच अन् नावाने ती अधिक वाढवली.
पुस्तक हातात आलं तेव्हा तो कवितासंग्रह आहे हे स्पष्ट झालं. हाताला एक पक्क्या बांधणीच्या हार्डबाउंड पुस्तकाचा दणकट पण तितकाच घरगुती – खासगी स्पर्श झाला. प्रत्येक पुस्तकाला स्वत:चा असा स्पर्श असतो असं मानणाऱ्या मला हे पुरेसं होतं पुस्तक उघडण्यासाठी..
कविता लिहून झाली की ती कवीची नसते, उरत नाही काही त्याचं. आपण वाचक म्हणून आपल्या भोवती आपणच आखून घेतलेलं, आपल्या मर्यादा, विचारपद्धती, अनुभव, आसपासच्यांचे अनुभव यांचं वर्तुळ आणि त्याच्या मध्यभागी राहून आपण वाचत असतो, जाणून घेत असतो. म्हणून कविता दरवेळी कवीची मानसिकता पोचवेल असे नाही किंबहुना कधीच पोचवत नाही. पण याला अपवाद आहे तो असा की जर तुम्ही कवीला ओळखत असाल, त्याच्या रचनाविश्वाशी निगडीत असाल तर तुम्हाला काही प्रमाणात त्याचा अंदाज येऊ शकतो. शक्यता राहते पण ती खरी होईलच असे बंधन किंवा गृहीतक नाही.
आशुतोषची कविता वाचताना काही मुद्दे प्राथमिक पातळीवर लक्षात घ्यावे लागतात. तो लेखक आहे, त्याला संपादन म्हणजे काय यांची उत्तम जाणीव आहे, तो नाटककार आहे, तो नाटक आणि साहित्य शिकवतो हे मुद्दे आणि त्यासोबत कोल्हापुरपासून आत असणाऱ्या एक अत्यंत छोट्या गावातून त्याचा हा प्रवास सुरू झाला आहे हा मुद्दा ही लक्षात घ्यावा लागतो. त्याची कविता वाचताना या सगळ्या गोष्टी ठाऊक नसल्या तर कविता समजत नाही किंवा कळत नाही असं होतं नाही पण माहीत असल्या तर ती अधिक कळते हे नक्की.
‘..उंबरा’ मधल्या कविता वाचताना एक गोष्ट मला जाणवली ती म्हणजे या सगळया कविता केऑसच्या कविता आहेत. हा केऑस त्याचा खासगी आहे, आंतरिक आहे. केऑस म्हणजे फक्त गोंधळ नव्हे. केऑस हे आंतरिक मंथनाचं पर्यटक म्हणून सुद्धा ग्राह्य धरलं पाहिजे. त्याने जाणिवांनी असेल किंवा पृथक:करणाने असेल, टिपलेले अनुभव, व्यक्तिविशेष, घटना किंवा साम्य विशेष हे याच केऑसची उत्पत्ति आहेत असं मला वाटतं. उदाहरणादाखल त्याच्या दोन कविता: १. ढेकूण रात्री (दीर्घ कविता) आणि २. मेटॅमॉरफॉसिस.
- ओडोमॉसला सरावलेल्या
माझ्या टॅन्ड कातडीला आजकाल
काही सोसवत नाही
थोडे गार पाणीही नाही
अन थोडे गरम पाणीही नको वाटते.
<कालची रात्र>
<सात वर्षापूर्वीची रात्र>
<दहा वर्षांपूर्वीची रात्र>
२.रात्रीच्या रस्त्यावर
डांबरात उजळलेले पिवळे खांब
कोपऱ्यावरची बाई
आवरून सावरून बसलीय
थक्क करणारा तिचा संसार
सगळय तिच्याकडे
भाताचं भांडं
पोळपाट
भाजीचं पातेलं
हलवायला डाव
.
.
.
शोपीस प्रमाणे नटून बसलेले हनुमान
टोलेजंग अळयांच्या
मेटॅमॉरफॉसिसच्या कृष्णकृत्यांची साक्ष देत
ताटकळत उभे आहेत.
रात्रीच्या रस्त्यावर
डांबराने उजळलेले पिवळे खांब.
या केओटीक पार्श्वभूमीवर कवी व्यक्तिचित्रणे सुद्धा मांडतो. आजोबा, आजी1 किंवा आयरे यांना सक्षमपणे समोर आणतो. या कवितांना केऑसची पार्श्वभूमी काढून वाचल्यानंतरची स्वतंत्र अशी बैठकही आहे हे नमूद केलं पाहिजे. पन्हाळा हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.
- तुझ्या परतवंडांच्या
वहीवरला स्पायडरमॅन
आता जाळं पसरतोय
उडी मारायसाठी सज्जय
आपले नेट टाकून
आपल्या नेटचा हरेक नसेचा धागा
पाताळात खुंटीवर लटकवलेल्या
गात्राच्या मोगरमायेत शिरून
चंद्रावर विसावणाऱ्या
तुझ्या खरखरीत हाताकडे विसावतोय.
एकटेपणा हा केऑसचा प्रथमभाव आणि नंतर अनादि काळासाठीचा स्थायीभाव असतो. आपण सरतेशेवटी एकटे असतो ही जाणीव प्रचंड भीतीदायक असते पण तितकीच आत्मशोधाची, enlighten होण्याचीही असते. आशुतोषाच्या कवितेतला एकटेपणा या दोघांच्या मधल्या अवस्थेत फिरत राहतो, बहुदा लूप मध्ये.
- एकटेपणा
एकटेपणाची भुतं
अंगभर विखुरली आहेत
शोधून काढून
कानातल्या औषधाच्या
रबरी बुचाप्रमाणे
उचकटून टाकावीत
चिमटीत धरून उचलून टाकावे
मेलेल्या उंदरसारखे
पण
स्वयंप्रेरित भुतं
पुनरुत्पादित होत राहतात
मास्टरबेशनमधूनच
कुणी देवो अथवा न देवो
त्यांची अंडी सतत
उबत राहतात.
किंवा
- वागणे
सतत
वागणे
लक्षात येत नाही आपले
सतत
नाडी तपासत राहतो
बंद पडली असेल तर?
विरत रहातो
आपण
सतत
भयचा लगदा
खिशात ठेऊन
कुरवाळत राहतो
सतत
वागणे
लक्षात येत नाही आपले
आपल्याला
सतत.
त्याला त्याच्या एकटेपणाची enlighten स्थिति ही मिळते. पुस्तकाच्या रचनेत ही कविता नेमकी शेवटची आहे.
उच्चार तू हा शब्द
उच्चार तू हा शब्द
बोल
लिही
कॉपी कर शब्द
तुझ्या लिहिणाऱ्या बोटात सापडतील
ते दरम्यानच्या रिकाम्या अवकाशात
.
.
.
विसावा घेतील गुजगोष्टी आणि गॉसिप्स
अनंतच्या बिंदुवर थांबला असेल तो शब्द
उल्कापाताच्या प्रतीक्षेत
उच्चार तू ही भाषा
उच्चारु दे त्यांनाही.
हा शेवटचा ‘त्यांनाही’ स्वत:तल्या स्व:ची जाणीव झाल्यानंतरचा निघालेला आदेश आहे. गौतम बुद्धाला बोधिखाली रहस्य प्राप्त झाल्यानंतर अनुभूति झालेली अवस्था आहे. पुस्तकं नेमकं या नोटवर संपतं. हा संकेत म्हणावा का? अर्थातच. फक्त तो कवी म्हणून पुढला प्रवास सुरू केल्याच आहे हे नक्की.
या रचनेतला आणि तितकाच स्वतंत्र भाग म्हणून काही कविता लक्षात घ्यायला हव्यात. त्या नाहीत घेतल्या तर त्यांच्यावर अन्याय असेल. हा कवितासंग्रह केऑस ते आत्मशोध अशा कॅनव्हास वर पसरलेला असला तर एकेठिकाणी त्याला रोमँटिसीजमची फुलं आलेली आहेत. ‘खिडकी’* ही कविता एकाच वेळी वास्तववाद आणि रोमॅंटिसीजम अशा दोन्ही पातळ्यांवर उभी राहते आणि खरी उतरते.
खिडकी
आडव्या उभ्या
काळ्या तपकिरी
जाळीच्या तारेच्या
.
.
.
.
शेकडो खिडक्या सोडून
तुझीच खिडकी बघितली मी.
किंवा माय कर्ली बॉय
तू लिहितोस अक्षरे तेव्हा
समुद्र मंथनाची चाहूल लागते
तू पुसतोस अक्षरे तेव्हा
भूमिगत सीता रामायण रिवाइंड करते.
‘.. उंबरा’ मधली एकही कविता छंदात किंवा वृत्त बंधनातली नाही. ती मुक्त आहे. पण ती मुक्त आहे म्हणून गेय नाही असं नाही. तिला तिचा नाद आहे. तो गुणगुणण्याचा नसेलही किंवा मंचीय सादरीकरणाचा नसेल पण तो आतल्या आवाजाशी सलगी करणारा नक्कीच आहे.
हा लेख आशुतोषच्या कवितांची समीक्षा करण्यासाठी लिहिलेला नाही. मुळात त्याच्या कवितेची समीक्षा इतक्यात होऊ शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. तो बऱ्याच काळापासून लिहीत आहे पण आपण वाचक म्हणून त्याची कविता किती काळापासून वाचत आहोत, समजून घेत आहोत? त्याच्या कवितेबद्दल आपल्याला काय आणि किती ठाऊक आहे हे जोवर आपण ठामपणे सांगू शकत नाही तोवर आपण त्याच्या कवितेची समीक्षा करण्याचा नैतिक अधिकार प्राप्त करत नाही हे ध्यानात घेतलं पाहिजे. हा लेख त्याच्या कविता पोचव्यात म्हणून आहे, तितकाच आहे.
म्हणूनच या लेखात त्याच्या अजून काही महत्त्वाच्या कविता घेतलेल्या नाहीत. उदाहरण द्यायचं झालं तर शीर्षकाच्या नावाची कविता. सगळं एका वेळी सांगणे शक्य नाहीच आणि ते सोपं ही नाही. मुळात कवीने संग्रहात मांडलेला रचनाबंध एका पातळीनंतर आपला, वाचकाचा होतो, तो संग्रहाच्या प्रवाहासोबत अनुभवावा लागतो. तो तसाच अनुभवणे इष्ट ठरेल.
जिन-ल्युक गोदार्द नावाचा एक महत्त्वाचा आणि सतत नाविन्याच्या प्रयोगात रमणारा फ्रेंच-स्वीडिश चित्रपट दिग्दर्शक आहे. २०१८च्या IFFI मध्ये त्याचा एक सिनेमा पाहण्यात आला होता – द इमेज बूक. हा सिनेमा आपल्याला ८५ मिनिटं वेगवेगळी चित्रं, सिनेमातले तुकडे, संगीताचे तुकडे यांना फ्रेंच भाषेतल्या नरेशनने जोडून ठेवतो. समोर चित्र- विचित्र गोष्टी कानावर पडणाऱ्या अनोळख्या आणि काहीच न कळू शकणाऱ्या भाषेतून येत राहतात, सतत ८५ मिनिटं. म्हटलं तर कळत काहीच नाही पण एक क्षण आपल्याला ‘आपलं’ असं काहीतरी, कदाचित चित्र कदाचित संगीत, सापडतं आणि तो एक केऑस असतो जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. हा कविता संग्रह अगदी तसाच आहे.
फक्त आपल्या आतल्या केऑसला कवीने उतरवलेल्या केऑस सोबात शांतपणे न्याहाळता आलं तरच..
खेळ खेळत राहतो उंबरा
आशुतोष पोतदार
कॉपर कॉईन प्रकाशन
पृष्ठ संख्या: ८०
किंमत: १९९ रुपये.
COMMENTS