प्रिया रामाणी खटला निर्णयाने सारे आलबेल होईल असे मानणे मात्र भाबडेपणाचे ठरेल. पण आशेचा किरण मात्र या निकालामुळे दिसला आहे.
‘ब्लेमिंग द विक्टिम’, म्हणजे घडलेल्या प्रसंग गुन्हा यासाठी बळीला जबाबदार धरणे. हा प्रकार अतिशय अतिशय जुना आहे. पार पुराणकाळापासून. आणि त्यात जर बळी स्त्री असेल तर मग बोलायची सोय नाही. उदाहरण घ्यायचे तर सीतेचे घ्या. तिच्या चोळीमुळे, म्हणजे स्त्री हट्टामुळे रामायण घडले. म्हणजे रावण दोषी नाही. रामाला वनवासात जावे लागले. याला जबाबदार फक्त कैकयी, पण चार-चार लग्न केलेला मुखदुर्बळ दशरथ निष्पाप आणि पुत्र वियोगात बुडालेला. इंद्राने अहिल्येला फसवले. पण शिळा होऊन पडली अहिल्या. इंद्र परत चाळे करायला मोकळा. मुद्दा हा की बलात्कार, छेडछाड, लैंगिक छळ अशा गुन्ह्यांमध्ये संशयाची सुई बाईवरच प्रथम जाते की, तुझ्याकडून काही चुकीचा संदेश गेला असेल, म्हणून ही घटना झाली. अगदी बलात्कार पण बलात्कारच होता हे न्यायालयात बाईलाच पटवून द्यायला लागते. छेडछाड, लैंगिक छळ, सहेतुक स्पर्श, द्विअर्थी बोलणे हे सगळे असे, असे घडले, हे पटवून देणे किती कठीण असते याची कल्पना करता येणार नाही.
ज्येष्ठ संपादक-पत्रकार व राज्यसभेचे सदस्य एम. जे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रामाणी यांच्याविरुद्ध जो बदनामी दावा केला होता त्यात प्रिया रामाणी यांना न्यायालयाने निर्दोष ठरवले. २०१७मध्ये “मीटू ची चळवळ” (#MeToo) ऐन भरात असताना प्रिया रामाणी या पत्रकार स्त्रीने एम. जे. अकबर यांनी माझा लैंगिक छळ केला, असा एका लेखातून आरोप केला होता. एम. जे. अकबर म्हणजे बडी हस्ती. ख्यातनाम, संपादक, माजी केंद्रीय मंत्री. त्यांनी प्रिया रामाणी विरुद्ध बदनामी दावा दाखल केला. एकूण खटला काळात प्रिया रामाणी आणि जवळपास वीसएक स्त्रियांनी एम. जे. अकबर यांच्यावर समान आरोप जाहीररित्या केले.
घडलेली घटना बरीच जुनी आहे, आता हिला प्रकरणे उकरून काय मिळणार? तेव्हाच तक्रार का केली नाही? असल्या शंका जनमानसात उठल्या आणि त्यात नवे काही नाही. इथे एक लक्षात घ्यायला हवे की असे बलात्कार, लैंगिक छळ, छेडछाड असले गुन्हे जेव्हा घडतात तेव्हा तुझ्याच बाबतीत असे का झाले? हा प्रश्न पहिला विचारला जातो. मग ती घर कामगार, शेतमजूर स्त्री असो, कॉलेजमध्ये जाणारी मुलगी असो, अथवा मध्यमवयीन नोकरदार बाई असो, संशय तिच्यावरच प्रथम येतो. आणि त्यात नवे काही नाही. अगदी पोलिसात, नवऱ्याच्या मारहाणीबद्दल तक्रार घेवून गेलेली बाई असेल तरी तू काय केले की तो चिडला? असा प्रश्न विचारला जातो. शतकानुशतकांच्या पितृसत्ताक, पुरुषी वर्चस्वाच्या, सरंजामी मानसिकतेचा हा परिपाक आहे.
बाई म्हणजे नरकाचे द्वार, पुरुषांना भोगाच्या जाळ्यात ओढणार्या, स्वार्थी असेच रंगविले जाते. लेखाच्या सुरुवातीला उदाहरणे दिली आहेतच. आणि साहजिकच हे गुन्हे घडले, याला कारण बाईचे कपडे, वागणूक, चाल चलन, इशारे. यामुळे पुरुष चळतो, आणि मग अशा घटना घडतात. बळीला जबाबदार धरणे जे म्हटले ते हेच:-
‘मीटू चळवळी’मुळेच अनेक जणींच्या दडपलेल्या जखमा उघड्या झाल्या. अनेकींनी धैर्य दाखवून आपल्यावरील अन्याय जाहीर केला. पण बहुतांशी समाज या सगळ्या जमिनीकडे पीडित किंवा बळी म्हणून न बघता, तिचा काहीतरी आंतरिक हेतू असणार, याच मानसिकतेतून बघत होता, आहे.
कामाच्या ठिकाणी, शाळा, महाविद्यालय येथे होणारा लैंगिक छळ हा अतिशय भयानक असतो. कारण तो इतका साळसूदपणे केला जातो की बोट ठेवता येत नाही. परत हीच बाई जहांबाज म्हणून बाईवरच ठपका येतो. जाताजाता सहज स्पर्श करणे, द्विअर्थी शेरे मारणे, विनोद सांगणे, सूचक बोलणे, शरीराच्या ठराविक भागावर नजर रोखणे, छुपे इशारे करणे, अशा अनेक प्रकारात हा छळ होतो. आणि आजही ९९% बायकांचे कंडिशनिंग, तुझंच चुकले असेल काही झालेले असल्याने बाई नकळत स्वतःलाच दोषी ठरवते. इथे एक आवर्जून लक्षात घ्यायला हवे की अशी वर्तणूक करणारे पुरूष बऱ्याचदा, त्या बाईचे वरिष्ठ किंवा मोठ्या पदावरील, समाजात प्रतिष्ठित, कुटुंब असणारे असतात. म्हणजे बोललो, तर त्या बाईची नोकरी धोक्यात. मग ती घर कामगार असो, लष्करात असो, सनदी अधिकारी असो वा बहुराष्ट्रीय आस्थापनातील स्त्री कर्मचारी. इथे हुद्दा, शिक्षण, वय गैरलागू असते. दोन स्तन आणि नितंब असणारे शरीर, इतकीच तिची ओळख ठरते. आणि त्यात जर ती दारू सिगरेट सेवन करणारी, मोकळी वागणारी असेल, तर मग तिच्यावर छिनाल किंवा अव्हेलेबल, हा शिक्का परस्पर बसतो.
शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एक निष्पाप बळी जाता नये, न्यायालयाचे कामकाज या तत्त्वावर चालते. आपल्या बाबतीत हे घडले आहे, हे फिर्यादीला पटवून द्यावे लागते. सुदैवाने सध्या मात्र या प्रक्रियेत संवेदनशील बदल झाले आहेत.
प्रसंग घटना घडून जातात. पण त्याचे व्रण भरता भरत नाहीत. आणि आधी म्हटल्याप्रमाणे कंडिशनिंग झालेले असल्याने बायका स्वतःलाच नकळत दोषी ठरवतात. माणूस म्हणून जगण्याचा त्यांचा मुलभूत हक्कच इथे डावलला जातो. आणि इथेच समाज म्हणून आपण अधिक सजग आणि संवेदनशील होणे गरजेचे आहे. न्याय प्रक्रिया कितीही काळ चालू दे. त्यात आपण ढवळाढवळ करू शकत नाही. पण एक नागरिक, माणूस म्हणून आपल्यातल्याच कुणा एकीला काहीतरी आधार देऊ शकतो. आणि तो जर नाही देता आला, तर निदान तिलाच दोषी ठरवणे तरी टाळता येते. सामाजिक संवेदनशीलता हीच!
ज्या बाईच्या बाबतीत समाजाने कधीच दाखविली नाही, म्हणून इथे सती आणि जोहार सारख्या प्रथांचे उदात्तीकरण केले गेले. आणि अन्याय करणाऱ्यांना दैवत्व दिले गेले. अनेक अहिल्या आजही शिळा होऊन वावरत असतील, अनेक सीता गुप्त झाल्या असतील, यादी न संपणारी आहे.
प्रिया रामाणी खटला निर्णय हा आशादायक ठरतो तो याचमुळे. न जाणो कुणाला यामुळे बळ येईल. अर्थात या निर्णयाने सारे आलबेल होईल असे मानणे मात्र भाबडेपणाचे ठरेल. पण आशेचा किरण मात्र या निकालामुळे दिसला आहे. कितीही काळ गेला तरीही स्त्री तक्रार करू शकते, निकालामधील हे विधान अतिशय महत्त्वाचे आहे. घटना जरी जुनी असली तरी तिचे घाव कायम असतात. ते उघडे केले जात नाहीत, म्हणजे त्याचा त्रास होत नाही असे बिलकुल नाही.
एम. जे. अकबर यांच्यावर असे आरोप जाहीररित्या करणे, हा एक मोठा धोका होता जो तक्रारदार स्त्री ने घेतला. निकाल त्यांच्या विरोधात जावू शकत होता. असे पाऊल स्त्री उगाच उचलत नाही. अर्थात त्याला मानसिक ताकद लागते. हल्लीच्या काळात दोन मंत्र्याबद्दलच्या, अशाच बातम्या गाजत होत्या. शहानिशा व्हायच्या आधी एक मंत्री वाजतगाजत घरी गेला आणि दुसऱ्या बाबतीत तर त्या मुलीने आत्महत्या केली.
मुद्दा असा की राजकारण, नोकरी, व्यवसाय, मनोरंजन क्षेत्र सगळीकडे स्त्रीचे लैंगिक शोषण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या होत असते. इथे इंग्रजी पत्रकार होती, दुसरीकडे काटा मुकादमाच्या छळाला बळी पडणारी कचरावेचक बाई असते किंवा शेतमजूर स्त्री. गरजू, हाताखालील काम करणारी स्त्री म्हणजे पुरुषाला आपली मालमत्ता वाटते. समाज यावर विश्वास ठेवणार नाही, या भीतीने असे प्रकार समोर येत नाहीत.
अनेक वर्षे आधी बसमध्ये स्त्रिया वाहक होत्या. त्यांचे अनुभव अतिशय किळसवाणे होते. पुढे सरकत रहा किंवा वरच्या मजल्यावर जा असे म्हटले तर पुरुष प्रवासी दुसरा अर्थ काढून टिंगल करायचे हे एक अतिशय छोटे उदाहरण. असे साध्या, प्रवासात असेल, तर ज्या स्त्रियांना अशा पुरुषांच्या सतत संपर्कात राहावे लागते, त्यांच्या त्रासाबद्दल विचार करवत नाही.
‘विशाखा’ नियम कामाच्या ठिकाणी असणे आता अनिवार्य असते आणि अशा तक्रारीची दखल घेण्यासाठी वेगळी समिती पण असते. तथापि या समितीत अनेकदा मालक, व्यवस्थापन यांचेच लोक असतात जे तक्रारी फार गंभीरपणे घेत नाहीत. तू का हे प्रकरण वाढवतेस इथपासून सुरुवात होते. बाई अशा प्रसंगाने आधीच घाबरलेली असते, नोकरीची काळजी, बढती अनेक बाबी असतात. आणि तिच्यावरच जर संशय घेतला गेला तर मग तिची कोंडी होते. बायकांनी या प्रकाराला घाबरून नोकऱ्या सोडल्यात, बढत्या नाकारल्या आहेत. आणि हे अगदी उच्च पातळीवर पण होते. प्रिया रामाणी निकालामुळे आशेला जागा आहे हे मात्र नक्की दिसून आले आहे.
COMMENTS