खेलो इंडिया स्पर्धाः महाराष्ट्र-हरियाणात पहिल्या क्रमांकासाठी चुरस

खेलो इंडिया स्पर्धाः महाराष्ट्र-हरियाणात पहिल्या क्रमांकासाठी चुरस

पंचकुला: खेलो इंडिया स्पर्धेत बुधवारी महाराष्ट्राच्या संघाने २ सुवर्ण, ३ रौप्य व ५ कांस्य पदके पटकावली. कुस्ती, अॅथलेटिक्स, मल्लखांब, जलतरण, वेटलिफ्टिंगमधील पदकांचा यात समावेश आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणात पहिल्या क्रमांकासाठी चढाओढ आहे.

जलतरण – बटरफ्लाय – आर्यन वर्णेकर (कांस्यपदक, लिंब, सातारा), ८०० मीटर फ्रीस्टाईल – आन्या वाला (रौप्य, मुंबई).

अॅथलेटिक्स – १०० मीटर हर्डल्स – प्रांजली पाटील (कांस्य, मुंबई), ट्रिपल जम्प – पूर्वा सावंत – सुवर्णपदक.

मल्लखांब – रौप्य (एक सांघिक उपविजेतेपद). प्रणाली मोरे (सातारा), भक्ती मोरे (सातारा), पलक चुरी (मुंबई), हार्दिका शिंदे (मुंबई), आरूषी शिंघवी (अमरावती), तमन्ना संघवी (मुंबई) या मुलींचा मल्लखांबचा संघ आहे. त्यांनी उपविजेतेपद मिळवले.

वेटलिफ्टिंग – ७६ किलो वजनगट – प्रतीक्षा कडू (क्रीडा प्रबोधिनी, पुणे).

कुस्तीत मुला-मुलींच्या संघांनी सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. हरियाणाने दोन्ही प्रकारात विजेतेपद पटकावले. तर दिल्ली तिसऱ्या स्थानावर राहिली. ५५ किलो फ्रीस्टाईल वजन गटात वैभव पाटीलने (रा. बानगे, कोल्हापूर) सुवर्णपदक पटकावले. ५३ किलो वजनगटात कल्याणी गादेकर हिने रौप्य पदक मिळवले. ६५ किलो वजनगटात पल्लवी पोटफोटे (वडगाव दरेकर, दौंड, पुणे) हिने कांस्य पदकावर नाव कोरले.

महाराष्ट्र-हरियाणात प्रथम क्रमांकासाठी चढाओढ

चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये चढाओढ लागली आहे. कधी महाराष्ट्र तर कधी हरियाणा पुढे जात आहे. मंगळवारी महाराष्ट्र पहिल्या (२४ सुवर्ण, २४ रौप्य, १४ कांस्य पदकांसह एकूण ६६) तर हरियाणा दुसऱ्या क्रमांकावर (२३ सुवर्ण, २० रौप्य, २९ कांस्य पदकांसह एकूण ७२) होता.

बुधवारी कुस्ती आणि अॅथलेटिक्समधील पदकांमुळे ही आकडेवारी बदलली. हरियाणा पहिल्या क्रमांकावर (३० सुवर्ण, २३ रौप्य, ३४ कांस्य पदकांसह एकूण ८७) तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर (२६ सुवर्ण, २५ रौप्य, २२ कांस्य पदकांसह एकूण ७३) विराजमान आहे. 

कुस्तीत मुला-मुलींच्या संघाने पटकावले सर्वसाधारण उपविजेतेपद

महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या कुस्ती संघाने बुधवारी सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. ५५ किलो फ्रीस्टाईल वजन गटात वैभव पाटीलने (रा. बानगे, कोल्हापूर) सुवर्णपदक पटकावले. ५३ किलो वजनगटात कल्याणी गादेकर हिने रौप्य पदक मिळवले. ६५ किलो वजनगटात पल्लवी पोटफोटे (वडगाव दरेकर, दौंड, पुणे) हिने कांस्य पदकावर नाव कोरले.

महाराष्ट्राच्या कुस्तीगिरांनी हरियाणातील आखाडा चांगलाच गाजवला. ५५ किलो गटात वैभव पाटीलने केलेल्या कुस्त्या नेत्रदीपक ठरल्या. कल्याणीच्या कुस्त्यांनीही वाहवा मिळवली. मात्र, तिचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले.

अ‍ॅथलेटिक्स मैदानही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गाजवले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एक सुवर्ण पदक आणि एक कांस्य पदक मिळाले होते.

४० सेकंदात चीतपट

हरियाणा आणि महाराष्ट्राच्या मल्लांमध्ये नेहमीच टक्कर होत असते. याही स्पर्धेत टशन पहायला मिळाली. सुवर्ण आणि कांस्य पदकासाठी या दोन राज्यांच्या पैलवानांमध्ये लढती झाल्या. ५५ किलो वजन गटात फ्री स्टाईलमध्ये वैभव पाटीलच्या कुस्तीने वाहवा मिळवली. त्याची अंतिम कुस्ती हरियाणाच्या सुरिंदरसोबत झाली. ही कुस्ती त्याने अवघ्या ४० सेकंदात चीतपट केली. सुरिंदरला डावपेच करण्यापूर्वीच वैभव कुस्ती करून महाराष्ट्राचे वैभव वाढवले. पहिल्यांदा दस्ती ओढून दोन गुण घेतले.

कल्याणी गादेकरच्या कुटुंबियांचा संघर्ष; कुस्तीसाठी विकली जमीन

वाशिमसारख्या जिल्ह्यातून आलेल्या कल्याणी गादेकरचे कुस्तीतील राष्ट्रीय यश कौतुकास्पद आहे. गावात किंवा परिसरात कोणतीही तालिम नसताना तिने आतापर्यंत खेलो इंडियात दोन पदक मिळविली आहेत. कॅडेटच्या कुस्तीतही ती पदकविजेती आहे. तिच्या वडिलांनी कुस्तीसाठी शेतातच माती टाकून तालिम बनवली. याच तालमीत तिचे इतर भावंडेही सराव करतात. मुलींनी कुस्तीत पुढे जावे यासाठी, कल्याणीच्या वडिलांनी तिला हरियाणात प्रशिक्षणासाठी पाठवले. तेथील खर्च आवाक्याबाहेर असल्याने आता ती साईचे अमोल यादव (मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. मुलींना कुस्तीत खुराक कमी पडू नये म्हणून तिच्या वडिलांनी आतापर्यंत जवळपास साडेचार एकर जमीन विकली आहे. त्यांची जिद्द आणि मुलांच्या मेहनतीमुळे कुस्तीत पदके मिळत आहेत. गादेकर कुटुंबियांची कहाणी फोगट भगिनींसारखीच आहे. साईच्या विभागीय संचालक सुश्मिता ज्योतिषी यांनीही कल्याणीच्या खेळाचे कौतुक केले.

COMMENTS