जॉन्सन यांच्या जहाजाच्या तळात भोक पडलंय!

जॉन्सन यांच्या जहाजाच्या तळात भोक पडलंय!

सत्ताधारी कंझर्वेटिव्ह पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत २११ खासदारांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सनना पाठिंबा दिला; १४८ खासदारांनी विरोध केला. जॉन्सन वाचले

ब्रेक्झिट कराराबाबतचा महत्त्वाचा ठराव ब्रिटिश संसदेत नामंजूर
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा
बोरिस जॉन्सन ब्रिटनचे नवे पंतप्रधान

सत्ताधारी कंझर्वेटिव्ह पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत २११ खासदारांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सनना पाठिंबा दिला; १४८ खासदारांनी विरोध केला. जॉन्सन वाचले.

#

राणीच्या राज्यारोहणाचा सत्तराव्वा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक मोठ्ठा इव्हेंट लंडनमधे चालला होता. पंतप्रधान या नात्यानं बोरिस जॉन्सन आपल्या पत्नीसह इव्हेंटच्या जागी पोचले.

तिथं जाण्याआधी काही मिनिटं त्यांना माहिती देण्यात आली होती की त्यांच्यावर अविश्वास व्यक्त करणाऱी ६१ खासदारांची पत्रं गोळा झाली आहेत; कंझर्वेटिव्ह पक्षाच्या खासदारांची बैठक भरवली जाईल आणि तिथं त्यांच्यावरचा अविश्वास चर्चिला जाईल.

जॉन्सन यांच्यावर या माहितीचा काहीही परिणाम झालेला दिसत नव्हता. ढिम्म होते.

इव्हेंटच्या मुख्य ठिकाणी ते पोचले, तेव्हां गोळा झालेल्या जमावानं त्यांची हुर्र्यो उडवली. मराठीत बोलायचं तर त्यांच्या नावानं शंख केला.

बैठक झाली.

ब्रिटीश कंझर्वेटिव्ह पार्टीत एक परंपरा आहे. पक्षाच्या खासदारांची एक कमीटी असते. खासदारांनी (सध्या ५४)  आपल्या नेत्याबद्दल म्हणजे पंतप्रधानाबद्दल अविश्वास दाखवणारं पत्र या कमीटीला दिलं तर खासदारांची बैठक भरते, तिथ चर्चा होते, अविश्वास मंजूर झाला तर पंतप्रधान राजीनामा देतो.

विश्वास-अविश्वासाची भानगड आली कुठून?

कोविड सुरु झाल्यावर सरकारनं नागरिकांच्या वावरण्यावर, एकत्र येण्यावर कडक निर्बंध लादले होते. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वतःचे ते निर्बंध धुडकावले, पंतप्रधान कार्यालयात अनेक पार्ट्या झोडल्या. एका पार्टीत मंडळी दारु पिऊन घुंद झाली. एका पार्टीत करावके करून तीव्र आवाजात गाणी-नाच केले. रात्री उशीरापर्यंत या पार्ट्या चालत. एक पार्टी तर कॅबिनेट बैठकीतच पार पडली.

एक नव्हे तर किमान दहा पार्ट्या.

वाच्यता झाली. पेपरांनी फोटो आणि बातम्या छापल्या. चॅनेलांनी क्लिप्स प्रसिद्ध केले.

जॉन्सन प्रथम म्हणाले की पेपरवाले देशद्रोही आहेत, मला व्यक्तिशः विरोध करतात, खोट्या बातम्या छापतात.

पार्लमेंटांत विरोधकांनी जॉन्सना झोडलं, सोललं.

जॉन्सन म्हणाले की पार्ट्याबिर्ट्या झाल्याच नाहीत, आपण बेकायदेशीर वागलो नाही.

पण बाटली उघडली की वास तर पसरणारच, मग दारुडा तोंडावर हात ठेवून काहीही म्हणो.

पार्लमेंटनं सू ग्रे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली. समितीनं पार्ट्या झाल्या असं निरीक्षण नोंदवलं.

दिल्लीच्या मेट्रो पोलिसांना नाइलाजाने मारत चौकशी करावी लागली. कंझर्वेटिव्ह मंत्री, सरकारी कर्मचाही आणि पंतप्रधान यांना कायदा मोडल्याबद्दल पोलिसांनी दंड केला.

एव्हढा सगळा तमाशा झाल्यावर जॉन्सन पार्लमेंटासमोर उभे राहिले आणि म्हणाले की आमच्या हातून काही किरकोळ चुका झाल्या असं दिसतंय, मी त्या बद्दल क्षमा मागतो, पंतप्रधान कार्यालयाच्या कार्यपद्धतीत आवश्यक ते बदल करण्यात येतील.

जॉन्सन यांचं नशीब थोर. युक्रेनचं युद्ध उपटलं. युरोपीय देश आणि अमेरिका युक्रेनच्या बाजूनं उभे राहिले. युकेनंही युक्रेनचं जोरदार समर्थन केलं, लष्करी सामग्री दिली. ही आपली कामगिरी इतकी थोर आहे की त्यापुढं पार्टी प्रकरण अगदीच किरकोळ आहे असं जॉन्सन म्हणाले. नागरीकही युक्रेन व जनरल आर्थिक अडचणीत इतके अडकले होते की जॉन्सन यांचं वर्तन ते विसरले.

परंतू चार घोट दारू पिण्याचा आगाऊपणा विसरून जाऊन पंतप्रधानाला क्षमा करा असं म्हणण्याइतका साधा प्रश्न होता काय?

जॉन्सन हे साधे पण धांदरट गहस्थ असते तर लोकांनी त्यांची दारुबाजी हसण्यावारी नेली असती, विसरून गेले असते. पण जॉन्सन खोटारडे, बेशरम, पोरकट असल्यानं अशा माणसाच्या हातात सत्ता देणं योग्य नाही असं खुद्द त्यांच्याच पक्षाच्या खासदाराना वाटलं. असा माणूस नेता राहिला तर पक्ष निवडणुकीत हरेल आणि आपली खासदारकीही जाईल असं अनेक खासदारांना वाटलं. त्यातूनच वर उल्लेख केलेली विश्वासदर्शक बैठक निर्माण झाली.

आपल्याच पक्षाचे ४१ टक्के खासदार आपल्याला विरोध करताहेत याचा अर्थ जॉन्सन यांना समजला नाही. ५९ टक्के खासदारांनी पाठिंबा दिलाय म्हणजे भरघोस पाठिंबा असल्यानं आपण जोरदार कामाला लागणार आहोत असं जॉन्सन म्हणाले.

निव्वळ पार्ट्या केल्या हा भाग नाहीये.

कोविडची हाताळणी अत्यंत धोरणहीन पद्धतीनं झाली. लॉकडाऊन लावायला जॉन्सननी नकार दिला. जगणं महत्वाचं, मरणं नाही. म्हणजे माणसं मेली तर दुःखदायक, समजण्यासारखं आहे; उद्योग व्यापार बंद पडता कामा नयेत असं जॉन्सन म्हणत राहिले. खूप माणसं मेली.

कोवीड आणि युक्रेन युद्धाचे परिणाम अर्थव्यवस्थेवर झाले. वस्तू व तेलाची टंचाई झाली. महागाई कायच्या काय वाढली. उपाशी पोटी रहावं लागणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत गेली. आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी प्रभावी आणि एकात्मिक पावलं सरकारनं अजूनही उचललेली नाहीत.

कधी सरकार म्हणतं की महागाईला तोंड देण्यासाठी सरकार प्रत्येक कुटुंबाला एकरकमी एकवेळी पैसे वाटणार आहे. त्याच बरोबर सरकार कर कपातही करेल. म्हणजे एकीकडं जनतेला खुष ठेवण्यासाठी पैसे खर्च करायचे आणि दुसरीकडं उद्योगांना आणि धनिकांना खुष ठेवण्यासाठी कर कपात करायची. दोन्हींचा मेळ बजेटमधे, अर्थव्यवस्थेत कसा घालणार?

जॉन्सन यांच्याकडं आर्थिक विचार आणि धोरणं नाहीत हे लोकाना आधीपासून माहित आहे. त्यांच्या पत्रकारी कारकीर्दीत अनेक वेळा ते युकेच्या नागरिकानी अनुभवलं आहे. कधी ते ब्रेक्झिटच्या  विरोधात असत, कधी ते ब्रेक्झिटच्या बाजूनं असत. लोकांना झुलवत ठेवायचं हा त्यांचा खाक्या असतो.

जे काही असेल ते असो, २०१९ मधे युकेच्या जनतेनं त्यांना भरघोस मतं दिली. नागरीक थापांना भुलतात. जगात अनेक देशांत तसं घडलेलं दिसतंय. जॉन्सन यांच्या बाबतीतही ते घडलं.

परंतू गोष्टी आश्वासनं, थापा यांच्या पलिकडं जातात तेव्हां लोकांचे डोळे उघडतात. कोविड हे संकट आलं, मी काय करू. युक्रेन युद्ध आलं मी काय करू. जगभरच अन्न आणि ऊर्जेची टंचाई आहे, मी काय करू.

जनता म्हणू लागली, मी काय करू असे प्रश्न विचारू नका. तुम्हाला जमत नाहीये ना मग तुम्ही घरी जा.

मुळात जॉन्सन हा खोटारडा आणि बोगस माणूस. पण संकटं तर थांबेनात. जॉन्सननी सत्ता आपल्या हातात केंद्रीत करायला सुरवात केली. स्वतःची माणसं सरकारात घुसवून खाजगी राज्य करायला सुरवात केली, कॅबिनेट दुय्यम होऊ लागलं.

संसद, कॅबिनेट या संस्था पंतप्रधानाला मदत करत असतात, या संस्था पंतप्रधानावर अंकुशही ठेवत असतात. अमेरिका, फ्रान्सप्रमाणे सर्वाधिकार राष्ट्राध्यक्षाच्या हाती देण्याला ब्रिटीशांचा विरोध होता. त्यामुळंच ब्रिटीश पंतप्रधान हा एक सर्वसाधारण खासदार असतो, इतर खासदारांच्या मदतीनं तो सरकार तयार करत असतो. तो राष्ट्रपती-राजा नसतो. संसद, संसदेच्या कमिट्या, कॅबिनेट, पक्षांतर्गात कमीट्या या वाटांनी पंतप्रधानावर ब्रिटीश लोकशाही लक्ष ठेवून असते.

जॉन्सन यांच्यावर अविश्वास व्यक्त करणार पहिलं पत्र सीनियर कंझर्वेटिव्ह खासदार आणि माजी मंत्री जेस्से नॉर्मन यांनी लिहिलं.  ”तुम्ही राष्ट्रपती नाही आहात. तुम्ही अमेरिकन राष्ट्रपती परंपरा ब्रिटनमधे आणायचा प्रयत्न करताय. तुम्ही हे विसरू नका तुम्हाला केवळ एक खासदार म्हणून निवडून दिलेलं आहे, ती मर्यादा तुम्ही सोडताहात…”

जॉन्सन वाचलेत. परंपरेनुसार एक वर्षपर्यंत त्यांच्यावर अविश्वास ठराव येऊ शकत नाही.

पण जरा निवांतीनं ब्रिटीशांच्या परंपरा पहा. या आधी मे, थॅचर, स्मिथ इत्यादी पंतप्रधानांनीही विश्वास ठराव करवून घेतले पण त्यानंतर काही आठवडे-महिन्यातच त्यांना जावं लागलं.

ब्रिटीश लोक झटका देणारे लोक नाहीत. चिमटे काढत, ओचकारे काढत, धपाटे घालत, टपल्या मारत नेत्याला हैराण करतात आणि सावकाशीनं त्याला घरी बसवतात.

जॉन्सन यांच्या जहाजाला तळात भोक पडलंय.

।।

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0