कोण गुरु, कोण चेला?

कोण गुरु, कोण चेला?

अटीतटीची वेळ येईल तेव्हा ‘आघाडीचे कर्तव्य’, ‘शिष्याची पाठराखण’ आणि ‘दोस्तीचा धर्म’या तीन पैकी शरद पवार कुठल्या पारड्यात आपले वजन टाकतील? गुरु शरद पवार आणि चेला नरेंद्र मोदी हे खरोखरच एकमेकांच्या विरोधात ही निवडणूक लढवित आहेत का?

सिसोदियांच्या घरावर सीबीआयचे छापे
पीकविमा योजनेचे तीनतेरा
निवडणुकीच्या तोंडावर मोदींचे ‘श्रीराम’
लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

‘पवारांना अजिबात मत देऊ नका, एक दशकभर केंद्रात कृषीमंत्री असूनही पवारांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची चिंता केली नाही’ असं पवारांचे परमशिष्य नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच वर्ध्यात अर्ध्या भरलेल्या किंवा अर्ध्या रिकाम्या मैदानातील जेमतेम गर्दीसमोर सांगितलं.  पेला ‘अर्धा भरलेला’ म्हणावा की ‘अर्धा रिकामा’ म्हणावा यावर जसा गेली हजारो वर्षे वाद सुरु आहे, तद्वतच  वर्ध्याच्या  सभेच्या वेळी मैदान अर्धे भरलेले होते की अर्धे रिकामे, यावर गेले दोन दिवस वाद सुरु आहे. आशावादी विरूद्ध निराशावादी असा हा वाद आहे. दोन्ही बाजू स्तःला आशावादी आणि इतरांना निराशावादी म्हणत आहेत, त्यामुळे या वादाचा निकाल लागणार नाही. तर ते असो, मुद्दा मोदींचा आहे! गर्दी खरंच असेल का?  तर त्याचे उत्तर ‘मोदी है तो मुमकीन है’ असे देता येईल, आणि काही भक्तांनी पुरावा म्हणून गर्दीचे फोटो टाकले ते फेक असतील का, या प्रश्नाचे उत्तरही,  ‘मोदी है तो मुमकीन है’ असे देता येईल. परंतु त्याहीपुढे जाऊन प्रश्न असा आहे की गुरु शरद पवार आणि चेला नरेंद्र मोदी हे खरोखरच एकमेकांच्या विरोधात ही निवडणूक लढवित आहेत का? किमान लढताना दिसत तरी आहेत, परंतु आपल्या मराठी भाषेने ‘दिसते तसे नसते म्हणून जग फसते’ अशी एक म्हण आपल्या कानांत कधीच सांगून ठेवलेली आहे.
आणखी एक म्हण आहे ती ‘गुरुची विद्या गुरुला’ अशी! गुरुने दिलेल्या विद्येचा उपयोग करुन चेल्याने गुरुलाच अस्मान दाखवणे, असा त्या म्हणीचा अर्थ होतो. आता गुरु शरद पवार यांनी दिलेल्या राजकीय कानमंत्राचा वापर करुन चेला नरेंद्र मोदी, पवारांना अस्मान दाखवतो, की हे दोघे गुरु-चेला मिळून देशातल्या जनतेलाच अस्मान दाखवतात, हे आपल्याला मे २०१९च्या अखेर कळेल. सध्या तरी या गुरु-चेल्यांनी ‘एकमेकांच्या विरोधात असल्याच्या’ झूली पांघरल्या आहेत.  शरद पवार सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, असे आपण म्हणू शकतो आणि ते अधिकृतपणे काँग्रेससोबतच्या आघाडीत सामील आहेत, असेही आपण म्हणू शकतो. नरेंद्र मोदी मात्र १००% भाजपचेच पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत, असे आपण म्हणू शकतो. त्यांच्या पक्षाला दोनशेच्या वर जागा मिळण्याची शक्यता व्यक्त होते आहे तोवर तर नक्कीच म्हणू शकतो. मात्र आयपीएलच्या दोन प्रतिस्पर्धी संघातले  खेळाडू, पुढल्या आयपीएलमध्ये एकाच संघात असण्याची शक्यता नेहमीच असते, तशी पवार आणि मोदी एका पक्षात नाही तर किमान एका सत्तेत असण्याची शक्यता ते दोघे

गुरु आणि चेला

गुरु आणि चेला

स्वतःसुध्दा नाकारणार नाहीत, मग आपण तरी कसे नाकारणार?
सध्या सोशल मीडियावर फेकन्यूज, फेकपोस्ट, फेकफोटो यांचे पीक आले आहे आणि देशात किती प्रतिभावंत लोक आहेत याचा प्रत्यय व्हाटसॅप पासून ट्विटरपर्यंत सगळीकडे येत असतो. परंतु नेते स्वतःच्या तोंडून जर ‘फेक’ सांगत असतील तर ते कोणी कसे ओळखणार?  पंतप्रधान मोदी स्वतःच म्हणाले होते की मी शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो आहे. मोदी जेंव्हा भरल्या सभेत हे सांगत होते तेंव्हा पवार गालातल्या गालात हसत होते. ‘हा माणूस काय वाट्टेल त्या थापा मारतो’ असा त्या हसण्याचा अर्थ होता की ‘आपण आजवर जपलेले गुपीत अखेर मोदींनी सांगून टाकले’ असा त्याचा अर्थ होता हे आपण कसे सांगणार? मोदींनी पवारांचा उल्लेख गुरु म्हणून केला तेव्हा पवारांनी त्या सभेत त्यावर काहीच भाष्य केले नाही. परंतु नंतर पुण्यात घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी पवारांना जेव्हा याविषयी विचारले तेव्हा त्यांनी  त्या प्रकरणी आपले बोट झटकून टाकले आणि  ‘मी मोदींना काही शिकवल्याचे  मला आठवत नाही’, असे सांगून टाकले. आपल्या संस्कृतीत दिलेले दान गुप्त ठेवण्याची पद्धत आहे तशी विद्या गुप्त ठेवण्याचाही पद्धत आहे, एवढाच त्याचा अर्थ होतो. ‘मोदी है तो मुमकीन है’ ही घोषणा तर फारच अलिकडली आहे, ‘शरद पवार है तो मुमकीन है’ ही घोषणा कोणी आजवर दिलेली नाही परंतु ती प्रत्यक्ष अस्तित्वात मात्र कधीचीच आहे. त्यामुळे या दोघांच्या बाबतीतली कोणतीही शक्यता आपण नाकारु शकत नाही.
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला सत्तास्थापनेसाठी  बळ कमी पडत होते तेव्हा तिथे पवार टेकू घेऊन पुढे सरसावले होते. दिल्लीत आप-काँग्रेस यांच्यात बोलणी व्हावी म्हणूनही शरद पवारच मध्ये पडले म्हणतात. आपल्याला तर पवार म्हणजे, ‘भाजले, पोळले, कापले किंवा खरचटले या सर्वांवर लागू पडणारे  क्रीम’ वाटतात. त्यामुळेच मोदी यांनी पवारांवर टीका केली असली तरी  त्यामागेही शरद पवार स्वतःच असावेत असे सतत वाटत राहते. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा घेण्याचा प्रयत्न पवारांचा पुतण्या करत आहे, त्यामुळे कुटुंबात कलह माजला आहे’, असे मोदींनी त्या सभेत सांगितले आणि त्यामुळेच ही शंका बळावते. पवारांना स्वतःलाच हे सांगायचे होते ते त्यांनी मोदींकडून सांगून घेतले, असे कुणी म्हटले तर ते अगदीच खोटे वाटणार नाही. अखेर पवार हे गुरु आहेत आणि मोदी चेला आहेत. दोघे एकमेकांना मदत करणारच.
पवार पंतप्रधान होण्याची शक्यता कधी आहेकाँग्रेसला बहुमत नसेल आणि विरोधी पक्षांना एकत्र येऊन तर सत्ता स्थापन करता येईल, अशी परिस्थिती आली तर पवारांच्या नावाच्या पर्यायावर एकमत होऊ शकते. ( असे  पवारांना ‘अजूनही’ वाटते.) चेला पुन्हा पंतप्रधान कधी बनून शकेल? भाजपला चांगले बहुमत मिळाले तर! भाजपला यश मिळाले परंतु सत्ता

गडकरी–पवार यांची मैत्रीही सगळ्यांना ठावूक आहे

गडकरी–पवार यांची मैत्रीही सगळ्यांना ठावूक आहे

स्थापनेसाठी ते पुरेसे नसेल, त्यांचे मित्र पक्ष एकत्र येऊनही ती संख्या गाठता येत नसेल तर मात्र गडकरींच्या नावाचा विचार होईल असे आत्ता बोलले जात आहे. गडकरींचे नाव संघाकडूनच पुढे केले जात आहे अशीही कुजबूज आहे. गडकरी–पवार यांची मैत्रीही सगळ्यांना ठावूक आहे. त्यामुळे मे महिन्यात निकाल लागल्यावर पवार आताच्या आघाडीत राहतील, आपल्या शिष्याच्या पाठीशी उभे राहतील की मित्रकर्तव्य पार पाडतील?
गेली वीस वर्षे, प्रत्येक निवडणुकीच्या आधी  आपण हमखास म्हणत आलो आहोत तसं, ‘ही निवडणूक पवारांसाठी निर्णायक असेल.’ एवढं मात्र नक्की!

अगस्ती चापेकर, घरंदाज राजकीय विश्लेषक असून, लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0