रशियात विरोधी पक्षनेत्यावर विषप्रयोग?

रशियात विरोधी पक्षनेत्यावर विषप्रयोग?

मॉस्को (सीएनएन) – रशियातील पुतीन सरकारवरच्या धोरणांवर सतत टीका करणारे प्रमुख विरोधी पक्ष नेते अलेक्सी नाव्हाल्न्ये यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचा संशय आहे. नाव्हाल्न्ये सैबेरियातील टोम्स्क येथून मॉस्कोकडे विमानातून प्रवास करताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे विमान ओम्स्क येथे उतरवण्यात आले व त्यांना तातडीने इस्पितळात नेण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रशियाची सरकारी वृत्तसंस्था ‘तास’ने सांगितले. त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले आहे.

नाव्हाल्न्ये यांनी टोम्स्क विमानतळावरील एका कॅफेमध्ये काळा चहा प्याला होता व नंतर त्यांना विमानात अस्वस्थ वाटू लागले. नाव्हाल्न्ये यांना चहातून विषद्रव्य दिले असून त्यांनी सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते. हे विषद्रव्य गरम द्रव पदार्थातून शरीरात वेगाने पसरते असे डॉक्टरांचे म्हणणे असल्याचा दावा नाव्हाल्न्ये यांच्या प्रवक्त्या किरा यार्मेश यांनी ट्विटरवरून केला आहे. नाव्हाल्न्ये यांना इस्पितळात आणल्यानंतर त्यांच्या चोहोबाजूंनी मोठ्या प्रमाणात पोलिस जमा झाले. ते डॉक्टरांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते. काही बाबी गोपनीय असल्याचे पोलिस म्हणत होते, असा दावा यार्मेश यांनी केला आहे.

विमानात अस्वस्थ वाटू लागल्यानंतर नाव्हाल्न्ये यांना विमानातून इस्पितळात नेत असल्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

नाव्हाल्न्ये यांचे निकटवर्तीय डॉक्टर अनास्तिशिया वासिलयेव्हा तातडीने ओम्स्क येथे पोहोचले पण त्यांना इस्पितळात जाण्यास परवानगी देण्यात आली नाही.

आम्ही नाव्हाल्न्ये यांच्यावर प्रकृतीसंदर्भातील अहवाल मागत आहोत व जमल्यास त्यांना मॉस्को किंवा परदेशात उपचार घेण्याची परवानगीही आरोग्य खात्याकडून मागत आहोत, असे यार्मेश यांनी सांगितले.

दरम्यान रशियन सरकारने नाव्हाल्न्ये यांच्या प्रकृतीसंदर्भात आपल्याला सर्व माहिती मिळाल्याचे स्पष्ट करून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत योग्य ते उपचार केले जातील, असे म्हटले आहे. नाव्हाल्न्ये यांना विषबाधा झाली की नाही हे त्यांच्या प्रकृतीचे अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल, असेही सरकारने सांगितले आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात पोलिस कोठडीत असताना नाव्हाल्न्ये यांनी आपल्यावर विषप्रयोग झाल्याचा आरोप केला होता. त्यावेळी त्यांची डॉक्टरांनी तपासणी केली होती. पण त्यात विषप्रयोग झाला नसल्याचे दिसून आले होते.

नाव्हाल्न्ये हे पुतीन सरकार टीका करणारे रशियातील एक प्रभावी राजकीय नेते आहेत. गेल्या वर्षी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी रशियातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना सरकारकडून धमकावले जाते, ठार मारले जाते, असा दावा केला होता. सरकारच्या विरोधात गप्प बसणे हाच विरोधी नेत्यांपुढे आपला जीव वाचवण्याचा पर्याय असल्याचे ते म्हणाले होते.

मूळ वृत्त

COMMENTS