वातावरण बदलाची समस्या विक्राळ स्वरूप धारण करू लागल्यावर २००६ साली राष्ट्रसंघाच्या अन्न व शेती संघटनेनं एक पाहणी अहवाल प्रसिद्ध केला. अहवालानं सांगितल
वातावरण बदलाची समस्या विक्राळ स्वरूप धारण करू लागल्यावर २००६ साली राष्ट्रसंघाच्या अन्न व शेती संघटनेनं एक पाहणी अहवाल प्रसिद्ध केला. अहवालानं सांगितलं की वातावरणातला घातक ग्रीन हाऊस वायूपैकी १८ टक्के वायू पशुपालन उद्योगातून निर्माण होतो. कार, विमानं, जहाजं, रेलगाड्या इत्यादी एकत्रितपणे जेवढा घातक वायू सोडतात त्या पेक्षा पशुपालनात निर्माण होणारा वायू जास्त आहे.
दूध आणि मांसासाठी गायबैल पोसले जातात.सर्वात जास्त म्हणजे ६० टक्के घातक वायू हे गायबैल हवेत सोडतात. त्या खालोखाल डुकरं आणि कोंबड्यांचा नंबर लागतो.
गायबैल वनस्पती खातात आणि पोटातल्या चार उपपोटात त्या पचवत असतात. या पचवण्याच्या खटाटोपात मिथेन व इतर वायू बाहेर पडतात.
एक सर्वसाधारण बळकट गाय दरवर्षी १०० किलोग्रॅम मिथेन हवेत सोडते. येवढा मिथेन हवेत सोडायला एका कारला ८७० लीटर तेल जाळावं लागतं.
गायबैल, डुकरं, कोंबड्या इत्यादी प्राणी वनस्पतींचं रूपांतर प्रथिनांत करत असतात. गायबैल सहा किलो वनस्पती खातात तेव्हां एक किलो मांस तयार होतं. डुकरांना एक किलो मांस तयार करण्यासाठी ४ किलो वनस्पती खाव्या लागतात. कोंबडी एक किलो वनस्पती खाते तेव्हां अर्धा किलो मांस तयार होतं.
दर वर्षी गायबैल, डुक्कर, कोंबडी असे मुख्य खाल्ले जाणारे ६५ अब्ज प्राणी वाढवले-मारले जातात.
राष्ट्रसंघानं हे प्राणी हवेत किती प्रदूषण करत असतात ते सांगितल्यावर मुद्दा असा आला की हे प्राणी समजा तयारच केले नाहीत, मारले नाहीत तर काय होईल? अर्थातच प्रदुषण खूप कमी होईल. पण त्यांच्यापासून मिळणाऱ्या प्रथिनांचं काय?
१८८५ मधे विल्हेम रू या जर्मन शास्त्रज्ञानं कोंबडीची पेशी शरीरापासून वेगळी करून पोषक घटकांमधे वाढवली. तिथून पेशी शेती सुरु झाली. अगदी परवापरवापर्यंत दूधदुभतं आणि मांस यावर माणसं खुष असल्यानं कृत्रीम पेशी शेतीचा विचार हा केवळ सैद्धांतिक विचार होता. परंतू प्रदूषणाचा प्रश्न बिकट झाल्यावर आणि राष्ट्रसंघानं त्या विचाराला चालना दिल्यानंतर उत्पादक पेशी शेतीचा विचार करू लागले.
दूध असो की मांस की अंडी, त्यातले अन्नघटक प्राण्याच्या शरीराबाहेर, कारखान्यात तयार केले तर प्राणी मारणंही थांबेल आणि प्रदूषणही संपेल असा विचार उत्पादकांनी केला.
आज जगभर उत्पादक कंपन्या पेशी शेती तंत्राचा वापर करून गोमांस, बकऱ्याचं मांस इत्यादी तयार करू लागले आहेत. आज या व्यवहाराची उलाढाल खूपच कमी आहे. १.३ लाख कोटी डॉलरचा व्यवहार या पशुपालनात होतो. पण पेशीशेतीतून तयार झालेल्या मांसाचा वाटा फक्त २० कोटी डॉलरचा आहे.
पेशी शेती म्हणजे प्राण्याच्या शरीरातून माणूस खातो त्या मांसाची पेशी बाहेर काढणं आणि ती पोषक रसायनांत वाढवणं. प्राणवायू आणि अन्न मिळालं की पेशीच विभाजन होतं, एकाच्या दोन नंतर त्या दोनांच्या प्रत्येकी दोन असं करत करत पेशी वाढत जातात. परंतू प्रत्येक पेशीची विभाजनाची क्षमता मर्यादित असते. त्यामुळं सतत पेशी मिळवत रहावं लागतं.
प्राण्याच्या शरीरात रक्तवाहिन्या अन्न आणि प्राणवायू पेशींना पुरवत असतात. ते घटक बाहेर पुरवणं ही गोष्ट सोपी नाही. प्रयोगबशीत पेशी वाढवणं ठीक असतं पण औद्योगीक मात्रेत उत्पादन हवं असेल तर त्यासाठी लागणारं भांडं खूपच मोठं हवं. तशी भांडी तयार करणं हे काम अवघड आहे, अजूनही जमलेलं नाही.
कोट्यावधी टन मांस तयार करायचं असेल तर उद्योगात किती गुंतवणूक लागेल याची कल्पनाही करता येत नाही. आज मांसाचा उद्योग व्यवस्थित जम बसला असताना या उद्योगात कोण पैसे घालणार? काही उत्साही लोक, काही मांसाहाराला विरोध असणारे लोक पैसे गुंतवू लागले आहेत. परंतू तो पैसा अपुरा आहे.
प्रस्थापित दुग्धव्यवसायिक आणि मांस व्यवसायिक लोक स्पर्धा मारायचा प्रयत्न करतात. मांसविरहीत मांस, दूध नसलेलं दूध, निसर्गाचा संबंध नसलेलं नैसर्गिक मांस या वर्णनाला प्रस्थापित कंपन्यांचा विरोध आहे. नाना खटले भरून हे उद्योग पेशी शेतीतील उत्पादनांना जेरीस आणतात. मागं जेव्हां अमेरिकन मार्गरीन बाजारात आलं तेव्हां लोणी उद्योगानं मार्गरीनला त्रास देत देत अनेक वर्षं रोखून धरलं होतं.तसंच काहीसं मांसविरहीत मांसाच्या बाबतीत होतंय.
ज्यू धर्मगुरुंनीही कारखान्यात तयार झालेलं मांस कोशर आहे, म्हणजे धर्ममान्य आहे, असं मान्यतापत्र दिलंय. मांस तयार करण्यासाठी वापरली जाणारी पहिली पेशी जनावराला न मारताच घेतली जात असल्यानं या उत्पादनात हिंसा होत नाही. त्यामुळं हे मांस खाणं म्हणजे हिंसा ठरत नाही. मुळातली एक पेशी म्हणजे प्राणी होत नसतो त्यामुळंही या उत्पादनाला प्राणी म्हणता येत नाही. तेव्हां जैन मंडळींनाही या अन्नाला मांस असं न म्हणता वेगळं काही तरी नाव देऊन हे अन्न खाता येणं शक्य आहे.
पण तर्क आणि बुद्धी याचा अन्नाशी संबंध नसतो हेच खरं. आपण खातो त्या पदार्थात किती प्रथीनं आणि किती मेद आणि कोणती मूलद्रव्यं असतात ते पाहून आपण पदार्थ खात नसतो. शेकडो हजारो वर्षांच्या परंपरेचा परिणाम म्हणून, सवय म्हणून, जिभेला आवडतं म्हणून, पचतं म्हणून आपण अन्न खातो. पुरणपोळीत किती सोडियम आहे असा विचार आपण कधीच करत नाही. तेव्हां दूध नसलेलं दूध किंवा मांस नसलेलं मटन किंवा चिकन खाताना बुद्धीचा भाग कमी असतो, सवयीचा भाग जास्त असतो. ते मनाला पटायला हवं.
मांसविरहीत मांस तयार करणाऱ्या कंपन्या चांगल्या चांगल्या खाणावळीत, थोरथोर बल्लवांची मदत घेऊन उत्तम पदार्थ करून लोकांना खायला घालतात. खाणाऱ्यांना चव आवडते, पदार्थाचा चुरचुरीतपणा, लोणीमुलायमपणा इत्यादी गोष्टी आवडतात. खाणारे म्हणतात की आधी सांगितलं नसतं तर आपण मांस नसलेलं मांस खातोय असं त्यांना वाटलंही नसतं. पेपरांतून या गोष्टी प्रसिद्धही केल्या जातात.
तरीही लोक हात आखडता घेतात. शेवटी हा पदार्थ ही एक कॉपी आहे, मुळ पदार्थ काही औरच असतो अशी रुखरुख अनेकांना रहातेच.
अमेरिका, नेदरलँड, इस्रायल या देशात पेशीशेती करून मांस तयार करणाऱ्या कंपन्या आता उभ्या राहिल्या आहेत. त्यांना अनंत कायदे आणि बाजारातल्या स्पर्धेला तोंड द्यावं लागतंय.
जैन लोकं तर पहिल्यापासूनच मांसाहार करू नका म्हणून सांगतात. अलिकडं शाकाहारी लोकांची एक चळवळ, वेगन, उभी राहिलीय. पण त्या मंडळींचा प्रभाव मर्यादित आहे. मांसाहार करणाऱ्यांची संख्या शाकाहारींपेक्षा जास्त आहे, त्यांना कित्येक सहस्रकांची मांसाहाराची सवय आहे. एक वर्ग असंही म्हणतो की प्राण्यांपासून मिळणारी प्रथिनं वनस्पतींकडून मिळत नाहीत, प्राणीज प्रथिनं अधिक परिपूर्ण असतात. यावर वाद आहेत.
मांसाहार नैसर्गिक आहे, हजारो वर्षं जीवोजीवस्य जीवनम या न्यायानं मनुष्य जात प्राणी खात आली आहे. तेव्हां मांसाहार हे एक निसर्गचक्रच आहे आणि त्यात ढवळाढवळ करणं म्हणजे निसर्ग नष्ट करणं आहे असं मानणारा एक वर्ग आहे.
परंतू हे नवं तंत्रज्ञान मांसाचा उत्पादन खर्च खूप खाली आणार आहे. त्यामुळं उत्पादकाना हे पटलंय की हे उद्याचं तंत्रज्ञान आहे. त्यामुळं मांस उत्पादक हळूहळू या नव्या उत्पादनात पैसेही गुंतवू लागले आहेत.
लेखक चेज पर्डी त्यांच्या बिलियन डॉलर बर्गर या पुस्तकात पेशी शेतीच्या आजच्या स्थितीचं वर्णन करतात. सॅन फ्रान्सिस्कोमधल्या ‘ जस्ट’ या मांसविरहीत मांस तयार करणाऱ्या कंपनीचे जोश टेट्रिक यांच्याबरोबर चर्चा करत करत लेखकानं हे पुस्तक उभारलं आहे. लेखकानं या व्यवसायात गुंतलेले तंत्रज्ञ, वैज्ञानिक, उद्योगपती यांच्या मुलाखती पुस्तकात मांडल्या आहेत.
पेशीशेतीबद्दलची माहिती आज माहिती जालात विपुल आणि सहज उपलब्ध आहे. वेळोवेळी पेपरांतूनही लेख येत असतात, पुस्तकंही भरपूर उपलब्ध आहेत. तरीही माहिती एकत्रितपणे वाचणं उद्बोधक ठरतं. पुस्तकात काही एक रंजकता आहे, महत्वाचे मुद्दे पहात, तपशील सरकवत जात पुस्तक पटकन वाचता येतं.
निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.
COMMENTS