चंद्रयान -२ : प्रेरणादायी मिशन

चंद्रयान -२ : प्रेरणादायी मिशन

भारताने इसरोच्या माध्यमातून एक दैदिप्यमान परंपरा कायम केलेली आहे. या संस्थेने जगाला कमी खर्चात कशा प्रकारे अवकाश संशोधन करता येते याचे समर्पक धडे दिलेले आहेत. तसे पाहायला गेले तर चंद्रयान-2चा काही आठवड्यांचा प्रवास आज फलद्रूपास आलेला आहे. विक्रम लॅण्डर जरी यशस्वीरीत्या चंद्राच्या पृष्ठावर विसावलेला नसला व प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठावर आकडेवारी जमा करू शकत नसला तरीही ही चंद्रावरची चढाई यशस्वी झाली हे म्हणता येईल.

चंद्रावर पाऊल ठेवण्यास ‘चांद्रयान-२’ सज्ज
गती राखता न आल्याने विक्रम लँडर चंद्रावर आदळले
‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण, देशभर जल्लोष

अवकाशातून खाली चंद्राच्या पृष्ठावर येताना विक्रमचा पृथ्वीशी संपर्क तुटला त्यामुळे तो सॉफ्ट लँड किंवा हार्ड लँड झाला याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. इसरोला पुन्हा विक्रमशी संवाद साधण्याची आशा आहे. हा लेख लिहीत असताना इसरो विक्रमशी पुन्हा दळणवळण प्रस्थापित करण्याचा प्रयत्नात आहे. पण चंद्रयान-२ आपले इप्सित साध्य करण्यासाठी चंद्रावर घिरट्या घालत आहे. यातूनही आपल्याला महत्वाची माहिती व आकडेवारी मिळू शकते.
चंद्रयान-२ मोहिमेचे महत्व
या मोहिमेकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिले होते. ही मोहीम फक्त भारताचीच आहे असे नाही तर ती पूर्ण जगाची आहे. या मोहिमेतून जी माहिती गोळा होणार आहे त्याचा फायदा समस्त वैज्ञानिक जगताला होणार आहे. अमेरिका, रशिया व्यतिरिक्त चीन आणि इस्राएल सारखे देश अवकाश संशोधनात हिरीरीने पुढाकार घेत आहेत. अमेरिकेचा तर २०२४ सालापर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचा मानस आहे. चंद्रयान-२ जी वैज्ञानिक माहिती जमा करेल त्याचा उपयोग त्यांनाही होणार आहे.
वैज्ञानिक उत्क्रांतीत चंद्रयान-२ एक मैलाचा दगड ठरणार आहे.साऱ्या जगाचे लक्ष या मोहिमेकडे होते व आहे. एक तर विक्रमचे सॉफ्ट लँडिंग होणार होते व दुसरे हे की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारे पहिले भारतीयच असणार आहेत. अमेरिकेने सुद्धा चंद्राच्या ध्रुवावर चढाई करण्याचा प्रयत्न या आधी केलेला नाही. आपण पहिल्या प्रयत्नातच तिथल्या दक्षिण ध्रुवावर चाल करत आहोत. आपण त्यात यशस्वी झालो नाही ही खंत आहेच, पण एका अर्थाने आपण काही अंशी यशस्वीही झालो आहोत. या मोहिमेतून जी आकडेवारी आपल्याला मिळणार आहे त्यातून बरेचसे शिकायला मिळणार आहे.
स्फूर्ती व प्रेरणा
अवकाशातील यशस्वी मोहीम त्या देशाला विज्ञान व तंत्रज्ञानात बरेच चांगले दिवस दाखवत असते. १९६९ साली अमेरिकेने जेव्हा आपले नागरिक चंद्रावर उतरवले होते तेव्हा टीव्हीच्या माध्यमातून हा सारा देखावा अमेरिकेच्या घरोघरी पोहोचला होता. त्यातून शास्त्रज्ञांची व तंत्रज्ञांची एक फार मोठी फळी नंतरच्या काळात जन्माला आली होती. चंद्राला पादाक्रांत केल्याचे पाहिलेल्या व त्यापासून स्फूर्ती व प्रेरणा घेतलेल्या पिढीने नंतर विज्ञान व तंत्रज्ञाची कास पकडून आपल्या देशाच्या विकासात अतिशय मोलाचे योगदान दिले आहे. चंद्रयान-२ आपल्या देशासाठी असेच प्रेरणादायी काम करणार आहे, पूर्णांशाने यशस्वी झाली नसली तरी. येत्या काही वर्षात चंद्रयान-२ व विक्रमाचे कवित्व मुलांना विज्ञानाकडे फार मोठ्या प्रमाणावर आकर्षित करणार आहे. विक्रमचे यशस्वी उतरणे आपल्या देशासाठी ‘गेम चेन्जर’ ठरले असते यात कोणतीही शंका नाही. अशा प्रकारचे फायदे पैशात मोजण्यासारखे नसतात. पण ते ध्येयाने भारलेली पिढी घडवत असतात व देशाला गौरवांकित करण्यात मोलाची भर घालत असतात.
काही हरवले काही गवसले
चंद्रयान-२ जे अजूनही चंद्राच्या परिक्षेत्रातील अवकाशात विहरत आहे त्यातून आपल्याला नवी माहिती मिळेलच. यात ६ उपकरणे कार्यरत आहेत. पण हि मोहीम ज्या मुख्य कारणासाठी आयोजित करण्यात आलेली आहे, पाण्याचा शोध घेण्यासाठी, तो उद्देश्य काही प्रमाणात मागे पडेल. चंद्रयान-१ मोहिमेत वर्णपटाच्या साहाय्याने चंद्रावर पाणी असण्याचा शोध लावला गेला होता. या मोहिमेत त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्याचा इसरोचा मानस होता. वर्णपटाच्या मदतीने याआधी पाण्याचे अस्तित्व वर्तवण्यात आले होते. पण जे संकेत मिळाले होते ते पाण्याचेच आहेत हे ठामपणे सांगता येत नाहीत कारण हैड्रोजन किंवा हैड्रॉक्सिल सुद्धा वर्णपटाचे असे संकेत देऊ शकतात. त्यामुळे जवळ जाऊन पाण्याची पारख करणे गरजेचे होते. विक्रम जर निश्चित केलेल्या ठिकाणी उतरला असता तर नवीन खनिजांचाही शोध लागला असता. महत्वाचे म्हणजे आपला देश सर्वप्रथम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर शोधकार्य करणारा ठरला असता. चंद्रावर वसाहती उभारण्यासाठी पाणी व ऊर्जा मिळवण्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त काम विक्रमने केले असते.
विज्ञानाची कास धरणारयांसाठी हा एक तात्पुरता सेटबॅक आहे. अपयशातूनच यशाकडे वाटचाल करण्याचा मार्ग प्रशस्थ होतो.

प्रवीण गवळी, हे भारतीय भूचुंबत्व संस्थेत वैज्ञानिक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1