लताची विविधरंगी, विविधढंगी मराठी गाणी

लताची विविधरंगी, विविधढंगी मराठी गाणी

लताच्या मराठी गाण्याची संख्या ४१०च्या पुढे जात नाही. हिंदीत ५ हजार ६९१ एवढ्या मोठ्या संख्येने गाणी गाणाऱ्या लताची मातृभाषा मराठीतील गाणी तुलनेने इतकी कमी का?

इरफान : माणूस आणि अभिनेता
नफा आणि भांडवल केंद्रित आजारी आरोग्यव्यवस्था
जाहीर चर्चांची पुस्तकं

सगळे गाती सूर लावूनी जीव लावूनी गातो कोण?

कवितेच्या गर्भात शिरूनी भावार्थाला भिडतो कोण?

गीतांमधली भाववादळे सबळ स्वरांनी झेली कोण?

अहंकार फेकून स्वरांना ममतेने कुरवाळी कोण ?

नाभीतून ओंकार निघावा तसे सहजच गातो कोण ?

गाता गाता अक्षर अक्षर सावधतेने जपतो कोण ?

शब्दांच्या पलिकडले स्पंदन सुरातुनी ओवितो कोण?

गीतामधली विरामचिन्हे, तीही बोलकी करतो कोण ?

निजस्वराचा पहिला श्रोता अपुला आपण होतो कोण ?

या सर्व प्रश्नांचे उत्तर… लता मंगेशकर

कविवर्य व संगीतकार यशवंत देव यांच्या या काव्यात लताच्या गाण्याचे सर्व सार आले आहे. तिच्या सुरांनी भारावून गेलं नाही असा श्रोता मिळणे अशक्यच आहे. तिच्या गाण्याचं चाहते व वेडे यांची संख्या अपरिमित आहे. पण गंमत म्हणजे तिच्या गाण्यांचा संग्रह करणाऱ्या छांदिष्ट लोकांची संख्याही बरीच मोठी आहे.

इंदोर येथे लता दीनानाथ मंगेशकर ग्रामोफोन रेकॉर्ड संग्रहालय नावाची संस्था आहे. लताच्या सर्व भाषांत गायलेल्या ध्वनिमुद्रिकांचा संग्रह तिथे आहे. या संस्थेने लताच्या रसिकांसाठी लताच्या गाण्यांचा ‘लता समग्र’ (१९४२ -२०१४) असा तिने ७२ वर्षांत गायलेल्या गाण्यांच्या उल्लेखाचा कोश काढला आहे. या कोशामुळे रसिकांना तिच्या गाण्याविषयी बरीच मोलाची माहिती मिळते.

लताने एकूण २४ भाषांत (त्यान तीन भारताबाहेरील) एकूण सुमारे ६ हजार ५५० एवढी गाणी गायली आहेत. कुतूहल असणाऱ्या वाचकांसाठी तिने गायलेल्या गाण्यांची भाषावर आकडेवारी अशी आहे. हिंदी (५६९१), भोजपुरी (१२), मराठी (४१०), संस्कृत (२४), गुजराती (४८), पंजाबी (६८), बंगाली (२०६), छत्तीसगढी (१), नेपाळी (१), स्वाहिली (१), मैथली (४), मगधी (२), आसामी (२), कन्नड (७), मल्याळम (८), सिंधी (१), तामिळ (११), तेलुगु (९), गढवाली (१), सिंहली (१), डोंगरी (१२) इंडोनेशियन मल्य भाषा (१), कोकणी (१), उडिया (१) एकूण गाणी सुमारे ६५५०. लताप्रेमी रसिकांना ही माहिती निश्चित मनोरंजक वाटेल.

आता लताने गायलेल्या मराठी गाण्यांचा लेखाजोखा अधिक तपशीलासह पाहू या. लताच्या मराठी गाण्याची संख्या ४१०च्या पुढे जात नाही. हिंदीत ५ हजार ६९१ एवढ्या मोठ्या संख्येने गाणी गाणाऱ्या लताची मातृभाषा मराठीतली गाणी तुलनेने इतकी कमी का? कारण अगदी उघड आहे. हिंदी गाण्यांच्या प्रचंड व्यापात ही कायम गुंतून असल्यामुळे मराठी गाण्यासाठी तिला फारच थोडा वेळ देता आला. मात्र लताच्या या मराठी गाण्यांचा प्रवास बघणे हे सुद्धा फार मनोरंजक आहे.

वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी १९४२ सालच्या पहिली मंगळागौर’ या मराठी चित्रपटात ‘नटली चैत्राची नवलाई ‘ (गीत- बाबुराव गोखले) हे दादा चांदेकर यांच्या संगीतातील गाणे गाऊन आपल्या संगीतजीवनाची सुरुवात केली. दादा चांदेकरांकडे तिने ‘पहिली मंगळागौर’ व ‘पुरुषाची जात’ या दोन्ही चित्रपटांत मिळून सात गाणी गायली. मा. विनायकांच्या ‘नवयुग’ स्टुडिओत फ्रॉक घालून आलेल्या सावळ्या लताला त्यांनी तिथले संगीतकार दत्ता डावजेकर यांच्याकडे पाठवले. त्यावेळी लताने मा. दीनानाथांचे प्रसिद्ध नाट्यगीत अशा तयारीने गायले की डावजेकर थक्क झाले आणि विनायकांना म्हणाले, ‘या मुलीला हातची गमावू नका.’ हाही प्रसंग १९४२ चाच. पुढे मंगेशकर भावंडांशीही डावजेकरांची चांगली जवळीक होती. १९४३ सालच्या ‘माझं बाळ’ या चित्रपटात संगीतकार डावजेकरांनी लताबाईंबरोबर सर्व भावंडांना एकत्र घेऊन केलेलं पहिलं गाणं ‘चला चला नव बाला, गुंफु चला सुमन माला’ (गीत – वि. स. खांडेकर) गाजलं. दिग्दर्शक वसंत – जोगळेकर यांच्या ‘आप की सेवा में’ या हिंदी चित्रपटात डावजेकरांनी लताचं पहिलं हिंदी गाणं ‘पा लागू कर…’ केलं. तिच्या हिंदी गाण्याची अलैकिक कारकीर्द या गाण्यापासून सुरु झाली. मराठीत डावजेकरांकडे लताने ‘चिमुकला संसार’, ‘माझं बाळ’, ‘गजाभाऊ’, ‘सुखाची सावली’, ‘घरची राणी’ अशा चित्रपटांत सुमारे २० गाणी गायली. लताचं पहिलं गैरफिल्मी गाणं ‘तुज स्वप्नी पाहिले रे गोपाळा’ (गीत- दत्ता डावजेकर) हे १९४८ साली स्वतः दत्ता डावजेकरांनीच स्वरबद्ध केलं होतं.

१९४२ पासून १९४८ पर्यंत लताने सुमारे २० गाणी गायली. या काळात तिने काही चित्रपटांत भूमिकाही केल्या. पण या काळातलं तिचं गाणं अंधारात चाचपडल्यासारखं होतं आणि १९४९ साली यातून ती बाहेर पडली. तिच्या एका गाण्याने स्वच्छ लखलखीत झगमगाट व्हावा, सारं आसमंत प्रकाशमान व्हावं असं झालं. ते गाण होतं- ‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या’. या अलैकिक अजरामर गाण्याला अभूतपूर्व यश मिळालं. महाराष्ट्रातल्याच काय पण महाराष्ट्राबाहेरील मराठी लोकांनीदेखील या गाण्याला अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. या गाण्यामुळे कवी पी. सावळाराम, संगीतकार वसंत प्रभू व गायिका लता मंगेशकर ही नावे मराठी माणसाच्या घराघरात गेली. हे त्रिकूट म्हणजे संगीत क्षेत्रातलं एक सुरेल बिल्वदल होतं. या त्रयीने त्या काळात भावगीत विश्वात व चित्रपटगीतातही चमत्कार केला. लताने गायिलेली श्रीरामा घनश्यामा, रघुनंदन आले आले, कल्पवृक्ष कन्येसाठी बाळा होऊ कशी उतराई, सप्तपदी हे रोज चालते, हृदयी जागा तू अनुरागा, प्रेम तुझ्यावर करिते मी रे, घट डोईवर घट कमरेवर, जो आवडतो सर्वांना इ. भावगीते व आली हासत पहिली रात, प्रेमा काय देऊ तुला, लेक लाडकी या घरची, कोकिळ कुहूकुहू बोले, माझिया नयनांच्या कोंदणी, सुख येता माझ्या दारी, सांग धावत्या जळा अशी चित्रपटगीते या साऱ्या गोड गाण्यांनी मराठी माणसांचं भावविश्व अक्षरशः सुरेल करून टाकलं होतं. वसंत प्रभूंकडे लताने सुमारे ७५ गाणी गायली. ती सारी गाजली. पी. सावळाराम हे असे नशीबवान गीतकार आहेत की त्यांची प्रभूंनी व इतर संगीतकारांनीही स्वरबद्ध केलेली सारीच्या सारी गाणी गाजली. लताने मराठीत कुठल्या गीतकारांची सर्वात जास्त गाणी गायली असतील तर ती पी. सावळाराम यांची आहेत. लताने पी. सावळाराम यांची सुमारे ९५ गाणी गायली आहेत.

निर्माते-दिग्दर्शक वसंतराव जोगळेकर हे अनेक कलावंतांना प्रथम संधी देण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या १९४९ सालच्या साखरपुडा’ या चित्रपटात संगीतकार वसंत देसाई यांच्याकडे लता प्रथम गायली. त्यानंतर वसंत देसाईंच्या अमरभूपाळी, कांचनगंगा, माझी जमीन, येरे माझ्या मागल्या, बाप माझा ब्रह्मचारी, मोलकरीण अशा चित्रपटात लताने सुमारे ३० गाणी गायली. त्यातली लटपट लटपट तुझं चालणं, तुझी माझी प्रीत, घडी घडी अरे मनमोहन बोलविणे बोल, डोंगर माथ्यावरी, दैव जाणिले कुणी ही गाणी रसिकमान्य झाली.

लताने सात दशकात १९४२-२०१४ या काळात ४१० गाणी गायली. त्यातील मराठीच्या सुवर्णकाळात म्हणजे पन्नासच्या दशकात तिने सुमारे १७५ गाणी गायली. या काळात तिने अनेक जुन्या मातब्बर संगीतकारांकडे गाणी गायली. ही सारीच गाणी अतिशय सुश्राव्य होती. मा. कृष्णराव यांच्याकडे ‘कीचकवध’ या एकमेव चित्रपटात लता गायली. त्यातली ‘उपवर झाली लेक लाडकी’, ‘असा नेसून शालू हिरवा’, ‘धुंद मधुमती रात रे’ या गोड गाण्यांवर श्रोते लुब्ध होते.

सी. रामचंद्र यांनी लताच्या आवाजाच्या सहाय्याने हिंदीत आपले स्थान निर्माण केले. पण मराठीत त्यांनी अवघ्या सहा चित्रपटांना संगीत दिले. त्यातील ‘छत्रपती शिवाजी’ व ‘संत निवृत्ती ज्ञानदेव’ याच चित्रपटात लताची गाणी होती. ‘सात जन्मीची सोनपावले’, ‘कुणी गोविंद घ्या’, ‘आज शिवाजी राजा झाला’, ‘वाजत डंका’ (गीत- पी. सावळाराम) व ‘संत निवृत्ती ज्ञानदेव’ मधील ‘नीज जो श्रीहरी’ (गीत – ग. दि. माडगूळकर) हे अंगाईगीत श्रोत्यांना आवडले.

शंकरराव कुलकर्णी यांच्या संगीतात लताने ‘शारदा’ व ‘अखेर जमलं’ या चित्रपटात ७ गाणी गायली तर संगीतकार वसंत पवार यांच्या ‘शशी’ व ‘गाठ पडली ठका ठका’ या चित्रपटांत ९ गाणी लताने गायली होती. सुधीर फडके यांच्याही सुरुवातीच्या चित्रपटांत लताने सुमारे १० गाणी गायली आहेत. त्यातली पाच प्राणांचा रे पावा (ओवाळणी), सुख देवासी मागावे ( शेवग्याच्या शेंगा), बघून बघून वाट तुझी (माझं घर माझी माणसं), रात अर्धी चांद अर्धा ( महाराणी येसूबाई) ही गाणी फार छान होती. संगीतकार स्नेहल भाटकर यांच्या ‘नंदकिशोर’, ‘संत बहिणाबाई’ व ‘चिमुकला पाहुणा’ या चित्रपटांतून लताने सुमारे १७ गाणी गायली. ‘चिमुकला पाहुणा’मधील ‘तुजसाठी शंकरा भिल्लीण मी झाले’ (गीत पी. सावळाराम) या गीताला भाटकरांनी मारूबिहाग रागात चाल लावली. त्या चालीवर लता बेहद्द खुश होती. ध्वनिमुद्रण झाल्यावर ती भाटकरांना म्हणाली, ‘या गीतानं आणि संगीतानं मी भारावून गेले आहे. खूप आनंदात आहे. इतकी की या गाण्याचं मानधन घेणार नाही.’

मराठी चित्रपटात सर्वात जास्त चित्रपटांना म्हणजे ११३ चित्रपटांना राम कदम यांनी संगीत दिले. पण त्यात लताची अवघी सहा गाणी आहेत. १९६०च्या ‘सलामी’ या चित्रपटात लताने त्यांच्याकडे सर्वप्रथम गायलेलं गाणं होतं- ‘जिवाचं पाखरू खुदकन हसलं’ (गीत – पी. सावळाराम ) त्यानंतर युगे युगे मी वाट पाहिली’मधलं ‘तूच खरा आधार’ (गीत – गंगाधर महाम्बरे) हे गाणं प्रार्थनेसारखं होतं. भालजींच्या ‘सख्या सजणा’ या चित्रपटाच्या निर्मितीत लताचा सहभाग होता. त्यातली ‘अरे नंदनदना’, ‘सख्या सजणा नका तुम्ही जाऊ’, ‘सजण शिपाई परदेशी’ (गीत – योगेश) ही गाणी गोड होती. ‘पिंजरा’तल्या ‘दे रे कान्हा’ या गाण्याची लोकप्रियताही प्रचंड होती.

संगीतकार प्रभाकर जोग यांच्याकडे लताची केवळ ३ गाणी आहेत. ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’ या चित्रपटाच्यावेळी गीतकार जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेलं एक उत्कृष्ट गीत हाती पडताच जोगांना वाटलं यासाठी लताचाच आवाज हवा. पण तिला विचारणार कसं ? धीर देत होत नव्हता. यावेळी त्यांचे मित्र ज्येष्ठ व्हायोलिन वादक हरिश्चंद्र नार्वेकर त्यांच्या मदतीला आले. नार्वेकर हे लताचे आवडते वादक होते. लताच्या आवाजात मग ‘शुभंकरोती कल्याणं’ व ‘घेऊ कसा उखाणा?’ ही दोन्ही गाणी ध्वनिमुद्रित झाली. लता त्या काळात संध्याकाळी गात नसे. पण अपवाद म्हणून जोगांसाठी ताडदेवच्या फेमस स्टुडिओत संध्याकाळी हे ध्वनिमुद्रण झालं. जोगांच्याच ‘मुरळी मल्हारी रायाची’ याही चित्रपटात ‘धाव रे देवा मल्हारी’ हे मल्हारी गीत लताने गायले होते.

काही संगीतकारांची लताने केवळ एकेकच गाणी गायली आहेत. पण त्याही गाण्यांनी खूप गंमत आणली आहे. किर्लोस्कर नाटक कंपनीत बालनट म्हणून काम करणारे सदाशिव नेवरेकर यांनी ६ मराठी चित्रपटांना संगीत दिले. त्यातील शेवटच्या ‘किती हसाल’ (१९४२) या चित्रपटात त्यांनी लताकडून ‘नाचू या गडे’ (गीत – बाबुराव गोखले) हे सर्वात पहिले गाणे गाऊन घेतले होते. पण दुर्दैवाने या गाण्याचा चित्रपटात समावेश झाला नाही. संगीतकार बाळ पार्टे यांच्याकडे लताने ‘मंगळसूत्र’ या चित्रपटासाठी गायलेले ‘माझे न मी राहिले’ (गीत-शांता शेळके) हे गीत अप्रतिम होते. संगीतकार भास्कर चंदावरकर यांच्या ‘सामना’ मधील ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ (गीत – जगदीश खेबूडकर) हे एकमेव गीत रसिकांचा काळजाला चटका लावून गेले. संगीतकार अनिल-अरुण यांच्या सुरुवातीच्या ‘नाव मोठं लक्षण खोटं’ या चित्रपटातील ‘शोधू मी कुठे कशी प्रिया तुला’ (गीत – शांता शेळके) हे गीत हिट झाले होते. आकाशवाणीवरचे संगीतकार मधुकर गोळवलकर यांनी स्वरबद्ध केलेल्या स्वा. सावरकरांच्या ‘जयोस्तुते श्री महन्मंगले’ या स्वातंत्र्यसुक्ताला लताबरोबरच इतर भावंडांचाही आवाज होता. उषा मंगेशकरने संगीत दिलेल्या ‘आई मी कुठे जाऊ’ या चित्रपटात लताची २ गाणी होती, तर मीना मंगेशकरने संगीत दिलेल्या ‘माणसाला पंख असतात’ व ‘शाब्बास सूनबाई’ या चित्रपटांत लताची ६ गाणी होती. त्यातली ‘ये जवळी घे जवळी’ (गीत वि.स. खांडेकर) व ‘मायभवानी तुझे लेकरू’ (गीत – सुधीर मोघे) ही गाणी फारच गोड होती. संगीतकार यशवंत देव यांच्या ‘कामापुरता मामा’ या चित्रपटातलं ‘जीवनात ही घडी’ (गीत-यशवंत देव) हे गाणं तर कायम ताजंतवानं वाटतं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या ‘भाव तेथे देव’ या एकमेव चित्रपटात लताने ३ गाणी गायली. त्यातील ‘चंद्रा रे मी तुझी रोहिणी’ (गीत-पी. सावळाराम) हे जुन्या बंदिशीवर आधारलेलं गाणे अतिशय श्रवणीय होतं.

लताला वाचनाची आवड. मराठीतले जुने जुने उत्तमोत्तम साहित्य तिने वाचले आहे. मुख्य म्हणजे तिला कवितेची चांगली जाण आहे आणि म्हणूनच पन्नासच्या दशकात तिने कवी भा. रा. तांबे, कवी बी. कवी माधव ज्यूलियन यांच्या भावगीतांच्या तर सत्तरच्या दशकात संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या उत्कृष्ट अभंगांच्या दीर्घ ध्वनिमुद्रिका करण्याचा आग्रह धरून त्या केल्या. हे तिचे मराठी गीत विश्वावर फार मोठे उपकार आहेत. त्याचप्रमाणे हिंदी चित्रपटातील काही संगीतकार लतामुळेच मराठीत आले होते. हेमंतकुमार (नायकिणीचा सज्जा), एम. शफी ( श्रीमान बाळासाहेब व श्रीमंत मेहुणा पाहिजे), सलील चौधरी (सूनबाई) या साऱ्या चित्रपटातील गाण्यात लताचा स्वर होताच!

स्वतः लताने १९५० साली दिनकर द. पाटलांच्या ‘राम राम पाव्हणं’ या चित्रपटाला सुरेल संगीत दिलं होतं. त्यानंतर अनेक वर्षांनी भालजींच्या ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘साधी माणसं’ आणि ‘तांबडी माती’ या चार चित्रपटांना ‘आनंदघन’ या नावाने संगीत दिले होते.

यातील लताच्या स्वरातली- ‘शपथ दुधाची या आईच्या फिर माघारी पोरी’ (गीत- पी. सावळाराम), बाई बाई मनमोराचा (गीत – शांता शेळके), आला साखरपुडा (गीत – जगदीश खेबूडकर), अखेरचा हा तुला दंडवत (गीत – योगेश), ऐरणीच्या देवा तुला (गीत- जगदीश खेबूडकर), मागते मन एक काही (गीत – शांता शेळके), जा जा रानीच्या पाखरा (गीत – शांता शेळके) ही सारी गाणी लोकांना खूप भावली.

मराठी भावगीत विश्वात अनेक गोड चालीच्या स्वररचना देणारे महान संगीतकार श्रीनिवास खळे ‘जिव्हाळा’ या चित्रपटाचे संगीत करत होते. पहिली दोन गाणी आशा भोसलेच्या आवाजात केल्यावर तिसऱ्या ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ (गीत-ग.दि. माडगूळकर) या सांजगीताचे शब्द वाचताच त्यांच्या मनात आले की हे गाणं आपण लताकडून गाऊन घ्यावे. पण तिला अजिबात वेळ नव्हता. खळ्यांनी हे गाणं केवळ तुमच्यासाठीच केलं आहे असं सांगून लताला ते गाणं ऐकायचा आग्रह केला. ते सांज गीत होतं म्हणून खळ्यांनी त्याचा मुखडा पुरिया धनश्रीत बांधून अंतऱ्यासाठी संध्याकाळच्याच मारवा रागाची जोड दिली होती. हो-ना करता लता तयार झाली. खळ्यांनी तिला हार्मोनियमवर चाल ऐकवली. बाराही सुरांचा वापर केलेली खळ्यांची ती अप्रतिम स्वररचना लताने ऐकली आणि चमत्कार झाला. लताने इतर गाण्यांचे बुकिंग रद्द करून हे गाणे गायचा निर्णय घेतला. लताने याही गाण्याचे मानधन घेतले नाही. हे गाणं प्रचंड गाजलं.

खळे आधी आकाशवाणीवर होते. त्यानंतर एचएमव्हीमध्ये रेकॉर्डिंग ऑफिसर झाले. ‘भावनांचा तू भुकेला’, ‘नीज माझ्या नंदलाला’, ‘जाहल्या काही चुका’ व ‘श्रावणात घननिळा बरसला’ (गीत – मंगेश पाडगावकर) ही चारही गाणी त्यांनी लताकडून गाऊन घेतली. ही सारी गाणी गाजली. यातील ‘जाहल्या काही चुका’ या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी खळे हॉस्पिटलमध्ये होते. पण रेकॉर्डिंग रद्द न करता हॉस्पिटलमधून खास परवानगीने ते रेकॉर्डिंगला हजर राहिले. ‘श्रावणात घननिळा’ या गाण्याने तर अवघ्या मराठी माणसाला मंत्रमुग्ध केलं.

१९७३ साली लताच्या मनात संत तुकारामांच्या अभंगाची दीर्घ ध्वनिमुद्रिका काढावी असा विचार आला. तिने ही कल्पना खळेंना सांगितली. त्यांनी तुकारामच्या गाथेतून गो. नी दांडेकर, कवी वसंत बापट व विद्याधर गोखले यांच्या मदतीने २० अभंग निवडून स्वरबद्ध केले. लताने त्यातून १० अभंग निवडून ‘अभंग तुक्याचे’ ही दीर्घ ध्वनिमुद्रिका केली. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’, ‘अगा करूणाकरा’, ‘कुमोदिनी काय जाणे’, ‘हाचि नेम आता’, ‘खेळ मांडियेला’, ‘भेटी लागी जीवा’, ‘जेथे जातो तेथे’, ‘कन्या सासुरास जाये’, ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’, ‘हेचि दान देगा देवा’ अशा या १० अभंगाच्या ध्वनिमुद्रिकेने इतिहास निर्माण केला. लोकप्रियतेचा आणि विक्रीचा विक्रम मोडला. या ध्वनिमुद्रिकेबद्दल कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकरांनी म्हटलं होतं- ‘तुक्याचे अभंग वेडेवाकडे गायले तरी ईश्वराला भुरळ पडते. तर ही अभंगवाणी एखाद्या गानसम्राज्ञीच्या मुखातून उमटली तर सोनियाचा सुगंधू.’ तुकोबाचे कवित्व हा सतराव्या शतकातील चमत्कार तर लताचे गाणे हा विसाव्या शतकातील चमत्कार.

या ध्वनिमुद्रिकेतील ‘भेटी लागी जीवा’ अभंगाने प्रसिद्ध अभिनेता राजकपूर यांचेही लक्ष वेधून घेतलं. त्याच्यासारख्या संगीताच्या जाणकाराला ही ध्वनिमुद्रिका खूप भावली.

लताची सर्वांत जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारे संगीतकार आहेत – पं. हृदयनाथ मंगेशकर ! हृदयनाथ १९५७ साली आकाशवाणीवर नोकरीत असताना रेडिओसाठी त्यांनी लताच्या आवाजात ‘तिन्ही सांजा सखे’ मिळाल्या व ‘कशी काळनागिणी’ (कवी – भा. रा. तांबे) ही गाणी केली. पुढे १० वर्षांनी एच.एम.व्ही.ने त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. सर्वसामान्य संगीतकार गीतांच्या प्रेमात असतात. पण हृदयनाथ हे असे संगीतकार आहेत की ज्यांचे कवितेवर नितांत प्रेम आहे. कवितेतले अर्थसौंदर्य त्यांना मोहित करतं. त्यामुळे ते कवितेकडेच गीतापेक्षा जास्त आकृष्ट होतात. कविता वाचताच त्यांच्या मनातले स्वर त्या कवितेवर झेपावतात. भा. रा. तांबे, राजा बढे, आरती प्रभू, सुरेश भट, ना. धों. महानोर, ग्रेस अशा अनेक कवींच्या कविता हृदयनाथांचे संगीत व लताच्या स्वरात चिंब भिजून रसिकांच्या भेटीस आल्या आहेत. ‘मावळत्या दिनकरा’ (भा. रा. तांबे), नाही कशी म्हणू तुला, कसे कसे हसायचे (आरती प्रभू), आनंदी आनंद गडे, माझे गाणे (बालकवी), मेंदीच्या पानावर, आज गोकुळात रंग खेळतो हरी (सुरेश भट), सावर रे सावर रे उंच उंच झुला, असा बेभान हा वारा (मंगेश पाडगावकर) या गाण्यांनी रसिकांना तृप्त केलं.

हृदयनाथांनी सुमारे २० मराठी चित्रपटांना संगीत दिले. त्यातील लताच्या आवाजातील ‘जाहली जागी पंचवटी’ (ग. दि. माडगूळकर), ‘पाव नेर ग मायेला करू (शांता शेळके), घुंगरू तुटले रे (सुधीर मोघे), वारा गाई गाणे (जगदीश खेबूडकर), माझे राणी माझे मोगा (शांता शेळके), चिंब पावसानं (ना. धों. महानोर ), गगन सदन तेजोमय (वसंत बापट), सुन्या सुन्या मैफलीत माझ्या (सुरेश भट) ही सारी गाणी रसिकांच्या पसंतीस उतरली.

हृदयनाथ हे प्रयोगशील संगीतकार आहेत. बंगालमध्ये खांद्यावरून पालखी वाहणारे भोई ‘पालखी चोले- पालखी चोले’ असं शब्द तालात गातात. त्यावरून त्यांना कल्पना सुचली की समुद्राच्या लाटांच्या हेलकाव्याच्या तालात आणि लयीत कोळीगीते करावी. त्यानुसार त्यांनी १९६९ साली शांता शेळके यांच्याकडून कोळी गीतं लिहून घेतली. ‘माझ्या सारंगा राजा सारंगा’, वादळ वारं सुटलं गं’, ‘मी डोलकर’ या साऱ्या कोळी गीतांचं लताच्या आवाजात सोन झालं. कोळीगीताच्या ध्वनिमुद्रिकेची प्रचंड विक्री झाली. १९७१ साली गणपतीच्या आरतीबरोबरच शांता शेळके यांनी लिहिलेल्या ‘गणराज रंगी नाचतो’ आणि ‘गजानना श्री गणराया’ अशा तीन गीतांची ध्वनिमुद्रिका लताच्या आवाजात आली. ही गाणी आजतागायत गणपतीत वाजताहेत. १९७४ साली शिवराज्याभिषेकाला ३०० वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी प्रसिद्ध लेखक आणि इतिहासप्रेमी गो. नी. दांडेकर यांच्या मनात निरनिराळ्या कवितांमधून शिवचरित्र सांगणारी, बाबासाहेब पुरंदरे यांचे निवेदन व लताचा स्वर असलेली एक दीर्घ ध्ननिमुद्रिका काढावी अशी कल्पना आली. त्यांनी निवडलेल्या १५ कवितांमधून हृदयनाथांनी चोखंदळपणे ११ कविता निवडून संगीतबद्ध केल्या आणि लता भावंडांच्या आवाजात ‘शिवकल्याण राजा’ ही ध्वनिमुद्रिका निघाली. प्राणीमात्र झाले दुःखी (गोविंदाग्रज), हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा (स्वा. सावरकर), सरणार कधी रण (कुसुमाग्रज), कुंद पयवृंद हा (भूषण), वेडात मराठे वीर (कुसुमाग्रज), आनंदवनभुवनी (संत रामदास), शिवाजी राज्याभिषेक (शंकर वैद्य), निश्चयाचा महामेरू (संत रामदास) मराठी वाङ्मयातल्या या साऱ्या अभिजात कविता. लताच्या स्वरातली ही गाणी आजही मराठी मनावर अधिराज्य गाजवून आहेत.

१९९५ साली हृदयनाथांनी गो. नी. दांडेकर व शंकर अभ्यंकर यांच्याशी चर्चा करून संत ज्ञानेश्वरांच्या रचनांच्या दोन टप्प्यात ध्वनिमुद्रिका लताच्या आवाजात केल्या. ‘घनु वाजे घुणघुणा’, ‘पैल तो गे काऊ कोकताहे’, ‘पसायदान’, ‘अवचिता परिमळु’, ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा’, ‘अजि सोनियाचा दिनु’, ‘रंगा येई वो’, ‘अरे अरे ज्ञाना झालासी पावन’ या ज्ञानदेवांच्या साऱ्याच अभंगरचना रसिकांनी भक्तीभावाने अक्षरशः डोक्यावर घेतल्या. हृदयनाथांनी मराठी संगीतात जेवढे प्रयोग केले तसे क्वचितच कुणी केले असतील. बालपणी आजोळी खानदेशात असताना त्यांच्या कानावर तिथल्या लोकगीतांचे जे सूर पडले ते त्यांनी मनात कायम कोरून ठेवले. पुढे १९८० साली त्यांनी कविवर्य ना. धों. महानोर यांच्याकडून (महानोरही खानदेशचेच ) सहा गाणी करून घेतली. ‘घन ओथंबुनी येती’, ‘चांद केवड्याची रात’, ‘किती जिवाला राखायचं’, ‘राजसा जवळी जरा बसा’, ‘आज उदास उदास’ व ‘बाळगू कशाला व्यर्थ कुणाची’ अशा सहा गीतांची लताच्या आवाजात निघालेली ‘आजोळची गाणी’ ही ध्वनिमुद्रिकाही लोकप्रिय झाली. पं. हृदयनाथांकडे गायलेली लताची गाणी अशी विविधरंगी आणि विविधढंगी होती.

मराठीतील पु.ल. देशपांडे, दशरथ पुजारी, बाळ पळसुले, एन. दत्ता, विश्वनाथ मोरे, अशोक पत्की, आनंद मोडक व श्रीधर फडके या प्रतिथयश संगीताकारांकडे लताचे एकही गाणे नाही. त्याचप्रमाणे राजा परांजपे, अनंत माने व दादा कोंडके यांची निर्मिती असलेल्या एकाही चित्रपटात लताचे गाणे नाही. तर असा हा लताच्या मराठी गाण्यांचा प्रवास. लताच्या अमृतमयी स्वराने मराठी माणसाच्या भावजीवनात पराकोटीचा आनंद भरला, त्यांची मने तृप्त झाली. तिच्या स्वर्गीय सुरांचा सुगंध अक्षय आहे. त्याचा दरवळ कायम राहाणार आहे. लताचं गाणं ऐकताना कसं वाटतं हे सांगणं शब्दातीत असलं तरी मंगेश पाडगावकरांसारख्या महान कवीने ते अतिशय समर्पक शब्दात सांगितलं

ऐकता मी गायकांना वानितो त्यांच्या स्वराला

ऐकता गाणे लताचे मानितो मी ईश्वराला!

(मूळ लेख – तारांगण (सप्टेंबर २०१९, संपादक – मंदार जोशी ) या मासिकात प्रसिद्ध झाला आहे.)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0