मेवानी यांचा जामीन मंजूर

मेवानी यांचा जामीन मंजूर

नवी दिल्लीः आसाममधील एका महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या तक्रारीमुळे अटकेत असलेले गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांचा जामीन अर्ज शुक्रवारी बारपेटा सेशन्स कोर्टाने मंजूर केला. गेल्या मंगळवारी याच न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली होती.

गेल्या सोमवारी पंतप्रधान मोदींविरोधात ट्विट केल्या प्रकरणी जिग्नेश मेवानी यांना आसाममधील न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. पण क्रोकाझार पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचारी महिलेच्या तक्रारीनंतर मेवानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मेवानी यांनी आपल्याविरोधात अपशब्द उच्चारले. त्यावरून त्यांना सरळ वागण्याची समज दिली होती पण मेवानी यांनी आपल्याविरुद्ध अपशब्द उच्चारले, आपल्याकडे पाहून बोटे दाखवली, धमकी दिली व धक्का दिला असा आरोप या पोलिस महिलेचा होता. या आरोपावरून मेवानी यांना लगेचच आसाम पोलिसांनी अटक केली होती.

मेवानी यांना एक हजार रु.च्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला असून त्यांच्याविरोधातील गुन्हाच बनावट असल्याचा आरोप मेवानी यांचे वकील अंग्शुमन बोरा यांनी केला आहे.

मेवानी प्रवास करत असल्याने त्यांच्या जामीन आदेशाची माहिती आसाममधल्या सर्व पोलिस ठाण्यांना पाठवावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. मेवानी यांना आता बारपेटाहून कोक्राझार येथे नेण्यात येणार असून नंतर सरकारी प्रक्रिया पार केल्यानंतर त्यांची सुटका केली जाणार आहे.

गेल्या आठवड्यात बुधवारी रात्री एका ट्विट प्रकरणी आसाम पोलिसांनी जिग्नेश मेवानी यांना बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर शहरातून अटक केली होती. मेवानी यांना नंतर अहमदाबाद येथे व त्यानंतर गुरुवारी सकाळी विमानाद्वारे आसाममध्ये नेण्यात आले होते.

मेवानी यांनी १८ एप्रिलला दोन समाजात तेढ निर्माण होईल असे ट्विट केल्याची तक्रार कोकराझार येथे पोलिसांत करण्यात आली होती. हे ट्विट नथुराम गोडसे संदर्भात होते. हे ट्विट नंतर मेवानी यांनी आपल्या अकाउंटवरून हटवलेही होते. मेवानी यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ व आयपीसी कलम १५३ अंतर्गत गुन्हे दाखल केले होते.  मेवानी यांना कोकराझार पोलिसांनी अटक केली होती. त्यांना जामीन मिळवण्यासाठी त्यांचे वकील आनंद याज्ञिक आसाम उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

मेवानी हे वडगाम मतदारसंघातील अपक्ष आमदार असून ते गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये सामील झाले होते.

मूळ बातमी

COMMENTS