धार्मिक तेढ पसरवल्याप्रकरणी मधु किश्वर यांच्यावर गुन्हा

धार्मिक तेढ पसरवल्याप्रकरणी मधु किश्वर यांच्यावर गुन्हा

नवी दिल्लीः २०१७मध्ये एका मुस्लिम व्यक्तीवर कावड यात्रेकरूंकडून गाडी घातल्या प्रकरणाचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याबद्दल कट्टर उजव्या विचारांच्या समर्थक व कार्यकर्त्या मधु किश्वर यांच्यासह अन्य चार जणांवर सहारणपूर पोलिसांनी खोटी माहिती पसरवून धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

घटना २०१७मध्ये घडली होती, या घटनेत कावड यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या एका गाडीखाली मुस्लिम व्यक्ती चिरडली होती. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी गाडीतल्या कावड यात्रेकरूंवर गुन्हाही दाखल केला होता व त्याचा तपासही सुरू केला होता. तपासानंतर पोलिसांनी सोशल मीडियात फिरत असलेला व्हीडिओ खोटा व विपर्यास्त माहिती पसरवत असून तो ज्यांनी शेअर केला असेल त्यांनी लगेच हटवावा असे स्पष्ट केले होते.

पण मधु किश्वर यांनी पोलिसांच्या या सूचनेकडे दुर्लक्ष केले. त्यांनी  व्हीडिओ शेअर करताना कावड यात्रेकरूंवर पोलिसांनी जाणूनबुजून गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला. किश्वर यांच्यासह अन्य चार जणांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हीडिओ गेली ५ वर्षे हटवलेला नाही. हा व्हीडिओ मधु किश्वर यांच्या व्यतिरिक्त [email protected]! proud Hindu, Shudha Shukla, Raj Kamal and Anil Mansingka  या चार अकाउंटवर कायम होता.

किश्वर यांच्यासह चार जणांवरचे गुन्हे देवबंद पोलिस ठाण्यात नोंद झाले आहेत.

मधु किश्वर यांची सोशल मीडियावरील वादग्रस्त मते

किश्वर यांच्याकडून यापूर्वीही सद्यस्थितीचे विपर्यास्त करणारे व धार्मिक तेढ निर्माण करणारे अनेक व्हीडिओ पसरवले गेले आहेत. गेल्या एप्रिल महिन्यात मुस्लिम धर्मावर हल्ला करणारा व्हीडिओ त्यांनी सोशल मीडियात शेअर केला होता. पण नंतर त्यांनी तो हटवला. मुस्लिम पुरुष त्यांच्याकडे असलेल्या लैंगिक शक्तीच्या जोरावर हिंदू, ख्रिश्चन व शीख मुलींना भूरळ पाडतात. मुस्लिम धर्मात पुरुषांना अन्य धर्माच्या मुलींवर जाळ्यात ओढण्याचे कसब शिकवले जाते. त्यांचा हा खेळ ‘लव्ह जिहाद’ नसून ‘सेक्स जिहाद’ असल्याचा विपर्यास्त मजकूर किश्वर यांनी सोशल मीडियात लिहिला होता. त्यांच्या या मतांवर मोठ्या प्रमाणात टीका झाल्याने त्यांना तो हटवावा लागला होता. अल्ट न्यूजनेही किश्वर यांचे दावे खोडून काढणारे वृत्त दिले होते.

त्यानंतर गेल्या वर्षी २३ जुलैला त्यांनी पत्रकारितेतला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुलित्झर पुरस्कार विजेता भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांचा उल्लेख ‘जिहादी’ असा केला होता.

वास्तविक प्रतिष्ठीत रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेत काम करणारे दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानात वार्तांकन करत असताना तालिबानच्या हल्ल्यात ठार झाले होते.

२०१८मध्ये किश्वर यांनी गुरुग्राम येथे पाच मुस्लिमांनी एका शाळेच्या गाडीवर हल्ला केल्याची माहिती ट्विट केली होती. ही माहिती नंतर चुकीची असल्याचे आढळून आले होते. या वेळी किश्वर यांनी या संदर्भातल्या अनेक पोस्ट ट्विटरवर लिहिल्या होत्या. पण त्यातील एक माहिती खरी नसल्याचे अल्ट न्यूजने सिद्ध केले होते.

गेल्या वर्षी मे महिन्यात किश्वर यांच्या ट्विटवर जम्मू-काश्मीर पोलिसांनी समज दिली होती. २०१६ मध्ये बुरहाण वाणी या दहशतवाद्याला ठार मारणाऱ्या पोलिस अधिक्षकाची जम्मू व काश्मीर पोलिस महासंचालकांनी बदली केली अशी खोटी, पुरावा नसलेली माहिती ट्विट केली होती. ही माहिती खोटी असून अशी कोणाचीही बदली केली नसल्याचा खुलासा जम्मू काश्मीर पोलिस प्रशासनाने केला होता.

मधु किश्वर या जेएनयूच्या माजी विद्यार्थी असून त्यांनी लिंगभाव व राजकारण या विषयावर विपुल लेखन केले आहे. त्या महिला व समाज या विषयाला वाहून घेतलेल्या ‘मानुषी’ या नियतकालिकाच्या सहसंस्थापकही आहेत. २०१४मध्ये नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर मधु किश्वर यांनी ‘मोदी, मुस्लिम अँड मीडियाः व्हॉइसेस फ्रॉम नरेंद्र मोदीज गुजरात’ या नावाचे पुस्तकही लिहिले होते.

मूळ वृत्त

COMMENTS