लॉकडाऊन उठल्यानंतर रोजगाराच्या संधीत वाढ

लॉकडाऊन उठल्यानंतर रोजगाराच्या संधीत वाढ

‘लॉकडाऊन’च्या काळात अनेकांचे रोजगार गेले असले तरी आता हळूहळू का होईना, अर्थचक्र पुन्हा रुळावर येताना दिसत आहे. खासगी क्षेत्रात अनुभवी तसेच नवोदितांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.

‘अग्निपथ’ विरोधाचे लोण ७ राज्यात पसरले
गेल्या महिन्यात १७,१५० बेरोजगारांना रोजगारः मविआ
बेकारीच्या दराने गाठला ४५ वर्षांतील उच्चांक!

‘कोविड-१९’च्या कालखंडानंतर २०२० दरम्यानच्या करिअरच्या संधी कशा आणि कितपत असू शकतील याचे आडाखे नव्या स्वरुपात व त्या संदर्भात मांडले जात आहेत. यासंदर्भात सकृतदर्शनी व प्राथामिक स्वरुपाचे अंदाज सकारात्मक स्वरुपाचे आहेत. एप्रिल-जून या नव्या वर्षातील पहिल्या आर्थिक तिमाहीतच रोजगाराला पूरक चित्र दिसू लागले आहे.

कोरोनानंतरच्या या नव्या रोजगार संधींना व्यवहार्य व कल्पक संधींची साथ मिळत आहे. यासंदर्भातील एक प्रमुख उदाहरण म्हणजे, काही निवडक कंपन्यांमधील कोरोना काळात नोकरी गमावलेल्या कर्मचार्‍यांनी ‘बाऊन्स बॅक लिस्ट’ नावाची उमेदवार कर्मचार्‍यांची सूची तयार केली आहे. या उमेदवार यादीमध्ये प्रामुख्याने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विषयातील प्रशिक्षित व अनुभवी उमेदवारांचा समावेश आहे.

या कर्मचारी सूचीचा उपयोग सध्या तातडीने व मोठ्या संख्येने अनुभवी कर्मचार्‍यांची गरज असणार्‍या कंपन्यांना प्रामुख्याने होत आहे. मुख्य म्हणजे, हे कर्मचारी अल्पावधीत वा तातडीने कामावर रुजू होण्यासाठी उपलब्ध असल्याने ही बाब अनुभवी उमेदवार व त्यांची तातडीने निकड असणार्‍या कंपन्या या उभयतांसाठी उपयुक्त ठरल्या आहेत.

यासंदर्भात ‘केहो’ या स्टार्ट-अप क्षेत्रातील वित्तीय साहाय्यता, विधायक काम करणार्‍या कंपनीचा एक अनुभव पाहूया. या कंपनीला जुलै-ऑगस्ट दरम्यान वित्तीय-प्रकल्प क्षेत्रातील अनुभवी अशा १०० उमेदवारांची तातडीने गरज होती. यासंदर्भात ‘केहो’ने ‘बाऊन्सिंग बॅक’शी संपर्क साधला व त्याचा चांगला फायदा झाला. कंपनीच्या नेमक्या गरजांनुरुप १५ उमेदवार जुलैमध्येच आपल्या कामावर रुजूही झाले.

कोरोनामुळे व्यावसायिक मंदीची सुरुवात तशी मार्च अखेरीस सुरू झाली. बदलत्या परिस्थिती व गरजांनुरुप कर्मचार्‍यांची कंपनीतून सेवामुक्त होण्याची संख्याही वाढत गेली. सुरुवातीच्या काळात कंपनीतून कोरोनामुळे काढून टाकलेल्या कर्मचार्‍यांपोटी कणव असायची. मात्र, लवकरच कंपनी-व्यवस्थापन स्तरावर कोरोनासारख्या अत्यंत विपरीत स्थितीत कंपनीतून काढण्यात आलेल्या कर्मचार्‍यांपोटी सहानुभूतीच नव्हे, तर आपुलकीही निर्माण होत असून गेले दोन महिने याचेच प्रत्यंतर प्रत्यक्षात दिसून येत आहे. हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.

औद्योगिक व्यवस्थापन रोजगार क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, ‘कोविड-१९’नंतरच्या कोरोना-२०२० या कालावधीत आलेली मंदी व त्यामुळे विशेषत: एप्रिल-जून या कालावधीत झालेली कर्मचारी कपात ही २००८-२००९च्या जागतिक मंदीनंतरच्या कर्मचारी कपातीच्या तुलनेत काही पटींनी अधिक ठरली आहे.

जागतिक स्तरावर कंपनी-कर्मचार्‍यांसाठी रोजगारविषयक कामे प्रामुख्याने करणार्‍या ‘मॅनपॉवर ग्रुप’ने एप्रिल-जून २०२० या कालावधीसाठी रोजगार संधीविषयक विशेष सर्वेक्षण केले. या संस्थेतर्फे अशा प्रकारचे सर्वेक्षण गेली १५ वर्षे सातत्याने करण्यात येत आहे. ‘मॅनपॉवर ग्रुप’च्या यावेळच्या शैक्षणिक सर्वेक्षणातील प्रामुख्याने निदर्शनास आलेली बाब म्हणजे, जुलै-सप्टेंबर या दुसर्‍या तिमाहीतील रोजगारविषयक गरजा आणि संधींमध्ये फार मोठी सुधारणा अपेक्षित नाही. उलट या तिमाहीत त्यापूर्वीच्या एप्रिल-जून या तीन महिन्यांतील रोजगार संधीच्या तुलनेत ६ टक्क्यांची घट होणे अपेक्षित आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६९५ कंपन्यांपैकी ४६ टक्के कंपन्यांनी त्यांच्याकडे जुलै ते सप्टेंबर या काळात कर्मचार्‍यांची भरती नगण्य स्वरुपात करण्यात येईल, असे स्पष्ट स्वरुपात नमुद केले आहे.

अर्थात, या स्थितीत बदल होऊ लागला तो ‘लॉकडाऊन’ संपण्यापासून म्हणजे जूनच्या सुरुवातीपासून. गेल्या दोन महिन्यात रोजगारपूरक वातावरण निर्माण होऊ लागले आहे. या दरम्यान, रोजगाराची निकड असणार्‍यांनी प्रसंगी अस्थायी स्वरुपाचे, निश्चित कालावधीसाठी व प्रसंगी त्यांच्या आधीच्या नोकरी-अनुभवानुरुप नसणार्‍या क्षेत्रात पण नोकरी करण्यास होकार देण्यास सुरुवात केली. परिणामी, रोजगार संधींसाठी अधिक पूरक आणि प्रेरक वातावरण निर्मिती होऊ लागली ही वस्तुस्थिती आहे.

याच्या जोडीला पूर्वापार चालत आलेले व केलेले १० ते ६ असे कामकाज व अकल्पितपणे इतिहासजमा झाले. घरून कामाची पद्धत तर सर्वदूर प्रचलित झाली व सर्वांनी त्याचा अवलंबही केला. ‘डिलॉईट इंडिया’चे चीफ टॅलेंट ऑफिसर एस. व्ही. नाथन यांच्या मते, सद्यस्थितीच पाचपैकी तीन कंपन्यांचे अशा प्रकारचे कामकाज आणि कर्मचारी घेण्यावर भर असून ही स्थिती आगामी वर्षभरातही कायम राहण्याची शक्यता आहे.

या बदलत्या स्थिती आणि कार्यपद्धतीला अनुरुप व त्वरित उपलब्ध असणारे अनुभवी कर्मचारी म्हणून पण कंपन्या आणि व्यवस्थापन ‘लॉकडाऊन’ दरम्यान, नोकरी गमावलेल्या व ‘बाऊन्स बॅक लिस्ट डॉट कॉम’सारख्या माध्यमाला प्राधान्याने व विशेष पसंती देत आहेत.

या दरम्यान ‘टीमलीज’ने केलेल्या सर्वेक्षणात २०२०-२१ या नवीन आर्थिक-व्यावसायिक परिस्थितीचे सकारात्मक परिणाम दिसायला लागले आहेत. ‘टीमलीज’नुसार आगामी तीन महिन्यांत राष्ट्रीय पातळीवर विशेषत: आरोग्य सेवा व वैद्यकीय क्षेत्र, ई-कॉमर्स, शिक्षण क्षेत्र इत्यादीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून त्यांचा फायदा नवागत व अनुभवी अशा उभय क्षेत्रातील उमेदवारांना निश्चितपणे होणार आहे.

सर्वेक्षणात नमूद केल्यानुसार, या वर्षी एप्रिल-जून कालावधीत सुमारे ११ टक्के असणारे रोजगार भरतीचे प्रमाण जुलै-सप्टेंबर दरम्यान १८ टक्क्यांवर निश्चितपणे जाणार आहे. महानगरांच्या संदर्भात उपलब्ध असणार्‍या अपेक्षित आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२० पर्यंत बंगळुरूमध्ये नव्याने २१ टक्के, राजधानी दिल्लीत २१ टक्के, हैद्राबाद १५ टक्के, चंदिगढ १४ टक्के, कोलकाता १२ टक्के व मुंबईमध्ये नव्या रोजगारांची टक्केवारी १३ टक्के असणे अपेक्षित आहे.

नव्या सहामाहीत नव्या रोजगारांच्या संधी आणि त्याची अपेक्षित टक्केवारी कोरोनापूर्व काळातील प्रचलित व परंपरागत स्वरुपातील नव्या रोजगारांच्या तुलनेत कमी आहेच. पण, ‘लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर नव्याने समोर आलेले रोजगार संधीविषयक चित्र व टक्केवारी ‘टीमलीज’चे कार्यकारी उपाध्यक्ष ऋतूपर्ण चक्रवर्ती यांना मात्र, निश्चितपणे आशादायी वाटते.

त्यांना असे पण वाटते, या नव्या व वाढत्या रोजगार संधी कृषी उद्योग-अन्न प्रक्रिया, तांत्रिक क्षेत्रातील स्टार्ट-अप, कृषीविषयक रसायन, संगणक सेवा-प्रक्रिया ग्राहकोपयोगी सेवा इ. मध्ये उपलब्ध होऊ शकतात. यामुळे विशेषत: अनुभवी व नवागत उत्तीर्ण उमेदवारांना समान प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. रोजगार संधींचे प्रमाण हे ‘लॉकडाऊन’ उठल्यानंतर काही प्रमाणात का होईना पण निश्चितपणे वाढणार आहे.

दरम्यान, संगणक विज्ञान-सेवा क्षेत्रातील अग्रगण्य अशा ‘एचसीएल’ कंपनीने कोरोनानंतर आपल्या उद्योगाला नव्याने चालना देण्यासाठी नव्याने उत्तीर्ण झालेल्या सुमारे १५ हजार उमेदवारांची निवड करण्यासाठी जोमाने तयारी सुरु केली होती. गेल्या वर्षी ‘एचसीएल’ कंपनीने अशा प्रकारे नऊ हजार उमेदवार नव्याने नियुक्त केले होते. रोजगार संधींच्या संदर्भात बदलत्या व आशादायी परिस्थितीच्या दृष्टीने ही मोठीच संधी ठरली आहे.

दत्तात्रय आंबुलकर, एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0