कोक्राझारः गरीबी व कोविड-१९ महासाथीत हाताला काम मिळत नसल्या कारणाने एका स्थलांतरित मजुराने आपली १५ दिवसांची मुलगी ४५ हजार रु.ला विकण्याची धक्कादायक घट
कोक्राझारः गरीबी व कोविड-१९ महासाथीत हाताला काम मिळत नसल्या कारणाने एका स्थलांतरित मजुराने आपली १५ दिवसांची मुलगी ४५ हजार रु.ला विकण्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. या संदर्भात पोलिसांनी मानवी तस्करीच्या आरोपाखाली तिघांना अटक केली. यात दोन महिला तसेच आपल्या मुलीची विक्री करणार्या मजुराचा समावेश आहे
ही घटना कोक्राझार जिल्ह्यातील धनतोला मंडारिया गावात घडली असून दीपक ब्रह्मा या स्थलांतरित मजुराने आपली मुलगी विकली. दीपक ब्रह्मा गुजरातमध्ये काम करत होता व लॉकडाऊनच्या काळात त्याला आसाममध्ये परतावे लागले होते. तो अनेक दिवस बेरोजगार होता, असे मानवी तस्करीच्या विरोधात काम करणार्या बिगर सरकारी संस्था निदान फाउंडेशनचे अध्यक्ष दिगंबर नर्जरी यांनी सांगितले.
दिगंबरच्या बायकोला लॉकडाऊनच्या काळात मुलगी झाली व त्याच्या हाताला रोजगार नसल्याने व सर्व पुंजी संपल्याने त्याने आपल्याच नवजात मुलीला २ जुलैला ४५ हजार रु.ला विकण्याचे कृत्य केले. आपली मुलगी विकली असल्याचे लक्षात आल्याने दीपकच्या बायकोने व गावातील काही जणांनी पोलिसांमध्ये लगेच तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन महिला व दीपकला ताब्यात घेतले. अटक झालेल्या दोन महिलांनी, त्यांच्या एका नातेवाईकाला मूल नसल्याने दीपकच्या नवजात मुलीला विकण्याचा निर्णय घेतला, असे सांगितले.
देशात अनेक राज्यात काम करत असलेले आसामचे श्रमिक घरी आल्याने ग्रामीण भागातील परिस्थिती कठीण झालेली आहे. लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत, शिवाय लॉकडाऊनमुळे राज्यातही रोजगार मिळत नाहीत. त्यात गेले १० दिवस आसाममध्ये महापुराने हाहाकार माजवला असून राज्यातल्या ३३ जिल्ह्यांतील २६ जिल्हे पुरग्रस्त झाले आहेत. या पुराचा फटका २८ लाखाहून अधिक लोकांना बसला आहे.
मूळ बातमी
COMMENTS