नवी दिल्ली : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन हे ‘पॉझ बटन’ असून एक मोठी रणनीती आखून मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्यास व देश एकजुटीने उभा राहिल्य
नवी दिल्ली : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन हे ‘पॉझ बटन’ असून एक मोठी रणनीती आखून मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्यास व देश एकजुटीने उभा राहिल्यास कोरोनाचा पराभव अटळ असल्याचे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. कोरोनाविरोधातील लढाई ही दीर्घकालीन असून तिच्यावर आपण विजय मिळवला असे समजू चालू लागलो तर ती घाई ठरेल आणि देशाला मोठे नुकसान सोसावे लागेल, असे ते म्हणाले.
गुरुवारी राहुल गांधी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी राज्ये व जिल्ह्यांना सशक्त करण्यावर केंद्र सरकारने भर द्यावा व न्याय्य योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांपर्यंत मदत पोहोचवावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले. मी सरकारवर टीका करत नाही पण रचनात्मक पातळीवर सर्व विरोधी पक्षांनी व जनतेने एकजुटीने कोरोनाशी लढले पाहिजे असे स्पष्ट करत लॉकडाउन हे एक ‘पॉज बटन’ असून ते कोरोनावरचे उत्तर नव्हे, एकदा लॉकडाऊनमधून आपण बाहेर पडू तेव्हा हा विषाणू पुन्हा पसरू शकतो. त्यामुळे अधिकाधिक चाचण्यांवर आपण भर दिला पाहिजे व ती पावले शिस्तबद्धरित्या टाकली पाहिजेत, असे ते म्हणाले.
कोरोना विषाणूविरोधात सर्वात मोठे शस्त्र चाचण्या असून या चाचण्यांमुळे आपल्याला कोरोनाचा संसर्ग कुठे पसरत चालला आहे, याची माहिती मिळू शकते. आपल्याकडे सध्या १० लाख लोकसंख्येमागे केवळ १९९ चाचण्या केल्या जात आहेत, त्या पर्याप्त नाहीत याकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.
खरी ताकद राज्ये व जिल्ह्यांकडे
राहुल गांधी यांनी कोरोनाशी दोन हात करायचे असतील तर त्यासंदर्भातले खरे सामर्थ्य राज्ये व जिल्ह्यांकडे असल्याचा मुद्दा उपस्थित केला. आपला लोकसभा मतदारसंघ वायनाड जिल्ह्यात कोरोना रोखण्यात आलेले यश त्यांनी सांगितले. कोरोनाविरोधातील लढाई समाजाच्या स्तरात खालून वर (बॉटम अप) लढली पाहिजे वरून खाली (टॉप-डाऊन) नाही असे सांगत पंतप्रधानांनी या घडीला राज्ये सशक्त केली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. सध्या केंद्राकडून राज्य सरकारला ज्या गतीने मदत मिळायला हवी ती मिळत नसून कोरोनाशी लढताना आता वैद्यकीय व आर्थिक पातळीवर संघर्ष करावा लागत आहे, या दोन्ही आघाड्यांवर व्यूहरचना आखली पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले.
केंद्राने जाहीर केलेले १ लाख ७० हजार कोटी रु.चे आर्थिक पॅकेज अपुरे असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी आता बेरोजगारी वाढीला सुरूवात झाली असून त्याचे गंभीर रुप आपल्यापुढे उभे राहील अशी भीती व्यक्त केली. रोजगार देणारी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करायला हवे तसे बड्या कंपन्यांसाठीही मदत जाहीर केली पाहिजे, असे त्यांनी मत व्यक्त केले.
न्याय योजनेचा आग्रह
राहुल गांधी यांनी न्याय योजनेचा सरकारने वापर केला पाहिजे असे सांगत देशातील २० टक्के जनतेच्या खात्यात थेट पैसे गेले पाहिजेत अशी सूचना केली. न्याय्य योजनेला सरकारने कोणतेही नाव द्यावे पण ही योजना प्रत्यक्षात आणावी अशी विनंती केली. देशात अन्नधान्याच्या कोठारातील धान्य गरीबांसाठी खुले करावे हे धान्य केवळ रेशन कार्डवाल्यांना नको तर सर्व गरजूंना खुले करावे, अन्न सुरक्षा योजनेचा मार्ग तयार करावा असेही सरकारला सांगितले. आम्हाला कशाचेही क्रेडिट नको आहे, अपेक्षाही नाही. ज्यांना घ्यायचे आहे त्यांनी घ्यावे. आमच्या दृष्टीने देशातील जनता महत्त्वाची आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
या संकटाच्या काळात कोणीही घाबरून जाऊ नये. भारत कोणत्याही आव्हानांचा सामना करू शकतो. आपण सर्वजण या विषाणूला हरवूया. या संकटानंतर भारत सर्वाधिक वेगाने पुढे जाईल, असेही राहुल गांधी म्हणाले.
मूळ बातमी
COMMENTS