अतर्क्य शक्तीवरील दीर्घकाव्य

अतर्क्य शक्तीवरील दीर्घकाव्य

महात्म्यांची नामसमृद्धी शब्दश: आकाराला येण्यासाठी नेमके शब्द चिमटीत पकडणे हे काम तसे कठीण असते. त्यासाठी हवा असणारा शब्दसंग्रह लेखक किंवा कवींच्या जवळ

बिहार-उ. प्रदेश सीमेवर गंगेत ७१ मृतदेह आढळले
राज्यामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन
शैलीदार आद्यनायक

महात्म्यांची नामसमृद्धी शब्दश: आकाराला येण्यासाठी नेमके शब्द चिमटीत पकडणे हे काम तसे कठीण असते. त्यासाठी हवा असणारा शब्दसंग्रह लेखक किंवा कवींच्या जवळ असेल तर सुंदर कलाकृती आकाराला येते. हा अनुभव महात्मा गांधी या महापुरुषावरील महावीर जोंधळे यांनी लिहिलेल्या ‘जमीन अजून बरड नाही’ हे दीर्घकाव्य वाचताना अनुभवाला येतो. यातून महात्म्याची व्यक्तीवैशिष्ट्ये नवतेने आकाराला आलेली दिसतात. अलंकारविरहित हे काव्य जिव्हाळ्याचे वाटते ते यासाठी. ते या दीर्घकवितेत म्हणतात-

बापू,
उसळून येणारा पाऊस,
तुम्ही माणसात पाहिला
स्वातंत्र्याचे ढग आभाळात
जमवून आल्यावर.
पण, मी तो पाहिला गांधींच्या चालण्यात,
एक उसळता पाऊस.

उसळणं, कसं असतं हे तुम्हालाही कळेल कदाचित. या कवितेत एक सूत्र दिसते ते, बारीक-सारीक घटकांना,  अनुभवांना अर्थपूर्णता देऊन वाचकांस स्थिर करण्याचा प्रयत्न. या दीर्घ कवितेत गांधीजींच्या गुणात्मक वजाबाकीचे व्यवहार आणि वर्तमानातील भावनिक मानसिक गोळाबेरीज शब्दस्वातंत्र्याच्या मुक्तधर्माशी संलग्न ठेवून त्यात निर्माण केलेला गोडवा महात्म्याची नामसमृद्धी स्पष्ट करतो. शब्दांची पुनरावृत्ती होऊ न देता हे काम करणे सोपे नसते.  एकतर महात्मा गांधींचे व्यक्तिमत्व गुंतागुंतीचे, त्यामुळे आशय घटकातील अर्थपूर्णता, विवेचक शैलीद्वारे त्यात आलेली अर्थपूर्णता गुणात्मक दृष्टिकोनाचा विचार करता, वस्तुनिष्ठता स्पष्ट करते.

भावाशय आणि वैचारिक देवाणघेवाण कविला अपेक्षित असलेल्या नव्या वाटा शोधण्यास मदत होताना दिसते. म. गांधींवरील काव्य-लेखन मराठीत कमीच आहे. पारंपरिक लेखनातून  गांधीजी समजावून सांगण्याचा ध्यास अनेकांनी मूर्त स्वरूपात आणला. मत-भेदांसह तो स्वीकारलाही गेला. त्यातून उभे-आडवे अर्थ काढून वेगवेगळ्या पद्धतीने आकलनाचे प्रयत्न झाले, परंतू, ‘जमीन अजून बरड आहे’ या कवितेचा आकृतीबंध हा नेहमीच्या प्रतिमा-सृष्टीपेक्षा अधिक वेगळा वाटण्याचे कारण म्हणजे ही कविता शब्दश: अर्थसंबंधांना काळजीपूर्वक जपत जाते. आशयाचे प्रकटीकरण मोजक्या, नेटक्या ओळीतून स्वाभाविकपणे येत जाते.

महावीर जोंधळे यांनी विषयाचा आकार, पोत, रंग, रूप यांच्यावर केलेली मेहनत पृष्ठावर दिसत असली, तरी ती गांधीजी या विषयाच्या आवाक्याला वेगळे पैलू पाडताना दिसते. आणि हेच ‘जमीन अजून बरड नाही’ या कवितेचे महत्त्व मराठीच्या काव्यप्रांतात घेऊन येताना दिसते.

संपन्न विपन्नाचा
खेळ मांडला नाही
आपसूक पसरली काया
फुलवित मेघमाया.
गात्र-गात्र
झाले सतपात्र
मानव वास्तव
निरखून बघता बघता
कळून येते वास्तव
झपाटलेल्या बरगड्याही
कार्य करताना बघणे
आपल्यासाठी,
अनिकेतांच्या
दु:खासाठी.

एकमेकांत गुंतत गेलेली आशयघनता अक्षरसमूहाला न्याय देणारी ठरते. म. गांधींच्या विराट कार्याला संदर्भीय अर्थ देत ती एखादा वृक्ष बहरून यावा तशी येते. भावाभिव्यक्तीचा तोल आणि डौल नजरेत भरून टाकते आणि वाचकाला लपेटून टाकते.

नौखालीत पडलं पाऊल
तेव्हा,
कडाडत्या विजा थांबल्या.
ज्वालांची झाली फुले
लोहगोल झाले अचंबित
तळ्यात उतरत.
शांत सावल्या
चंद्रासाठी आतुरलेल्या
शीतलतेच्या उंबरठ्यावरच
लक्ष लक्ष पावले, थबकली
निरपेक्ष तळावर
शांती कोरीत
अज्ञानाची संगत सोडत.

गांधीजींच्या जीवनातील नागवे सत्य ज्यांच्या बुबुळांना पेलवत नाही त्यांचे नेमके काय करायचे…? हा प्रश्न कवी महावीर जोंधळे यांना पडतो आणि ते विषण्ण मन:स्थितीत म्हणून जातात, “बापू, काँक्रिटच्या जंगलांना आजही तुमच्या हातातील अदृश्य काठीचा आवाज सहन होत नाही. तुमचा फक्त नामोच्चार झाला तरी बहुमजली इमारती आणि जंगलराज थरथरायला लागते.

प्रतिमा जेव्हा मूळ वस्तूरूप घेऊन येते, तेव्हा संपूर्ण काव्य संवेदनरूपच घेऊन येते. हे रूप अनेकांनी दुभंगण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नाचे अचूक रूप कवी आपल्यासमोर ठेवतो. आजही गांधींच्या विचाराच्या पावलांचा कानावर पडला तरी ‘ही’ मंडळी गाढ झोपेतून उठून जागले कसे होतात या काव्यबांधणीतील गढण फक्त कवीपुरती मर्यादित न राहता ती आपोआपच शब्दांची होत जाते. अंतरा-अंतराने येणारे काव्याचे तुकडे स्पष्ट भूमिका घेऊनच अस्तित्वमान होतात.

‘आता कोरड्या ढगालाही विमान लागतं
मातीवर
उतरण्यासाठी
तुमचे वारस
तालेवार झाले
पुराण कथा
सांगत सांगत.’

वर्तमानात गांधीजींचे अस्तित्व बदलून टाकण्याचे पूर्वग्रहदूषित आजचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत असले तरी कवी या खालील ओळीतून आशावाद निर्माण करतो.

तुमच्या सांडलेल्या
रक्तातून उगवेल
पुन्हा नवी पहाट,
बापू,
अजून आमची जमीन
बरड झाली नाही!

जमीन अजून बरड नाही!
महावीर जोंधळे
आर्ष पब्लिकेशन्स

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0