चंपारण चळवळीचे सामर्थ्य

चंपारण चळवळीचे सामर्थ्य

म. गांधींच्या चंपारण चळवळीच्या माध्यमातून ब्रिटिश प्रशासनाला थेटपणे आव्हान देण्याबरोबरच अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, आणि स्वतःच्या नियमांना अनुसरून वर्तन करणे, याबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये आशा निर्माण करण्याचा हेतू होता. हा हेतू साध्य झाला व जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला. डॉ. युसूफ बेन्नूर यांचे ‘चंपारण मूव्हमेंट अँड सोशल अॅक्शन’ हे पुस्तक या चळवळीचा परामर्श घेते.

केंद्रीय गृहमंत्रालयाचा संघराज्य तत्त्वावर पुन्हा घाला?
फेसबुकच्या धोरणावर कंपनीतल्या ११ कर्मचाऱ्यांचे पत्र
टीआरपी रॅकेटमध्ये रिपब्लिक टीव्ही

१९१७ साली बिहारच्या चंपारण जिल्ह्यात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली जी चळवळ सुरू झाली, ती भारतातील पहिली असहकार  चळवळ म्हणून मानली जाते. ही चळवळ म्हणजे, महात्मा गांधींच्या सत्याग्रहाचाच एक भाग होता. या चळवळीद्वारे सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचे समाजाच्या तळागाळातील दुर्बल लोकांकडून अनुकरण करण्यात आले. या चळवळीमुळे कामगार, शेतकरी, महिला, हरिजन यांच्यातील एकात्मिक शक्तीची ओळख समाजाला झाली. महात्मा गांधींच्या  दृष्टिकोनातून ही चळवळ दोन कारणांसाठी महत्त्वाची होती. एक म्हणजे – या चळवळीच्या माध्यमातून ब्रिटिश प्रशासनाला थेटपणे आव्हान देणे आणि दुसरे म्हणजे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, आणि स्वतःच्या नियमांना अनुसरून वर्तन करणे, याबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये आशा निर्माण करणे. या घटकांबाबत आशा निर्माण झाल्या मुळे आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण झाल्यामुळे चंपारण्य चळवळ यशस्वी ठरली.

प्रस्तुत ग्रंथांचे चार प्रकरणांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. पहिल्या प्रकरणांमध्ये चंपारणची चळवळ ही महत्त्वपूर्ण का ठरली? या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. निळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यासाठी ब्रिटिशांकडून भारतीय शेतकऱ्यांना जबरदस्ती केली जात होती कारण भारतात उत्पादित झालेली नीळ त्यांना इंग्लंडला पाठवायची होती. त्यांच्याकडून भारतीय शेतकऱ्यांचे या कारणास्तव शारीरिक व आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणावर होत होते. महात्मा गांधींना या शेतकऱ्यांच्या समस्येची, वेदनेची जाणीव झाली, ते या चळवळीत सहभागी झाले. गांधीजी या चळवळीत सहभागी झाले नव्हते, तो पर्यंत भारतीय शेतकऱ्यांनी ब्रिटिशांना कोणत्याही प्रकारे विरोध केला नाही. महात्मा गांधींनी मात्र या शेतकऱ्यांच्या हाती असहकार आंदोलनाचे शस्त्र दिले आणि ब्रिटिशांना त्यांच्याबरोबर चर्चा करण्यात आणि वाटाघाटी करण्यास प्रवृत्त केले. लुईस फिश्चर, डी. जे. तेंडुलकर, बी. आर. नंदा, रॉबर्ट पेने, एरीक एरिकसन, प्यारेलाल, सुशीला नायर इत्यादीनी चंपारण चळवळीबाबत जे विचार व्यक्त केले आहे त्याचे संदर्भ प्रस्तुत प्रकरणात दिले आहेत.

या चळवळी संबंधीच्या महत्त्वपूर्ण घटना म्हणजे  योग्य नेतृत्व, राजकीय एकात्मता, राजकीय निर्णय इत्यादी बाबत या प्रकरणात विस्तृत चर्चा केली आहे. विशेष म्हणजे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची बीजे या चंपारण चळवळीतच रुजलेली आहेत त्यामुळे वाचकांना स्वातंत्र्यपूर्व काळाचा पुन:प्रत्यय येईल.

दुसऱ्या प्रकरणात, दक्षिण आफ्रिकेतील युरोपियन शेतकऱ्यांबाबत महात्मा गांधीजींची नेमकी भूमिका काय होती? या बाबत सविस्तर आणि प्रबोधनात्मक विवेचन केले आहे. चंपारण चळवळ यशस्वी झाल्यामुळे अनेक तज्ज्ञांनी महात्मा गांधी हे एक राजकीय रणनीतीकार, स्वातंत्र्य सैनिक आणि एक समाज सुधारक आहेत असे मत व्यक्त केले होते. महात्मा गांधीजींनी विविध तंत्राचा अवलंब करून सत्याग्रह मोहीम अंमलात आणली. त्यामुळे त्यांच्या अंगी असलेला व्यवस्थापकीय दृष्टिकोनाची ओळख जगाला झाली. इतर समाज सुधारक, राजकीय नेते काय म्हणतात, त्याचे विचार काय आहेत या बाबत महात्मा गांधीजींनी फारसा विचार केला नाही. भारतात नेमकी परिस्थिती काय आहे याचा सर्वंकष अभ्यास करून त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत अथवा विधाने करावीत, या मतावर महात्मा गांधी ठाम होते.

महात्मा गांधीजींना अटक झाल्यानंतर, जामिनावर सुटका करण्यासाठी जी रक्कम न्यायालयात भरावी लागते ती भरण्यास त्यांनी साफ नकार दिला आणि न्यायालयाचा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल असे ते  म्हणाले. त्यांच्या या ठाम विचारांमुळे आणि निर्धारांमुळे, जनतेचे प्रश्न, समस्या, सामाजिक मूल्ये, अहिसावादी तत्वाचे गुण व फायदे, शांती इत्यादी घटकांच्या संदर्भातील त्यांचा दृष्टिकोन दिसून येतो.

शेतकऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास करणे, त्या बाबत संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल देणे. अहिंसक तत्त्वाचा अवलंब करून जनतेला एकत्रित करणे. शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे इत्यादी रणनीती तत्वे त्यांनी अवलंबली होती. या बाबत, दक्षिण आफ्रिकेत असताना कार्यानुभव आले होते या संदर्भातही सविस्तर विवेचन या प्रकरणात केले आहे.

प्रस्तुत ग्रंथांचे तिसरे प्रकरण हे केवळ गांधीजींनी चंपारण चळवळीत अंमलात आणलेली रणनीती आणि तंत्रे यांच्याशी संबंधित आहे. सत्याग्रहाची संकल्पना ही काही अपरिवर्तनीय तत्त्वावर आधारलेली आहे. ही तत्वे म्हणजे – अहिंसा, असहकार, सत्य आणि प्रामाणिकता. महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाची ही तत्त्वे केवळ राजकीय हत्यार म्हणून वापरले नाही तर, बहुजन समाजात राजकीय जाणीव निर्माण करून, त्या जाणिवेचा धर्म आणि तत्वज्ञानाशी संबंध जोडून, आध्यात्मिक ध्येयवाद आणि वैश्विक शांततेचे प्रकटीकरण करण्यासाठी सुद्धा या तत्त्वाचा विचार त्यांनी केला. सत्य, अहिंसा, प्रेम, प्रामाणिकता आणि शांती इत्यादीं बाबत महात्मा गांधीजींनी जनतेला उपदेश केला. त्यांच्या या तत्वांचा प्रभाव, मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला यांच्या सारख्या नेत्यावर देखील पडला होता.

चौथ्या प्रकरणांमध्ये चंपारण चळवळी संदर्भात आधारभूत अशी सैद्धांतिक पार्श्वभूमी विशद केली असल्यामुळे सर्व प्रकारच्या वाचकांना हे प्रकरण वाचण्यास नक्कीच आवडेल. ब्रिटिश राजवटीच्या इतिहासात ‘सत्याग्रह’ सारखी एक नाविन्यपूर्ण संकल्पना, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि शोषित वर्गातील लोकांकडून ब्रिटिश राजवटीच्या विरोधात अंमलात आणली तेव्हा त्याचे अपेक्षित असे परिणाम दिसून आले. त्यामुळे सत्याग्रहाच्या या नावीन्यपूर्ण संकल्पनेकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधले गेले. ब्रिटिशांची सत्ता ज्या-ज्या देशात होती, त्या-त्या देशातील जनतेने भारतातील सत्याग्रह आंदोलनाकडून प्रेरणा घेऊन ब्रिटिशांविरोधात आंदोलने केली. म्हणून जगभरातील ब्रिटिश राजवटीविरोधात स्वातंत्र्य संग्रामाची बीजे ही भारतात रुजली गेली, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

हिंदू-मुस्लिम ऐक्य, जातीय सलोखा, वैश्विक शांतता, हिंसाचार मुक्त जग, परस्पर संवादाच्या माध्यमातून माणसांच्या समस्यांवर उपाय योजना करणे, निराशावाड्यांमध्ये आशा जागृत करणे, असहाय शेतकऱ्यांना आत्मघात करण्यापासून रोखणे, नागरिकांचा विधायक कार्यक्रमातील सहभाग, इत्यादी बाबत संपूर्ण जगाला चंपारण चळवळीच्या निमित्ताने ओळख झाली. संघर्ष निवारण, समुदाय सहभाग, समाजकार्य, मानववंशशास्त्र, सामाजिक कायदे, कल्याणकारी अर्थशास्त्र, सक्षमीकरणाचे धोरण, चांगले प्रशासन, इत्यादी बाबत त्याच बरोबर सत्याग्रह आणि स्वातंत्र्य लढ्याच्या विविध पैलूंचे सहजपणे आकलन होण्याच्या दृष्टीने या ग्रंथाचे आवर्जून वाचन करायला हवे.

चंपारण मूव्हमेंट अँड सोशल अॅक्शन
डॉ. युसूफ बेन्नूर
करंट पब्लिकेशन्स, आग्रा (२०२२)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0