अमेरिकी कवयित्री लुईस ग्लुक यांना साहित्याचे नोबेल

अमेरिकी कवयित्री लुईस ग्लुक यांना साहित्याचे नोबेल

नोबेल समितीचे अध्यक्ष अँडर्स ओल्सोन ग्लुक यांच्या साहित्याबद्दल लिहितात, "ग्लुक यांच्या सर्व साहित्यात स्पष्टतेसाठी धडपड आहे. बालपण आणि कौटुंबिक आयुष्य, आईवडील व भावंडांसोबत असलेले घट्ट नाते हा विषयवस्तू त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीत मध्यवर्ती आहे.

साधेपणातील सौंदर्याचा आविष्कार घडवणाऱ्या काव्याच्या माध्यमातून मानवी अस्तित्वाला वैश्विक आयाम देणाऱ्या अमेरिकी कवयित्री लुईस ग्लुक यांना गुरुवारी २०२० सालासाठी साहित्याचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.

१९६८ मध्ये फर्स्टबॉर्न या काव्यसंग्रहासह साहित्याच्या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या लुईस ग्लुक लवकरच अमेरिकेतील समकालीन साहित्यातील महत्त्वाच्या कवींपैकी एक म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या व त्यांचा साहित्य प्रवास सुरू झाला.

ग्लुक यांचा जन्म १९४३ मध्ये न्यूयॉर्क येथे झाला. सध्या त्या मॅसॅच्युसेट्समधील कॅम्ब्रिज येथे राहतात. लेखनासोबतच त्यांनी येल युनिव्हर्सिटीमध्ये इंग्रजी साहित्याच्या अध्यापनाचे कामही केले आहे. ग्लुक यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. १९९३ मध्ये त्या पुलित्झर पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या, तर २०१४ मध्ये त्यांना नॅशनल बुक अवॉर्ड प्रदान करण्यात आले.

गेल्या ५२ वर्षांत ग्लुक यांचे १२ काव्यसंग्रह आणि काव्यावरील निबंधांचे काही खंड प्रकाशित झाले आहेत.

साहित्याचे नोबेल पारितोषिक स्त्री साहित्यिकाला प्रदान केले जाण्याची २०१० सालापासून ही चौथी वेळ आहे. मात्र, नोबेलच्या इतिहासात म्हणजे गेल्या ११९ वर्षात केवळ १६ स्त्री साहित्यिकांना या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. ७७ वर्षीय ग्लुक यांनी “या पारितोषिकासाठी निवड होणे हा सुखद आश्चर्याचा धक्का आहे” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणतात, “मला सतत चिंता वाटते ती दैनंदिन आयुष्य आहे तसे राखून ठेवण्याचीही, तेही आपल्या जवळच्या लोकांच्या साथीने.” ज्या वाचकांनी आपले साहित्य वाचलेले नाही, त्यांनी कोणत्याही काव्यसंग्रहापासून सुरुवात करावी, कारण, प्रत्येक संग्रह वेगळा आहे, अशी सूचना त्या करतात. मात्र, पहिल्या संग्रहापासून सुरुवात करू नये, कारण, त्याने कदाचित नवीन वाचकांना अपमानित झाल्यासारखे वाटू शकते, असेही त्या सांगतात.

नोबेल समितीचे अध्यक्ष अँडर्स ओल्सोन ग्लुक यांच्या साहित्याबद्दल लिहितात, “ग्लुक यांच्या सर्व साहित्यात स्पष्टतेसाठी धडपड आहे. बालपण आणि कौटुंबिक आयुष्य, आईवडील व भावंडांसोबत असलेले घट्ट नाते हा विषयवस्तू त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीत मध्यवर्ती आहे.

मात्र, त्यांच्या कवितांमधील ‘स्व’ नेहमीच आपल्या स्वप्नांमधून आणि भ्रमांमधून काय उरले आहे हे ऐकत असतो आणि या ‘स्व’च्या भ्रमांचा त्यांनी जेवढ्या कठोरपणे सामना केला आहे, तेवढा क्वचितच कोणी करू शकेल. आपल्या साहित्यातील आत्मचरित्रात्मक पार्श्वभूमीचे महत्त्व ग्लुक कधीच नाकारत नसल्या, तरी त्यांचे काव्य कन्फेशनल साहित्याच्या चौकटीत बसत नाही हे नक्की. कारण, त्यांची कविता नेहमीच वैश्विकतेच्या शोधात असते. त्या पुराणातून आणि अभिजात संकल्पनांतून प्रेरणा घेतात. त्याचे संदर्भ त्यांच्या साहित्यात नेहमी आढळतात. डिडो, पर्सेफानी आणि युरीडाइस यांसारख्या ग्रीक पुराणातील व्यक्तिरेखांचे आवाज म्हणजे नाकारलेल्यांची, शिक्षा झालेल्या, फसवले गेलेल्यांची प्रतीके आहेत आणि ते ‘स्व’मध्ये होणाऱ्या रूपांतराचे मुखवटेही आहेत. ते जेवढे व्यक्तिगत आहेत, तेवढेच वैश्विकही आहेत.”

ओल्सॉन पुढे लिहितात- “ट्रायम्फ ऑफ अॅकिलिस (१९८५) आणि ‘अॅराराट’ (१९९०) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाल्यानंतर ग्लुक यांचे अमेरिका व जगभरातील वाचक वाढत गेले. ‘अराराट’ या काव्यसंग्रहात तीन वैशिष्ट्ये पुन्हापुन्हा येतात. कौटुंबिक आयुष्यातील विषय, बुद्धिमत्तेचा साधेपणातून परिचय आणि रचनेतील सफाई या वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या काव्याला परिपूर्णता येते. आपल्या काव्यात अत्यंत साधी शब्दसंपदा कशी वापरायची हे या कवितांमुळे आपल्याला समजले असे ग्लुक यांनीही नमूद केले आहे. त्यांच्या कवितातील अत्यंत नैसर्गिक स्वर लक्ष वेधून घेणारा आहे. वेदनादायी कौटुंबिक नात्यांच्या उघड्यावागड्या प्रतिमा यात कठोरपणे येतात. या प्रतिमा कमालीच्या प्रांजळ आहेत व कोणत्याही आडपडद्याशिवाय येतात. त्यात काव्यात्मक अलंकारिक भाषेचा लवलेशही नाही.”

ग्लुक यांनी काव्यावरील निबंधांमध्ये इलियटच्या स्वरातील निकडीबद्दल लिहिले आहे, कीट्सच्या आतील आवाज ऐकण्याच्या कलेबद्दल लिहिले आहे, जॉर्ज ओपेनच्या ऐच्छिक मौनाबद्दल लिहिले आहे. या लेखनातून ग्लुक यांच्या काव्याबद्दलही बरेच काही उलगडत जाते. मात्र, श्रद्धेची साधी तत्त्वे नाकारताना ग्लुक यांची कविता जी तीव्रता आणि नाराजी दाखवते, त्यामुळे ती एमिली डिकिन्सन यांच्या कवितेच्या सर्वाधिक जवळ जाते.

लुईस ग्लुक यांची कविता केवळ आयुष्यातील स्थित्यंतरांत आणि गैरसमजांत गुंतलेली नाही, तर ती आमूलाग्र बदलाची आणि पुनरुज्जीवनाची कविता आहे. या कवितेत काहीतरी गमावल्याच्या खोल भावनेतून मारलेली भरारी आहे. ग्लुक यांना पुलित्झर पारितोषिक प्राप्त करून देणाऱ्या ‘द वाइल्ड आयरिस’ (१९९२) या काव्यसंग्रहातील ‘स्नोड्रॉप्स’ या कवितेत त्यांनी हिवाळ्यानंतर होणाऱ्या जीवनाच्या विलक्षण पुनरागमनाचे वर्णन केले आहे:

I did not expect to survive,
earth suppressing me. I didn’t expect
to waken again, to feel
in damp earth my body
able to respond again, remembering
after so long how to open again
in the cold light
of earliest spring –

afraid, yes, but among you again
crying yes risk joy

in the raw wind of the new world.

(आय डिड नॉट एक्स्पेक्ट टू सर्व्हाइव, अर्थ सरपासिंग मी.

आय डिड नॉट एक्स्पेक्ट टू वेकन अगेन,

टू फील इन डॅम्प अर्थ माय बॉडी एबल टू रिस्पॉण्ड अगेन,

रिमेंबरिंग आफ्टर सो लाँग हाऊ टू ओपन अगेन

इन द कोल्ड लाइट ऑफ अर्लीएस्ट स्प्रिंग-

अफ्रेड, येस, बट अमंग यू अगेन

क्रायिंग येस रिस्क जॉय इन द रॉ विंड ऑफ द न्यू वर्ल्ड.)

ग्लुक यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बदलाचा निर्णायक क्षण या कवितेत काहीशा विनोदी अंगाने, बोचऱ्या विनोदाच्या स्वरूपात येतो.  त्यांचा ‘व्हीटा नोव्हा’ (१९९९) या काव्यसंग्रहाची सांगता खालील ओळींनी होते: ‘आय थॉट माय लाइफ वॉज ओव्हर अँड माय हार्ड वॉज ब्रोकन/ देन आय मुव्ह्ड टू कॅम्ब्रिज.’ या काव्यसंग्रहाचे शीर्षक दाँतेच्या अभिजात ‘ला विता नोवा’ची आठवण करून देणारे आहे. आपली प्रेरणा बिअॅट्रिसच्या रूपातील नवीन आयुष्याचे साजरीकरण दाँतेच्या कवितेत आहे. ग्लुक यांच्या कवितेत मात्र हरवलेल्या प्रेम साजरे केले आहे.

‘अॅव्हर्नो’ (२००६) या ग्लुक यांच्या अप्रतिम काव्यसंग्रहात पर्सेफानीच्या दंतकथेचा द्रष्टा अन्वयार्थ आहे. त्यांच्या ‘फेथफुल अँड व्हर्च्युअस’ (२०१४) या अगदी अलीकडील काव्यसंग्रहाला नॅशनल बुकर पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या कवितेच्या आवाजाने पुन्हा एकदा वाचकांना हलवून टाकले, मृत्यूच्या प्रतिमेकडे ग्लुक यांनी या काव्यसंग्रहाद्वारे लक्षणीय दिमाखात व सहजपणे बघितले आहे. प्रवास किंवा काही स्मृती जागवत त्या स्वप्नाळू कथनात्मक कविता लिहितात आणि कधी डगमगून तर कधी नवीन दृष्टीने बघण्यासाठी विसावा घेतात. त्यांच्या कवितातील जग विखरून जाते ते जादूई रितीने पुन्हा एकत्र येण्यासाठीच.”

मूळ लेख

COMMENTS