द्वेषाच्या माहौलमध्ये मॅक्रॉन पुन्हा अध्यक्ष

द्वेषाच्या माहौलमध्ये मॅक्रॉन पुन्हा अध्यक्ष

इमॅन्युअल मॅक्रॉन दुसऱ्यांदा फ्रान्सचे अध्यक्ष झालेत.

सामान्यतः फ्रेच माणसं अध्यक्षाला दुसरी टर्म देत नाहीत, फुटवतात. फ्रेंच माणसांना सतत बदल हवा असतो. त्यांच्या अध्यक्षांकडून भरमसाठ अपेक्षा असतात, त्या कधीच पूर्ण होत नाहीत, लोकं त्यांना हाकलतात.

मॅक्रॉन कसे काय टिकले?

मॅक्रॉन मुळातच अध्यक्ष झाले ते मध्यममार्गी म्हणून. फ्रान्समधे अती डावे आणि अती उजवे असे पक्ष होते. लोकमतंही विभागलेलं होतं. डावे, उजवे, मध्यम मार्गी अशा विचारांची माणसं प्रत्येकी सुमारे वीस ते तेवीस टक्के होती. डाव्या लोकांनी ठरवलं की उजवे लोकं डेंजरस आहेत, तेव्हा कसंही करून त्यांना सत्तेत येऊ देता कामा नये. त्यांनी आपली मतं मध्यममार्गी, लिबरल, मॅक्रॉन यांच्याकडं सरकवली. २०१७ आणि २०२२ अशा दोन्ही निवडणुकांत तेच घडलंय.

उजव्या, नॅशनलिस्ट ल पेन यांचं आव्हान होतं. ल पेन बाहेरून येणाऱ्या लोकांच्या विरोधात आहेत. त्यांचा मुसलमानांवर राग आहे. त्यांना युरोपियन युनियनमधे रहायचं नाहीये. या त्यांच्या मताशी आजघडीला फ्रान्समधली चाळीस टक्केपेक्षा जास्त माणसं सहमत आहे. मुसलमान लोकं दहशतवादी आहेत, ती माणसं फ्रेंच संस्कृती बिघडवत आहेत असं या लोकांचं मत आहे. अरब, आशियाई इत्यादी उपरे बाहेरून फ्रान्समधे येतात, फ्रेंचांच्या नोकऱ्या बळकावतात, फ्रेंच संस्कृतीपासून फ्रान्सला दूर नेतात असंही या लोकांना वाटतं. आपण फ्रेंच म्हणजे थोर. युरोप, युके, अमेरिका इत्यादी कोणाही पेक्षा थोर अशी एक जोरदार सांस्कृतीक अस्मिता या लोकांमध्ये आहे.

पण उरलेल्या लोकांना तसं वाटत नाही. तसं मॅक्रॉनना वाटत नाही. फ्रान्सनं जगाबरोबर राहिलं पाहिजे, युरोपबरोबर राहिलं पाहिजे, एकीनं राहिलं पाहिजे, द्वेषाचं राजकारण करता कामा नये असं त्या लोकांना, मॅक्रॉनना वाटतं.

ल पेन किंवा देशीवादी लोकांची संख्या गेल्या दहा वर्षात फ्रान्समधे वाढलीय. फ्रान्समध्ये झालेले दहशतवादी हल्ले देशीवादी भावना बळकट करतात. दहशतवादी हल्ले करणारी माणसं मुसलमान होती, पण फ्रेंच होती. ती फ्रान्समधेच जन्मली वाढली होती. त्यामुळं ल पेन मागणी करत होत्या की कोणालाही जन्मामुळं नागरीकत्व मिळता कामा नये.

वरवर हे म्हणणं तर्काला धरून वाटतं. पण फ्रान्समधे जन्मून फ्रेंच झालेले ९८ टक्के मुसलमान धर्मानं मुसलमान असले तरी संस्कृतीनं फ्रेंच असतात हेही वास्तव आहे. हे ९८ टक्के मुसलमान लोकशाहीवादी असतात, कायद्यानं वागणारे असतात. फक्त त्यांची उपासना पद्धती वेगळी असते, ते कपडे वेगळे घालतात, त्यांच्या अन्नामधे मसाले जास्त असतात. तेव्हां फ्रान्समधला नागरीक अमूक एक गोष्टीच खाणारा, अमूक एका प्रकारचेच कपडे वापरणारा, अमूक एका प्रकारचीच दाढी ठेवणारा, अमूक एक गाणी म्हणणाराच असावा असा आग्रह कितपत योग्य असा प्रश्न विचारणारेही फ्रेंच खूप आहेत. आधुनिक जगात नाना प्रकारची माणसं समाजात एकत्र येणार हे वास्तव लक्षात घेतलं तर नागरीकत्वाच्या कल्पना बदलायला हव्यात असा विचार करणारीही माणसं फ्रान्समधे आहेत. एकेकाळी हा विचार करणारे सत्तर टक्के असतील, आता ते फार तर पन्नास टक्क्यावर आलेत. दुसऱ्या गटातले लोकं एकेकाळी दहा टक्के असतील तर ते आता चाळीस टक्के झालेत.

युरोप, युके आणि अमेरिकेतही अशी विभागणी झालेली दिसतेय.

मॅक्रॉन हे आर्थिक बाजूनं विचार करणारे गृहस्थ आहेत. अडचण पहायची आणि मार्ग काढायचा अशी त्यांची विचाराची पद्धत आहे. फ्रान्समधले प्रश्न आर्थिक, तंत्रज्ञान या मुद्द्यांशी संबंधित आहेत. दहशतवाद ही एक स्वतंत्र समस्या आहे. ती स्वतंत्रपणेच सोडवायला हवी. पण मुख्य प्रश्न आर्थिक आहेत आणि त्याचा संबंध संस्कृतीशी कमी आहे असं ते ढोबळ मानानं मानतात.

२०१७ साली अध्यक्ष झाल्यावर त्यांना फ्रान्समधली बेकारी, विषमता आणि गरीबी या समस्यांचा सामना करायचा होता. त्यांनी संपत्ती कर रद्द केला. ते ज्या समाजवादी अध्यक्षाच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री होते ते समाजवादी खवळले. मॅक्रॉन भांडवलशहांचे पित्ते आहेत असा आरोप व्हायला लागला. मॅक्रॉननी कामाचे तास कमी केले, त्यामुळं अधिक व्यक्तीना रोजगार मिळाला. समाजवादी रागावले. प्राप्त परिस्थितीत मॅक्रॉननी गॅस, पेट्रोल इत्यादी वस्तूंवरचा कर वाढवला. त्यामुळं महागाई एकदम कडाडली.तमाम जनता मॅक्रॉनवर संतापली.

हिजाबवर बंदी घालून, फ्रान्समधे मिनार असता कामा नयेत आणि मिनारांवर भोंगे वाजता कामा नयेत असे कायदे करून फ्रान्समधली बेकारी कशी कमी होणार होती? फ्रेंच सरकारचं उत्पन्न कसं वाढणार होतं?

मॅक्रॉन यांचा विचार आणि कौशल्य बँकिंग या विषयातलं आहे. ते सरकारात अर्थमंत्री होते. त्या वाटेनं ते विचार करतात.

कोविडची साथ आली. त्या काळात वैज्ञानिक आणि अंजेला मर्केल यांच्यासारखे समजूतदार पुढारी सांगत होते त्या प्रमाणं लस आणि लॉकडाऊन आवश्यक होतं. मॅक्रॉननी ते मार्ग अवलंबले. फ्रेंच लोकं खवळले. त्यांना वाटलं की त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आलीय. लोकांनी लस घ्यायला नकार दिला, मास्क घालायला नकार दिला. आंदोलन केलं, दंगे केले. खुद्द मॅक्रॉनवरही हल्ला करण्याचे प्रयत्न झाला. मॅक्रॉन बधले नाहीत. परिणामी कोविड आटोक्यात आला.

कोविडनं खूप माणसं मेली होती. अर्थव्यवस्था कोसळली होती. बेकारीच्या संकटानं नवं रूप घेतलं होतं. मॅक्रॉननी देशभर दौरा करून लोकांची भेट घेतली तेव्हां आर्थिक संकट ही लॉकडाऊनची दुसरी बाजू त्यांच्या लक्षात आली. त्यांनी लॉक डाऊन सैल केला, शाळा सुरु केल्या, उद्योगाना परवानगी दिली.

हे झालं देशांतर्गत. युक्रेनवर रशियानं केलेल्या हल्ल्यानं युरोप अशक्त होत होता, विस्कटत होता. मॅक्रॉन युक्रेनच्या बाजूनं उभे राहिलेच पण युरोप पुन्हा एकसंध करण्याचा प्रयत्न केला आणि हळूच युरोपचं नेतृत्व मिळवलं. मर्केल निवृत्त झाल्यानंतरच्या नेतृत्वाच्या पोकळीत मॅक्रॉन खुबीनं शिरले आणि फ्रान्सला पुन्हा आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली.

मॅक्रॉन तरूण आहेत. एककल्ली आहेत. चाकोरीबाहेरचा विचार करणारे आहेत. त्यांच्या डोक्यात काही तरी असतं, ते पार पाडल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. मार्गात आड येणाऱ्या लोकांना ते दूर ढकलतात. स्वतःच नेमलेल्या पंतप्रधानालाही त्यांनी हाकलून दिलं. एकेकाळी ते एककल्ली, लोकांपासून काहीसे दुरावलेले, ऊच्चभ्रू वगैरे होते. पण ते शिकत गेले. लोकांमधे मिसळत गेले. लोकांना काय वाटतं याचा अनुभव घेत गेले. सुधारत गेले.

एकही सुरकुती चालणार नाही, असे सूट परिधान करणारे मॅक्रॉन कोट काढून खुर्चीला टांगून लोकांचं म्हणणं तासनतास ऐकू लागले. छत गळताय, जमीन भेगाळलीय, नळाला पाणी नाहीये, तावदानं फुटलेली आहेत, खिडक्या मोडल्या आहेत अशा शाळांत ते गेले, तिथल्या मुलांशी आणि त्यांच्या पालकांशी बोलले. एका मुलीनं तर त्यांना बिनधास्त विचारल- कां हो, तुम्हाला पगार किती मिळतो. मॅक्रॉननी अगदी करेक्ट आकडा सांगितला तशी ती मुलगी आश्चर्य चकीतच झाली. एकदा कोविड लशीला विरोध करणारा माथेकरू त्यांच्या अंगावर धावून गेला. सेक्युरिटी वगैरे बाजूला ठेवून मॅक्रॉन त्याला भिडले. आलिशान आणि भीती वाटावी अशा राजवाड्यात त्यांनी युट्यूबवर वावरणाऱ्या लोकप्रियांना बोलावलं आणि चूक की बरोबर हा खेळ खेळले. लाईव्ह.

रट्टे खाल्ल्यावर आता मॅक्रॉन फ्रेंचांना आवडू लागलेत.

फ्रेंच अध्यक्षाला तिसरी टर्म दिली जात नाही. त्यामुळं या टर्ममधे मॅक्रॉननी काही केलं नाही तर फरक पडत नाही.

पण मॅक्रॉन हा गृहस्थ चाकोरीतून जाणारा नाही. त्यामुळं फ्रान्स आणि युरोपसमोर उभ्या असलेल्या आर्थिक आणि सांस्कृतीक आव्हानांना तो भिडू शकेल. त्याच्या पद्धतीनं. तो काय करेल ते सांगता येत नाही.

त्यामुळंच नव्या टर्मबद्दल लोकांचं कुतुहुल वाढीस लागलेलं आहे.

निळू दामले लेख आणि पत्रकार आहेत.

COMMENTS